मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १ ला| श्लोक १ ते ७ अध्याय १ ला श्लोक १ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १४ श्लोक १५ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २९ श्लोक ३० ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४३ श्लोक ४४ते ४७ श्लोक ४८ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६९ श्लोक ७० ते ७२ अध्याय १ ला - श्लोक १ ते ७ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ७ Translation - भाषांतर राजोवाच - कथितो वंशविस्तारो भवता सोमसूर्ययोः । राज्ञां चोभयवंशानां चरितं परमाद्भुतम् ॥१॥राजेंद्र म्हणे जी योगींद्रा । वाङ्मयामृतवदनचंद्रा । आल्हाद होय चित्तचकोरा । श्रवणनयनीं प्राशितां ॥४३॥चंद्र सूर्य वंश दोन्ही । त्यांचे विस्तार कथिले मुनि । दोही वंशांचे चूडामणि । अनेक राजे वर्णिले ॥४४॥त्यांचें अत्यद्भुत चरित्र । श्रवणें लोकत्रय पवित्र । तृप्ति न मानिती माझे श्रोत्र । प्रश्न विचित्र वांछिती ॥२४५॥जंववरी तृप्ति नाहीं पोटीं । तोंवरी भोक्ता लाळ घोंटी । आत्मप्राप्ति नसतां हट्टी । साधनसंकटीं शिणेना ॥४६॥तरी न टाकतां गंगे । रिघालिया पोहणें लागे । तृषा न बोलतां मागे । जल तषार्त पुनः पुनः ॥४७॥तैसें सुमंगल कृष्णकीर्तन । कृष्णजन्मकर्मगुण । श्रवणादरें स्फुरे प्रश्न । अतृप्त श्रवण न निवती ॥४८॥यदोश्च धर्मशीलस्य नितरां मुनिसत्तम । तत्रांशेनावतीर्णस्य विष्णोर्वीर्याणि शंस नः ॥२॥नवमस्कंधपरिसमाप्ति । समासें कथिली कृष्णकीर्ति । तेणें श्रवणां न पवे तृप्ति । म्हणोनि आर्ति वाढतसे ॥४९॥सकळ धर्मां जन्मस्थान । नाहुषभार्गवीचें गर्भरत्न । सोमवंशीं कुळभूषण । परम धन्य यदुराव ॥२५०॥तो यदुवंश बरवे परीं । श्रवण करावा अत्यादरीं । तेथ अवतरोनि श्रीहरि । लीला करी अलौकिक ॥५१॥त्या विष्णूचीं विशद चरितें । मुनिसत्तमा समस्त मातें । प्रशंसीं तें प्रशस्त चित्तें । श्रवणपात्रीं समर्पीं ॥५२॥अवतीर्य यदोर्वंशे भगवान्भूतभावनः । कृतवान्यानि विश्वात्मा तानि नो वद विस्तरात् ॥३॥सकळ भूतांचा भावन । तो यदुवंशीं श्रीभगवान । विश्वात्मा आणि क्रियावान । सांगें संपूर्ण तें आम्हां ॥५३॥सकळ सुखांचा सुखाब्धि । तो यदुवंशीं कैवल्यनिधि । अवतरोनि नाटकविधि । कवणे बुद्धी आचरला ॥५४॥यश लक्ष्मी औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य । जेथ षड्गुणांचें गांभीर्य । तो सुरवर्य भगवान ॥२५५॥तेणें पराजय आणि दीनता । कार्पण्य आणि आसक्तता । अज्ञान आणि पराधीनता । कैशी तत्त्वतां दाखविली ॥५६॥जो कां स्वयें भूतभावन । तयासि कुटुंबाभिसर्जन । पुत्रपौत्रबंधुस्वजन । पशुसदनकोशादि ॥५७॥देव मनुश्य असुर । त्रिगुणात्मक चराचर । खेचर भूचर जलचर । जंगम स्थावर आब्रह्म ॥५८॥लक्ष चौर्यांशीकारणी । अपार सृष्टि पृथग्योनि विश्वात्मा विश्व व्यापूनि । अभिन्नपणीं एकला ॥५९॥तयासि कैसे शत्रुमित्र । कैसें तयासि कुलगोत्र । कैसें वय साचें चरित्र । हें विचित्र सांगावें ॥२६०॥म्हणाल सांगतां सविस्तर । श्रवणीं होईल अनादर । तैसें नव्हेजी चरित्र । उत्तम श्लोकगुणाचें ॥६१॥त्रिगुणात्मक त्रिविधजनीं । बद्धमुमुक्षुमुक्तपणीं । विषयीं फळीं आत्मज्ञानीं । प्रीति वाढे विरोधें ॥६२॥बद्ध नायके ब्रह्मज्ञान । मुमुक्षु नायके विषयकथन । मुक्त दोहींसि उदासीन । नित्य निमग्न स्वानंदीं ॥६३॥उत्तमश्लोकगुणानुवाद । त्रिविध करी एकविध । मोडी त्रिविधपणाचा भेद । परमानंद प्रकटवी ॥६४॥निवृत्ततर्षैरुपगीयमानाद्भवौषधाच्छ्रोत्रमनोऽभिरामात् ।क उत्तमश्लोकगुणानुवादात्पुमान्विरज्येत विना पशुघ्नात् ॥४॥तृष्णारहित सनकादिक । कपिल कपर्दी नारदप्रमुख । उत्तमश्लोकगुणांचे घोक । गाती ऐकती सर्वदा ॥२६५॥प्रत्यक्षासि काय प्रमाण । स्वामी नित्य मुक्त सर्वज्ञ । कथिती उत्तम श्लोकगुण । तें मज जीवन त्यक्तोदा ॥६६॥त्रिविध तापज्वरें तपाले । भवबंधनीं बद्ध झाले । मोक्ष इच्छिती मुमुक्षु भले । तिहीं घेतलें औषध ॥६७॥सद्गुरुसद्वैद्य धडफुटा । देतां उत्तमश्लोकगुणांचा काढा । होतां भवरोगाचा झाडा । केला रोकडा उपचार ॥६८॥एक सप्तक तुमच्या मुखें । म्यां हें दिव्यौषध घेतलें निकें । पुष्टता तुकितां माझेनि तुकें । अनंत ब्रह्मांडें न तुकती ॥६९॥भगवच्चातुर्यलीलाक्रीडन । ऐकोनि चमत्कारती विषयी जन । हरिगुणीं वेधतां श्रवण । मननोन्मन तत्काळ ॥२७०॥ऐसें समस्तांचें जीवन । यथाधिकारें वदती जन । कोण उपेक्षी भगवद्रुण । एक पशुघ्नावांचोनि ॥७१॥आत्मघातक अज्ञान पशु । पशुत्वें पशुहत्या करी विशेषु । तया उत्तमश्लोकगुणीं त्रासु । अनधिकारें दुर्भाग्यें ॥७२॥जेथ खाती तेथ हगती । भक्ष्याभक्ष्य न विचारिती । पुत्र मातेवरी चढती । अगम्य न म्हणती पशुत्वें ॥७३॥पशुघ्न कंठीं घाली सुरी । तैसें मरण आदळे उरीं । तंववरी विषयाचा सोस करी । त्रास अंतरीं उपजेना ॥७४॥गगनींहूनि पडे पाषाण । तया व्यापक न कळे गगन । जडत्वें पावे अधःपतन । न करी उत्प्लवन खगाऐसा ॥२७५॥तैसें अज्ञान अहंताजडत्वें पशु । तयासि हरिगुणाचा न रुचे लेशु । म्हणूनि उपेक्षिती हा विशेषु । कथणें न लगे बहुतेक ॥७६॥उभाभ्यामेव पक्षाभ्यां यथा खे पक्षिणां गतिः । तथैव ज्ञानकर्माभ्यां परं विन्दन्ति योगिनः ॥५॥जैसा दो पक्षांच्या फडत्कारें । विहंग ऊर्ध्वगति संचरे । पूर्वोत्तर पक्षीं भरे । योगी तसै चित्सुखीं ॥७७॥नेणे पूर्वपक्षीं शुद्धकर्म । उत्तरपक्षीं ज्ञानवर्म । उभयपक्षहीन भ्रम । कल्पांतींही निरसेना ॥७८॥ऐशी पक्षहीन गति । तयासि पाषाण वदती । नरदेह गगनींहूनि च्यवती । अधोगति अंधतमीं ॥७९॥असोत पशु कां पशुघ्न । जया नावडती हरिगुण । किमर्थ वाढवूं व्याख्यान । श्रोते सज्ञान जाणती ॥२८०॥माझे पूर्वज हरीनिकटीं । हरि रक्षी त्यां नानासंकटीं । मीही ऐकें हे कुळकटी । म्हणोनि पोटीं उत्कंठा ॥८१॥पितामहा मे समरेऽमरंजयैर्देवव्रताद्यातिरथैस्तिमिंगलैः ।दुरत्ययं कौरवसैन्यसागरं कृत्वाऽतरन्वत्सपदं स्म यत्प्लवाः ॥६॥गोविंदकथा मंगलमूर्ति । मंगलारंभीं मंगलकीर्ति । हरिगुणांची मंगल स्मृति । उदयीं शांति विघ्नांची ॥८२॥आत्महंते कां पशुघाती । तया हरिगुणीं नुपजे रति । वांचूनि त्रिविध जे त्रिजगतीं । कृष्णकीर्ति द्विरेफ ॥८३॥श्रीहरि आमुचें कुळदैवत । अभीष्टवरद पूर्वजार्चित । म्हणोनि हरिगुणीं चित्त निरत । नान्यासक्त सर्वदा ॥८४॥मत्पूर्वजांची पुण्यकीर्ति । जेणें विस्तारिली त्रिजगतीं । पठणें श्रवणें तरले किती । पुढें तरती अकल्प ॥२८५॥म्हणोनि ब्रह्मशापें दुर्मरण । अधोगतीस कारण । ते निवारे श्रीकृष्णगुण - । पुण्यश्रवणकीर्तनें ॥८६॥मंदर मज्जतां क्षीरार्णवीं । धांवा केला ब्रहमदि देवीं । कमठावतरें तारिला जेवीं । अधोगतीपासूनि ॥८७॥ब्रह्मा भेडसावूनि शंखें । निगम हरूनि अधोमुखें । सागरीं बुडवितां दुःखें । लोकत्रय दाटलें ॥८८॥तैं मत्स्यविग्रहें वेदोद्धरणीं । सिंधु डहुळी चक्रपाणी । शंख मर्दूनि वामपाणीं । वाद्य करूनि वागविला ॥८९॥असंख्यात भवार्णवीं । अधोगती पचतां जीवीं । कृष्णस्मरणें तरले जेवीं । कुरुसैन्याब्धि पांडव ॥२९०॥माझे पितामह पांडव । तरले कौरवसैन्यार्णव । तुच्छ करूनि वत्सपद इव । श्रीकृष्णनाथप्रतापें ॥९१॥तो सैन्यसिंधु अतिदुस्तर । संग्रामवर्त्त भयंकर । द्रोण कर्ण अतिरथी वीर । मकर नक्र शल्यादि ॥९२॥कृपाचार्य महाबाहो । भूरिश्रवा विकर्ण ग्राहो । अश्वत्थामा प्रलयदाहो । वडवानळ ज्यामाजीं ॥९३॥अमर जिंकूनि लंकानाथें । संयोजिलें निजदास्यातें । कार्तवीर्यें दशकंठातें । धरूनि निगडीं बांधिलें ॥९४॥शाखामृगादि श्वापद हरि । विनोदें रक्षिती राजमंदिरीं । रावणही त्याचपरी । कारागारीं जो योजी ॥२९५॥तया कार्तवीर्या रणीं । एकला जिंकी परशुपाणि । तोही भृगुपति स्वयंपणीं । भीष्मदेवें जिंकिला ॥९६॥जेणें संग्रामीं कुरुक्षेत्रीं । प्रतिज्ञापूर्वक जिंकिला हरि । चक्र धरविलें पहातां वीरीं । ऐशी थोरी भीष्माची ॥९७॥कृष्ण सुरासुरांचा जेता । तो जिंकिला क्षण न लगतां । अमरजयाचिया अर्था । देवव्रता बोलिजे ॥९८॥तो देवव्रत आदिकरूनि । वीर जलग्रह जिये जीवनीं । तो सैन्यार्णव तुच्छ करूनि । गोष्मदप्राय लंधिला ॥९९॥तया पांडवांची पुण्यनौका । श्रीकृष्ण तैलोक्यतारिका । कीर्तिश्रवणें मजही रंका । तेचि नावे बैसवीं ॥३००॥पूर्वजांचिया जुनाट गोष्टी । ऐकोनि श्रवणीं हांव पोटीं । प्रत्यक्ष माझी ही अंगयष्टि । अस्त्रसंकटीं रक्षिली ॥१॥द्रौण्यस्त्रविप्लुष्टमिदं मदङ्गं संतानबीजं कुरुपाण्डवानाम् ।जुगोप कुक्षिंगत आत्तचक्रो मातुश्च मे यः शरणं गतायाः ॥७॥जेणें द्रौण्यस्त्रापासूनि वांचविलें । तैहूनि तन्निष्ठचि मन झालें । त्या कृष्णाचें कीर्तन भलें । श्रवण करविलें पाहिजे ॥२॥म्हणाल द्रौण्यस्त्र तें कवण । अंगव्याप्तीस काय कारण । तरी हें सौप्तिकपर्वीचें संक्षेपकथन । विचक्षण परिसोत ॥३॥कुरुक्षेत्रीं कौरव बळी । पांडवहस्तें पडले सकळी । गांधार जानुभग्न घायाळी । रणमंडळीं पहुडला ॥४॥सैन्य मारिलें अकरा क्षौणी । उरेल कृतवर्मा कृप द्रौणि । प्राणभयें घोरारण्यीं । ठेले लपोनि वटवृक्षीं ॥३०५॥दोघे निद्रित पावोनि श्रमा । पितृदुःखार्त अश्वत्थामा । धृष्टद्युम्नाच्या हननकामा । चिंताचंडि पूजितसे ॥६॥तंव त्या वटीं वायस कोटी । सुखें निद्रित निशीच्या पोटीं । तेव्हां काकशत्रु उलूक हटी । एकला निवटी बहुकाकां ॥७॥देखोनि अश्वत्थामा वेगें । कृपुकृतवर्म्यां करी जागें । काकउलूकांचा वृत्तांत सांगे । म्हणे ऐसें निजांघें करीन मी ॥८॥तया कृपाचार्यें सांगोनि नीति । वारितां नायके पुरुषार्थी । पिता मारिला तैशा रीतीं । पितृघाती मारीन ॥९॥आजि पांडव आणि पांचाळ । शिबिरीं निद्रिंत मारीन सकळ । म्हणूनि निघाला उतावीळ । भोजमातुला घेऊनि ॥३१०॥शिबिरद्वारीं महद्भूत । प्रकटोनि वारिला द्रोणसुत । गिळिलीं शस्त्रास्त्रें समस्त । गर्वहत तो झाला ॥११॥तेणें स्तविलें कालाग्निरुद्रा । करुणा आली भालनेत्रा । मार्ग देऊनि शिबिरद्वारी । खङ्ग दिधलें द्रौणीतें ॥१२॥खङ्ग लाहूनि भर्गदत्त । शिविरीं प्रवेशे द्रोणसुत । द्वारीं रक्षणा ठेविले गुप्त । कृपाचार्य कृत्वर्मा ॥१३॥दुर्योधन पदतां रणीं । पांडवां घेऊनि चक्रपाणि । गेला पूजावया भवानी । भविष्यकरणी जाणता ॥१४॥शिखंडी धृष्टद्युम्न । द्रौपदीपुत्र पांचही जाण । असंख्य उरलें पांडवसैन्य । घाला घालूनि मारिलें ॥३१५॥निद्रित मारिले महावळी । शिबिरें जाळूणि केली होळी । पळतां मारिलें द्वारपाळीं । एवं सकळ आटिलें ॥१६॥धृष्टद्युम्नाचा सारथी । दैवें पळाला गुप्तगति । तेणें सांगतां पांडवांप्रति । महारथी क्षोभले ॥१७॥तंव कृपाचार्य यादव द्रौणि । पांडवभयें प्राणरक्षणीं । तिहीं मार्गी तिघी जणी । महा पळणी मांडिली ॥१८॥द्वारके पळाला कृतवर्मा । कृपाचार्य गेला निजाश्रमा गंगातटीं अश्वत्थामा । ब्रह्मकर्मा संपादी ॥१९॥द्रौपदी आणि धर्म ग्लानीं । देखोनि भीमार्जुनचक्रपाणि । धांवणी करितां देखे द्रौणि । ईषिका मंत्रूनि तो सोडी ॥३२०॥पांडवांचा कुलक्षयो । इच्छूनि द्रौणि द्रोणतनयो । द्रौण्यस्त्र प्रेरितां अस्त्रवायो । गगनगर्भी चौताळे ॥२१॥पांडवर रक्षिले पद्मनाभें । द्रौणि अस्त्रोपसंहरण न लभे । तेव्हां मम मातेच्या गर्भें । अस्त्रप्रभें पीडिजे ॥२२॥तो हा पांडवकौरववंश - । वृद्धीसि माझा देह अंश रक्षिला जैसा कां हुताश । श्रौतेष्टीच्या गोपने ॥२३॥अस्त्रें पीडितां गर्भगोळ । माझी माता अति व्याकुळ । हृदयीं चिंतूनि गोपाळ । शरण तत्काळ रिघाली ॥२४॥तेव्हां सचक्र रिघूनि कुशीं । द्रौण्यस्त्रबाधेपासूनि रक्षी । माझा देह मज मी साक्षी । विश्वीं परीक्षीं रक्षका ॥३२५॥यालागीं परीक्षिति नाम । माझें ठेवी पुरुषोत्तम । त्याचे लीलेचा अनुक्रम । जन्मकर्म परिसवीं ॥२६॥ N/A References : N/A Last Updated : April 25, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP