खंड ७ - अध्याय ९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ कश्यप पुढती सांगत । ममासुर शांतियुक्त होत । देव तें पाहून हर्षित । मुनिजनांसह वंदिती ॥१॥
विघ्ननायकासी पूजिती । रोमांच उठले अंगावरती । भक्तिभावें कर जोडिती । स्तवन गाती आदरानें ॥२॥
देवर्षी तेव्हां स्तोत्र म्हणती । विघ्नराजाचें रूप वर्णिती । साम्य स्वरूप जो जगतीं । द्वंद्वविहीन परमार्थभूत ॥३॥
द्विविधांत राहून विरक्त । आनंदनाथ । निजभक्त स्तुत । त्यांसी सदा जो पोषित । त्या विघ्नराजा सतत भजतों ॥४॥
भेदविहीन अप्रमेय । परम श्रेष्ठ जो आक्षिमय । विनायकत्व ज्याचें अभेद्य । त्या विघ्नराजा सतत भजतों ॥५॥
सदैव तूं समभाव स्थित । परी सृजिलें भेदयुत । द्वितीय ब्रह्य लीला कारणें जगांत । उत्थान रूप तूं अससी ॥६॥
जेव्हां परेश मायामोहयुक्त । अन्योन्य एक्मेका भेटत । प्रकाशरूपें तूं वसत । विमोहशून्य सर्वकाळ ॥७॥
तूं प्रेरिसी द्वंद्वमय पर । सोऽहं तैसा बिंदु अपर । त्यांत समत्वें राहून करिसी विहार । विघ्नराजा तुज भजतों आम्हीं ॥८॥
अहंकार बिंदूस जोडून । विश्व रचिलें चतुष्पादमय पुराण । तेथेच नाथा प्रकाशसी महान । विघ्नराजा तुज सतत । भजतों ॥९॥
ऐशापरी स्वतोत्थान बळें खेळत । साम्यरूपें तूं जगांत । परी तद्‍भावशून्य वर्तत । विघ्नराजा तुज सतत भजतों ॥१०॥
ऐसा परेशाधिपति निर्मित । गणराजा तैसा तूं न भासत । सांख्यस्वरूप वेदप्रशंसित । विघ्नराजा तुज सतत भजतों ॥११॥
सांख्य तो दोषविहीन । ऐसे म्हणती विद्वज्जन । म्हणोनि उत्थानहीन । सांख्यसंस्थ तूं न कदापि ॥१२॥
स्वानंदवासी गणनायक । आनंदरूप तूं सौख्यप्रतीक । तदात्मशून्य द्वन्द्वप्रकाशक । विघ्नराजा तुज सतत । भजतों ॥१३॥
नित्य मनोवाक्प्रभवें हीन । साम्यात्मक सुयोगें शोभन । लक्ष्य तूं सदानंदघन । विघ्नराजा तुज सतत भजतों ॥१४॥
जयाचें करण्या पूर्ण स्तवन । वेदही असमर्थ झालें उन्मन । त्या हेरंबा आद्यास वंदन । करितों तुज देवदेवा ॥१५॥
तूं संतुष्ट होई सर्वत्मक । योगींद्रमुख्य सेवक तुझें । ऐसें सांगून भजत । ध्यानैक । विघ्नराजा तुज सतत भजतों ॥१६॥
त्यांच्या मनोभक्तिभावरक्षणार्थ । तूं होसी देहधारी समर्थ । तेथेंच भक्तिभावें सुभक्त रमत । विघ्नराजा तुज सतत भजतों ॥१७॥
देह तुझा असद्‍ब्रह्ममय । सद्रूप गजवाचक तोंड सदय । त्यांचा योग होतां पावसी उदय । विघ्नराजा तुज सतत भज्तों ॥१८॥
करि-आनन तुज म्हणती । योगमया तुज ह्रदयीं पाहती । सिद्धिप्रद बुद्धिचालक जगतीं । विघ्नराजा तुज सतत भजतों ॥१९॥
ब्रह्मा मीं माझ्या सर्व अधीन । विश्वादिक म्हणती ब्रह्मगण । तुझ्या मायेनें मोहित होऊन । विघ्नराजा तुज भजतों आम्हीं ॥२०॥
त्यांस सत्ताविहीन करिसी । विघ्नप्रदानें महानुभावा पीडिसी । स्वार्थविहीन ते जात पूर्णत्वासी । विघ्नराजा तुज सतत भजतों ॥२१॥
तुझ्या अंघ्रिकमलाचा आश्रय । शरण येऊन घेती सभय । तेव्हां विघ्न जाऊन ते निर्भय । विघ्नराजा तुज सतत भजतों ॥२२॥
ऐशा विघ्न-पतींचें स्तवन । करण्या असमर्थ आम्हीं जाण । वेदही धरिती जेथ मौन । तर्कातीत अलभ्य तूं ॥२३॥
योगमय म्हणून होऊन । तुझें करूं नित्य मनन । गजानना करी रक्षण । विघ्नराजा तुज सतत भजतों ॥२४॥
कश्यप म्हणे दितीप्रत । ऐसी स्तुति करून नमन । देवऋषि संतुष्ट करित । स्तवन करून बहुविध ॥२५॥
त्यास तेव्हां ब्रह्मपति म्हणत । विघ्नेश देवर्षीनो सांप्रत । वर मागा महाभागांनो त्वरित । मनोवांछित जो असे ॥२६॥
यो स्तोत्रानें संतुष्ट । देईन मी भक्ताधीन जगांत । तुम्हीं रचिलेलें हें स्तोत्र सतत । होईल सर्वार्थदायक ॥२७॥
जो हें वाचील वा ऐकेल । भाव ठेवून श्रद्धामय अमल । तो सर्व सुखें पावेल । विद्या धन धान्य यश ॥२८॥
धर्म अर्थ काम मोक्ष । ब्रह्मभूय त्यास करीन दक्ष । पुत्रपौत्रादिक ऐहिक सुख । आरोग्य उत्तम त्यास लाभे ॥२९॥
जयकाळीं हें स्तोत्र वाचित । त्यास युद्धांत विजय लाभत । मारण उच्चाटन तंत्र होत । सिद्ध हें स्तोत्र वाचूनियां ॥३०॥
परकृत्याचें प्रशमन होत । मरणभय सारें विनष्ट । कारागृहपीडा संपत । हया स्तोत्राच्या वाचनानें ॥३१॥
हयाचें सहस्त्रावर्तन । अथवा एकवीस वेळी वाचन । करिता एकवीस दिवस भावपूर्ण । ऐकतांही भक्तीनें ॥३२॥
मनोवांछित सर्व लाभत । माझी भक्ति मनांत वाढत । अपराधादिक सारे विनष्ट । होतील निरंतर हें वचन माझें ॥३३॥
ऐसें गणपतीचें वरदान । ऐकून म्हणती देव गजानन । भक्तिभावपूर्ण वचन । विघ्नेशा ऐक प्रार्थना ॥३४॥
जरी प्रसन्न तूं आम्हांवर । पदांबुजाची तव भक्ति दे निर्भर । आम्हां नको अन्य वर । ममासुरास तूं शांत केलें ॥३५॥
आतां आपापल्या स्थानांत । स्वर्गस्थ देव जातील बळयुक । मुनिजन स्वकर्में आचरित । स्वधर्मपालन करतील ॥३६॥
गणाध्यक्षा अन्य काय मागावें । वरदान काय बरवें । विघ्नेविदारणा जें व्हावें । त्याचें फळ आधींच दिलेस ॥३७॥
तथाऽस्तु म्हणून अन्तर्धान । पावले देव गजानन । देव मुनिजन त्यास नमून । खेदयुक्त मनीं विरहें त्याच्या ॥३८॥
गणाध्यक्षांची मूर्ति स्थपिति । हिमाचलाच्या मध्यें स्थान वर्णिती । विघ्नपतीसी तेथ पूजिती । उत्तर विशेस हें क्षेत्र ॥३९॥
भाद्रपद शुक्र चतुर्थी असत । माध्यान्ही मूर्ति तेथ स्थापित । देव सर्व मुनिगणां सहित । सर्व सुखावह विघ्नेश ॥४०॥
विघ्नपति मध्यें विराजित । वामांगीं सिद्धि स्थित । बुद्धी दक्षिणांगीं वर्तत । नागेश पुढें उभा असे ॥४१॥
पृष्ठभागीं प्रयागादी क्षेत्रं असतीं । विघ्नराजाच्या सेवेस्तव तीं । अति उत्सुक नित्य राहती । डावीकडे शंशु आदिदेव ॥४२॥
उजव्या बाजूस मुनीश्वर । पुढयांत असुर नागमुख्य गंधर्व वर । अप्सरा नाना सिद्धगण उदार । सुलोचने वसती सेवनोसुक ॥४३॥
गंगादी नद्या तेथ भक्तियुक्त । अन्यही जन राहत । दहा योजनें विस्तार ख्यात । या क्षेत्राचा मुख्यत्वें ॥४४॥
हें चौकोनी महाक्षेत्री ज्ञात । सुखप्रद जगतांत । तेथ गणेशतीर्थ विशेषयुत । सर्वसिद्धिप्रदायक ॥४५॥
स्नानमात्रें प्राण्यांस प्राप्त । भुक्तिमुक्ति गणेश तीर्थांत । अन्य विष्णुमुख्य देवांचीही तेथ । तीर्थे तैशीं योग्यांचीं ॥४६॥
स्नान करितां त्या तीर्थांत । सायुज्य । आपापलें तीं देत । अन्य देवादिकांचे जे भक्त । ते जरी दिवंगत या क्षेत्रीं ॥४७॥
तरी ते शुक्लगतीनें जाती । ब्रह्मभूतत्व पावती । यात्रा तेथ भक्त करिती । भाद्रपद शुक्ल चतुर्थीसी ॥४८॥
महोत्सव परायण सेविती । क्षेत्रवासी जन प्रीतीं । देवर्षि गणांसह बोध करिती । गजानन ज्ञानाचा बोधक ॥४९॥
विघ्नराजाचीं चरित्रें सांगतीं । आनंदाश्रु नयनीं दाटती । विघ्नेश्वराची स्तुति करिती ऐशापरी ते बहुविध ॥५०॥
कोणत्याही अन्य दिनीं करिती । यात्रा जरी भावभक्ती । ते मानव या लोकीं भोगिती । अनंत भोग निश्चयें ॥५१॥
अंतीं मुक्तिलाभ तयांप्रती । विघ्नराजास जे नमिती ।  मनोप्सित सारें लाभती । सुखयुक्त त्या योगें ॥५२॥
विघ्नेश्वराचे भक्त जगांत । कोठेही वसती ब्रह्मभूत । त्यांचें दर्शन पावक होत । अन्य जनांसी निःसंदेह ॥५३॥
ऐसें हें सर्व खडांत । द्विपात क्षेत्र उत्तम असत । उत्तर दिशेस ललामभूत । विघ्नेशांनी जें वसविलें ॥५४॥
ब्रह्मभूयप्रद क्षेत्र अद्‍भुत । विघ्नेश क्षेत्र चतुष्पदयुक्त । त्याचें वर्णन करण्या समर्थ । वेदही असती विस्मित ते ॥५५॥
परी संक्षेपें सांगितलें । क्षेत्रमाहात्म्य तुजला भलें । विस्तारें सांगण्या बळ कोठलें । कोणासही या जगीं ॥५६॥
ऐसा विघ्नेश्वर देव असत । नाना अवतार तो घेत । भक्तांच्या संरक्षणार्थ । अभक्तांच्या नाशार्थ ॥५७॥
अवतार त्याचे असंख्यात । ते सारे वर्णनाती त । हें ममासुराचें शमन पुनीत । चरित्रीं या वर्णिलें ॥५८॥
तें सर्व सिद्धिप्रद सतत । वाचका पाठकास होत । ममात्मिक भययुक्त । ब्रह्म सनातन तो ॥५९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे सप्तमे खंडे विघ्नराजचरिते ममासुरशांतियुक्तविघ्नेशचरितक्षेत्रवर्णनं नाम नवमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP