मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे|
गेली वहिनी, गेला बाबा । ब...

जय मृत्युंजय - गेली वहिनी, गेला बाबा । ब...

गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.


गेली वहिनी, गेला बाबा । बाळालाही नेत विधाता ।
सखे, प्रेमले ! तूं अंतरतां । सरल्या गाठी भेटी आता ॥धृ०॥
बोहल्यावरी जडले नातें । जीव जिवाशी विणले होते ।
तोडी नियती संबंधाते ।
काळाचा कर तुजला शिवतां । सरल्या गाठी भेटी आता ॥१॥
हाक भूमिची येतां कानी । गेलो उठुनी शय्येंवरुनी ।
तुझ्या संगतीला विरहाग्नी ।
पावक विझला मिटली चिंता । सरल्या गाठी भेटी आता ॥२॥
भिन्न स्थानें होती अपुली । एकजिवाने कार्ये केली ।
कडू गोड वा फळें चाखली ।
कार्यामधुनी तूं उन्मुक्ता । सरल्या गाठी भेटी आता ॥३॥
होता मजला नियतीचा वर । म्हणुनी आलो उतरुनि सागर ।
आणि मोडले दैत्यांचे घर ।
येत शांतता झंझावाता । सरल्या गाठी भेटी आता ॥४॥
नव्हता संभव संसाराचा सहचर्याचा, सहवासाचा ।
लाभ नव्हे कां हा दोघांचा ।
पुत्र-पौत्रसुख आले बघता । सरल्या गाठी भेटी आता ॥५॥
फार तुला, श्रम, थोडे मजला । घास घास अश्रूंनी भिजला ।
साह्र मिळे देवाचे तुजला ।
घेई अंकी तुला देवता । सरल्या गाठी भेटी आता ॥६॥
कष्टाचे अन् सौभाग्याचे । वागविले तूं भूषण साचे ।
सोने झाले आयुष्याचे ।
कीर्ति ठेवुनी देहा त्यंजितां । सरल्या गाठी भेटी आता ॥७॥
कार्य इथे माझेंही सरले । जिणे येथले थोडे उरले ।
कंकण आयुष्याला पुरले ।
मिळेन मीही शीघ्र अतीता । सरल्या गाठी भेटी आता ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP