भक्तवत्सलता - अभंग ७६ ते ८०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


७६.
अगम्य सामर्थ्य नयेचि गणना । तारूनि पाषाणा केलें सम ॥१॥
तारिसी वान्नर अवघेची सेना । तोडिसी बंधना पांडु-रंगा ॥२॥
काय वनचर जाणती प्रत्यक्ष । परिक्षिती साक्ष दिस सातां ॥३॥
कृतत्रेतद्वापारांचे आदि अंतीं । नामाचिते ख्याति म्हणे नामा ॥४॥

७७.
सर्व देवांमाजी विठ्ठल वरिष्ट । बोलतसे स्पष्ट वेद- शास्त्रीं ॥१॥
अच्युता अनंता माधवा मुकुंदा । गोपाळा गोविंदा गोपवेषा ॥२॥
कृष्णा कमलाक्षा कस्तुरीचा टिळा । नेसला पाटोळा खोंचे शिरीं ॥३॥
नामा म्हणे रामकृष्ण नारायण । तारिसी पाषाणां सिंधूमाजी ॥४॥

७८.
षड्‍गुणसंपन्न पंढरिच्या राया । आमुच्या स्वामिया के-शिराजा ॥१॥
रामकृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा । सज्जनी स्वानंद सर्वातीता ॥२॥
गोविंदा गोपाळा गोप वेषधारी । गोव-र्धन धरी नखावरी ॥३॥
दुष्त दुर्जनाच्या दुखवीना चित्ता । पावन प्रतिता नामा म्हणे ॥४॥

७९.
संतोषाकारणें सज्जन जीवासी । साहाकारी होसी ना-रायणा ॥१॥
समान करिसी सर्वाभूतीं जाण । पतीत पावन भाक तुझी ॥२॥
भक्ति भाव ज्यांचा भाग्यें आगळिया । होसी देवराया सर्वविध ॥३॥
समर्थपणासी कोणा विचारावें । नामा म्हणे भावें कारण हा ॥४॥

८०.
अलक्ष्या अच्युता सख्या भक्तराया । तूंचि देवराया पांडुरंगा ॥१॥
परात्परतर पार नेणे ब्रह्मा । तूंचि निजधाम स्वयें देसी ॥२॥
विश्वामित्रासाठीं विलंब न करीं । बळिचिया द्वारीं भृत्य होती ॥३॥
नामा ह्मणे तुझी माव नेणे कोणी । धांवें चक्रपाणी त्वरें नेटें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP