खंड ७ - अध्याय ५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ कश्यप दितीस सांगत । देवांसी पाहतां क्रोधयुक्त । दैत्य विविध शस्त्रास्त्रांनीं भेदित । मर्मस्थानीं देवांसी ॥१॥
देवही दैत्य पुंगवांगी हाणिती । अन्योन्यांसी पीडिती । सैन्यें मिसळलीं ऐशा रीतीं । संमोह पडला वीरांसी ॥२॥
धुळीचे लोट नभांत उडती । अंधकार पसरला रणभूवरती । आपुला कोण दुजा कोण हें न जाणती । मारिती पुढयांत येई त्यास ॥३॥
ऐसे तु दुर्मद ठार करित । आपुल्याही योध्यासी भ्रमयुक्त । एक दिवस दारूण युद्ध चालत । वीरांसही मोहप्रद ॥४॥
तदनंतर रक्ताची नदी वाहत । घोर प्रवाह तैं धूळ बसत । त्या रक्तांत ती मिसळत । प्रकाश पसरे रणभूमीवरी ॥५॥
तदनंतर संभ्रमांत पडती । विवेक पुनरपि जोडिती । देव दैत्य त्वेषानें लढती । महोत्साह लाभूनियां ॥६॥
दैत्यांच्या सैन्याची सरशी होत । देवसैन्य भग्न होत । दैत्यसंघ त्याचें हनन करित । तेव्हां देवसेना पळाली ॥७॥
ते भैरव मुख्य़ादि गण जात । विष्वक्सेनादि आदित्यांसहित । कालिमुख्य शक्ती क्रोधयुक्त । असुर सैन्यावरी हल्ला करण्या ॥८॥
महास्त्रांचा वर्षाव करिती । दैत्य सैन्यांत पसरली भीती । प्राण वाचवावया असुर पळती । दशदिशांत त्यावेळी ॥९॥
तदनंतर क्रोधसमायुक्त । ममासुराचे प्रधान लढत । सुरेंद्रांसी शस्त्रांनी मारित । दैत्य भैरवांचे युद्ध घोर ॥१०॥
एक दिवस युद्ध चाललें । घनघोर तेथ लढले । देव दैत्य जय इच्छिते झाले । उभयही रणक्षेंत्रांत ॥११॥
तदनंतर दैत्येंद्रमुख पडत । रणांत मूर्च्छा येऊन बहुत । असुरसैन्य पळालें भययुक्त । दशदिशांत त्या वेळीं ॥१२॥
तें वृत्त ऐकतां ममासुराचे सुत । पित्यास प्रणास करून जात । लढावया रणांगणांत । तोवरी शुक्राचार्य काय करी ॥१३॥
त्यानें संजीवनी जपून । दैत्य वीरांस दिलें वीरांस दिलें जीवदान । ते पुनः जिवंत होऊन । लढावया गेले त्वेषानें ॥१४॥
दैंत्यां समवेत शस्त्रास्त्र धर । धर्माधर्म तेव्हां उग्र । देवेंद्रासी मूर्च्छापर । पाडविती रणांत तैं ॥१५॥
त्यांचें अस्त्रबल सहन करील । ऐसा देवसेनेंत वीर न प्रबल । म्हणून देव पळाले भयविव्हल । तैं वृत्त समजलें शिवासी ॥१६॥
तो स्वतः वृषभावर बैसून । अत्यंत क्रोधयुक्त मन । आला रणांगणांत निश्चय करून । मागून जगदंबाही आली ॥१७॥
विष्णु सूर्यादि देव येतो । त्ते दैत्यांसवें लढती । रोमहर्षक युद्ध करिती । ब्रह्मांडा भयदायक तें ॥१८॥
त्याचें वर्णन शब्दातीत । अधर्म विष्णूसंगे लढत । धर्म शंकरास आव्हान देत । कालजित लढे सूर्यासंगें ॥१९॥
प्रेत महाबळ लढत । शक्तिविरुद्ध रोषयुक्त । कपाल कालरुद्रा ललकारित । धर्मघ्न कालीसंगे लढे ॥२०॥
ते सारे मर्मभेदक टाकिती । अस्त्रें एकमेकांवरती । शस्त्रांनी आघार करिती । एक दिन ऐसें युद्ध झालें ॥२१॥
देवराक्षसांचे घोर रण । तेव्हां झालें अति दारुण । कालीनें धर्मघ्नाचें केलें हनन । पापी तो तत्क्षणीं मरण पावे ॥२२॥
कपालास पाडिलें मूर्च्छित । त्रिशूळ मारून क्षणांत । काळरुद्र अति बळवंत । शक्ति मारी प्रेतासी ॥२३॥
शक्तीच्या खड्‍गानें तो मरत । त्रिशूळ धर्मातें हाणित । तो पडे होऊन मूर्च्छित । विष्णूनें पाडिलें अधर्मासी ॥२४॥
विष्णूचें चक्र ताडण करित । अधर्मासुरासी करी मूर्च्छित । चक्र त्रिशूळांचा पराक्रम अद्‍भुत । दैत्यसैन्य नाश पावलें ॥२५॥
हाहाकार दैत्येश करिती । शोणिताच्या महानद्या वाहती । भिन्नभिन्न दैत्य पळती । मिळेल त्या दिशेनें तैं ॥२६॥
तथापि सुलोचने दिती मरत । शस्त्रवेगानें कांहीं क्षणांत । तेव्हां ममासुर स्वयं क्रोधरक्त । सग्रास करण्या पातला ॥२७॥
पाहून शिवास पुढयांत स्थित । म्हणे तो रागावून तयाप्रत । सर्वसंहारक ऐसा ख्यात । शंकर तो महापराक्रमी ॥२८॥
ममासुर म्हणे थांबरे थांब । महादेवा पहा अजव । पौरुषण माझें असह्यप्रभ । पाहिलें तुझें सामर्थ्य मीं ॥२९॥
ऐसें बोलून महादेवावर । सुदृढ बाण सोडून वार । केला दैत्यनायकें दुर्धंर । शंभू फेकी त्रिशूळ तेव्हां ॥३०॥
परी ममासुरासी कांहीं न होत । निष्फळ शस्त्रास्त्रें जात । शंभूस बाणांनी ताडित । पाडवी तो धरणीवरी ॥३१॥
शंकर पडतां सहसा मूर्च्छित । ममासुर एक बाण तेजयुक्त । सोडून माधवास करी मूर्च्छित । तोही पडला रणभृवरी ॥३२॥
शक्ति सूर्य क्रुद्ध होती । असुरावरी बाण दारूण सोडिती । परी ते सारे निष्फळ होती । वरदानानें अजिंक्य असुर ॥३३॥
सुर्य शक्तीस ह्रदयावरी । बाण मारून विद्ध करी । तेही पडले भूवरी । तदनंतर अन्यत्र वळला ॥३४॥
महा उग्र बाणवृष्टी करी । देवेंद्रास देवांस मारी । शंभु मुख्यास मूर्च्छित पाहून सत्वरी । अन्य देव पळून गेले ॥३५॥
कांहीं पडले मरून रणांत । कांहीं भयसमन्वित । दैत्यराज तो अतिहर्षित । महामते त्या वेळीं ॥३६॥
शंभुमुख्य देवांस पकडून । गेला स्वस्थाना परतून । शुक्राचार्य देई जीवन संजीवन मंत्रें दैत्यासी ॥३७॥
प्रधान पुत्र मुख्य झाले जिवंत । तेव्हां तो ममासुर विजयवंत । धर्मास कैलासाधिपति करीत । अधर्मासी विष्णुलोकेश ॥३८॥
प्रेतास शक्तिपुरीं नेमिलें । कपाळास सौरलोकाधिप केले । वीर धर्मघ्ना ब्रह्मलोकीं योजिलें । कालनिवास महेंद्रलोकीं ॥३९॥
कालकाम स्थापिलें यमलोकांत । अन्य दानवांस उचित । त्रैलोक्यांत मोठीं पदें देत । तदनंतर परतला स्वपुरासी ॥४०॥
देवेंद्रा शिवादि मुख्यास । भोगावया लाविला कारवास । राज्य करी महाबळ विशेष । ब्रह्मांडाचा अधिप झाला ॥४१॥
तो दुष्ट ममासुर मानित । कृतकृत्य आपणांस दैत्येंद्रासहित । स्त्रीमांसमदिरायुक्त । भोगलालस जाहला ॥४२॥
आपणांस अविनाशी मानित । देहधारी परी अमृत पावत । अति मदसंयुक्त प्रतापवन्त । ममासुर त्या समयी ॥४३॥
देवांगना नरांगना । पकडून आणि नागांगना । असुरेंद्रांसह त्यांना । पापी निश्चयें भोगी तो ॥४४॥
ऐसा बहुकाळ जात । स्त्रीरत्नें अगणित उपभोगित । नंतर दैत्येंद्रास पाठवित । खेळतो कर्म खंडनार्थ ॥४५॥
वर्णाश्रम कर्में भंगविली । आसुर कर्में सर्वत्र स्थापिली । दंडबळें सक्ती केले । ममासुरानें सर्वत्र ॥४६॥
स्वाहा न देवांस मिळत । स्वधा पितरांस नसत । वषट्‍काराचें नाम नसत । वर्णसंकर जाहला ॥४७॥
कांहीं ऋषीस केलें ताडन । कांहींस केलें बंधन । देवस्थानांचें खंडन । करिती दानव सर्वत्र ॥४८॥
तीर्थ पुण्यवृक्ष ते फोडिती । पापें अगणित आचरती । ममासुराची पूजा करविती । सर्व मानवांकडूनी ते ॥४९॥
दैत्यनाथाच्या प्रतिमा स्थापिती । सर्व मंदिरात दैत्यां स्तविती । ऐशापरी कर्मनाश जगतीं । दैत्यगणें झणीं केला ॥५०॥
हाहाकार सर्वत्र माजला । सर्वं जनगण भ्रष्ट झाला वर्णाश्रम विहीनतेला । स्वीकारिती दुःखानें ॥५१॥
राज्य करी दैत्येश ममासुर । चित्तीं हर्ष त्यास फार । वृष्टयादिक सर्वही भयाकुल उग्र । आसुरी कर्मामुळें झाले ॥५२॥
ऐसें पाप वाढतां राहत । उपोषणपर देव कारागृहांत । शोकपीडित ते अत्यंत । सत्तेपुढें कांहीं न चाले ॥५३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे सप्तमे खण्डे विघ्नराजचरिते ममासुरराज्यभोगवर्णनं नाम पंचमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP