संतचरित्रे - कमाल

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


कबीराचे घरीं आले संतजन । रात्र झाली जाण प्रहर एक ॥१॥
उठोनी कबीर संतां नमन केलें । बैसावया दिलें तृणासन ॥२॥
कांतेसी म्हणत संत उपवासी । यासी भोजनासी घालावें हो ॥३॥
अवश्य म्हणे कांता एक युक्ति करा । कमाल दुसरा घेऊनि संगें ॥४॥
ऐशा समयांत वाणी ते निद्रिस्थ । चला जाऊ येथें चोरीलागीं ॥५॥
चोरूनियां धान्य घेऊनियां यावें । संतांसी वालावें भोजनासी  ॥६॥
घेऊनियां शस्त्र उभयतां निघाले । घर तें फोडिलें वाणियाचें ॥७॥
प्रथम देखिली द्रव्याची ते रासी । नये उपयोगासी अमुचिया ॥८॥
पुढें तें देखिलें डाळ आणि पीठ । आनंदलें मोठें मन त्याचें ॥९॥
सर्वही साहित्य होएं वाण्या घरीं । कमाल अंतरीं संतोषला ॥१०॥
संतांचे पुरती सामीग्री घेतली । मोट ते बांधिली बरी तेणें ॥११॥
घेऊनियां मोट गवाक्षद्वारें । कबीराचे करें दिली तेणें ॥१२॥
मोकळ्या पडल्या द्रव्याचिया रासी । सावध वाण्यासी करूनि येतों ॥१३॥
योवोनी कमाल वाणियासी बोले । सांभाळ आपुलें द्रव्य आतां ॥१४॥
आइकोनी शब्द वाणी जागा झाला । कमाल चालिला तेथूनियां ॥१५॥
तांतडीनें निघतां गवाक्षाचें द्वारें । अर्ध तें शरीर गुंतलेंसे ॥१६॥
त्वरें करोनियां वाणी तो धांवला । कमाल धरिला पायीं तेणें ॥१७॥
तेव्हां तो कमाल म्हणे कबीरासी । न सोडी मजसी वाणी आतां ॥१८॥
आतां ताता तुम्ही कापा माझें शीर । जावें हो सत्वर धांवोनियां ॥१९॥
न कापितां शीर होईल फजिती । घरासी न येती संत कोणी ॥२०॥
खरें मानूनियां काढियेलें शस्त्र । कापियेलें शीर कमालाचें ॥२१॥
त्वरें करोनियां कबीर चालिला । आश्रमासी गेला आपुलिया ॥२२॥
झाला जो वृत्तांत सांगे कांतेलागीं । येरी म्हणे वागीं बरें केलें ॥२३॥
धन्य तो कमाल धन्य त्याची भक्ति । देह संतांप्रती अर्पियेला ॥२४॥
याचा खेद स्वामी न धरावा चित्ता । सामोग्री हे संतां अर्पा तुम्ही ॥२५॥
देवोनी सामोग्री संतांसी तो म्हणे । करावे भोजन स्वामी आतां ॥२६॥
घेवोनि सामोग्री केलेंसे गलबला । चोर धरियेला धांवा धांवा ॥२८॥
धांवोनियां आले नगरीचे लोक । पाहाती अनेक तयालागीं ॥२९॥
रुंड असे तेथें त्यासि नाहीं शीर । करिती विचार एकमेक ॥३०॥
म्हणती वाण्यासी काय तुझें नेलें । शोधोनी पाहिलें मग त्यानें ॥३१॥
सर्वस्वही आहे नेलें डाळ पीठ । साहित्य तें मिष्ट भोजनाचें ॥३२॥
श्रुत झाली वार्ता गांवींच्या राजाला । म्हणे त्या चोराला शूळीं घाला ॥३३॥
राजदूत तेव्हां आले धांवोनियां । रुंड घेविनियां चालिले ते ॥३४॥
शूळ तो रोंविला भागीरथी तीरीं । रुंड तयावरी घातलें तें ॥३५॥
पाहाती ते जन सर्व नामरीक । करील कवतुक पांडुरंग ॥३६॥
कबीरासी संत आशिर्वाद देत । कृपा सादोदित असों द्यावी ॥३७॥
वैष्णवांचा मेळा पुसोनि चालिला । कबीर निघाला बोळवीत ॥३८॥
करिती गजर हरिच्या नामाचा । पंथ भागिरथीचा धरिला त्यांनीं ॥३९॥
भागिरथी तीरीं रोंविलासे शूळ । नयनीं सकळ पाहाती संत ॥४०॥
शूळावरी रुंड देखिलें नयनीं । हात जोडुनी दोन्ही नमस्कारी ॥४१॥
सर्वत्रीं देखलें आपुलिया डोळां । जीव निर्जिवाला आला कैसा ॥४२॥
वैष्णव पुसती कभीरालागोनी । विपरीत करणी कैसो झाली ॥४३॥
तेव्हां तो कबीर बोलतसे संतां । चोर हा देखिला हरिभक्त ॥४४॥
तुम्हांपाशीं त्याचें गुंतलें संचित । म्हणूनि दंडवत केलें त्यानें ॥४५॥
तंव त्या संतांनीं घेतलीसे आळी । उठवीं वनमाळी यासी आतां ॥४६॥
तंव त्या कबीरें श्रुत केलेई वार्ता । तेव्हां त्या हो संतां समजलें ॥४७॥
तेव्हां ते वैष्णव बोलती सकळ । आणा शिरकमल तुम्ही येथें ॥४८॥
इकडे मातेनें कमालाचें शीर । घेवीनी धणीवर पाहे द्दष्टी ॥४९॥
म्हणे धन्य बाळा येउनी पोटाशी  । उभय कुळांसी उद्धरिलें ॥५०॥
संतांचिया कजा वेंचिलासी प्राण । जगीं तूंचि धन्य म्हणविलें ॥५१॥
वैकुंठींचा वासी झालासी मिरासी । आम्हां पतितांसी सोडियेलें ॥५२॥
तुजसवें मज जावें बा घेवोनी । करी विनवणी पांडुरंगा ॥५३॥
तुजविण मज न गमे सखया । येईं तूं तान्हया धांवोनियां ॥५४॥
हरणी चुकली जैसी कां पाडसा । दश दिशा ओसा तिजलागीं ॥५५॥
तैसें मज झालें न गमेचि कांहीं । भेट माझे आई कमाला तूं ॥५६॥
काय तुझे गुण आठवूं मी आतां । सत्त्वधारी सुता कबीराच्या ॥५७॥
नाशवंत देह त्याचा केला त्याग । धन्य हें वैराग्य तुझें बापा ॥५८॥
ऐसी तेही माया कारेतसे शोक । अकस्मात्‌ देखे कबीराला ॥५९॥
झालें वर्तमान सांगितलें तिसी । चिंता हे मानसीं करूं नमो ॥६०॥  
वेगीं देईं शीर उठला कमा ल । संतांचा हा बोल सत्य असे ॥६१॥
सभळित शीर घेउनी कबीर । संतांचिया करें दिलें तेव्हां ॥६२॥
उतरुनी रुंड वैष्णवांनीं शीर । ठेविलें झड करी नामघोषें ॥६३॥
भावाचा तो देव भक्तीचा अंकिला । कमाल उठिला तेचि वेळीं ॥६४॥
हरि नामघोषें करुनि गजर । संतां नमस्कार केला तेणें ॥६५॥
ऐसें सकळ जनीं पाहिलें कौतुक । संतांचा अधिक महिमा असे ॥६६॥
नामा म्हणे त्याचा होईन मी दास । शरण तयांस वारंवार ॥६७॥

N/A

References : N/A
Last Updated : January 14, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP