अध्याय १ ला - श्लोक १५ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


सूत उवाच - एवं निशम्य भृगुनन्दन साधुवादं वैयासकिः स भगवानथ विष्णुरातम् ।
प्रत्यर्च्य कृष्णचरितं कलिकल्मषघ्नं व्याहर्तुमारभत भागवतप्रधानः ॥१५॥

सूत म्हणे भृगुनंदना । शौनकाचार्या दीर्घयाजना । परिसोनि परीक्षितीच्या सुधाप्रश्ना । आल्हाद मना शुक पावे ॥४८॥
श्रोता आणि सप्रेमळ । श्रवणीं सादर अर्थकुशल । विरक्त सर्वज्ञ दीनदयाळ । भगवच्छील भागवत ॥४९॥
ऐकोनि प्रश्नोक्ति साधुवाद । षड्गुणैश्वर्याचा कंद । व्यासऔरस शुक कोविद । ब्रह्मानंद पावला ॥४५०॥
गर्भीं रक्षी ज्या भगवंत । यालागीं परीक्षिति विष्णुरात । भला गा भला म्हणूनि पूजित । शुक समर्थ सुशब्दीं ॥५१॥
याउपरि बोले शुक । परम आल्हादें सकौतुक । तया अमृतघना चातक । त्यक्तोदक भूपति ॥५२॥
शंभु तोषे रामस्मरणें । इंद्र तोषे अमृतपानें । तेवीं कृष्णलीलापीयूषप्रश्नें । शुक निजमनीं तोषला ॥५३॥
जयाचें जें परमाभीष्ट । तें वर्णितां न मानी कष्ट । कोणी न पुसतां सोत्कंठ । पाहे वाट प्रश्नाची ॥५४॥
तया कृष्णकथेचा प्रश्न । प्रावृट् खवळी जैसा घन । तैसें उचंबळे मुनीचें मन । कृष्णकीर्तन सांगावया ॥४५५॥
ध्वांत विध्वंसी भास्कर । ताप निवारी सुधाकर । तेवीं कलिमलपर्वतावरी वज्र । पुण्यचरित्र कृष्णाचें ॥५६॥
आतां कृष्णकथेचा आरंभ । शुकमुखकल्पतरूचा कोंभ । तेथ श्रवणसुखाचा स्वेच्छालाभ । होय स्वयंभ श्रोतयां ॥५७॥
किती कल्पद्रुमाचीं फळें । किती सूर्याचीं प्रतिमंडळें । किती अक्षरांचे उमाळे । भारतीचे जिव्हाग्रीं ॥५८॥
तेवीं हरीचे अनंत गुण । अनंत भागवतांचे गण । त्यांत प्रधान चौदा जण । त्यांचें शिरोरत्न श्रीशुक ॥५९॥
शुकाचार्याचा जनक व्यास । राजा रुक्मांगद आणि अंबरीष । दैत्य म्हणती प्रर्‍हादास । जो हृषीकेशवल्लभ ॥४६०॥
व्यास जनक पराशर । पणजा वसिष्ठ ऋषीश्वर । बिभीषण राक्षसांमाजीं धीर । जेणें रघुवीर सेविला ॥६१॥
भृगुवंशीचा तूं मुनि शौनक । नारद आणि पुंडरीक । भीष्मार्जुन दाल्भ्य प्रमुख । सर्वां श्रीशुक प्रधान ॥६२॥
जन्मूनि विरक्त रिघतां वनीं । व्यास आळवी करुणावचनीं । वृक्षीं पाषाणीं निघती ध्वनि । अभेदज्ञानी मुनिवर्य ॥६३॥
याज्ञवल्क्यादि ब्रह्मनिष्ठ । श्रीकृष्णही असतां निकट । शुकें भक्षितां सिक्थोच्छिष्ट । अमोघघंटा गर्जत ॥६४॥
ऐसा अपार योगमहिमा । अशेष वर्णूं न शके ब्रह्मा । तोही कृष्णचरित्रक्रमा । नृपसत्तमा सांगतसे ॥४६५॥

श्रीशुक उवाच - सम्यग्व्यवसिता बुद्धिस्तव राजर्षिसत्तम । वासुदेवकथायां ते यज्जाता नैष्ठिकी मतिः ॥१६॥

मुनि म्हणे गा नृपसत्तमा । कलिमर्दना सार्वभौमा ।राजर्षीमाजीं तुझी गरिमा । सर्वोत्तमा पढियंती ॥६६॥
बुद्धि निश्चयातें वरी । ऐशी कृपा पारमेश्वरी । तेही सम्यक् बरवे परीं । तवांतरीं व्यवस्थित ॥६७॥
न सांगतां गर्भिणी पाहे । दोहदें चिन्ह प्रकट होय । तैशी प्रज्ञा कवळिली आहे । वैष्नवीय श्रद्धेनें ॥६८॥
भगवत्प्राप्तीचा जो योग । त्यासि नवां मार्गीं होय रीघ । त्या नवांचाही राजमार्ग । तो त्वां साङ्ग कवळिला ॥६९॥
श्रवण कीर्तन विष्णुस्मरण । पादसेवन अर्चन नमन । दास्य सख्य आत्मनिवेदन । यांचें जीवन श्रोतव्य ॥४७०॥
श्रवणभक्तीचा अधिष्ठाता । यशोधना अभिमन्युसुता । विसरलासि शारीर व्यथा । वासुदेवकथारसपानें ॥७१॥
जन्मसहस्रांचिया कोटि । तपें ध्यानें समाधि हट्टी । पापपर्वत कोट्यानुकोटि । जळतां पोटीं हे उपजे ॥७२॥
शतमख पुण्यें स्वर्ग वरित । पुण्यक्षयें त्या अधःपात । तैशी नव्हे श्रीकृष्णामात । हे परमामृतप्रापक ॥७३॥
ते कृष्नकीर्तिश्रवणीं मति । तुझी एकनिष्ठ गा भूपति । देखोनी माझी स्वानंदवृत्ति । हेलावती सप्रेमें ॥७४॥
सभाग्यासि जोडे परीस । गुणज्ञा निरूपणीं नवरस । जोडे मराळा मानस । तो उल्हास तव प्रश्नें ॥४७५॥

वासुदेवकथाप्रश्नः पुरुषांस्त्रीन्पुनाति हि । वक्तारं पृच्छकं श्रोतॄंस्तत्पादसलिलं यथा ॥१७॥

मुनि म्हणे गा भक्तोत्तमा । कृष्णकथेचा प्रश्नमहिमा । प्राश्निकां वक्त्यां श्रोत्यां समा । कैवल्यधामा पाववी ॥७६॥
भगवत्पादोद्भवा जान्हवी । शमलक्षालनीं समर्थ जेवीं । कृष्णकीर्ति जो श्रवणें सेवी । हे त्याचा नुरवी भवभ्रम ॥७७॥
तो त्वां कृष्णकथेचा प्रश्न । केला म्हणूनि सावधान । होऊनि ऐके निरूपण । सदस्यगणसमवेत ॥७८॥

भूमिर्दृप्तनृपव्याजदैत्यानीकशतायुतैः । आक्रान्ता भोरिमारेण ब्राह्मणं शरणं ययौ ॥१८॥
भूमीवरी मदोद्धत । भूपति आपणां म्हणवीत । शतसहस्र अयुतप्रयुत । केवळ दैत्य दुरात्मे ॥७९॥
उत्पथगामी क्रूर खळ । केवळ निर्दय चांडाळ । पृथक् सैन्याचे करिती मेळ । हलकल्होळ प्रजांसि ॥४८०॥
गायीब्राह्मणांसि करिती पीडा । पतिव्रतांची हरिती व्रीडा । वासुरा लेकुरां हंबरडा । चहूंकडां आकांत ॥८१॥
परस्परें विग्रह करिती । तेणें जगासि थोर विपत्ति । लेंकुरें माता नोळखती । आक्रंदती वियोगें ॥८२॥
भयें शरण आलिया पाहीं । नागविती ठायींच्या ठायीं । लोकापवादा भेणें देहीं । प्राण तेही न राखिती ॥८३॥
बलात्कारें स्त्रिया हरण । उत्तम करिती नीचवर्ण । विश्वासूनि हरिती प्राण । शठ दुर्जन आध्यांचे ॥८४॥
अभय देऊनि वधिती पाहीं । विश्वासाचा लेश नाहीं । सत्य बुडालें प्रलोभडोहीं । नीति कांहीं आढळेना ॥४८५॥
फाल्गुनोत्सवीं शंखस्फुरण । कोणें केलें पुसे कोण । निरपराधें विष्ठाशेण । होय दंडन साधूंसि ॥८६॥
अनेक अपशब्दांच्या वाणी । करिती भल्यांची विटंबणी । योग्यायोग्य अवगणी । कोण गणी ते ठायीं ॥८७॥
नीतिप्रवाहीं आटले प्राणी । क्षोभकल्कालमहिषाची डहुळणी । दृप्तनृपधीवरगणीं । जालश्रेणी घातल्या ॥८८॥
पीडा जीवमात्रजलचरां । आकांत मांडला चराचरां । ईश्वर न पावतां कैवारा । धरा थरथरां कांपत ॥८९॥
नीतिमार्गें जो श्रृंगार । अनीतिमार्गें तोची भार । सतीस तोषद भ्रतार । देखोनि जार प्राणांत ॥४९०॥
शुंठी मिरें लवण रामटः । भोजनीं मुखीं रुचिकर श्रेष्ठ । नेत्रीं घालितां हृदयस्फोट । तेवीं दुर्घट भू मानी ॥९१॥
तैसे अन्याय अकर्मकर । दुष्ट दुर्मद नृपतस्कर । त्यांचा सोसूं न शके भार । धरा फार त्रासली ॥९२॥
रसातळा जाऊं पाहे । अत्यंत धीर धरूनि साहे । शरण जाऊनि म्हणे त्राहें । प्रार्थिताहे विधीतें ॥९३॥

गौर्भूत्वाऽश्रुमुखी खिन्ना क्रन्दन्ती करुणं विभोः । उपस्थिताऽन्तिके तस्मै व्यसनं स्वमवोचत ॥१९॥

धेनुरूप धरूनि क्षिति । करुणास्वरें आक्रंदती । नेत्रीं बाष्पोदकें ढाळिती । मूर्च्छा पावती खिन्नत्वें ॥९४॥
जो सगुण सृष्टीचा स्रष्टा । सत्यलोकीं ज्या प्रतिष्ठा । तयासि भूमि आपुल्या कष्टा । दुष्ट चेष्टा निवेदी ॥४९५॥
महारोग होती उदरीं । ते आपुले आपणा न होती दुरी । मग तो सांगे धन्वन्तरी । तेवीं धरित्री स्रष्ट्यातें ॥९६॥
उभी राहोनि तयानिकटीं । दुःखें शब्द न फुटे कंठीं । स्रष्ट्याकारणें वृत्तान्तगोष्टी । महासंकटीं सांगितली ॥९७॥

ब्रह्मा तदुपधार्याथ सह देवैस्तया सह । जगाम सत्रिनयनस्तीरं क्षीरपयोनिधेः ॥२०॥

एकुलतिया बाळकाची माता । जेवीं कळवळे ऐकोनि व्यथा । तैशी सत्यलोकनाथा । क्षोणीची विकलता जाहली ॥९८॥
नागरी नगरीचीं देखोनि दुःखें । राजद्वारीं उभा ठाके । कां अनीति देखोनि धार्मिकें । महाशोकें पीडिजे ॥९९॥
सविस्तर धराशोक । ऐकोनि भारतीनायक । त्रिदशत्रिलोचनप्रमुख । धरेसहित चालिला ॥५००॥
जैसें चंद्राचें शुद्ध मंडळ । किंवा कैलासपर्वत सुढाळ । धवलधाम जाश्वनीळ । तैसा निर्मळ क्षीराब्धि ॥१॥
ध्याननिष्ठांचे विमलांतरीं । सद्भावशेषशयनावरी । श्रद्धालक्ष्मी सेवा करी । पहुडे मुरारि जगदात्मा ॥२॥
तो क्षीराब्धिगर्भीं पुरुषोत्तम । भक्तकामकल्पद्रुम । योगियांचा विश्रामधाम । मेघश्याम श्रीपति ॥३॥
तया क्षीराब्धीचिये तीरीं । ब्रह्मा जाऊनि सहनिर्जरीं । चित्तैकाग्र्यें स्तवन करी । सविस्तरीं तें ऐका ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP