मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|वरपरीक्षा|
वर नपुसंक नसावा

वर नपुसंक नसावा

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


पुरुषजातीचे पुरुषत्व खरोखरीचे पाहिजे असे सांगण्याचा धर्मशास्त्रकारांचा उद्देश आहे. प्रत्येक प्राणिकोटीत स्त्रीजाती व पुरुषजाती यांच्या संयोगापासून त्या कोटीतील जीवांचा विस्तार होत जावा हा सृष्टिगर सामान्य नियम आहे, व त्यास अनुसरून मानवी जातीतही प्राणिविस्तार होत जाण्यास पुरुषजातीच्या अंगी वास्तविक पुरुषत्व असणे जरुर आहे. तशातूनही सांप्रतच्या समाजाच्या विशेष नियमाने प्रत्येक व्यक्तीचा जोडा अमुकच समजावा, व त्या जोड्याचा फ़िरून विजोड होताच कामा नये, असा सख्तीचा निर्बंध झाला असल्यामुळे तर विवाहस्थितीत शिरू इच्छिणार्‍या प्रत्येक पुरुषाच्या अंगी हा गुण असणे केवळ अगतिकच बनले आहे. वधूपक्षाकडील लोकांच्या निष्काळजीपणामुळे अगर इतर कोणत्याही कारणाने वराच्या अंगी त्या गुणाचा अभाव असूनही जर ती गोष्ट वेळी कळून आली नाही. व लोकरीतीप्रमाणे विवाहाचा विधी पूर्णपणे तडीस जाऊन पुढे तो अभाव प्रत्ययास आला, तर त्या बिचार्‍या वधूचा जन्म कायमचा विफ़ळ झाल्यासारखा होतो, व तिने आजन्म झुरत राहणे किंवा समाजाची नीती बाजूला ठेवून स्वैराचरणास प्रवृत्त होणे याहून निराळी तोड राहात नाही.
हलक्या प्रतीच्या म्हणून मानिल्या गेलेल्या जातींतून अशा प्रसंगी पुरुषांनी स्त्रियांस काडी मोडून देऊन स्त्रियांस निराळे पती करण्याची परवानगी दिल्याची उदाहरणे केव्हा केव्हा घडतात; परंतु त्या जातीच्या लोकांतदेखील नवीन पती करण्याचा हा प्रकार मोठासा संभावैत मानिला जात नाही. ज्या जातीचे लोक आपल्या जाती वरिष्ठ प्रतीच्या असे समजतात, त्या जातीत झालेला विवाहसंबंध आजन्म पाळण्याचा रिवाज पडला आहे, व त्यामुळे त्यातील स्त्रीवर्गास मात्र ही आपत्ती अत्यंत दु:सह होते. पराशरस्मृती इत्यादी शास्त्रग्रंथांतून अशा आपत्प्रसंगी स्त्रियांस पुनर्विवाह करण्याची मोकळीक ठेविली आहे, परंतु ‘ शास्त्राद्रूढिर्बलीयसी ’ या न्यायाने खरे शास्त्र मागे पडून त्याचे स्थान रूढीने पटकाविले आहे; व ही रूढी आजमितीस सर्वत्र प्रबल होऊन बसली असल्यामुळे, पती क्लीब असला तरी, केवळ नाइलाजास्तव बिचार्‍या स्त्रीवर्गास ही भयंकर आपत्ती आजन्म निमूटपणे सोशीत बसणे भाग झाले आहे !! हा प्रकार येथे सांगण्याचे मुख्य तात्पर्य मिळून इतकेच की, विवाहघटनेच्या वेळी वर योजना करिताना पुरुषाच्या पुरुषत्वाची परीक्षा करण्याए काम कितीही नाजूक व घाणेरडे वाटले, तरी कन्येस अनुभवावे लागणारे भावी दुष्परिणाम टाळण्यासाठी ते काम करणे हे प्रत्येक वरयोजकाने आपले अवश्य कर्तव्य होय असेच मानिले पाहिजे.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP