मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|वरपरीक्षा|
शकुनांबद्दल चार शब्द

शकुनांबद्दल चार शब्द

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


स्त्रीजातीच्या परीक्षेविषयी लिहिताना मागे कलम ४१ येथे शकुनशास्त्राधारे पाहण्याच्या कित्येक गोष्टींबद्दल उल्लेख करण्यात आला आहे, त्याचा तात्पर्यार्थ पाहू जाता, वधूग्रहणापासून वराचा संसार चांगला होईल अगर कसे, त्यास तिजपासून मुलेबाळे होतील की नाहीत, तिच्या योगाने कुटुंबास दारिद्र्य येईल की काय, व तिला वरण्यापासून पतीच्या अगर त्याच्या नात्यागोत्याच्या इतर मनुष्यांस प्राणहानीचे तर प्रसंग येणार नाहीत ना, इत्यादी प्रकारच्या कल्पना मनात येऊन त्या धोरणाने वरपक्षीयांकडून शकुनांचे अर्थ पाहिले जातात, इतकाच काय तो आहे. वधूपक्षीयांकडून शकुन पाहावयाचे झाल्यास त्यांच्या मनातदेखील हे सर्व अर्थ येतातच, पन त्याशिवाय त्यांस आणखीही कित्येक गोष्टींचा विचार करण्याची पाळी येते. एक वेळ मुलगी देऊन टाकिली म्हनजे तिला एक प्रकारची जन्माची कैदच प्राप्त होणार, अशा स्थितीत ती पतीशी कशी वागेलो ? पती तिला ममतेने वागवील की नाही ? तिला संपती न झाली किंवा इतर रीतीने दांपत्याची मने विटली, तर मुलीच्या उरावर नवीन सवत उभी राहील की काय ? पतीने तिचा त्याग केला व तिचे नाव घेण्याचे सोडून दिले, तर पुढे तिची कशी दशा होईल ? हे व अशासारखे अनेक अशुभ प्रश्न वधूपित्याच्या अंत:करणात घोळत असतात; व अशा स्थितीत त्यास निरुपाय म्हणून वराच्या शोधार्थ घराबाहेर पडण्याची पाळी येते. प्रसंगी आपली व आपल्या कन्येची आपणच मिरवणूक काढून गावोगावी हिंडण्याचेही कारण पडते.
ही वर्णिलेली स्थिती काल्पनिक नसून प्रत्येक कन्यापित्यास थोड्याबहुत अंशांनी तरी अनुभवावीच लागते. या स्थितीत समाधान होण्यास म्हटले म्हणजे एकदा कशीबशी तरी वरयोजना होऊन हाती घेतलेले कार्य निर्विघ्नपणे शेवटास जाने हाच एक उपाय असतो. मनाप्रमाणे सर्व गोष्टी जुळवून आणण्याचा यत्न करणे हे आपले कर्तव्य होय, त्यात यश अपयश येणे आपल्या हातचे नव्हे, अशा तर्‍हेची मनाची चमत्कारिक स्थिती होऊन जाते, व यासाठी त्यास मनाचे समाधान कोणत्याही तर्‍हेने होणे अगर करून घेता येणे अत्यंत अगत्याचे असते. शकुनशास्त्र खरे असो वा नसो; त्याचा काही तरी फ़ायदा घडून येण्याची संधी प्राय: हीच. जगातील अनंत वस्तूंचे अनंत व्यवहार केवळ यदृच्छेने चालत असतात, परंतु त्यांचा संबंध आपल्या विद्यमान स्थितीशी कोणत्यही तर्‍हेने जुळवून घेता आला, तर तेवढ्यानेच मनुष्यास थोडेबहुत तरी समाधान वाटू लागते; व लग्नकार्य नीट रीतीने तडीस जाणे जरी क्षणभर ईश्वरी तंत्राने निराळेच आहे असे म्हटले, तरीदेखील या शकुनांच्या मिषाने ती ती भूतसृष्टी निदान काही काळपावेतो तरी एखाद्या सचेतन प्राण्याप्रमाणे आपल्याशी खरोखरीचा संवाद करण्यास आपणापुढे आविर्भूत होऊन काही तरी सुखसमाधानाच्या गोष्टी करीत आहे असा भास कन्यापित्याच्या आतुर मनास झाल्याशिवाय राहात नाही. बृहत्संहिता अ. ८६ श्लो. ६ येथे -
ग्राम्यारण्याग्बुभूव्योमद्युनिशोभयचारिण: ।
रुतयातेक्षित्क्तेषु ग्राह्या स्त्रीपुंनपुंसका: ॥
रोदन, गमन, विलोकन आणि भाषण या चार गोष्टींसंबंधाने ( १ ) ग्रामभव ( लोकवस्तीतले ), ( २ ) अरण्यभा ( अरण्यातले ), ( ३ ) पाण्यात होणारे, ( ४ ) भूमीवर होणारे, ( ५ ) आकाशात घडणारे, ( ६ ) दिवसा होणारे, ( ७ ) रात्री होणारे, आणि ( ८ ) रात्रंदिवस होणारे असे शकुनांचे आठ प्रकार सांगितले असून, प्रत्येक प्रकारच्या विशेष प्रसंगी दिसणार्‍या स्वरूपावरून तो तो प्रकार पुल्लिंगी, स्त्रीलिंगी अगर नपुंसकलिंगी अशा विशेष संज्ञेने विर्दिष्ट केला आहे. अखेर निदर्शनाला किंवा अनुभवाला कोणताही प्रकार येणार असला, तरी त्याचे स्वरूप सामान्यत: अगाऊ कळून आलेले बरे; अशी उत्कंठा प्रत्येक कन्यापित्याला वाटत असते हा बहुधा जगात अनुभव असतो.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP