स्फुट श्लोक - श्लोक १६ ते १७

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


१६
कितेक जीव जन्मती । कितेक मृत्य पावती । कितेक होत जातसे । मना प्रचीत येतसे ॥१॥
कितेक वृक्ष वाढती । कितेक वृक्ष मोडती । कितेक पाहातां रचे । कितेक मागुतें खचे ॥२॥
पुरें कितेक पट्टणें । कळे समस्त आट्टणें । कितेक होत दाटणी । स्थळें न येत वांटणी ॥३॥
रुणानबंद तों घडे । पुन्हा सवें चि वीघडे । कितेक काल तों वसे । सवें चि सर्व नीरसे ॥४॥
कितेक देश लागला । कितेक देश भंगला । कितेक नृपती भले । परंतु मृत्य पावले ॥५॥
कितेक उत्पती स्थिती । कितेक पावती गती । तुम्ही समस्त देखता । कठीण काळ धाकता ॥६॥
जना प्रतक्ष हें दिसे । तयासि संशयो नसे । रचेल तें खचेल रे । दिसेल नीरसेल रे ॥७॥
दिसेल भास तो भ्रमु । भ्रमें जनासि विभ्रमु । असार सार तें पाहा । कळोनिया सुखें रहा ॥८॥
स्वहित जाणतां खरें । न जाणतां नव्हे बरें । क्षराक्षरासि वीवरा । विचार हा बरा करा ॥९॥
असार सार वाड रे । क्षिरा निरा निवाड रे । करील राजहंस तो । जनामधें विशेष तो ॥१०॥
भुतें भुतासि पाहाती । भुतें भुतांत राहाती । भुतां सबाहे अंतरीं । विचार सार तो धरीं ॥११॥
अरे अनन्य भक्त हो । जना अतीत मुक्त हो । स धन्य धन्य धन्य रे । विचार सार मान्य रे ॥१२॥
१७
कदा कळहोचि लागला । भुतीं कळहो विभागला । अनंत पंथ आगमी । कळहो उदंड नीगमी ॥१॥
प्रकृतिचा कळहो उठो । जनीं प्रकुर्ति वोहटें । प्रकुर्तिमूळ भांडणे । कळहो उदंड मीपणें ॥२॥
कळहो अनादि हा असे । विवंचितां चि नीरसे । अहंमती विरोचिना । तरी कळहो सरेचिना ॥३॥
अभेद भक्तिचा ठसा । अनन्य भाव तो कसा । निवेदनेंचि वोळखा । अहंपणें झकों नका ॥४॥
विकारलेश जों उरे । अहंपणें भरीं भरे। तयासि पाहातां बरें । विरोन रहातां खरें ॥५॥
कदापि वीवरेचिना । तरी मनु थिरेचिना । अहंपणेंचि पातकी । उरेल तोचि घातकी ॥६॥
उरेल तो अभक्त रे । नुरेल तोचि भक्त रे । उगारला अहंपणें । तयासि काय सांगणें ॥७॥
बरें कळेल तें करा । परंतु हेत वीवरा । अहेत तो अहेत रे । धरूनि काय हेत रे ॥८॥
अनन्य भाव ही तरे । उरेल तो पतीत रे । प्रतक्ष वेगळा पडे । अहंपणेंचि नीवडे ॥९॥
धरून पक्ष काय रे । उपाय तो अपाय रे । तुम्ही तुम्हांस वीवरा । स्वहित तें मनीं धरा ॥१०॥
जनीं उदंड पाहिलें । कळहो करीत राहिलें । अनन्य देव भेटला । कळहो तयास तूटला ॥११॥
कळहो करील शब्द रे । अनंत तो निशब्द रे । तुम्ही अनंत कां न व्हा । वेवादतां अव्हासव्हा ॥१२॥
अनंत ब्रह्म तें असे । तयास पक्ष ही नसे । संत संत संत रे । निवांत रे निवांत रे ॥१३॥
स्वयें चि तो चि होइजे । पदीं मिळोनि जाइजे । उरेल तो कळहो करु । उदंड पक्ष ही धरु ॥१४॥
उदंड हो बरें बरें । तुम्ही म्हणाल तें खरें । कळेल तें सुखें करा । धराल तें सुखें धरा ॥१५॥
उडेल तो पडेल रे । पडेल तो रडेल रे । उडेचिना पडेचिना । रडेचिना दडेचिना ॥१६॥
वितंड वाद घालणें । वितंड शब्द बोलणें । वितंड बंड ही नुरे । उरेल तें चि तें नुरे ॥१७॥
अनेक शब्दभावना । किती करूं विवंचना । जनी म्हणेल जें जसें । तयांसि मानिजे तसें ॥१८॥
हितार्थ सांगणें घडे । विवंचिता तिढा पडे । जना प्रचीत नावडे । कुळाभिमान तो जडे ॥१९॥
अनन्यता परोपरीं । उदास दास वीवरी । कळहो जनासि वाटला । मनु बळें उचाटला ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP