TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|वरपरीक्षा|
वराची मातापितरे

वराची मातापितरे

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


वराची मातापितरे, बंधू, आप्त वगैरेबद्दल चौकशी करण्याचे महत्त्व
शेवटल्या दोन कलमांत काढिलेली स्त्रीसंसाराची चित्र अत्यंत कष्टमय आहेत; तथापि अशी चित्रे काढण्यास नेहमी कष्टाचेच प्रसंग मनात आणिले पाहिजेत असा नियम मात्र कोनी मनात आणू नये. संसार म्हणजे बोलून चालून अठरा धान्यांचे कडबुळे, त्यात नाना प्रकारच्या रुचीची व गुणांची मिश्रणे असणे हे सर्वथा अपरिहार्य होय. देवळात एकटा विठोबा व एकटी रखमाई एवढ्या दोनच मूत्री असण्याची ज्याप्रमाणे शोभा नाही, त्याप्रमाणे घरात नुसती नवरा-बायको ही दोनच माणसे असल्याने संसाराची खरी शोभा उत्पन्न होत नाही. बिचारा विठोबा सर्वकाळ आपल्या राउळात तरी उभा राहतो; परंतु ही स्थिती संसारात पडलेल्या पुरुषाने मनात आणून क्षणभरही चालणार नाही. संसारातील गरजा अनेक प्रकारच्या असतात, व त्या पुरुषास काय किंवा स्त्रीस काय, घरातल्या घरात भागविता येण्याजोग्या नसतात. त्याला इतरांची मदत अवश्य घ्यावी लागते. ही मदत बाहेरच्या भाडोत्री लोकांकडून घेता येईल असे मानणे हे सर्वकाळ हितावह नव्हे. ही मदत देण्यास खर्‍या काळजीची व कळवळ्याची अशीच माणसे असली पाहिजेत. आमच्या सांप्रतच्या विवाहपद्धतीत वधू आणि प्रथम विवाहाचा वर ही उभयताही प्राय: अल्पवयी, अर्थात जगातील व्यवहाराविषयी अननुभवी व अज्ञानी असतात. पाश्चात्य लोकांत विवाह झाल्याबरोबर वधूवरे स्वतंत्र घरसंसार मांडून राहू शकतात, तशी स्थिती, निदान, तूर्तची बाकीची समाजव्यवस्था जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत तरी आमच्या आर्यमंडळास क्षणभरही हितकारक होऊ शकावयाची नाही. अनुभवशून्य वधूवरांस संसाराचा योग्य मार्ग दाखविण्यास, त्यांना जगातील व्यवहाराची योग्य दिशा दाखवून देण्यास, अडचणीच्या प्रसंगी त्यास त्यातून निभावून घेण्यास घरच्या खर्‍या कळवळ्याची माणसे असणे अत्यंत आवश्यक आहे. नवरा अगर बायको यास आजार किंवा काही झाले असता त्यास वेळच्या वेळी औषधोपच्चार करण्यास, त्यांच्यासाठी वैद्याकडे किंवा बाजारात धावाधाव करण्यास, बाहेरची माणसे उपयोगी पडत नाहीत. या गोष्टी होण्यास घरचीच माणसे असावयास पाहिजेत. अशा स्थितीत घरातील संसाराची व्यवस्था पाहणे, पैसा अडक्याची अगर इतर अडचण पडल्यास ती नाहीशी करण्याचा यत्न करने, बाहेरच्या लोकांशी देवधेवीची व्यवस्था नीटपणे राखणे, प्रसंगी कुटुंबांच्या अडचणीसाथी कर्जवाम करण्याची जरूर पडल्यास तेही बेताबाताने करून ते आहाराबाहेर न जाऊ देण्याची सावधगिरी ठेवणे, इत्यादी असंख्य प्रसंग संसारात येतात; व अशा स्थितीत एकाला दुसर्‍याचे पाठबळ असले तरच ते प्रसंग नीटपणे निभावून जाऊ शकतात. वरयोजना करताना त्यास आई, बाप, वडील धाकटे भाऊ, व इतर आप्तवर्ग कोणी आहेत अगर नाहीत याची चौकशी करावयाची तिचा हेतू तरी हाच होय. या माणसाबद्दल चौकशी करावयाची म्हणजे तिजबरोबर त्यांच्या स्वभावाबद्दल चौकशी करावयाची, व अडीअडचणीच्या प्रसंगी या माणसांकडून योजिलेल्या वराला पाठिंबा अगर मदत कितपत मिळू शकेल याचा अजमास करून तो समाधानकारक वाटला, तर पुढचा कौटुंबिक संबंध जोडावयाचा, हे स्पष्टच आहे.

शेवटल्या तीन कलमांत दर्शविलेल्या विचारांवरून त्यांतील मूळ सारांशाचा भाग म्हटला म्हणजे, कन्या ज्या  घरी द्यावयाची त्या घरातील त्या घरातील संपत्तीतून तिचा आजन्म चरितार्थ चालावा, व तिला माहेरच्या मंडळीपुढे उभे राहून दात विचकण्याचा प्रसंग सहसा न यावा, अशाविषयीच्या उपायांची योजना अगाऊ मनात आणणे, हा होय. आईबापे लोभी स्वभावाची नसली, तर कन्येवर कोसळलेल्या आपत्प्रसंगाबद्दल मायेच्या पोटी त्यांना तिच्याविषयी कळवळा वाटून ती तिला सुस्वभावाचे असले, तर ते आपल्या बहिणीच्या पोषणाचे फ़ारसे ओझे मानीत नाहीत, व त्यांच्याकडून तिला सहसा त्रासही होत नाही. परंतु घरातल्या भावजया व इतर माणसे यांची स्थिती मात्र याहून भिन्न असते. माहेरवासिणीचा मान समाजाच्या रीतीप्रमाणे स्वाभाविक मोठेपणाचा असल्यामुळे भावजयांना तिला नेहमी ‘ अहो अहो ’ म्हणावे लागते, व सासूसासर्‍यांच्या अगर आपल्या पतींच्या धाकामुळे त्या तिला घरातले कामकाज काही सांगू शकत नाहीत; अर्थात ही बया घरात येऊन राहिल्याचे त्यांना मात्र नवीन ओझे वाटू लागते, व प्रत्यक्ष उघडपणे त्यांना बोलता आले नाही तथापि तिजविषयी द्वेष वाटू लागतो. आपली परावलंबंनाची स्थिती ओळखून ती आपण होऊन घरातील कामकाज करू लागली, अगर भावजयांच्या मुलांबाळांना खेळविणे, त्यांच्या खाण्यापिण्याची तरतूद त्यांनी न सांगता ठेविणे, या गोष्टींत ती मन घालू लागली, तर कदाचित हा मनातला द्वेष फ़ारसा अपायकारक होत नाही, व बिचारीची नांदणूक त्यातल्या त्यात थोड्याबहुत समाधानाने राहू शकते; परंतु तिचे वर्तन जर का खर्‍या माहेरवासिणीच्या तोर्‍यावरचे राहू लागले, तर मात्र हा ‘ ऐदी गोळा ’ भावजयांना सर्वस्वी दु:सह होतो, व मनातल्या द्वेषाचे उग्र स्वरूप प्रत्यक्ष प्रकट होऊ लागून घरात अगदी क्षुल्लक बाबतीतसुद्धा धुसपूस सुरू होते. प्रत्येक प्रसंगी घालून पाडून बोलणी चालतात, व दोन्ही पक्षांकडील स्त्रीयोद्ध्यांची शाब्दिक झुंज बहुतेक सर्वकाळ बहुधा चालूच राहते. बहीण आपल्या भावांपाशी गार्‍हाणे नेते, व भावजयाही एकान्तात असल्या म्हणजे पतींची मने उलट प्रकारे वळविण्याचा यत्न करू लागतात. प्रारंभी काही दिवस कदाचित भाऊ या स्थितीत फ़ारसे मन घालीत नाहीत खरे पण ही स्थिती फ़ार दिवस चालू शकत नाही. कारन बहीण माहेरवाशीण असली, तरी तिचा आपणावर वास्तविक काही हक्क नसल्याने तिचे पोषण आपण केवळ धर्मार्थ करीत आहोत ही गोष्ट भावास पक्केपणी माहीत असते, व अखेर तिचाच परिणाम बहिणीच्या प्रत्ययास येतो. अर्थात एकपक्षी घरात भावजया वागतील व हाल करितील ते सर्व मुकाट्याने गिळीत राहून पोटात कसेबसे तरी काटे भरण्याची दुर्धर स्थिती कबूल करून कोडगेपणाने घरात तळ देऊन राहणे, अगर दुसर्‍या पक्षी ही स्थिती दु:सह वाटली तर भावाच्या घरातून निघून जाणे, या गोष्टी पत्करल्याशिवाय तिला गत्यंतर राहात नाही. माहेर सुटले की दुसर्‍याच्या दाराशी जाऊन भीक मागणे, अगर कोण्याच्या तरी घरी पोळपाट-लाटणे घेणे, अथवा इतर प्रकारे मोलमजुरी करणे, हाच पुढचा मार्ग होय हे निराळे सांगणे नकोच. ही पुढची स्थिती काल्पनिक नसून जगात पदोपदी प्रत्येकाच्या अनुभवास येणारी आहे; व यासाठीच ती टाळण्याचा यत्न अगोदरपासून करण्यात आळस न होऊ देणे हे प्रत्येक कन्यापालकाचे कर्त्यव्य होय हे उघड आहे.


Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:55:17.1400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

incidence fo taxation

  • Econ. 
  • कराधानाचा आपात 
  • पु. करभार 
RANDOM WORD

Did you know?

अष्टगंधात कोणकोणते घटक असतात?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site