सांप्रतच्या पद्धतीचा व सीमान्तपूजनविधीचा विरोध
प्राचीनकाळचा रिवाज नि:संशय आतच्या या प्रकाराहून निराळा होता. आजच्या स्थितीत कन्येचा विवाह म्हणजे आईबापांच्या मानेवर जड जोखड घातल्याप्रमाणेच असते. यामुळे वरपक्षाच्या बाजूने लग्नाची उचल होते तिजपेक्षा वधूपक्षाकडून ती अधिक होते. या स्थितीचा परिणाम असा झाला आहे की, मुलीचे वय लग्नाचे झाले आहे असे अंमळ कोठे वाटू लागले की आईबापे आपण होऊन वराच्या शोधाच्या तजविजीस लागतात, व ही आतुरता अनेक प्रसंगी त्यांची त्यांस घातुक झाल्याचेही मागाहून त्यांच्या अनुभवास येते.
कन्याविक्रयच करून पैसे मिळवू इच्छिणार्या आईबापांच्या अंगी मात्र ही आतुरता वास करीत नाही, व अशी आईबापे अधिक पैसे मिळविणार्या लालचीने आपली कन्या खुशाल मोठी होऊ देतात. परंतु जी आईबापे कन्यविक्रयच्या या नीच मार्गाचे अवलंबन करणारी नसतात, त्यांजकडून मात्र वरशोधनाच्या कामी ही घाई झाल्याचे दृष्टीत्पत्तीस आल्यावाचून राहात नाही. अनेक प्रसंगी विवाह्य कन्येचा बाप, भाऊ, चुलता, मामा वगैरे मंडळीबरोबर मुलीस घेऊन वरशोधासाठी या गावाहून त्या गावाकडे, त्या गावाहून तिसरीकडे, याप्रमाणे एकसारखी भटकत राहून अखेर संधी दिल्याबरोबर मुलीच्या विवाहाचे काम एकदाचे कसेबसे तरी साधून घेतात. मात्र हा जो काही प्रकार होतो तो लोकरीतीत शास्त्रसिद्ध मानिलेल्या ‘ सीमान्तपूजन ’ विधीशी सर्वथा विरुद्ध आहे यात संशय नाही.
Translation - भाषांतर
N/A