खंड ७ - अध्याय १३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ कश्यप सांगे दितीस । एकदां होता माघमास । सूर्य असतां मकरराशीस । देवविप्र तीर्थें प्रयागास जाती ॥१॥
सर्व होते प्रमुदितचित । माघस्नानासाठीं उत्कंठित । स्नान करून ते पूजित । ॐ कारगणनाथासी भक्तीनें ॥२॥
तदनंतर शूलधरास पूजून । तत्रस्त माधवासी आराधून । त्रिवेणीस वंदून । पुरातन गोष्टी सांगत होते ॥३॥
तेथ संचार करित । योगींद्रसत्तम दत्त येत । जो अवधूत मार्ग प्रसिद्धीप्रत । नेण्यांत होता अग्रेसर ॥४॥
गाणेश ब्रह्मपास । सर्वार्थदायक ओंकार गणनाथास । प्रणाम करून स्तुतिस्तोत्रास । गाइले त्यानें सादरानें ॥५॥
तें पाहून परमाश्चर्ययुक्त । शिवादियोगी त्यास नमित । कश्यपादी योगी देवही वंदित । आदरानें तयासी ॥६॥
त्यास प्रणास करून । गणेशभजनांत मग्न पाहून । ते योगींद्रास विस्मितमन । नंतर विचारिती आदरानें ॥७॥
शिवादि त्या योगींद्रास म्हणत । भगवंता आपण ब्रह्मपारंगत । सर्वतत्त्वज्ञ ब्रह्मशरीर साक्षात । यदृच्छेनें भेटलात ॥८॥
अवधून मार्ग प्रकाशनार्थ । देह्धारी झालात । शरीरधारका करण्या पुनीत । दर्शनमात्रें कृतकृत्यु आम्हीं ॥९॥
आतां स्वामी बोध करावा । आम्हां देवांस मुनीस दाखवा । आमुचे भावर्णवीं तारक व्हा । विनयें प्रार्थना ऐसी केली ॥१०॥
तेव्हां तो त्या महाभागांप्रत । हर्षभरें महामुनि सांगत । ब्रह्माविष्णु शिवांनो सांप्रत । तैसेंचि अन्य देवांनो ॥११॥
मुनींनो शेषादि नागराजहो ऐकावें । वचन माझें भक्तिभावें । ब्रह्म हेच एकसत्य मानावें । त्यास भजावें हितास्तव ॥१२॥
ऐसें करतां ब्रह्मभूत । तुम्ही व्हाल समर्थ निश्चित । त्याचें तें वचन ऐकून म्हणत । वंदन करून तयासी ॥१३॥
शिवादि त्या योगिवंद्यास । विचारिती एका प्रश्नास । ब्रह्मांत आपण ब्रह्मभूत विशेष । गणेशास कां भजता तरी ॥१४॥
हा गणेश नामरूपधर । ओंकाराकृतिधर थोर । आमुचा कुलदेव त्रिगुणात्म शरीर । यांत नसे संशय ॥१५॥
परी तो योग्यांसी मूलभूत । कैसा असे तें न ज्ञात । त्यांचें वचन । ऐकून । बोलत । स्मित करून दत्तात्रेय ॥१६॥
महायश तो हर्षभरित । ज्ञानदानार्थ उत्कंठित । दत्त म्हणे त्या समस्तांप्रत । गणेश ब्रह्मांचा नाथ असे ॥१७॥
ऐसे वेदांत प्रख्यात । ब्रह्म नानाविधि वर्तत । ते मायेनें युक्त असत । अन्न हें ब्रह्म जाणावें ॥१८॥
देवेशांनो मुनींनो ऐकावें । अन्नमय रूपा मायेसी जाणावें । मोहकरीअ मायेसी स्वभावें । हा पहिला उपदेश असे ॥१९॥
प्राण ब्रह्म असून । तेथ प्राणाकार विमोहनी मनमोहन । मनब्रह्मांत मनोमय होऊन । माया सर्वदा रहातसे ॥२०॥
विज्ञान ब्रह्म असत । तेथ विज्ञानरूपें विलसत । आनंद ब्रह्म जैम असत । तैं माया आनंदरूप ॥२१॥
चैतन्य ब्रह्म वर्तत । तेथें माया चैतन्यरूप ख्यात । बिंदु ब्रह्म जें असत । तेथ माया बिंदुमयी ॥२२॥
सोऽहं ब्रह्मांत सतत । माया सोऽहं प्रकाशिनी ज्ञात । बोध ब्रह्म जेव्हां असत । बोधाख्या माया तेथ विमोहिनी ॥२३॥
विदेह ब्रह्म जें उक्त । देहरूप मापा तेथ । महादेव त्या मायेनें युक्त । ब्रह्ममानी भ्रमण करिती ॥२४॥
कर्म ब्र्ह्म जेथ ज्ञात । तेथ माया कर्माख्या मोहवित । ज‘जान ब्रह्म असतां ज‘जान मायायुत । माया असे प्रख्यात ॥२५॥
सम ब्रह्म जरी ज्ञात । माया समरूपिणी तेथ । सहज ब्रह्म असता होत । माया सहजाख्यविकारप्रदा ॥२६॥
असद्‍ ब्रह्म जरी ज्ञात । तें असन्मायायुक्त । सद्‍ ब्रह्म जें असत । ते सदाकार मायायुत ॥२७॥
असद्‍ ब्रह्म असन्मायायुक्त । सद्‍ ब्रह्म सदाकारमायायुक्त । सदसन्मय भावाख्य असत । ब्रह्म उभयात्मविकारयुत ॥२८॥
अव्यक्त ब्रह्म जें असत । तें अव्यक्त मायायुक्त । स्वसंवेद्य पर ब्रह्म वर्तत । स्वानंद मायायुक्त सदा ॥२९॥
आत्माद्वयैक सर्वाख्य असत । आद्य शब्द परिकीर्तित । महावाक्यादींनी ते होत । त्या त्या मायेवे प्रकाशक ॥३०॥
शिव विष्णुमुख शब्द ख्यात । ब्रह्मवाच्य हेही सतत । त्या त्या विकारें संयुक्त । देवसत्तमांनो ते जाणावें ॥३१॥
पृथ्वी जलादि तत्त्वें असती । ब्रह्मंची वाचक तींही जगतीं । त्या त्या विकारयुक्त तीं । देवासमही जाणावीं ॥३२॥
ऐसी नानाविध ब्रह्में युक्त । वेदांदींत तीं समस्त । मायामोहें असतीं युक्त । त्यांचा स्वामी ब्रह्मणस्पति ॥३३॥
ब्रह्मांचा हा पालनकर्ता । म्हणून ब्रह्मपति नावें जगत । हा गणाध्यक्ष झाला तत्त्वतां । वेद सारे हें सांगती ॥३४॥
ब्रह्मभूयमय साक्षात । त्यास द्विजोत्तमहो भजा सतत । उत्पत्ति नाश हीन जें असत । तें गजाख्य ब्रह्म जाणा ॥३५॥
सांख्य हें गणेशाचें शिर । म्हणून गजानन नाम थोर । भूमिसाधनभावें तन्मय उदार । देह नाना भूमिप्रधारक ॥३६॥
म्हणोनी योगरूप ज्ञात । देहशिर योगें देहधारी उक्त । गणेशान सांख्ययोगांत । पूर्णशांतिदायक साक्षात ॥३७॥
संयोगांत हा गकाराख्य असत । अयोगांत णमय ज्ञात । त्यांच्या ईश गणेशनामें विलसत । वेदवादानुसार ॥३८॥
पंचचित्तमयी बुद्धि वर्तत । दक्षिणांग होऊन त्यांचें पुनीत । पंचभ्रांति करी सिद्धि भूषवित । वामांग या गणेशाचें ॥३९॥
त्याचा स्वामी गणाध्यक्ष खेळत । या दोन मायांसमवेत । त्यांच्या चित्तीं चिंतामणि साक्षात । प्रकाशदाता उभयतांसी ॥४०॥
समोऽहं मीं समब्रह्म असत । ऐशा चित्तप्रेरणा त्यागित । तेव्हां नर योगींद्र होत । त्या चित्त चालनकारका भजतें मन ॥४१॥
सिद्धिबुद्धिद्वयांनीं निर्मित । सकल ब्रह्में विश्वांत । त्या ब्रह्मांस सोडून लाभत । ब्रह्म कैसें मनुजांसी ॥४२॥
म्हणून देहधारी होऊन । भक्तमार्गांचें करी प्रदर्शन । सुलभतेस्तव देवेशा महान । अवतार घेई वारंवार ॥४३॥
त्याचें तें ऐकून वचन । वसिष्ठ विचारी संशयग्रस्तमन । ब्रह्मच वेदांत वर्णन । सर्वसंमत ऐसें असे ॥४४॥
तरी हा ब्रह्मणस्पति । कोण हा सांगता जगताचा पति । महामाया पतिरूप होऊन निश्चिती । गणेशांत राहिली का ? ॥४५॥
जैसें अन्नब्रह्म वर्तत । तेथ माया त्या त्या विकारस्थ । तैसेंचि ब्रह्मपति ब्रह्मपति ब्रह्म असत । तेथ माया पतिरूप का ॥४६॥
वसिष्ठाचा ऐकून संशय । दत्त हर्षसमन्वित होय । त्यास म्हणे वचन निःसंशय । योगींद्र तो परमार्थज्ञ ॥४७॥
अन्नप्राणादियुक्तें ब्रह्में चित । त्यायोगें गणेश हा पति उक्त । महायोग्या ब्रह्में मानित । पति तयासी आपुली ॥४८॥
त्या ब्रह्मांचा नाश होत । तरी पतिभावें स्वयंब्रह्मस्थ । अन्नप्राणादि विकार त्यजित । ब्रह्में तेव्हां ब्रह्मभूत ॥४९॥
ब्रह्में ब्रह्मस्थ होती । तरी कोणाचा पति गणपति । तें सांग मज त्वरिती । मायाविकारहीन तीं ॥५०॥
उपास्य भावें हा ब्रह्म परम । पतित्व याचें त्यायोगें शोभन । ऐसें त्या दत्ताचें वचन । ऐकून नारद पुनः विचारी ॥५१॥
अवधूत तो पापरहित । भावबोधार्थ योगींद्रा त्या प्रार्थित । गणेशांत तदाकार तूं असत । तरी भेद कैसा उरतो ॥५२॥
मी दत्त हा एकदन्त । ऐसा भेद कोठें उरत । महाभागा जरी भिन्न नसत । तरी कोणासी तूं भजसी ॥५३॥
हा संशय माझ्या चित्तांत । तूं दूर करावा सांप्रत । दत्त महामती तेव्हां सांगत । देह हा माझा नरतुल्य असे ॥५४॥
नित्य कर्म शुभाशुभ समस्त । नामरूप विकारवश देह आचरत । ब्रह्म सर्वत्र तन्मय निश्चित । त्याची सत्ता न्यूनाधिक ॥५५॥
ब्रह्मणस्पति शब्दाख्या सत्ता स्थित । गणपतींत एकमेव अद्‍भुत । ती नसे शंभुविष्णु आदि देवभावांत । ऐसे जाण विचक्षण ॥५६॥
म्हणोन प्रत्यक्षत्वें चित्तांत । ब्रह्म विघ्नेशवाचक अनुभूत । त्यास पाहून भजेल जगांत । ब्रह्मभूय परब्रह्म कोण असे ॥५७॥
म्हणून मीं देहधारी भजत । त्या गणेश्वरासी भक्तियुक्त । विशेषें देह क्रियात्मा परायण वर्तत । म्हणोनि यांत न आश्चर्य ॥५८॥
देह क्रियात्मक असत । चित्त चिंतनकारक स्वभावें ज्ञात । ते चिंतनादिक अन्य करित । तैसेंचि भजे गणेशासी ॥५९॥
माझा देह चित्त गणेश्वरास भजत । त्याचें प्रकाशक ब्रह्म ख्यात । तें गजाननास कैसें भजत । ब्रह्म ब्रह्मचि जाहले जेव्हां ॥६०॥
तदाकार माझा देह चित्त । स्वप्रकाशकरास भजत । या योगामार्गें मीं सेवित । गणनायकासी सर्वदा ॥६१॥
जर मीं गणेशाहून अन्य नसत । तर कोणासी विचारसी सांप्रत । जैसें भक्षणादिक नित्य करित । आदरेंमी प्रतिदिनीं ॥६२॥
तैसेंच गणेश्वरास भजत । भक्तियुक्त जरी लोकिकांत । तरी मीं देहगत जो असत । तो मी भोक्ता नसे कदा ॥६३॥
मी गणराजाचा तैं न भक्त । केवळ देहधर्म प्रवर्तत । ब्रह्मांत जो ब्रह्म भूत । तो न भजे गणनायका ॥६४॥
तथापि देहचित्तांत । स्वभावें अन्य आचरण करित । ब्रह्मभूत योग्यांत मुख्य न उक्त । श्रेष्ठ भक्त ऐसें ख्यात असे ॥६५॥
म्हणोनि हर्षभरें मी भजत । अनायासें जें ब्रह्म चित्तांत । देहभावें विलसत । त्यास पाहून न भजे कोण ? ॥६६॥
ऐसें जरी न करील भजन । तरी तो जाणावा ब्रह्मघ्न । गणेशास मूर्तिगत पाहून । योगेशा शांतिदायका ॥६७॥
कोणत्या योगिजनाचें मन । प्रीतियुक्त न होतें प्रसन्न । ऐसें दत्ताचें ऐकून वचन शिवादि झाले हर्षयुक्त ॥६८॥
नारदादि त्यास करिती नमन । त्याच्या क्रियांनी विनीतमन । ते सर्व त्यास म्हणती वचन । संशय आमुचा दूर केलासी ॥६९॥
केलेंस तूं महाभागा निश्चित । एकमार्ग परायण जगांत । नानामत विभेदांनी युक्त । भ्रांतियुक्त ते भटकती ॥७०॥
जे सर्व पूज्या पूर्णा गणेश्वरास त्यागिती । ते भ्रांतिपर भटकती । त्यांच्या भ्रांतिनाशार्थ जगतीं । योगमार्ग निर्मिला विघ्नेश्वरें ॥७१॥
तो तूं सर्वज्ञ सर्वशांत्तिप्रद । आम्हां ज्ञान केलेंस विशद । ऐसें स्तविती द्त्तास बोधप्रद । दत्त ह्से स्तुति ऐकून ॥७२॥
तदनंतर दत्त निघून जात । शिवादि देव स्वस्थानीं परतत । वसिष्ठादी मुनीही स्वगृहाप्रत । बोले तदनंतर दितिप्रिये ॥७३॥
ऐसी ही द्त्तात्रेय मुखातून । स्त्रवली जी गीता महान । सर्वसार ती पावन । पठनें श्रवणें शांतिप्रद ॥७४॥
सर्वसिद्धिप्रदा ती असत । कश्यपाचें वचन ऐकून युक्त । दिति त्यास प्रणास करित । विघ्नेश्वरनिष्ठ ती त्यास म्हणे ॥७५॥
भावगंभीरस्वरें विचारित । गणेश उपासनेची रीत पुनीत । कश्यप तो तिज निवेदित । पुढले अध्यायीं ही कथा ॥७६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे सप्तमे खण्डे विघ्नराजचरिते दत्तगीतावर्णंनें नाम त्रयोद्शोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP