मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे|
बहिष्कारिण्या परदेशी वसन ...

जय मृत्युंजय - बहिष्कारिण्या परदेशी वसन ...

गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.


बहिष्कारिण्या परदेशी वसन भारतात ।
योजना विनायक योजी छात्रमंडळात ।
विलायती जाळा वस्त्रे, छात्र गर्जतात ।
लोक लक्तरे दास्याची फेकती मखांत,
पुण्यपत्तनात ॥१॥
सजविती फुलांनी गाडा मार्ग आक्रमाया ।
वाजतात वाद्ये नाना देश जागवाया ।
प्रेम जागता देशाचे लोकमानसात ।
लोक लक्तरे दास्याची फेकती मखांत,
पुण्यपत्तनात ॥२॥
देशमुक्ति साधाया हे यागकार्य आहे ।
त्याग याच यागासाठी देश मागताहे ।
भक्तिने विनायक सांगे राहुनी पुढयात ।
लोक लक्तरे दास्याची फेकती मखांत,
पुण्यपत्तनांत ॥३॥
हळू हळू स्वातंत्र्याची होत वाटचाल ।
भरे मार्ग, भरला गाडा वाहिला गुलाल ।
’त्याग भारतायस्वाहा’ मंत्र गात गात ।
लोक लक्तरे दास्याची फेकती मखांत,
पुण्यपत्तनांत ॥४॥
स्मशानात गेली यात्रा, वन्हि चेतवीला ।
घाबरे धुराने केले आंग्लशासनाला ।
भूमि तप्त झाली, ज्वाला पोचती नभात ।
लोक लक्तरे दास्याची फेकती मखांत,
पुण्यपत्तनात ॥५॥
देशभक्ति लोकांमध्ये चेतवीत होते ।
परांजपे, भालाकर्ते, टिळक आदि नेते ।
सांगती, रिपूला फेका सप्तसागरात ।
लोक लक्तरे दास्याची फेकती मखांत,
पुण्यपत्तनात ॥६॥
चिता होत इतिहासाचे पान एक साचे ।
येथुनी विनायक साही घाव पावकाचे ।
जन्म जाळण्याच्या बांधी तोरणा चितेत ।
लोक लक्तरे दास्याची फेकती मखांत,
पुण्यपत्तनात ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP