केशवस्वामी - श्लोक संग्रह ३

केशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू असून महानभगवद्‌भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते.


निशिदिनीं भजतो भव पाही । ह्मणवुनी मजला भव नाहीं ॥

भवसुखें बरवा बहुधालों जिवदशा गिळुनी भव झालो ॥१०१॥

निजपदीं रमतां सजणीं सदा । अनुभवीं ममतां नवधीं कदा ॥

अतिशयीं समता मति पावली । कवि ह्मणे गतिची गति फावली ॥२॥

नानापरी लोक दिसे विकारी । तरीं हरी केवळ निर्विकारी ॥

मुक्तासि हे मंगळसूत्र ठावें । नव्हेचि तो व्याकुळ चित्रभावें ॥३॥

नानाविधां चित्र दिसे हरीहो । विचित्र मी पूर्ण असे तरीहो ॥

येणें सुखें मुक्त सुखें निवालों । सर्वाश्रया पासुनि मुक्त झालों ॥४॥

नभाव झाले जगसर्वन्यासी । काळत्रयीं गर्व नुठीच त्यासी ।

घाली मिठी आत्म सुखेंच पाही । त्या वेगळा आणिक देव नाहीं ॥५॥

नारायणा वांचुनि लोक नाहीं । नारायणीलोक नसेचि कांहीं ॥

हें जाणती संत समर्थ पाहीं । त्यांच्या पदीं नित्य अभिन्न राही ॥६॥

निजफळें फळला गुरुपाही । ह्मणउनी चरणीं स्थिर राही ॥

अतिसार रसनें विण घेई । कवी ह्मणे मरणांतक होई ॥७॥

निशिदिनीं हरिचें गुणगातो । हरिपदीं रमतो बहुधा तो ॥

मज सदा गमतो हरिगा तो । भज मना सगुणी बहुधा तो ॥८॥

न करितां हरिच्या भजनासी । जनवृथा वय पावन नाशी ॥

भवपरे करुनी करणे हो । विसरला हिततें करणें हो ॥९॥

निज जना परमामृत देतो । उचलुनि कडियेवर घेतो ॥

ध्रुवपदा परिते मग नेतो । जिवतया पाहतां शिव होतो ॥११०॥

निरसुनी जन हे मृग तो यरे । निजपदीं बरवा स्थिर होयरे ।

अतिसुखें निवृत्ति तीर रे सदा । नपवसी विविधा तनु आ पदा ॥११॥

निर्वाण बोधें मन तोषलाहो । निर्माण होणें तव नास लाहो ॥

निर्वाण आतां मज लागि नाहीं । समान झालों जनसर्व पाही ॥१२॥

निज सखा हरि हा घन सावळा । श्रुति ह्मणे बरवा मनि आवळा ॥

हरि कधीं न भजे जन बावळा । मज गमे शिवला भ्रम कावळा ॥१३॥

निजकरी असतां हरि नेणती । भवपुरी पडती श्रमती अती ॥

गाति तया न दिसे विषयानना । न भजति क्षणही समलोचना ॥१४॥

निरसुनी मद मत्सरकांचणी । हरिपदीं मिरवे मति नाचणी ॥

तरि सरे अवघीं भव जाचणीं । हरि रसे जन पीईल पाचणी ॥१५॥

निज दया करतो हरि सेवा । भव भयासुरहा दुरि ठेवा ॥

श्रुति असे वदती चतुराला । हरिपदीं कवि सावध झाला ॥१६॥

न करिती जन चिद्‌घन आसरा । ह्मणवुनी छळती तनु आसरा ॥

घडि घडी पडती भवझांपडी । नुमजती गुरु वांचुनी बापुडी ॥१७॥

नाना शब्दें बोलता तोंड नाहीं । ऐसे मूके देखिले येक पाहीं ॥

त्याच्या बोधी बोधलें चित्त धालें । गुप्ताचेही गुप्त हातासि आलें ॥१८॥

निरखितां हरिच्या चरणाला । उरि कदा न दिसे करणाला ॥

ह्मणवुनी सज्जनीच कळे हो । हरि रसे जन हें वळे हो ॥१९॥

नामेच नाशीं भव ताप जाणा । दयाळतो केवळ रामराणा ॥

हृत्पंकजा लागुनि शीघ्र आणा । पडो नका अंतक चक्र आणा ॥१२०॥

नासोनि माया मति ऊर्ण नाभी । बोले दयासागर नाभिनाभी ॥

त्या सर्वदा चिन्मय पद्मनाभी । प्रलोकितां चित्रभवासि नाभी ॥२१॥

नासोनि माया ममता कुवर्णी । देतो सदा शांति दया सुवर्णी ॥

त्यास्वामिची कीर्ति प्रताप वर्णी । सेवा सदोदीत शिवा अवर्णी ॥२२॥

नानापरी चित्त करुनि राजी । राहो सदा ब्रह्म सुखाचि माजी ॥

माझीं मती आंदणी त्यासि द्याहो । अपार हे अक्षर कीर्ति घ्याहो ॥२३॥

नासोनि माया ममला पतीला । विलोकितां नित्य रमा पतीला ॥

झाली असी निश्चळभारती हो । आलिंगिला भारत सारथी हो ॥२४॥

नेदीच जो मान मनासि कांहीं । जनासि मानी नभ पुष्प पाहीं ॥

सेवी चिदानंद घना अभेदे । झाला सुखीं तो परिपूर्ण बोधें ॥२५॥

निःकाम पंथीच मनासि लावी । निरंतरी सर्व समाधि दावी ॥

दयानिधी प्राण सखा निजाचा । आत्माचि तो केवळ केशवाचा ॥२६॥

नानाभयीं निर्भयरुप होतो । कालत्रयीं आत्म सुखासि घेतो ॥

देतो मिठी पूर्ण स्वभावे । तो ब्रह्म हे वर्म तयासि ठावे ॥२७॥

गुरु दयाघन वंदुनि पाही । शमदमे करुनी लवलाही ॥

हरि पदीं गळ लावुनि आलो । ह्मणवुनी हरि केवळ झालो ॥२८॥

गुरु दयामृत सेवुनि आधीं । मुख घना अमना प्रति साधीं ॥

मतिविना निज अद्वय योगें । क्षण क्षणा निवसी तरिवेगे ॥२९॥

गोडाहुनी चिन्मय गोड साचे । निरंतरी साधुसि वेड त्याचे ॥

परोपरी कोड करुनि नाचे । तेणे सुखें तो करणा न मेंचे ॥१३०॥

गुण परमतिचा विलयीरे । अति दया पतिच्या निलयीरे ॥

निजपदीं स्थिर हो उनि बैसे । मज दिसे जन हे मज ऐसे ॥३१॥

ग्रासूनि माया मद मोह चेष्टा । विलोकिती तें शिव सर्व द्रष्टा ॥

तत्पाद निष्ठा मज प्राप्त झाली । हृत्पंकजी अक्षर वस्तु आली ॥३२॥

गुरु तुझें नाम मुखासि आलें । तेणे गुणे मान सपूर्ण झालें ॥

झालो सुखीं भेद लयासि गेला । दया निधी बोध अपूर्व केला ॥३३॥

गुरु पूजा अक्रुनि सुमनी हो । स्थिर मती रमती अमनी हो ॥

श्रम झडे विघडे भव बाधा । ह्मणवुनि अगुणी गति साधा ॥३४॥

गुरुमुखें हरुनि मदनाशी । वद हरी वदनी मदनाशी ॥

तरि घडे हरिच्या पदि थारा । जरि घडे व्रत हें असिधारा ॥३५॥

गुरु दया फळली मजलागुनी । ह्मणवुनी न दिसे भवलोचनी ॥

जनिवनी घन माधव कोंदला । निजसुखें मन मारुत रोधला ॥३६॥

गुण घना अमलामृत लोचना । करि दया त्रिविध भव मोचना ॥

ह्मणवुनि चरणी मन ठेविलें । तव शिवे अवघें पद दीधले ॥३७॥

गुरु दया कर सादर वंदुनी । झड झडा निघसी तरि तेथुनी ॥

कवळुनी हृदयीं मति माधवा । निजसुखें निवसी तरि मानवा ॥३८॥

गुणमयी हरली सरली क्रिया । मति सुखें भरली भजता प्रिया ॥

किति वदू वदतां गुजहे नव्हे । निजपदी दुसरे न दिसे सये ॥३९॥

गुरु पदीं रमता भ्रम गेला । बहु विधा श्रमहा दुरि ठेला ॥

विसरलो स्वमुखें तनु धर्मा । सम रसे मिनलो परब्रह्मा ॥१४०॥

गुरु मुखीं उघडी जरि डोळे । निज पदी मन हे तरि खेळे ॥

अति सुखें विसरे श्रम नाना । करि सदा अमला मृत पाना ॥४१॥

गुरु गुण घना अगुणा गुरु नायका । करि दया सदया सुख दायका ॥

भवपुरी पडली मति लहणी । परि तरी उतरी कच घालुनी ॥४२॥

गुरु मुखें विविधा मति नासली । ह्मणवुनी विविधा चित्ति भासली ॥

निजसुखें रचला अति तोषला । खद खदा कवि केशव हांसला ॥४३॥

गुरु मुखें तनुता शमनी नये । ह्मणउनी ममता हृदया नये ॥

अतिसुखें समता घन दाटली । समपदीं समता मति आटली ॥४४॥

गोपाळ हा पूर्ण कृपाळ झाला । त्रिकाळ माझ्या त्दृदयासि आला ॥

गेला लया भेद विशाळ तेणें । यालागि नाहीं मज जन्म घेणे ॥४५॥

गुरु पदीं मन सादर वाहा । जिव दशा हरुनी शिव पाहा ॥

निजसुखें अति निरुळ राहा । मग कदा नलगे भव दाहा ॥४६॥

गुरु पदीं मन निश्चळ रक्षितां । शम दमा श्रम सर्वहि भक्षिता ॥

भवनदी पदी पडली अति कोरडी । सुख घनी घडली गति कोरडी ॥४७॥

ज्ञानोदये पातक जाळ नाशी । सेवी निजानंद प्रकाश राशी ॥

समर्थ तो नाथ प्रसन्न झाला । स्वप्रत्यया सर्वहि राम आला ॥४८॥

गांठी असे पुण्य अपार कोटी । चिद्राघवाची तरि होय भेटी ॥

पडे मिठी स्वात्म सुखेंत्रिकाळी । वेदार्थ ऐसा वदवी कपाळी ॥४९॥

रामार्णवी चित्त बळेचि लोटे । चिद्राम चित्तींच अखंड दाटे ॥

आनंद वाटे परि पूर्ण पाही । जयासि वाटे मग तोचि नाहीं ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP