संतचरित्रे - संताजी पवार

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


रांजण गांवामध्यें संताजी पवार । असे तो सरदार नामांकित ॥१॥
स्वामी काजामध्यें असे तो सावध । भावें हा गोविंद आठवीत ॥२॥
शास्त्र भागवत करितां श्रवण । समजलें पूर्ण मनामाजी ॥३॥
नाशवंत सर्व आहे हा संसार । नाम एक सार विठोबाचें ॥४॥
ऐसें कांहीं आतां करावें साधन । रामनामीं मन लागेल तें ॥५॥
कासियासि आतां हा पाहिजे उद्योग । घेतलें वैराग्य तेचि वेळां ॥६॥
मातेलागीं तेव्हां केला नमस्कार । निघाले हे त्वरें तेथूनियां ॥७॥
बाबा संतराजा कां बा केला त्याग । घेतलें वैराग्य कासयास ॥८॥
काय जड भारी पडियेलें तुज । सांग कैसें गुज मजलागीं ॥९॥
नको नको माते या संसाराची बेडी । फारच आहे गोडी हरिनामांत ॥१०॥
नामामृत पान करीन हें आतां । माधान चित्ता होय माझ्या ॥११॥
करूं दे सार्थक आलिया देहास । नको भव फांस घालूं आतां ॥१२॥
वारंवार तुज हेचि विज्ञापना । पाहूं दे चरणा देवाजीच्या ॥१३॥
कृपा करूनियां देईं आशिर्वाद । सखा हा गोविंद करीं माझा ॥१४॥
करुनी प्रार्थना निघाले तेथुनी । चालिले ते वनीं अरण्यांत ॥१५॥
नको नको मज भव हा संसार ॥ उतरावें स्वामीसंगें मजलागीं ॥१७॥
गंगेचा हा ओघ सागरासी गेला । नाहीं परतला मागुता तो ॥१८॥
ऐसे महाराज तुम्ही कृपावंत । समाधान चित्त करा माझें ॥१९॥
येईन सांगातें करीन हे सेवा । मान्य हे केशवालागीं असे ॥२०॥
पहा महाराजा तुम्ही कृपाद्दष्टी । कां मज हिंपुटी करीतसां ॥२१॥
जळा तो वेगळा कैसा राहे मीन । जाईल हा प्राण तेचि वेळां ॥२२॥
तुमचे चरणीं बहु आहे सुख । नको भवदु:ख संसार हा ॥२३॥
सार रामनाम फार आहे गोड । पुरवा आवड माझी आतां ॥२४॥
आवडीचें लेणें द्यावें मज आतां । तुम्ही प्राणनाथा कृपासिंधु ॥२५॥
रामनास अंगीं लेववा भूषण । तेणें समाधान होय माझें ॥२६॥
दीपक ही प्रभा नव्हेचि वेगळी । पाहूं वनमाळी संगें दोघें ॥२७॥
तेव्हां संतराज करिती उत्तर । न धरवे धीर तुजलागीं ॥२८॥
न सोसवे तुज कठीण बैराग्य । नको येऊं मागें माझ्या आतां ॥२९॥
सांडोनियां द्यावी देहाची हे आस । तेव्हां तुटेल फांस संसाराचा ॥३०॥
कामक्रोध यांसी देऊं नये थार । लीन व्हावें फार संतांपायीं ॥३१॥
वस्त्रें भूषणाची धरुं नये चाड । ध्यावें नाम गोड गोविंदाचें ॥३२॥
लौकिकाची कांहीं धरूं नये लाज । बोलावें हें गुज देवाजीसीं ॥३३॥
द्वतै कल्पनेचा नसे जेथें ठाव । तोचि झाला देव स्वयें अंगें ॥३४॥
ऐकोनियां ऐसें बोले कांता त्यासी । आनंद मानसीं हाचि माझ्या ॥३५॥
तिचि वेळां केला भूषणाचा त्याग । घेतलें वैराग्य पतिसंगें ॥३६॥
पांडुरंग ध्यानीं पांडुरंग मनीं ॥ राहती ते वनीं आनंदानें ॥३७॥
तेव्हां संत राज बोले कांतेलागीं । भिक्षेलागीं वेगीं जावें आतां ॥३८॥
पारगांव असे भीमे पलीकडे । कोणासी सांकडें न घालावें ॥३९॥
संतोषानें जे कां देतील पदरीं । म्हणावें श्रीहरी अर्पण तें ॥४०॥
आनंदानें तेव्हां निघाली तेथुनी । वाचे नारायण गात असे ॥४१॥
भिक्षा मागतांना नणंद भेटली । तिणें ओळखिली भाउजई ॥४२॥
कासयासी बाई घेतलें वैराग्य । कांगे केला त्यग संसाराचा ॥४३॥
सांडोनियां सर्व हें राज्य संपत्ती । उदास कां चित्तीं झालां तुम्ही ॥४४॥
ऐकोनियां येरी करीत उत्तर । सांपडलें सार संसारींचें ॥४५॥
सार नामामृत गोड आहे फार । प्राशन चतुर करिताती ॥४६॥
सद्रुरु कृपेचा वर्षाव जाहला । प्रसाद लाधला भ्रतारासी ॥४७॥
त्यांतील हें शेष त्या पात्रीं राहिले । आवडी सेविलें माझ्या एक्या मुखें ॥४९॥
अखंड सेविती नित्य साधुसंत । भाग्या नाहीं अंत त्याचीया तो ॥५०॥
येरी म्हणे वाई करावें भोजन । भिक्षा जा घेऊन येथूनियां ॥५१॥
आग्रह करून दोन पोळ्या आतां । घातल्या झोळींत न कळतां ॥५२॥
आज्ञा घेऊनियां निघाली ते त्वरें । पोंहचली तीरा भीवरेचे ॥५३॥
भीवरे उगमीं पर्जन्य पडीला । पुर तेथें आला अकस्मात्‌ ॥५४॥
पलीकडे जावया न दिसे उतार । झाली चिंतातुर मनामाजी ॥५५॥
स्वामी माझा तेथें असे उपवासी । काय हृषिकेशी करूं आतां ॥५६॥
ऐकोनियां कोळी झाला नारायण । नेलें उतरून पार तीतें ॥५७॥
पतीलागीं तिनें केला नमस्कार । ठेविली समोर भिक्षा त्याचे ॥५८॥
येरु म्हणे कैसी आलीस तूं पार । कोळीयानें त्वरें उतरीली ॥५९॥
कैंचा कोळी तेथें आले पांडुरंग । धन्य तुझें भाग्य भेट झाली ॥६०॥
प्रेमअश्रु डोळां वाहे त्याचे नीर । भेट द्यावी त्वरें पांडुरंगा ॥६१॥
भेटी वांचूनियां न करीं भोजन । करीतसे ध्यान देवाजीचें ॥६२॥
वाणी एक होता रांजणगांवांत । झाला द्दष्टांत त्याजलागीं ॥६३॥
बोले पांडुरंग करुनि पव्कान्न । घालावें भोजन संतराजा ॥६४॥
करुनी पाकसिद्धि वाणी गेला तेथें । सांगे तो वृत्तांत त्याजलगीं ॥६५॥
येरु म्हणे तुज देवाजी भेटले । निष्ठुर कां झाले मजविसीं ॥६६॥
करीन भोजन देवा तुझ्या हातें । कांहो माझें चित्त पाहातसां ॥६७॥
पतीत मी पापी तुझा शरणागत । समाधान चित्त कर माझें ॥६८॥
न मागें मी कांहीं देवा तुज आतां । भेट तूं अनंता एक वेळां ॥६९॥
भाकितां करुणा आले नारायण । करीं बा भोजन संतराजा ॥७०॥
आलिंगूनि दोघां धरिलें ह्रदयीं । झाली विठाबाई कृपावंत ॥७१॥
काय इच्छा असे मागा तुम्ही आतां । नामीं हे अनंता प्रीत देईं ॥७२॥
भिक्षेचें पवित्र भक्षिताती अन्न । अहोरात्न ध्यान देवाजीचें ॥७३॥
आषाढीची यात्रा जात पंढरीसी । आनंद मानसीं जाहला त्यांचे ॥७४॥
भेटतील आतां माझे दिनानाथ । आणीकही संत साधुजन ॥७५॥
समारंभें जाती करीत गजर । पोहोंचले तीर भीवरचें ॥७६॥
व्रत एकादशी होती तेचि दिनीं । भीवरा भरोनि चाललीसे ॥७७॥
नामाचेंनि छंदें जाहला ब्रम्हानंद । चालिले आनंदें त्याची पंथें ॥७८॥
कूर्मरूप तेव्हां जाहला नारायण । नेलें उतरून पार  त्यातें ॥७९॥
स्वर्गीं सुरव्र बैसोनि विमानीं । पाहती नयनीं कवतुक ॥८०॥
धन्य साधुसंत भाग्या नाहीं पार । वाहे पृष्ठीं भार देव त्यांचा ॥८१॥
भीमा उतरूनि आले पंढरिसी । आनंद मानसी सर्वत्रांचे ॥८२॥
अणीकही भार अयात्रेचा तो आला । त्याणें हा देखिला नवलावो ॥८३॥
म्हणती संतराजा नेईं आम्हां पार अ। भेटवीं हा वर रखुमाईचा ॥८४॥
कृपावंत साधु आले धांऊनियां । म्हणती पंढरिराया सांभाळावें ॥८५॥
भावाची ही पेठ बांधा बळकट । मार्ग धरा नीट भक्तीचा हा ॥८६॥
संतांचा हा संग धरावा सप्रेम । न वाधा हा श्रम तुम्हालागीं ॥८७॥
रामनाम संगें धरावें भांडवल । वस्तु हे अमोल येईल हाता ॥८८॥
सभाग्य हे साधु त्यांनीं केला सांठा । देतील ते वांटा तुम्हांलागीं ॥८९॥
नामाचें तें रूप असे सर्व सृष्टी । दाविती तो द्दष्टी ज्ञानाची हे ॥९०॥
तेव्हां तुझ्या मना होईल आनंद । तोचि ब्रह्मानंद ओळखावा ॥९१॥
द्वैत क्ल्पनेसीनसे जेथें ठाव । आला तोचि देव स्वयें अंगें ॥९२॥
सद्‌गुरु कृप्नें हरेल हा भ्रम । दिसेल हें ब्रम्हा जग सारें ॥९३॥
त्याजविण कोठें रिता नाहीं ठाव । धरा नामीं भाव विठोबाच्या ॥९४॥
उतरूनि भीमा गेले पैल तीरा । भेटावया वरा रखुमाईच्या ॥९५॥
ब्रम्हानंद झाला सर्वांचे अंतरीं । आनंदें श्रीहरि आठविती ॥९६॥
पंढरीच्या सुखा भाग्या नाहीं अंत । जाणताती संत साधुजन ॥९७॥
नित्यानित्य घडे चंद्रभागे स्नान । अखंड दरुशन देवाजीचें ॥९८॥
तयाचिया भाग्या अंत नाहीं पार । राहिला सार संतोबा तो ॥९९॥
नामदेव तेथें याचक भिकारी । हाका त्यासी मारी वारंवार ॥१००॥
कांहीं मज द्यावें तुमचें उच्छिष्ट । भरेल हें पोट तेणें माझें ॥१०१॥
कृपावंत साधु आली त्या करुणा । वंदितो चरणा नामदेव ॥१०२॥

N/A

References : N/A
Last Updated : January 14, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP