खंड ७ - अध्याय ६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ कश्यप कथा पुढती सांगत । शंभुप्रमुख देव दुःखयुक्त । ममासुराच्या नाशार्थ करित । सर्व जण ते विचार ॥१॥
तेथ विष्णु बुद्धिमंत । म्हणे वाक्य विवेकयुक्त । देवांस समाश्वासन देत । विघ्नराजास स्मरे मनीं ॥२॥
विष्णु म्हणे देवांप्रत । आपण पडलों कारागृहांत । कर्मखंडनें उपोषणयुक्त । केलें आम्हां ममासुरानें ॥३॥
ममासुराच्या राज्यांत । पाप अतिशय असे घडत । त्यायोगें पुण्यविहीन तो मृत । होईल यांत न संशय ॥४॥
वेदवादी वर्णन करिती । सर्वसत्ताधार गणपति । विघ्नराज तो धर्मपालक निश्चिती । त्याची उपासना करूंया ॥५॥
आपद्‍धर्मविधानें पूजन । करितां त्याचें एकमत । तो या ममासुराचें हनन । करील हें सत्य माना ॥६॥
देव तत्त्वप्रकाशक । नसे तो जगीं तत्त्वधारक । म्हणोनी मारील यास निःशंक । वरदान जरी हया असे ॥७॥
अतिविषयासक्त । ममासुर । मोहित होऊन फार । गणेशासी विसरेला तो उग्र । भोगविलासी मग्न असे ॥८॥
विघ्नपाच्याही क्षेत्रांत । त्यानें मूर्ति भंगल्या समस्त । तेथ आपुल्या प्रतिमा स्थापित । पूजवी त्या जनहस्तें ॥९॥
आधीं गणपतीचें पूजन । स्मरणादिक त्याचें पावन । करावें हा नियम मोडून । ममासुर स्वच्छंदें राहतसे ॥१०॥
म्हणून विघ्नेश्वर कोपयुक्त । मारील यासी निश्चित । त्या देवासी विशेषयुक्त । भावबळें पुजूंथा ॥११॥
विष्णूचें वचन ऐकून । शंभुपुरोगम देव तोषून । म्हणती वाहवा शोभन । उपदेश केशवा तूं केलास ॥१२॥
तदनंतर देव गणेशास ध्याती । संकटमुक्तीची प्रार्थना करिती । मंत्रस्नान आचरिती । न्यासादी करिती मनोमय ॥१३॥
गणपतीचें ध्यान करुन । उपचार अनेक मानस पूजन । मंत्रजपही करिती प्रसन्न । मनापासुनी ते उत्कट ॥१४॥
एकाक्षरविधानें युक्त । तप आचरती ते समस्त । भयसंयुक्त ते गुप्त । निराहारपरायण सारे ॥१५॥
ऐसीं शंभर वर्षे पूर्ण होत । तैं गणनायक प्रकटत । भाद्रपदशुक्ल चतुर्थीस देत । दर्शन माध्यानहीं वरद तेव्हां ॥१६॥
त्यास पाहून हर्षभरित । देव उठून सत्वर नमित । पूजिती विविध उपाचरें एकदंत । मानसपूजायुक्त ते ॥१७॥
पुनरपि प्रणाम करून । भक्तिभावें हात जोडून । आनंदाश्रुयुक्त नमन । देव स्तविती नम्रकंधर ॥१८॥
विघ्नराजासी भक्तविघ्नविदारणासी । अभक्तांस विघ्नदात्यासी । गणेशासी परेशासी । हेरंबासी नमन असो ॥१९॥
चतुर्बाहुधराधी नागेशध्वजासीं । अमेयासी अप्रतर्क्यासी । सदा स्वानंदवासीसी । ब्रह्मपतीसी नमन असो ॥२०॥
ब्रह्मदात्यासी सांख्यासी । बोधरूपासी पुरुषासी । परात्म्यासी गणेशासी । प्रकृतीसी त्रिगुणासी नमन ॥२१॥
स्त्रष्टयासी पात्रासी संहर्त्यासी । प्रकाशरूपधारकासी । मायिकां नानामायाप्रचालक्रासी । त्रिलोकस्थाना नमन असो ॥२२॥
मोहकासी मोहदासी । विशेषें तुज मायिकासी । नानाभेदमयासी ब्रह्मासी । विघ्नयुक्त तुज नमन ॥२३॥
तेथ आनंदयुतासी । समभावासी सर्वभेदविहीनासी । ब्रह्मामृतमयासी । भेदहीनासी नमन असो ॥२४॥
शास्त्रप्रमाणानुसार । भेदहीन तो विघ्नकर । भेदयुक्त गजवक्त्र । गणाधीशा तुज नमन ॥२५॥
तूं भेदयुक्त भेदहीन सृजिले । द्वंद्वमय नाथा जें झालें । त्यांच्या स्वामित्वें भलें । रूप शोभलें तुझें नमन ॥२६॥
आनंद तूं परम ब्रह्म । विघ्नहारक सर्वोत्तम । प्रदायक तत्त्व तूं अभिराम । विघ्नराजा नमन तुला ॥२७॥
आज विघ्नराजा तुज अप्रमेयास । चर्मचक्षूनें पहातों विशेष । धन्यत्व गणा धीशा आम्हां सर्वांस । तुझ्या पदांच्या दर्शनानें ॥२८॥
ऐसें बोलून प्रणाम करिती । शंभुमुख्य देव त्यास प्रीती । तो विघ्नेश भक्तितुष्ट तयांप्रती । म्हणे वर मागा इच्छित ॥२९॥
महादेवांनो जो जो मनांत । असेल इष्ट हेतू तो सांगा त्वरित । मीं स्तोत्रसंतुष्ट तपतोषित । ध्यानतुष्ट देईन सासें ॥३०॥
तुम्हीं रचिलेलें हें स्तोत्र । सर्वसिद्धिप्रद पवित्र । पाठकां वाचकां सर्वत्र । देवांनो देईल वांछितार्थ ॥३१॥
गणेशाचें वचन ऐकून । हर्षभरित देव करिती वंदन । हर्षगद्‍गदस्वरें वचन । म्हणती अचल दे भक्ति तुझी ॥३२॥
तुझ्या पायीं दृढ भक्ति लाभतां । विघ्नविहीन आम्ही तत्त्वतां । शांति लाभून स्वचित्ता । योगी जेणें सिद्ध होती ॥३३॥
ममासुरासी नाथा मारावें । सर्वांसी पीडाप्रद जो स्वभावें । धर्मध्वंसकरासी संहारावें । वर्णसंकरकरासी त्या ॥३४॥
त्यास दिलें जें वरदान । त्यायोगें तो बलिष्ठ होऊन । आम्हांस केलें बंदीजन । उपोषणपर आम्हीं आतां ॥३५॥
ऐसें त्यांचें ऐकून वचन । विघ्नराज प्रतापवान । तथाऽस्तु ऐसें वरदान । देऊन म्हणे मीं करीन हें ॥३६॥
हया कालावधीत देवि आश्चर्यं । घडलें स्वर्गी चित्रमय । दैत्य जे पहारा करिती निर्दय । देवांवरी ते पहात होते ॥३७॥
देवाचें पूजनादि पाहत । जाऊन काथिती सर्व वृत्तान्त । गणेश आगमन निवेदित । म्हणती विघ्नपती आला असे ॥३८॥
ममासुरासी ते सांगती । देवांनी आराधिला स्वचित्तीं । तो आला असे गणपति । त्या विघ्नपतीसी नमूनियां ॥३९॥
देव त्या महेशासी स्तविती । आपल्या वधार्थ प्रार्थिती । हया गणनाथानें सांप्रती । वरदान तैसें दिले त्यांना ॥४०॥
आतां हें वृत्त ऐकून । प्रभो काय करायचें तें ठरवून । त्यरित करावें आचरण । अन्यथा अनर्थ । ओढवे ॥४१॥
त्यांचें तें वचन ऐकून । क्रोधें आरक्त ममासुर होऊन । सर्व असुरांस बोलावून । सांगे वृत्त तें विस्तारानें ॥४२॥
तें ऐकून भयभीत । जाहले ते संभ्रमयुक्त । त्यास वंदन । करून सांगत । सल्ला स्वहिताचा त्या वेळीं ॥४३॥
दैत्येंद्र तयास सांगती । देव कारागारीं सांप्रत असती । ते कैसा आराधिती । गणनायक हें न कळे ॥४४॥
त्यानेंही संतुष्ट होऊन । ऐसें दिलें वरदान । हें सर्व अशक्य स्वप्न । तत्त्वमय दैत्य पाहिला ॥४५॥
पहारेकरी जे जैत्यवीर । पाहिला म्हणती विघ्नेश्वर । ते तत्त्वमयासीच निर्धार । पाहते जाहले असावे ॥४६॥
कारण जो तत्त्वहीन । त्याचें कैसें होय दर्शन । म्हणून त्याचें देवांसह हनन । सहज आम्ही करणार ॥४७॥
तुम्हांसी तो विघ्नेश काय करणार । मृत्युवर्जित आपण उग्र । जें जें तत्त्वमय असेल समग्र । त्या त्यापासून अभय असे ॥४८॥
ऐसें बोलून नाद महाभंयकर । करिती ते असुरवीर । देवादींसमीप शस्त्रास्त्रधर । ते निघाले जावया ॥४९॥
एवढयांत पुनरपि आश्चर्य घडत । नारद गेला विघ्नराजाप्रत । प्रणाम करून त्यास स्तवित । गायन करी आनंदें ॥५०॥
तदनंतर त्यास विनवित । ममासुरासी मारावें सांप्रत । परी गणराज त्यास पाठवित । समेट करण्या दैत्यांशी ॥५१॥
विघ्नराजाची नीति जाणत । नारद तोषला मनांत । प्रथम सामोपचार करित । गजानन त्या वेळीं ॥५२॥
नारद गजाननाचा दूत । गेला ममासुराकडे त्वरित । पुढे काय घडला वृत्तान्त । पुढिल्या अध्यायीं तें वर्णन ॥५३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे सप्तमे खंडे विघ्नराजचरिते विघ्नराजप्रादुर्भावो नाम षष्ठोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP