स्फुट श्लोक - श्लोक १ ते २

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


( प्रमाणिका वृत्त )


सुरेंद्रें चंद्रसेकरु । अखंड ध्यातसे हरु ।
जनासि सांगतो खुणा । श्री राम राम हें म्हणा ॥१॥
महेश पार्वतीप्रती । विशेष गूज सांगती ।
सलाभ होतसे दुणा । श्री राम राम हें म्हणा ॥२॥
विषें बहुत जाळिलें । विशेष आंग पोळलें ।
प्रचीत माझया मना । श्री राम राम हें म्हणा ॥३॥
विशाळ व्याळ वेस्त कीं । नदी खळाळ मस्तकीं ।
ऋषीभविष्यकारणा । श्री राम राम हें म्हणा ॥४॥
बहुत प्रेम पाहिले । परंतु सर्व राहिले ।
विबुधपक्षरक्षणा । श्री राम राम हें म्हणा ॥५॥
अपाय होत चूकला । उपाय हा भला भला ।
नसे जयासि तूळणा । श्री राम राम हें म्हणा ॥६॥
विरामधें विरोत्तमु । विशेष हा रघोत्तमु ।
सकाम काळ आंकणा । श्री राम राम हें म्हणा ॥७॥
बहुत पाहिले खरें । परंतु दोनि आक्षरें ।
चुकेल येमयातना । श्री राम राम हें म्हणा ॥८॥
मनीं धरूनि साक्षपें । अखंड नाम हें जपें ।
मनांतरीं क्षणक्षणा । श्री राम राम हें म्हणा ॥९॥
देहे धरूनि वानरी । अखंड दास्य मी करीं ।
विमुक्त राज्य रावणा । श्री राम राम हें म्हणा ॥१०॥

नमु गणेश शारदा । प्रबंदयोगिणी सदा ।
अनंत गुण लाघवी । प्रसंन्न होतसे कवी ॥१॥
मृगांकमौळिचा मनीं । अखंड ध्यान चितनीं ।
तया रुपाकडे मना । बहुत भाव भावना ॥२॥
अभंग ठाण बाणलें । गुणी धनुष्य ताणलें ।
सपीछय तें सणाणिलें । भुमंडळीं दणाणिलें ॥३॥
रघुविरा धरा मनीं । त्यजून काम कामिणी ।
पथी सगुण गामिनी । तडक मेघदामिणी ॥४॥
सुवर्णरत्नभूषणीं विराजत्तो विभूषणीं ।
समर्थं राम देखिला । मयंक रंक शंकला ॥५॥
भुगुटकीरटीं बरी । हिरेकण्या परोपरीं ।
अनेक सार कुसरी । सरी नसेल दूसरी ॥६॥
विशाळ भाळ साजिरें । प्रचंड दंडलें बरें ।
सुगंध गंध लेपनी । सुरंग ते विलेपनी ॥७॥
धगधगीत कुंडलें । सतेज तेज दंडलें ।
रसाळ मुख सुख हो । महंत पावले मोहो ॥८॥
अनेक बीक नासिकीं । रुपें रसाल तें फिकीं ।
सुवास वास दाटला । बहुत भृंग लोटला ॥९॥
कृपावलोकनी भले । विशाळ नेत्र शोभले ।
सुवस्ति घेतली सुखें । नये चि बोलतां मुखें ॥१०॥
हिरे सुढाळ ते किती । विशेष दंतपंगती ।
परोपरी मनोहरें । मधुर मृद उत्तरें ॥११॥
प्रचंड दंड दंडलें । वितंड दैत्य खंडलें ।
विरश्रिया घडी घडी । धनुष्य बाण भातडी ॥१२॥
सुगंध बाणली उटी । विशेष कास गोमटी ।
सुढाळ माळ साजिरी । विभूषणें परोपरीं ॥१३॥
बिदावळी पदीं वसे । विशेष दूसरा नसे ।
विबुधबंद तोडिले । अनंत जीव सोडिले ॥१४॥
श्रीराम शामसुंदरु । समागमें फणीवरु ।
विराजते सिता सती । समोर दास मारुती ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP