खंड ७ - अध्याय ३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ कश्यप कथा पुढें सांगत । गणेशव्रत पुण्यें मोहित । शंकर सदैव पार्वतींत । तन्मय होऊन राहतसे ॥१॥
विप्राचा वेष घेऊन । हिमाचलासमीप जाऊन । विघ्नेश्वरास स्मरून । नाना कळा दाखवी तया ॥२॥
क्षणांत त्यास मोहवित । हिमाचल वर माग म्हणत । जरी असेल माझ्या हातांत । तरी पुरविन मनोरथ तुझे ॥३॥
तेव्हां द्विज म्हणे दे मजप्रत । नगाधीशा उमा रूपयुक्त । अन्य वर मी नाहीं मागत । ऐकून मौन धरी तो गिरी ॥४॥
त्यास पाहून शोकमग्न । जगन्मयी उमा बोले वचन । हयास निःशंक मज देई ताता प्रसन्न । हा शिवचि आला असे ॥५॥
तें ऐकतां होत प्रमुदित । आपुली सुता देण्याचें मान्य करित । शिव स्वस्थानास जात । देव सन्मन त्याचा करिती ॥६॥
शुभ लग्न पाहून गणेशपूजन । करून देवासहित प्रसन्न । शिव गेला त्वरा करून । पर्वतेशाकडे तेव्हां ॥७॥
हिमाचल प्रसन्नचित्त । स्वागत शिवाचें करित । विवाहमंगल साजरें करित । ब्राह्मणहस्तें त्यावेळीं ॥८॥
वेदपारंगत ते विप्र देत । आशीर्वाद नव दांपत्याप्रत । शिवेस घेऊन नंतर जात । कैलासावरी महेश ॥९॥
पार्वतीसह रममाण होत । पुढें महायोगी स्कंद जन्मत । गणेशासी तो आराधित । तारकासुरासी संहारिलें ॥१०॥
दैत्य नायक तारक मदमत्त । जगसी होता पीडा देत । त्यास लीलया वधित । चराचरा सुखी केलें ॥११॥
हें सर्व स्कंद चरित । गणेशकृपेनें सिद्ध होत । शिव तेव्हां मायामोहित । पार्वतीच्या अधीन राही ॥१२॥
एकदा पार्वती मैत्रिणींसहित । आपुल्या मतीं गर्व करित । म्हणे मी धन्य धन्य त्रिभुवनांत । शिव माझ्या अंकित असे ॥१३॥
मी शिवास सोडुन । एकटीच गेलें होतें प्रेमयुक्त मन । परी तेथ अपमान होऊन । अग्निकुंडांत प्राण दिला ॥१४॥
पुनरपि हिमाचलाच्या सदनांत । सुता होऊन मीं जन्मत । शंकर मजवरी क्रुद्ध होत । पर्वतान्ततरीं निघून गेला ॥१५॥
मी तयासी तप करून । गणेशातें आराधून । केला मजवरी प्रसन्न । तेव्हां मोहित तो झाला ॥१६॥
तदनंतर स्वयं याचना करित । माझी पत्नीत्वें तो हिमालयाप्रत । त्याची संमती लाभून वरित । प्रेमभरें मजला तैं ॥१७॥
प्रथम गेला मज सोडून । पुनरपि करी याचना येऊन । आतां माझ्या तो अधीन । सर्वस्वीं असे निःसंशय ॥१८॥
माझी ममता पूर्ण सांप्रत सांप्रत मानिनीचें रहस्य रक्षित । ऐसा विचारें मनीं हर्षित । नगात्मजा ती धन्य मानी ॥१९॥
तेव्हां तिच्या सख्या म्हणत । धन्य तूं मानिनी स्त्रियांत । शंकरास जिंकून तपःप्रभावयुत । अधीन त्यास केलासी ॥२०॥
हें सख्यांचें ऐकून वचन । जगदंबा जाहली अति प्रसन्न । मनांत गर्व दाटून । हास्य करी मनमोकळें ॥२१॥
तिच्या हास्यांतून जन्मला । कामसदृश एक पुरुष भला । मम नामें ख्यात झाला । महाभाग भव्य पर्वतासम ॥२२॥
त्यास पाहून देवी विस्मित । आपुल्या मैत्रिणींसमवेत । त्या पुरुषास विचारित । कोण तूं कां येथ आलास ? ॥२३॥
तूं कोणाचा अससी । काय करूं इच्छिसी । पुरुष तेव्हां म्हणे तिजसी । मी तुझा सुत हास्यज ॥२४॥
तुझ्या हसण्यांतून माझें जनन । झालें आतां करी आज्ञापन । मी सर्व भावें सेवीन । तेव्हां पार्वती म्हणे त्यासी ॥२५॥
मी गर्व धरिला मनांत । तदनंतर तूं जन्म घेत । म्हणोनि मम नामा प्रख्यात । माझा पुत्र तूं बहु मानी ॥२६॥
गणेशासी भक्तीनेम भज । तेणें सर्व इच्छित सफल सहज । त्यायोगें विश्वांत हास्यज । पुत्रा तूं ख्यात होशील ॥२७॥
तदनंतर महादेवी देत । षडक्षरमंत्र तयाप्रत । विधियुक्त तो स्वीकारित । प्रणाम करी पार्वतीसी ॥२८॥
तदनंतर वनांत जाऊन । तप करी मनीं प्रसन्न । तेथ शंबर दैत्य येऊन । पार्वतीपुत्रासमीप बसला ॥२९॥
काळें प्रेरित तो दैत्येश । त्यास मम म्हणे कोण तूं वीर बलेश । कोणत्या कारणें या समयास । येथ आलास सांग मजला ॥३०॥
शंबरासुर त्यास म्हणत । मी येथ आदरयुक्त । आलों विद्या देण्या तुजप्रत । समर्थ त्यायोगें तूं होशील ॥३१॥
ऐसें सांगून महादैत्य ममाप्रत । नानाविध विद्या देत । ती आसुरी विद्या समस्त । शिकला पार्वतीपुत्र यत्नें ॥३२॥
विद्या सारी साध्य करित । स्वयं कामरूप तो होत । नाना सामर्थ्ययुक्त हर्षित । जाहला मम अत्यंत ॥३३॥
शंबरासी करी प्रणिपात । हितकारक वचन बोलत । त्याचा स्वभाव भक्तियुक्त । हात जोडी तो उदारधी ॥३४॥
ममासुर तेव्हां म्हणे त्यास । महाभागा महात्कार्यास । आतां शिष्य म्हणून या ममास । स्वीकारी मज बळवंता ॥३५॥
आता उपदेश करावा । माझा जीवितक्रम कैसा असावा । शंबर म्हणे गणेशदेवा । आराधी शक्तितयुक्त मंत्रानें ॥३६॥
मानदा तो प्रसन्न होईल । तुज वर देण्यास प्रकटेल । तेव्हां ब्रह्मांडाचें राज्य प्रबळ । माग त्या महाप्रभूजवळी ॥३७॥
तत्त्वसंभूत । तत्त्वांपासून । मृत्यूभय मजला कदाचन । ऐसें माग वरदान । दुसरा नको कांहीं वर ॥३८॥
ऐसें वर मिळवून । महाभागा ये मज सदनीं प्रसन्न । तदनंतर कर्तव्य तुज लागून । सांगेन मीं परमादरें ॥३९॥
ऐसेंचि मी करीन । ऐसें ममासुर बोले वचन । शंबरही हर्षितमन । स्वगृहासी तैं परतला ॥४०॥
मम तेथें च वनांत वसत । दारूण त्तप आचरित । वारा खाऊन राहत । ध्याई मनीं गजाननासी ॥४१॥
ऐसीं दिव्य सहस्त्रवर्षें जात । तेव्हां गणनायक तुष्ट होत । प्राणशेष ममासुराप्रत । वर देण्यासी प्रकटला ॥४२॥
गणनाथ उभा पुढयांत । परी त्या असुरासी न झालें ज्ञात । ध्यानसंस्थास त्यास म्हणत । यथायुक्त गणाधीश तैं ॥४३॥
महाभागा ममासुरा सांप्रत । पहा मीं तुझ्य़ा ह्रदयांत स्थित । तुझ्या तपानें संतुष्ट । आलों वर देण्यास तुला ॥४४॥
तुझ्या मंत्रजपानें प्रसन्न । तुजसमोर मी गजानन । हें ऐकतां धीरगंभीर वचन । ममानें डोळे उघडिले ॥४५॥
पुढयांत विघ्नेश्वरास पाहत । तैं त्वरित वरती उठत । त्यास नमस्कार करित । पूजितसे भक्तीनें ॥४६॥
पुनरपि प्रणास करित । स्तोत्र म्हणून स्तवन करित । गणनाथा गणनाथा गणपते तुज मीं वंदित । गणपद प्रदात्या नमोनमः ॥४७॥
गणरूप प्रधारकासी । विघ्नपते विघ्नरूफासी । भक्तांची विघ्ने हरणकर्त्यासी । इतरांस प्रहारकर्त्या नमन ॥४८॥
अनाथांच्या नाथासी । नाथांस नाथपददात्यासी । नाथांच्या नाथरूपासी । ब्रह्मणस्पते नमोनमः ॥४९॥
ब्रह्मदात्यासी । ब्रह्मपालका अमेयशक्तीसी  । शक्तिरूपधरासी । शक्तींस शक्तिदात्या नमन तुला ॥५०॥
शक्तींच्या शक्तिरूपासी । परेशासी परपदप्रदात्यासी । पररूपासी परात्परासी । ज्येष्ठराजा तुला नमन ॥५१॥
ज्येष्ठांस परमपदप्रदात्यासी । ज्येष्ठासी ज्येष्ठहीनासी । मातापित्या जगाच्या तुजसी । स्वानंददात्या नमोनमः ॥५२॥
विघ्नेश्वरासी अनंतविहारकर्त्यासी । सकलांच्या रक्षण कर्त्यासी । सिद्धिबुद्धिपतीसी । परात्म्या हेरंबा तुज नमन ॥५३॥
मी किती करावें स्तवन । योगप्रद एकदंत तूं महान । योगस्वरूप परमार्थभूत पावन । वेदही असमर्थ स्तवन करण्या ॥५४॥
शंभू आदि देव योगिजन । जेथ हरले धरिती मौन । ढुंढे तेथ माझें काय ज्ञान । आतां शरण सर्वभावें ॥५५॥
धन्य मी असे निश्चित । गजानना तुझें दर्शन घडत । जें अगम्य अलभ्य असत । योगिजनांसी सर्वदा ॥५६॥
मी तुझें पावलों साक्षात‍ दर्शन । कृतकृत्य जाहलों पावन । गणाधीशा जरी वरदान । देण्यास मज तूं उत्सुक ॥५७॥
तरी कोणत्याही तत्त्वापासून । अथवा तत्त्वज प्राण्याहातून । मजसी न यावें कदापि मरण । ऐसा एक वर मज देई ॥५८॥
जें जें मीं इच्छीन । तें तें सकळ होवो शोभन । आरोग्यादींनी संपन्न । मज करी तूं गजानना ॥५९॥
ब्रह्मांडगोलाचें राज्य मजप्रत । देई देवा मनोवांच्छित । माझ्यासम संग्रामांत । कोणीही वीर होऊ नये ॥६०॥
विघ्नपा सदा विनययुक्त । अजेय शंकरादी देवांप्रत । मज करी गणाधीशा सतत । अमोघ शस्त्रप्रधारक ॥६१॥
श्रीगणेश म्हणे ममासुराप्रत । हें दुर्घट सारें तव इच्छित । दैत्येंद्रनायका तथापि देत । भक्तितुष्ट मीं तुजलागीं ॥६२॥
जें जें तूं मागितलें । तें तें मीं तुज आज दिलें । हें स्तोत्र तूं रचिलेलें । अत्यंत प्रिय मजलागीं ॥६३॥
कामप्रद वाचकासी । तैसेंचि होईल श्रोत्यांसी । यांत संदेह नसे निश्चयेसी । भक्तिमुक्तिप्रद हें स्तोत्र ॥६४॥
ऐसें वरदान देऊन । गणेश पावला अंतर्धान । ब्रह्मणस्पतीतें वंदून । ममासुर गेला शंबरसदनीं ॥६५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे सप्तमे खण्डे विघ्नराजचरिते ममासुरवरप्रदांन नाम तृतीयोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP