संतचरित्रे - बोधलेबावा

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


धामणगांवामध्यें माणकोजी बोधला । आवडे देवाला प्राणाहुनी ॥१॥
विठोबाचे नामीं रंगलें हें मन । मिळालें जीवन सिंधुमाजी ॥२॥
आवडीनें केला त्याणें अंगिकार । कृपेचा सागर पांडुरंग ॥३॥
गुणदोष त्याचे न पाहे चक्रपाणी । बोलिले पुराणीं व्यासादिक ॥४॥
सत्य हेंचि असे सांगतों प्रमाण । भावे करा ध्यान विठोबाचे ॥५॥
तैसा बोधराज प्रेमळ हा भक्त । भावें आठवीत देवाजीसी ॥६॥
रात्रीं शेतामाजी करीत रक्षण । गात नारायण आवडीनें ॥७॥
राळरास त्याच्या सासर्‍याचा गांव । त्याची याची सींव एक असे ॥८॥
तयाचिया घरीं हांसी कुणबीण । करीत रक्षण शेतामाजी ॥९॥
बोधराज भावें आळवीत देव । हांसीचिया जीवा सुख वाटे ॥१०॥
विठोबाचे नामीं वेधलेंसे मन । आली ती शरण बोध राजा ॥११॥
म्हणे बापा मज द्यावा उपदेश । तोडावा हा फांस संसाराचा ॥१२॥
हांसीचा तो भाव जाणुनी पवित्र । सांगितला मंत्न त्रिअक्षरी ॥१३॥
विठ्ठल हें नाम अहोरन ध्याईं । मग तुला नाहीं भय चिंता ॥१४॥
हरिदिनिं व्रत करीं एकादशी । जागर कथेसी करीत जावा ॥१५॥
हांसीचिया मना झाला तो आनंद । भावें हा गोविंद आळवी ती ॥१६॥
चालवीत व्रत नेम एकादशी । जागर कथेसी धामणगांवीं ॥१७॥
बोधराज भक्त भाविक प्रेमळ । कीर्तन रसाळ आवडीचें ॥१८॥
श्रवणासी ते येती गांवीचे ते लोक । वाटतसे सुख तयालागीं ॥१९॥
भवर गांवीचे कीर्तनास आले । त्यांत काय झालें एक एका ॥२०॥
मार्गीं चालतांना सर्पदंश झाला । तेचि वेळां गेला प्राण त्याचा ॥२१॥
सांगात्यांनीं तेव्हां विचार करुनी । आणियेला त्वरें कथेमाजी ॥२२॥
बैसविलें त्यासी भिंतीसी टेकुनी । करिती श्रव्ण हरिकथा ॥२३॥
नामामृत भावें वाढीत बोधला । घ्यारे सर्वत्नांला सांगतसे ॥२४॥
करावी पुरती तुम्ही सांठवण । जगीं हें भरूनि उरलेंसे ॥२५॥
स्वर्ग मृत्युलोकीं असे तो पाताळीं । आणिला जवळीं पुंडलीकें ॥२६॥
समपदीं कटीं ठेऊनियां कर । उभे विटेवर राहिले ते ॥२७॥
तयाची हे गोडी बोधल्या संपडली । तेचि म्यां वाढिली तुम्हांपुढें ॥२८॥
श्रवणद्वारें तुम्ही जेवा सावकाशा । होईल उल्हास माझे जीवा  ॥२९॥
नामघोष तुम्ही वाजवावी टाळी । होईल हे होळी पातकांची ॥३०॥
श्रोते बोलताता तेव्हां बोधल्यास । करा उपदेश या गृहस्थासी ॥३१॥
वाजवीना टाळी करीना भोजन । कांहो यानें मौन्य धरियेलें ॥३२॥
बोधराज करी त्यासी विनवणी । बोला चक्रपाणी आवडीनें ॥३३॥
कथेलागीं तेव्हां येती आनंदानें । कांपे तया भेणें कळीकाळ ॥३४॥
सांडूनि अहंता यावें कीर्तनासी । तेणें हृषिकेशी संतोषतो ॥३५॥
म्हणेनिया कोणीं न करावा आळस । बोलावा उल्हासें पांडुरंग ॥३६॥
ऐकोनियां ऐसें तेव्हां नारायण । परतविला प्राण तेचि वेळां ॥३७॥
कथेमाजी जें कां बैसविलें प्रेत । तें आनंदें नाचत नामघोषें ॥६८॥
समजलें तेव्हां श्रोत्यां त्या सकळां । महिमा आगळा हरिनामाचा ॥३९॥
बोधल्यासी तेव्हां श्रुत झाली मात । उठविलें प्रेत पांडुरंगें ॥४०॥
प्रेमअश्रु बोधल्याचे डोळां । पाळिसी तूं लळा पांडुरंगा ॥४१॥
जाणूनि अंतर होसी साहाकारी । लज्जा त्वां श्रीहरि राखियेली ॥४२॥
बाळकाचे बोल मातेसी आवड । पुरवीत कोड आनंदानें ॥४३॥
समजलें मज आतां विठाबाई । काय उतराई होऊं तुज ॥४४॥
बोधल्यासी बोले विठोबा सांवळा । आवडी प्रेमला तुई मज ॥४५॥
आनंदें जागर होत एकादशी । किर्तनांत हांसी होती तेव्हां ॥४६॥
हांसीचे ते धनी विभक्त ते झाले । विकरा घातिलें हांसीलागीं ॥४७॥
हांसीलागीं तेव्हां श्रुत झाली वार्ता । खेद करी चित्ता आपुलिया ॥४८॥
काय जन्मांतर कैसें हें प्राक्तन । स्वामीचे चरण अंतरती ॥४९॥
बोधराज माझी पांडुरंग मूर्ती । वाटेल ही खंती त्याचि मज ॥५०॥
होऊनियां श्रमी धामणगांवा गेली । वार्ता सांगितली बोधराजा ॥५१॥
बाबा तुम्ही आतां द्यावें मज मोल । श्रुत तेव्हां केलें ममताईसी ॥५२॥
जाणूनि अंतर राळेरास आला । मेहुण्यास बोले बोधराज ॥५३॥
हंसिसी विकितां म्हणूनि ऐकिलें । सांगा इचें मोल काय आतां ॥५४॥
येरूं म्हणे हांसी देऊं आणिकासी । देऊं ना तुम्हासी बोलूं नका ॥५५॥
हांसीलागीं तेव्हां श्रुत झाली वार्ता । खेद करी चित्ता आपुलिया ॥५६॥
बोधराज तेव्हां श्रुत झाली वार्ता । सांगतों देवासी नेतील तुजा ॥५७॥
सांगूनियां ऐसें धामणगांवा गेले । तों हांसीलागीं आलें गिर्‍हाईक ॥५८॥
पंचवीस होन केलें तिचें मोल । लिहून घेतलें खरिदखत ॥५९॥
द्रव्य घातियेलें तयाच्या पदरांत । तों आले अकस्मात्‌ पांडुरंग ॥६०॥
हांसे तुललागीं बोलावी बोधला । शब्द हा ऐकिला सर्वत्रांनीं ॥६१॥
हांसी आणि मूल तेव्हां जालें गुप्त । केला हा वृत्तांत पांडुरंगें ॥६२॥
बोलावितां हांसी न दिसे तयाला । कज्जा तो लागला दोघांजणा ॥६३॥
भांडत हे गेले तेव्हां दिवाणांत । सांगती वृत्तांत दोघेज्ण ॥६४॥
फजीत होऊनि तेव्हां दरबारीं । दिल्हें तें माघारी द्रव्य त्याचें ॥६५॥
संताचें नायके नाडला तो खर । दोहींकडे थार नाहीं त्यासी ॥६६॥
संतांसी शरण असे दास नामा । अखंडित प्रेमा त्याचे नामीं ॥६७॥

N/A

References : N/A
Last Updated : January 14, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP