अध्याय ११ वा - आरंभ

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीगोविंदसद्गुरुमूर्तये नमः ।
सदयहृदया श्रीगोविंदा । आत्मनिरता पूर्णवरदा । अभेदबोधें नमितां पहा सच्चिदानंदा उपलब्धि ॥१॥
स्वात्मगतावलंबमात्र । विशुद्धसत्त्व जो स्वतंत्र । सर्वनियंता मायासूत्र - । चालक ईश्वर सर्वज्ञ ॥२॥
वामांगविलासवालभें । स्वाविष्कारें त्रिगुणक्षोभें । पांचभौतिक केलें उभें । आत्मप्रभे माजिवडें ॥३॥
आपुलें आपणामाजीं स्वप्न । स्फुरोनि उपजलें भेदभान । तेणें गुंतोनि जीवचैतन्य । करी भ्रमण भवनाशें ॥४॥
जन्ममरणाची घडामोडी । त्रिविध कर्माची परवडी । योनीमाजीं कोडीकोडी । न चुके भंवडी जीवाची ॥५॥
अविद्याशक्तिअंधकारें । स्वविस्मृतिनिद्राभरें । भ्रमे ब्रह्मचि विश्वाकारें । स्वप्नीं झांसुरे सुखदुःखें ॥६॥
त्या दुःखाचें निवारण । करावयासि करुणापूर्ण । विद्याशक्ति अवलंबून । स्वांगीं दक्षिणप्रदेशीं ॥७॥
जैसा चिंतूनि काशीक्षेत्रा । तदुपयोगी घेऊनि मात्रा । पदोपदीं क्रमितां गोत्रा । अवघी यात्रा रूपा ये ॥८॥
शुभसंकल्पें शुभाभिव्यक्त । अशुभें अशुभा व्यक्ति होत । इक्षु माधुर्यें वर्धत । कीं घेऊनि तैक्तगवाक्षा ॥९॥
जेणेंशीं जें होय वाढे । तें त्यासह म्हणणें घडे । सरस जळाचें नाम पडे । सताप उघडें अग्नीचें ॥१०॥
तेंवि भवीं बुडतयाचिये । जाकळोनि पूर्ण दये । तुझें रूपा येणें होये । म्हणोनि सदय अभिधान ॥११॥
शोध करितां जलगारेचा । रस आठोळी मज्जा त्वचा । जळा वांचोनि भेद याचा । न वदे वाचा कोणाची ॥१२॥
म्हणोनि दयेचीच तूं व्यक्ति । सर्वांवयवीं सदय मूर्ति । सदयहृदय ये व्युत्पत्ति । अभेदस्थिति स्फुट तुझी ॥१३॥
शापानुग्रहसमर्थ म्हणणें । किमर्थ तोषरोषाविणें । ऐसें म्हणाल तरी ये खुणे । अंतःकरणें विवरावें ॥१४॥
दुग्धप्राशन करी बाळ । तै मा धर्षण करी प्रबळ । बाऊ दावी त्या विकराल । परी नव्हे केवळ निर्दय ते ॥१५॥
तैसें प्राणी नेणती स्वहित । विषयासक्त आज्ञेरहित । क्षोभे त्यांच्या अनुग्रहार्थ । सदय समर्थ सद्गुरु तो ॥१६॥
लोभें क्षोभे हिताकारणें । परी ते निवृत्तीचें रूप नेणे । भवीं बुडवी सदयपणें । इतुकें उणें मातृत्वीं ॥१७॥
स्वसामर्थ्यें विवर्तगोडी । साधनक्रमें जो न सोडी । शापशस्त्रें त्यासी झोडी । मोडी खोडी नाथिल्या ॥१८॥
किंवा वर्णाश्रमाचारनिरत । सविश्वास ईश्वरभक्त । तत्प्रसादें जो विरक्त । इहामुत्रार्थफळभोगा ॥१९॥
नित्यानित्यविचारणा । करूनि अनित्यीं रमेना । नित्य स्वयुक्ति आकळेना । म्हणोनि साधना प्रवर्ते ॥२०॥
बाह्यइंद्रियप्रवृत्ति । विषयोन्मुख क्षोभे वृत्ति । तयेची करावया निवृत्ति । जोडी संपत्ति शमषट्क ॥२१॥
ऐसा मुमुक्षु शरणागत । त्यासि अवगमावया वास्तव नित्य । कृपेनें बोधूनियां वाक्यार्थ । निजपरमार्थ उपदेशी ॥२२॥
रोषें शापूनि अनधिकारी । दुर्गुण झाडूनि कृपेनें तारी । अनुग्रहचि दोही परी । रोषें तोषें सदयत्वें ॥२३॥
सदयहृदयतेची शोभा । रूपा आणी विश्ववालभा । आत्मप्रत्यय कैवल्यगाभा । ते चित्प्रभा श्री तुझी ॥२४॥
शर्करेचा केला द्रुम । फळें मूळें शाखा नाम । त्वचा कंटक भेद विषम । गोडी समसाम्यें अभेदें ॥२५॥
तेंवि दयाचि हृदयाकारें । होऊनि पसरे इंद्रियद्वारें । भूतहितार्थ व्यवहारे । भ्रमापहारें गोव्यक्ति ॥२६॥
भ्रमरहरणार्थ करणाकार । करूनि वृत्तीचा प्रकाश । सर्वज्ञ जाणता सर्वांतर । तूं सुखकर गोविंद ॥२७॥
तुज भजती जे सकाम । पुरविता तें तूं कल्पद्रुम । स्वगतमात्र भेदभ्रम । निष्काम प्रेम नेणती ॥२८॥
विमुख नेणतीच तुज कारणें । कां कीं दैवचि त्यांचें उणें । असो जे भजती आत्मैक्यखुणें । तूं पूर्णपणें त्यां वरद ॥२९॥
तुजहूनि ब्रह्मप्राप्ति येर । हाचि भजनाचा व्यभिचार । जें कां साराचें निज सार । ते साचार निजमूर्ति ॥३०॥
ब्रह्म सद्गुरु विश्व आपण । ऐसें चतुर्विध भेदभान । निरएस तैं तें अभेदभजन । त्रिपुटीविहीन आत्मैक्यें ॥३१॥
भजता आणि उपदेशिता । भजनोपचार जे सांगतां । भजा सहित एकात्मता । अभेद भक्तां गुरुवरें ॥३२॥
अहंक्रतुइत्यादि वचनीं । भगवद्गीतें चक्रपाणि । नवमाध्यायीं हे कहाणी । अर्जुनालागीं उपदेशी ॥३३॥
ऐसा अभेद अवगमून । गुरुमर्यादा नुलंघून । सप्रेमभावें सद्गुरुभजन । सच्चित्सुखघन प्रकाशे ॥३४॥
असद्विवर्ताध्यासलोप । अजड चिन्मात्र प्रकाशदीप । निर्विषयानंदस्वरूप । आपेंआप निवडे तै ॥३५॥
ऐशिया अभेद सप्रेम भजनें । श्रीचरणाचय अभिवंदनें । तोषोनि आज्ञापिलें वचनें । करुणापूर्णें गुरुवर्यें ॥३६॥
दशमाध्यायीं निरूपण । यमलार्जुनांचें उन्मूलन । धनदात्मजांचें उद्धरण । गुह्यकाख्यान संपलें ॥३७॥
पुढें एकादशाध्यायीं । काय करी शेषशायी । काय वर्तलें नंदालयीं । ते नवाई निरूपीं ॥३८॥
ऐशिये आज्ञेची दयांबुवृष्टि । तेणें दयाप्रचुर झाली सृष्टि । विश्वदयेची वाहवटी । झाली पैठी दयार्णवीं ॥३९॥
तेचि सर्वत्र दयेचें भरतें । भरूनि केलें पात्रां पुरतें । पूर्णानंदें हेलावतें । गुरुचरणांतें क्षालूनी ॥४०॥
आतां आज्ञापिलें जें काज । त्याची स्वामीस अवधी लाज । सालंकृत सलज्ज भाज । ते ऐश्वर्यवोज कांताची ॥४१॥
आपण पढवूनि पांखरूं । पढे तैं ऐकोनि हर्ष थोरु । तोचि एथींचा प्रकारु । कीर्ती विस्तारूं मम मुखें ॥४२॥
संत सज्जन श्रोतेजन । सद्गुरु जगदात्मा अभिन्न । शिकविलें तें करितां कथन । कीजे श्रवण संतोषें ॥४३॥
एकादशाध्यायीं कथा । गोकुळीं देखोनि महोत्पाता । मंत्र उपनंदें सांगतां । तो समस्तां मानला ॥४४॥
मग वसविलें वृंदावना । तेथें वत्सें चारितां कृष्णा । वधूं आले कंसआज्ञा । ते पावले मरणा वत्सबक ॥४५॥
इतुकी कथा अध्यायांत । रायासि सांगे व्याससुत । श्रोतीं होऊनि दत्तचित्त । परमामृत सेवावें ॥४६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP