सोमवार सायंस्मरण - भजन - सदगुरुनाथे माझ...

हरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .


भजन - सदगुरुनाथे माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ॥

१ )

श्रीशिवगौरीप्रियनंदना । पूर्ण करीं मनकामना ॥धृ०॥

चौदेहाच्या चौरंगी बसवुनि । पूजिन तुज विघ्नविनाशना ॥१॥

अनन्यभक्तिजले स्नान घालुनि । चरणी वाहीन सुमना ॥२॥

वासनाशेंदूर अंगा लावीन । धूप अहंभावना ॥३॥

रजोगुणात्मक लाल पीतांबर । नेसविन मूषकवाहना ॥४॥

पंचविषय ह्या दूर्वा तुज म्या । अर्पिन सुरनरवंदना ॥५॥

नंदादीप अखंड ध्यानाचा । कर्पूर समूळ दुर्भावना ॥६॥

सुप्रेमाचा मोदक भक्षी । सत्वरि कलिमलदहना ॥७॥

भजन - पार्वतीच्या नंदना मोरया , गजानना गजवदना ॥

२ )

सुंदरे गुणमंदिरे करुणाकरे कमलोदभवे ।

सिध्दचारणपूजिते जनवंदिते महावैष्णवे ।

त्राहि वो मज , त्राहि वो मज पाहि वो महालक्षुमी ।

हेमबावन रत्नकोंदन ते सिंहासन आसनी ॥१॥

एक एक विचित्र माणिक जोडिले मुगुटावरी ।

त्यासी देखुनि लोपला शशी चालिला गगनोदरी ।

कुंडले श्रवणी रविशशी - मंडलासह वर्तुळे ।

बोलता सुरनायकावरी हालताती चंचळे ॥२॥

कंचुकी कुचमंडलावरी हार चंपक रुळती ।

पारिजातक शेवंती बटमोगरा आणि मालती ।

पिवळा पट तो कटितटि वेष्टिला बरवे परी ।

सौदामिनिहुनि तेज अधिक शोभते उदरावरी ॥३॥

कामुकावरी मन्मथेश्वर सज्जिले तैशां निर्‍या ।

गर्जति पदपंकजे किती नूपुरे आणि घागर्‍या ।

इंद्र चंद्र महेंद्र नारद पादपंकज अर्चिती ।

कुंकुमागरु कस्तुरी प्रीति आदरे तुज चर्चिती ॥४॥

निर्जरे तुज पूजिले बहु शोभसी कमलासनी ।

किती हो तुज वर्णु मी मज पाव गे कुलस्वामिनी ।

कोटि तेहतीस देवता सह घेउनि विंझण करी ।

चामरे चिरपल्लवे तुज ढाळिती परमेश्वरी ॥५॥

नामामृत दे निरंतर याचकाप्रति गिरिसुते ।

जोडुनि कर विनवितो तुज पाव गे वरदेवते ।

संकटी तुजवाचुनि मज कोण रक्षिल अंबिके ।

गोसावीनंदन प्रार्थितो तुज पाव गे जगदंबिके ॥६॥

भजन - आनंदे गुरुमाय । निजानंदे गुरुमाय । सच्चिदानंदे गुरुमाय । पूर्णानंदे गुरुमाय ॥

३ )

संतदर्शने महालाभ जाहला । ह्रदयगृही आनंदकंद पाहिला ॥धृ०॥

मी माझे म्हणुनि भ्रमे फिरत होतो भारी । दैवयोगे पातलो संतमहाद्वारी ॥१॥

सापडुनि होतो गौडबंगाल जाली । सदय संतमायबापे मोकळीक केली ॥२॥

बहुत जन्मार्जित भाग्य उदया आले । संतकृपे आजि माझे निजरुप समजले ॥३॥

भ्रमर सुवासासि लुब्ध मक्षिका मधासि । तेचि चित्त गोवियेले आत्मह्रषीकेशी ॥४॥

अणुरेणुपासुनि विश्वि कृष्ण संचला । भक्तकामकल्पतरु दास मनी राहिला ॥५॥

भजन - शांत किती हा सदगुरुमूर्ति । पाहता मावळे द्वैतभ्रांति ॥

४ )

गुरुने अमल पिलायाजी । मुझकु गरक सुलायाजी ॥धृ०॥

आगम निगमकी बुट्टी गहिरा गुरुबचनका पानी । मनकुंडीमे खूब घोंटकर आत्मग्यानसे छानी ॥१॥

नैन अगोचर मुद्रा चढकर उलटा महल देखो । व्हांके अंदर मूरत बैठी रुप नही वा रेखो ॥२॥

निरंजन रघुनाथगुरुने एकहि बात सुनाई । मेरा चेहरा मुझे बताया आपोआप भुलाई ॥३॥

भजन - सीताराम जय जय राम । हरेराम , राम , राम , राम ॥

५ )

ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय वद , वद , वद रे ।

पावशी सच्चिदानंदपद रे । मनुजा ॥धृ०॥

लक्षचौर्‍यांशी योनी फिरता ।

अवचित नरतनु आली हाता ।

पुनरपि न मिळे ही जाणुनि ताता ।

गुरुसी वरी होउनि सदगद रे ॥१॥

विषय विषापरि वाटता तुज ।

गुरुपदी अनन्य होशी सहज ।

गुरुकृपेने कळता निजगुज ।

तरशिल भवसागर दुःखद रे ॥२॥

वेदशास्त्रे पुराणादिक ।

आणिक संत सनकादिक ।

गुरुविण गति नाही म्हणती सकळिक ।

गुरुवचने रुक्मिणी सावध रे ॥३॥

भजन - उपेंद्रा भक्तचकोरचंद्रा । सत्वरि धाव बा ॥

६ )

आरुढ , सत्पदारुढ , तमोमय मूढ जगी जन भरला , त्या मुक्त कराया , सांबचि जऊ अवतरला ॥धृ०॥

जरि रोड आकृति गोड , पाहता कोड , पुरति नेत्रांचे । तदभाषण वाटे सार ब्रह्मसूत्राचे ॥

मनि शांति , मुखावरि कांति , घालवी भ्रांति प्रणत लोकांची ।

या अल्पमुखे मी स्तुति करु केवी त्यांची । चाल ।

कुणी म्हणती जातीने वाणी , त्याजला ।

कुणी म्हणती कोष्टिकुलवंशी जन्मला ।

परि अधिक द्विजाहुनि वाटे तो मंला ।

समदृष्टि , सदासंतुष्टि , असो तो कोष्टि , विप्र की वाणी ।

तो वंद्यचि मजला , चिद्रत्नांची खाणी ॥१॥

बहु दिवस असा सहवास , कराया नवस चित्त करी माझे ।

तो योग आणिला सहजचि सदगुरुराजे ।

संगति ज्याचि सदगति , देउनि मति , शुद्ध करी खासी ।

तो राहुनि येथे , हुबळीची करी काशी चाल ।

असतील शेकडो ज्ञानी , महिवरी ।

मुक्तचि झाले स्वज्ञाने ते जरि ।

उपकारी क्वचितचि असतील यापरि ।

शिशुपरी खेळ कुणि करी , वदत वैखरी , पिशापरि कोणी ।

कुणि बसति मुक्यापरि , स्तंभुनि आपुली वाणी ॥२॥

ही माय दुभति गाय , वंदिता पाय , ज्ञानपय देई ।

गुण अंग जातिकुळ काळवेळ नच पाही ।

जन भरति ऐकुनि कीर्ति , पहाया मूर्ति रथावरि ज्याची ।

दरवर्षी भरे ती जत्रा कशी मौजेची ।

चाल । प्रार्थना जनांनो तुम्ही आईका ।

हा कल्पतरु तुम्हाला लाभला फुका ।

ही संधि वाया जाऊ देऊ नका ।

जा शरण , धरा तच्चरण , व्हावया तरण , भवांबुधिमाजि ।

ही कृष्णसुताची , विनंति ऐकुनि घ्याजि ॥३॥

भजन - ॐ नमःशिवाय , तरणोपाय , सुलभ उपाय , तारकमंत्र गुरुंचा ॥

७ )

मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा । तू साहेब मेरा सच्चा नाम लेऊं तेरा ॥धृ०॥

रुप नही रंग नही नही बरन छाया निर्विकार निर्गुन तू एक रघुराया ॥१॥

एक रोटी दे लंगोटी द्वार तेरा पावूं । काम क्रोध छोडकर हरिगुण गाऊं ॥२॥

मेहेरबान मेहेरबान मेहेर करो मेरी । दास कबीर चरण खडा नजर देख तेरी ॥३॥

भजन - बेळगांव शहरी अनगोळमाळी श्रीहरिमंदिरात तेथे हरि प्रत्यक्ष नांदतो काय सांगू मात ॥१॥

हरिनामाचा गजर होतो तेथे दिनरात । बंधुभगिनी सर्व मिळोनि अमोघ लाभ घेत ॥२॥

आमुचा हरि कृपादृष्टीने आम्हाकडे पहात । पाप ताप दुःख संकटे हरिला भिउनि पळत ॥३॥

८ )

माझी देवपूजा देवपूजा । पाय तुझे गुरुराजा ॥१॥

गुरुचरणाची माती । तीच माझी भागीरथी ॥२॥

गुरुचरणाचा बिंदु । तोचि माझा क्षीरसिंधु ॥३॥

गुरुचरणाचे ध्यान । तेचि माझे संध्या - स्नान ॥४॥

शिवदिन केसरिपायी । सदगुरुवाचुनि दैवत नाही ॥५॥

भजन - सदगुरुमाय दाखवि पाय । तुजविण गमेना करु मी काय ॥

अर्जी - गुरुराया तव चरणदास मी अर्जी ऐकावी । दयाळा , अर्जी ऐकावी ॥धृ०॥

मी अनाथ मज सनाथ करुनि लज्जा रक्षावी ।

दयाळा , उपेक्षा नसावी । चाल ।

तवपदकमली अनन्यभक्ति सतत दृढसावी ।

दयाळा , सतत दृढसावी ॥१॥

विषयसुखाची इच्छा कदापि न मला स्पर्शावी ।

दयाळा , न मला स्पर्शावी ।

तव दिव्य ज्ञान बोधामृती मम मति घर्षावी ।

दयाळा , मम मति घर्षावी । चाल ।

तुजवाचुनिया अन्य दैवते कधी नच नवसावी ।

दयाळा , कधी नच नवसावी ॥२॥

मी माझे ही द्वैतबुद्धि स्वप्नी न वसावी ।

दयाळा , स्वप्नी न वसावी ।

स्वस्वरुपाचा अनुभव देउनि भ्रांति निरसावी ।

दयाळा , भ्रांति निरसावी । चाल ।

कलिमलदहना परमपावना तव कृपा ऐसावी ।

दयाळा , तव कृपा ऐसावी ॥३॥

भजन - जय जय पांडुरंग हरि ॥

आरती -

१ ) आरती अनंता जय जय । आरती अनंता ॥धृ०॥

अनंत तव रुप , अनंत तव गुण । विधिहरिहरताता ॥१॥

अनंत तव नाम , अनंत तव प्रेम । तूचि कर्ताहर्ता ॥२॥

अनंत तव पद , अनंत तव कर । तारिसी तू भक्तां ॥३॥

अनंत श्रवण , अनंत नयन । काळाचा हंता ॥४॥

कलिमलदहना , सगुणनिर्गुणा । तूचि गुरुसमर्था ॥५॥

२ )

आरती गुरुमाई । मस्तक ठेविते पायी ॥धृ०॥

कलियुगी अवतरोनी । श्रीहरिमंदिरात ।

कलावती या नामे । प्रगटलीस आई ॥१॥

गौरवर्ण काया । सुहास्यवदन । शांत मूर्ति पाहता ।

मन तल्लीन होई ॥२॥

चतुर्विध भक्त येती । त्यावरि समान प्रीति ।

अज्ञान निरसुनिया । देसी आनंद आई ॥३॥

भवताप निवारोनी । सुखविसी सकला ।

म्हणुनि दीन विजया । शरण आली असे पायी ॥४॥

घालीन लोटांगण म्हणावे - पान १५

ॐ चैतन्यं शाश्वतं शांतं व्योमातीतं निरंजनम ।

नादबिंदुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः । गुरवे नमः । गुरवे नमः ॥

गुरुपादुकाष्टक - दयावंत कृपावंत सदगुरुराया ।

अनन्यभावे शरण आलो मी पाया ।

भवभ्रमातुनि काढी त्वरे या दीनासी ।

नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी ॥१॥

अनंत अपराधी मी सत्य आहे ।

म्हणोनि तुझा दास होऊ इच्छिताहे ।

तुजविण हे दुःख सांगू कुणासी ॥न०२॥

मतिहीन परदेशी मी एक आहे ।

तुजविण जगी कोणी प्रेमे न पाहे ।

जननी जनक इष्ट बंधु तू मजसी ॥न०३॥

जगत्पसारा दिसो सर्व वाव ।

अखंडित तव पायी मज देई ठाव ।

विषापरि विषय वाटो मनासी ॥न०४॥

तव आज्ञेसी पाळील जो एकभावे ।

तयासीच तू भेट देसी स्वभावे ।

म्हणोनि अनन्यशरण आलो मी तुजसी ॥न०५॥

किती दिवस गाऊ हे संसारगाणे ।

तुजविण कोण हे चुकविल पेणे ।

नको दूर लोटू चरणी थारा दे मजसी ॥न०६॥

सुवर्णासी सोडुनि कांति न राही ।

सुमनासी न सोडी सुवास पाही ।

तैसा मी राहीन निरंतर तुझ्या सेवेसी ॥न०७॥

कलावंत भगवंत अनंत सेवा ।

मनकामना पुरवि दे अखंड तव भक्तिमेवा ।

कृपा करोनि मज ठेवी स्वदेशी ॥न०८॥

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP