संतचरित्रे - कबीर

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


आतां ऐका कवित कबीरा । राम सेवेसी तत्परा ।
संत साधु आलिया घरा । कदा पाठमोरा नव्हेची ॥१॥
कोणी एके अवसरीं । आहे जी माध्यान रात्रीं ।
मिळोनि संतमांदी बरी । आले घरीं कबीराचे ॥२॥
तंव स्त्रीसहित उठोनी । लागे संतांचे चरणीं ।
आमुचें परम भाग्य म्हणोनी । जाली भेटी स्वामींची ॥३॥
मोडकें खोपट जर्जर । तेथें कैंचें भिंती आवार ।
वरुविण उपवासी पोर । नांदणुक थोर कबीराची ॥४॥
तंव बैसावया । कारण । संतांसी घातलें आसन ।
काढिला बोर्‍या मुलें उठवून । सवेंचि आपण उभा ठेला ॥५॥
कबीर म्हणे स्त्रियेसी । कांहीं नैवेद्य करावा देवासी ।
अवश्य म्हणोनी त्वरेसी । अंगिकारिती पैं जाली ॥६॥
बहुत संकट षडलें नारी । पाहातां धन न दिसे घरीं ।
दोन प्रहर लोटली रात्री। बाजारीं कोणी असेना ॥७॥
मेघ वर्षती दारुण । काळोखी पडली अति कठीण ।
अंतरीं स्मरे राम राम निधान । मग झडकरी जाण निघाली ॥८॥
सत्वर येउनी वाणिया आळीसी । तंव कुलुपें जालीं दुकानांसी ।
कोणी न बोलती कोणासी । जन निद्रेसी प्रवर्तले ॥९॥
मग झाली ह्रदयीं चिंताक्रांत । नामस्मरण करीत ।
एका दुकाना आंत । काय म्हणत परियसा ॥१०॥
मग जाउनी दुकानाजवळी । उघडी होती एक फळी ।
वाणी जागत तये वेळीं । अकस्मात बाळी तेथें आली ॥११॥
वाणी पुसे तूं कवणाची कवण । कां आलीस रात्न करून ।
कवण कृत्य असे तें निरोपण । श्रुत करणें आम्हालागीं ॥१२॥
ऐकें वाणीया देऊनि चित्त । कबीर जाणिजे माझा कांत ।
घरीं पाहुणे आले साधुसंत । म्हणोनि त्वरित पाठवीलें ॥१३॥
पाहिजे सामुग्री आम्हांसी । विलंब न करावा द्यावयासी ।
लेख होईल ते आम्हांसी । तंव दुकानासी नेलें तें ॥१४॥
तंव तो नष्ट दुराचारी । जाला असे कामातुर भारी ।
कुवासना धरिली अंतरीं । म्हणे ऐक सुंदरी वचन माझें ॥१५॥
जें सांगेन तें अंगिकारावें । मग लागेल तितुकें न्यावें ।
मनीं कांहीं न धरावें । नाहीं तरी जावें आले वाटे ॥१६॥
तंव ते सत्त्वधैर्याची पेटी । देखुनी त्याची चंचळ द्दष्टी ।
मग म्हणे बरवेंगा सेटी । वेगीं उठीं देईं सर्वदा ॥१७॥
आधीं सामग्री देईं आम्हांसी । कार्य संपादून येईन त्वरेसी ।
हें बोलणें माझें सत्य परियेसीं । या वचनासी नटळें गा ॥१८॥
तंव तो अविश्वासी नर । तयास कैसा बुद्धि विचार ।
म्हणे मज भाक देईं वो सत्वर । तरीच खरें वाटे गे आम्हलागीं ॥१९॥
मग भाक देऊनियां नारी । सर्व सामग्री घेतली पदरीं ।
तेथून निघाली झडकरी । आली घरीं तात्काळ ॥२०॥
मग उभय वर्ग मिळून । केलें संतचरण क्षाळण ।
घेतलीं तीर्थें समाधान । पूजाविधान आरंभिलें ॥२१॥
केल्या गंधाक्षता समस्तांसी । धूप दीप ओंवाळिले संतांसी ।
 झाला नैवेद्य अवघियासी । मग नमस्कारासी प्रवर्तले ॥२२॥
केले नमस्कार एकंदर । मनीं आनंदला कबीर ।
 म्हणे धन्य भाग्य आजी थोर । करून नमस्कार प्रवर्तले ॥२३॥
सर्व सांग विधि झाली । आनंदाची घडी लोटली ।
संतवृंदें संतोषलीं । समाधिस्थ झालीं सुखें ॥२४॥
ऐसा संत सत्कार सांभाळिला । मग कबीर स्त्रियेनें खुणविला ।
आतां पाहिजे निरोप दिधला । शब्द गुंतला आजी माझा ॥२५॥
तुम्ही आसीजे संतांपासीं । मज सत्य करणें वचनासी ।
भाक देऊनियां वाणीयासी । सामुग्रीसी आणिलें ॥२६॥
त्याचे मनोरथ पूर्ण करणें । म्हणोनि लागे मज जाणें ।
उशीर होतां उगवेल दिन । शिणतील नयन वाणीयाचे ॥२७॥
कबीर म्हणे वो कांते । मी येईन तुज संगातें ।
मेघ वर्षती अपरमित । निशी बहुत झाली असे ॥२८॥
त्या वणीयाचा उपकार । आम्हांवरी झाला थोर ।
मग स्कंधीं वाहोन सुंदर । वेगें सत्वर निघाला ॥२९॥
उभयतां करताती स्मरण । ह्रदयीं आठविला रघुनंदन ।
घरीं समाचार न घेतां जाण । कोपती सज्जन आम्हांवरी ॥३०॥
मग येऊनि दुकानापाशीं । आणोनि सोडिलें स्त्रियेसी ।
म्हणे सत्य करावें भाकेसी । वाणीयासी सुख द्यावें ॥३१॥
वाणी पाहत होता वाट । म्हणे रात्रीं येऊनियां धीट ।
कैसी ठकून गेली नष्ट । तंव अवचट आली पुढें ॥३२॥
मग हर्ष झाला वाणीयासी । भीतरीं येईं वो गुणरासी ।
 तंव आशंका झाली मानसीं । नवल तुजपासीं दिसतसे ॥३३॥
बैसली स्वस्थानीं दोघेंजणें । उपरी आरंभिलें बोलणें ।
कोरडी आलीस कवण्या गुणें । मृत्तिका चरणीं न लागेची ॥३४॥
वरुनी वर्षताती मेघ । जाला कर्दम वाहाती वोघ ।
कैसें कौतुक झालें तें सांग । आतां वेगें करुनियां ॥३५॥
ऐक गा सेटीया धर्मवंता । बोलती झाली गा कबीर कांता ।
तुझा उपकार नये सांगतां । साधुसंतां तृप्त केलें ॥३६॥
झालें संतसमाधान । हें तंव तुझेंचि पुण्य ।
मी नव्हे उपकारा उत्तीर्ण । सत्त्वरक्षण तुझेनी ॥३७॥
कबीर जीवाचा जिवलग । मज स्कंदीं वाहुनीं चांग ।
वरुनी झांकिलें सर्वांग । आणीले वेगें तुज पाशीं ॥३८॥
आपण गेले हो त्वरित । घरीं एकले साधुसंत ।
आतां सांडींगा चित्ताई भ्रांत । पुर्वीं मनोरथ आपले ॥३९॥
ऐसें बोलतांच सुंदरा । तंव वाणी कांपतसे थरथरा ।
धिक्‌ माझें जन्म दातारा । विषय व्यभिचारा प्रवर्तलें ॥४०॥
मी मतीहीन अज्ञान भारी । कुबुद्धि अमंगल शरीरीं ।
व्यर्थ भूमीभार संसारीं । मग अंतरीं पस्तावला ॥४१॥
होता विषयभाव मनीं । तो गळीत झाला तत्‌क्षणीं ।
मग धांवुनी लाला चरणीं । मजलागुनी उद्धरावें ॥४२॥
अन्यास झाला माते । सर्व शब्द क्षमा करीं वो दुरितें ।
ते माते पुण्य पवित्रे धैर्यवंते । मी मोहीत मूढमति हणोनियां ॥४३॥
आतां मज आणि कबीरासी । भेट करवीं दोघांसी ।
मज उद्धरावें त्वरेसी । म्हणोनि च्रणामिठी घाली ॥४४॥
मग म्हणे भला भला गा शेटी । बरवा भाव धरिला पोटीं ।
 आतां चला उठाउठी । करीन भेटी कबीरासी ॥४५॥
मग उठोनि दोघेंजण । त्वरें आटोपिलें दुकान ।
वेगें चालिले टाकिलें भुवन । देखिले चरण कबीराचे ॥४६॥
घातले दंडवत  नमस्कार । म्हणे मी अपराधी थोर ।
माझा करावा जी उद्धार । अभयकर ठेवूनियां ॥४७॥
कबीर अंतरज्ञानी पूर्ण । ओळखिलें तयाचें चिन्ह ।
मग स्वकरें कुरवाळून । दिधलें दान अक्षयीं ॥४८॥
कबीरभक्त ज्ञान विश्वासी । सदा संतुष्ट आणि उदासी ।
झाला रूप स्वय्पंप्रकाशी । उडाला भाव द्वैताचा ॥४९॥
ग्रेथूनि कथा रसाळ पुढती । एकाग्र होवोनी परिसिजे श्रोतीं ।
नामा सांगे भक्तांची विभूति । होय सुखप्राप्ति स्वानंदें ॥५०॥
इती श्री ग्रंथ नामावली जे । प्रार्थना करती प्रात:काळीं ।
तयाच्या पापाची होय होळी । होय अक्षयीं दास रामाचा ॥५१॥

N/A

References : N/A
Last Updated : January 14, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP