खंड ७ - अध्याय ११

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ कश्यप कथा पुढें सांगत । एकदा नारायण सुखांत । आसनीं होते विराजत । विष्वक्सेन तैं तेथ आला ॥१॥
नारायणासी वंदून । प्रार्थना करी तो विनतमन । केशवा शांतिप्रद योग पावन । सांगा मज कृपाळा ॥२॥
तो योग मीं साध्य करीन । भक्तीनें विष्णुरूप होईन । श्रीनारायण बोले वचन । नामरूपात्मक सर्व असत्य ॥३॥
ऐसें वेदशास्त्रें सांगती । जन्म मृत्यू तयाप्रती । नामरूपात्मक ब्रह्म निश्चिती । तैसेंच जाण विष्वक्सेन ॥४॥
जें सर्व भेदविहीन । तें परब्रह्म श्रेष्ठ पावन । तें अमृत सत्य एक जाण । योगसेवेनें तें जाणावें ॥५॥
त्यांच्या योगें सम ब्रह्म । सदानंदमय अभिराम । विष्णूरूप तें शोभन । जाणावें भक्तिभावानें ॥६॥
तेंच विघ्नराजाख्य ज्ञात । वेदांत ब्रह्म प्रतिष्ठित । त्यास विधानपूर्वक भजत । तरी तुज शांति लाभेल ॥७॥
विष्वक्सेन विचारित । विघ्नेश्वर विष्णुरूपें कैसा प्रथित । सर्वशास्त्रज्ञा सांग मजप्रत । संशय सारा दूर व्हावा ॥८॥
श्रीविष्णु सांगती तयाप्रत । माया सुख तें विघ्नयुक्त । आत्मसौख्य तें विघ्नरहित । बुध जन ऐसें सांगती ॥९॥
त्यांच्या योगें गणेशा ख्यात । विघ्नराज नामें जगांत । सदानंदमय त्यास सेवित । योगिजन सदा श्रद्धेनें ॥१०॥
गण समॄहरूप असत । समूह ब्रह्मवाचक वर्तक । बाह्मांतरादि योगें ज्ञात । योगिजगांस ते ध्रुव ॥११॥
गणेशाचें बिंब मायायुक्त । पडलें तें शिवविष्णु आदि ख्यात । म्हणून आम्ही सारे कलांशभून । त्या गजानन प्रभूचे ॥१२॥
त्यास विधानें तू भजशील । तरीच शांति लाभेल । कश्यप म्हणे विष्वक्सेन निर्मळ । विचारी पुनः वंदूनिया ॥१३॥
भक्तिसंयुक्त दक्षसुते म्हणत । मी न भजे विघ्नेशा सांप्रत । तुझ्या भक्तींत परायण असत । तुजहून श्रेष्ठ न जाणे मी ॥१४॥
ऐसें सांगून प्रणाम करित । विष्णूस नंतर जात वनांत । योगसिद्धयर्थ तप आचरित । आदरभावें विष्वक्सेन ॥१५॥
विष्णूस ह्रदयांत ध्यात । सर्व भावांत आनंद अनुभवित । मंत्रराज विष्णूचा जपत । इदं विष्णुस्तु ऋग्वेदांतला ॥१६॥
निराहार राहत प्रतापवंत । वैष्णव शिरोमणि तप आचरित । ऐसीं शभर वर्षें पूर्ण होत । तैं प्रसन्न गणनायक झाला ॥१७॥
त्यास समाख्य योग देत । भावधर प्रभु कृपावंत । स्वयं संयोगरूप पाहून हर्षित । जाहला विष्वक्सेन तेधवा ॥१८॥
तदनंतर हृदयांत पाहत । गणेशास लक्ष्मीसहित । परी विष्णूत आठवून होत । खेदाकुल तो महायश ॥१९॥
मंत्र जपे विष्णुपर । परी गणेशास पाही सत्वर । क्षणांत नारायण लक्ष्मीवर । पाहतसे हृदयांत ॥२०॥
क्षणांत विघ्नेश्वरासी पाहत । म्हणोनि तो होत विस्मित । तपाच्या अतिप्रभावें शुद्धचित्त । जाहला तैं विष्वक्सेत ॥२१॥
अभिमानज मोह त्यागून । विचार करी ह्रदयीं एकमन । मायामय शरीर असून । मायाहीन मस्तक असे ॥२२॥
गजाकार त्यांच्या योगें होत । देहधारी गणेश्वर जगांत । याचें बिंब सदा मोहयुक्त । हें असे विनिश्चित ॥२३॥
विष्णु समभावस्थ लक्ष्मीयुक्त । देव सिद्धिबुद्धि समन्वित । आपल्या महिम्यांत संस्थित । मायाखेळ करतो हा ॥२४॥
तोच लक्ष्मीपति ख्यात । विष्णूनें बोध केला असत । पूर्वीं अभिमानकारणें न ममांत । तेव्हां तो ठसला होता ॥२५॥
अबुद्ध नसे तद्रूप । वृथा पांडित्याचें रूप । योगासम स्वरूप । न ऐकलें वा पाहिलें ॥२६॥
ज्याच्या सेवनमात्रें होत । अभिमान नष्ट त्वरित । ऐसा विचार करून ध्यात । देवेशा त्या गणेशासी ॥२७॥
ध्याऊन पूजी भावयुत । मानस पूजा विधीनें तो भक्त । तेव्हां भक्तवत्सल गणेश होत । प्रसन्न त्याच्या भक्तीनें ॥१८॥
विष्वक्सेनाच्या आश्रमांत । प्रिये दिति तो जात । वर देण्यास तयाप्रत । परी तो भक्त ध्यानमग्न ॥२९॥
गजानन समोर स्थित । परी त्यास त्याचें भान नसत । एक आश्चर्य दाखवित । विघ्ननायक त्या वेळीं ॥३०॥
ह्रदयांतील गणेशास करी लुप्त । परी तो अन्य क्षणीं बाहेर । दिसत । लक्ष्मीयुक्त गणाधीशास पाहत । जाहला हर्षंभरित तेव्हां ॥३१॥
उठून त्यास प्रणाम करित । विष्वक्सेन त्यास पूजित । पुनरपि घाली दंडवत । आनंदाश्रू नयनांत ॥३२॥
भक्तियुक्त स्तुति करित । गजाननासी हात जोडित । विघ्नेशा तुज मी नमित । भक्तविघ्नविनाशका ॥३३॥
अभक्ता विघ्नदात्यासी । भक्तांच्या सुनाथासी । लक्ष्मीपतीसी सिद्धिबुद्धिवासी । स्वानंदवासीसी तुज नमन असो ॥३४॥
विकुंठस्थासी केशवासी । परेशासी चक्रपाणीस । गदाधरासी । हेरंबासी । परशुधारका नमन तुला ॥३५॥
दशरथसुतासी वासुदेवासी । शिवपुत्रासी देवेशासी । वरेण्यसुनूसी योगाकारासी । योग्यांच्या नाथा नमन तुला ॥३६॥
योग्यांस शांतिदात्यासी । कर्त्यासी हर्त्यासी सदा सुपात्रासी । गणेशासी नाभिशेषासी । शेषशायीसी नमन तुला ॥३७॥
सर्पयज्ञोपवीतासी । लंबोदरासी शाश्वातासी । नाना खेळ कर्त्यासी । नाना मायाचालका नमन तुला ॥३८॥
खेळ हीनासी देव सहायकासी । असुरांच्या विनाशकासी । असुरांसी वरदात्यासी । ढुंढिराजा तुला नमन असो ॥३९॥
भक्तिप्रियासी भक्तेशासी । गणेशासी गणपालकासी । परात्परासी नारायणासी । कृष्णा मेघश्यामा नमन तुला ॥४०॥
माया प्रभावें विष्णुरूपासी । सदा स्वमहिम्यांत स्थितासी । गणेशासी विष्णुनामें ख्यातासी । गणेशा तुज नमन असो ॥४१॥
जो विष्णु तोच विघ्नेश ज्ञात । अंतर त्यांत कांहीं नसत । ऐसी स्तुति करून नमत । महापति तो विष्वस्केन ॥४२॥
त्यावरी होऊन प्रसन्न । श्री विघ्नेश बोले वचन । माग आतां वरदान । देईन तें मीं भक्तितुष्ट ॥४३॥
तुझ्या स्तोत्रानें मी तुष्ट । भुक्तिमुक्तिप्रद हें इष्ट । पाठका वाचका संतुष्ट । करील सर्व सिद्धि देऊनिया ॥४४॥
कश्यप म्हणे दितीसी । गणेशवचन ऐकून तयासी । कर जोडून करी वंदनासी । विष्वक्सेन मान वाकवी ॥४५॥
भक्तिपूर्वक म्हणे देवा प्रसन्न । जरी वरद तूं गजानन । तरी तुझ्या पादपद्मीं माझें मन । दृढ राहो सर्वदा ॥४६॥
तुझ्या भक्तींत सदा रमावें । शांतियोगास योग्य व्हावें । ऐसें देवा मज द्यावें । वरदान मजला इच्छित ॥४७॥
गणराज तें ऐकून म्हणत । तुझें ईप्सित पूर्ण होत । माझी दृढ भक्ति तुझ्या ह्रदयांत । नांदेल यांत संशय नसे ॥४८॥
विष्णु संगतीनें प्राप्त । होईल शांतियोग तुज पुनीत । जें जें इच्छिसी तें तें होत । सफल हा वर देतसें ॥४९॥
ऐसें देऊन वरदान । अंतर्धान पावला गजानन । भक्तिनियंत्रित तो देव महान । विष्वक्सेन गेला वैकुंठीं ॥५०॥
तेथ विष्णूस भेटत । त्यास सांगे सर्व वृत्तान्त । तो ऐकतां संहर्षित । केशव तेव्हां जाहला ॥५१॥
त्यास महायोग निवेदित । त्याची साधना करितां होत । यथाविधि श्रद्धा युक्त । विष्वस्क्सेन योगिवंद्य ॥५२॥
गणेशास भजे भक्तिसंयुत । महाविष्णूस गुरुरूप मानित । गणेश्वरास देवत्वें स्वीकारित । हृदयांत ध्यान करी त्याचें ॥५३॥
ऐशा ध्यानें महातेजयुक्त । योगांत होत पारंगत । ऐसें हें लक्ष्मीगणेश चरित । सांगितलें तुज सर्वार्थद ॥५४॥
याचें करितां वाचन । अथवा श्रद्धायुक्त श्रवण । सर्वसिद्धि लाभून । आनंदपद लाभेद ॥५५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे सप्तमे खण्डे विघ्नराजचरिते लक्ष्मीविनायकचरितवर्णनं नामैकादशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP