खंड ७ - अध्याय १४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ दिति म्हणे कश्यपासी । गणेश उपासना सांगा मजसी । त्यापरी भजेन विघ्नेश्वारासी । निरंतर मी भक्तीनें ॥१॥
मुद्‍गल म्हणती दक्षाप्रत । ऐसें दिति विचारित । तेव्हां कश्यप तिजला देत । दीक्षा दशाक्षर मंत्राची ॥२॥
विधियुक्त विधानपूर्वक । दिति स्वीकारी तो गणेशमंत्र पावक । वृक्षसमृद्ध वनीं जाऊन चित्तक । दृढ करी मंत्रावरी ॥३॥
ऐसें तप तेथें आचरित । निराहार राहून गणेशध्यान करित । नासाग्रदृष्टि लावून जप करित । दशाक्षर गणेशमंत्राचा ॥४॥
अन्य सर्व कामना सोडून । विघ्नेश्वरीं रत एकमन । तयाच्या प्रभावें भ्रांतिहीन । जाहली दिति त्या वेळीं ॥५॥
पुत्रपौत्रादिक भावांत । रसहीन ती होत । योगपारंगत होण्या भजत । पूर्णभावें द्विरदाननासी ॥६॥
ऐसें एक सहस्त्र वर्षें आचरत । योगभूतिपरायण अविरत । तप तेव्हां शांतियोग लाभत । योगिवंद्य ती जाहली तैं ॥७॥
दत्तयाग मनीं स्मरत । विघ्नेश्वर पूजन कधीं न सोडित । तेव्हां प्रसन्न होऊन प्रकटत । गणनायक तिच्यापुढें ॥८॥
म्हणे दिति उघडी नयन । आतां समाप्त करी ध्यान । मीं उपस्थित गजानन । वर मग मनोवांच्छित ॥९॥
गणेशाचें ऐकून वचन । दिति हर्षभरित मन । ध्यान संपवून करी नमन । भक्तिभावें पूजी तयासी ॥१०॥
पुनरपि विघ्नेशा प्रणाम करित । करांजली जोडून हर्षभरित । पूजी विघ्नेश्वरा भक्तियुक्त । स्तवन करी ती दक्षपुत्री ॥११॥
विघ्नराजासी भक्तविघ्नहर्त्यासी । अभक्तां विघ्नकर्त्यासी । कश्यपासी परेशासी । विनायका तुज नमन असो ॥१२॥
ढुंढिसी लंबोदरासी सर्व भोगभोक्त्यासी । दीनांच्या पतीसी हेरंबासी । दीनदीनासी दीनपाळकासी । परेशा गणेशा नमन तुला ॥१३॥
परात्परतमासी परात्परकर्त्यासी । महोदरासी अनादीसी । सर्वांच्या आदिभूतिधरासी । आदिपूज्या तुज नमन ॥१४॥
सर्वांच्या अंतःस्थासी । शिवपुत्रासी विष्णुपुत्रासी । परमात्म्यासी वरेण्यसूनूसी । शेषपुरा तुज नमन असो ॥१५॥
सर्वपूज्यासी ज्येष्ठासी । ज्येष्ठांच्या ज्येष्ठ मूर्तीसी । ज्येष्ठ राजतमासी । मातापित्या तुज नमन असो ॥१६॥
ब्रह्मपतीसी ब्रह्मांसी ब्रह्मदात्यासी । ब्रह्मांच्या ब्रह्मरूपासी । एकदंतासी गजाननासी । देवासुरासम भावा तुज नमन ॥१७॥
योगाकारासी योग्यांस योगदासी । किती स्तवूं मी तुजसी । गणाधीशा शांतींच्या शांतिरूपासी । वेदादीही जेथ हरले ॥१८॥
त्यांना तैसें शिवादी देवासी । पूर्णत्वें स्तवण्या अशक्य वाटसी । अल्पबुद्धि मी तुजसी । प्रणाम करी सर्वेशा ॥१९॥
विघ्नपा संतुष्ट होऊन । माझी अल्प भक्ति गोड मानून । जरी वर देण्या उद्युक्त मन । तरी माझा पुत्र होई ॥२०॥
दयासिंधो हाचि वर । देऊन होई माझा तारक थोर । प्रकृति आसुरी उग्र । वेदांत उक्त द्विरदानन ॥२१॥
तो मी महाभक्तीनें भजेन । निरंतर तुझें करीन पालन । जेव्हां तूं माझा सुत होशील महान । तुझ्या मातेस कैसा बंध ॥२२॥
मायामय बंध तोडून । तव चरणीं ढुंढे माझे मन लावून । दृढभक्ति दे मज प्रसन्न । आसुर बंधहीन करी मला ॥२३॥
तुझ्या चरण कमळासवक्त । करी मज नित्य भक्तियुक्त । ऐसें बोलून गणाधीश नमित । दक्षनंदिनी त्या समयीं ॥२४॥
गणराज हर्षयुक्त । दितीस तेव्हां सांगत । तूं रचिलेलें हें स्तोत्र वाटत । अत्यंत प्रिय मजलागीं ॥२५॥
वाचका श्रोत्यास सर्व सिद्धिप्रद । हें स्तोत्र होईल सुखद । तुझा पुत्र होईन मीं वरद । आसुर भाव संहारीन ॥२६॥
तूं मज भजशील निरंतर । भावपरायण भक्तिधरंधर । ऐसें बोलून अंतर्धानपर । विघ्नेश होत ब्रह्मनायक ॥२७॥
दिति स्वगृहीं परतून । पतीस करी अभिवादन । सांगे सर्व वृत्तांत मुदितमन । तोही हर्षित ऐकतां ॥२८॥
कश्यप प्रेमभरें आलिंगित । दितीस आनंदाश्रू ढाळित । म्हणे धन्य धन्य तूं वाटत । कृतकृत्य मजसी प्रिये ॥२९॥
सफल तुझा झालां जन्म । गणाध्यक्ष दर्शन मनोरम । शांतिदायकाचें होऊन । पावन तूं झालीस ॥३०॥
असुरींचा तुझा सुत । होऊन गणाधीश विलसेल जगांत । योगिवंद्य महद्‍भाग्यें शिश्चित । तारिलेंस तूं मजला गे ॥३१॥
तूं माझी पत्नी शोभन । गणेश भजनीं रत होऊन । धन्य केलेंस माझें जीवन । जन्मकर्मादी सर्वही ॥३२॥
आसुरी तूं स्वहितांत रत । ऐसें बोलून कश्यप स्तवित । दिति प्रणाम करून सेवित । भक्तिभावें स्वपतीसी ॥३३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे सप्तमे खंडे विघ्नराचरिते दितिवरप्रदानं नाम चतुर्दशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP