TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

केशवस्वामी - श्लोक संग्रह २

केशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू असून महानभगवद्‌भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते.


श्लोक संग्रह २

भवीं या भया पासुनी सोडवीलें । पदीं स्थापुनी चित्सुखे गौरवीलें ॥

दयावंत ते संत नाथ माझे । सदा सद्रुपि कीर्ति त्याची विराजे ॥५१॥

भवाचा विरोधी न रोधी मनातें । समाधिस्त बोधेवरी चिद्‌ घनाते ॥

जनांते वनातें तया निर्जनातें । न जाणे सदा पावला निर्मनातें ॥५२॥

भ्रमाच्या लयीं कामवैरी निमाला । भ्रमाच्या लयीं चिन्मई योग झाला ॥

भ्रमाच्या लयीं दाटला देव देही । भ्रमाच्या लयीं केशवीं देह नाहीं ॥५३॥

भव भयांतक मंगळ योगें । रतिपती हरता अतिवेगे ॥

निजगती घडली मजलागीं । सुखनिधी भरला हरिअंगीं ॥५४॥

भजन पथ विचारें चालता गोड वाटे । त्रिभुवन जनकासी चिंतिता प्रेमदाटे ॥

ह्मणवुनि मनगंगे लोट आला सुखाचा । नयन कमलद्वंद्वें चालिला पाटसाचा ॥५५॥

भवगिरि वरती चडतांहो । ह्मणवुनि पतनीं पडतांहो ॥

हरि करीं असतां रडतां हो । हित कसें स्वरुपीं परतां हो ॥५६॥

भंगूनि मायामद भंजनाला । विलोकिती अद्वय भाजनाला ॥

जे सेविती अक्षर भोजनाला । नव्हेति या गोचर भोजनाला ॥५७॥

भावें सदा संत पदाब्ज जोडा । पूर्वील हे सर्वहि वोढि सोडा ॥

करा कथा चित्र विचित्र गोडा । फोडा तुह्मी अंतक वक्रखोडा ॥५८॥

भक्ता विरक्ता भवताप मुक्ता । हा ठावुका राम सभाग्यवंता ॥

याकारणें रामपदींच तेहो । विलासुनि ग्रासुनि शोकमोहो ॥५९॥

विलोकितां सद्गुरु चंद्रमा हो। गेली लया शोकमई अयाहो ॥

सारामृता चित्तचकोर घेते । झाली सिमा सर्व सुखासि घेते ॥६०॥

विलोकितां संत समर्थ पाया । संसार गेला अवघाचि वाया ॥

निमग्न झाले अचरी अपारी । यालागि मी केवळ निर्विकारी ॥६१॥

वानु दयाळा तुजला कितीरे । देऊनि हातीं निज संपतीरे ॥

मी देव ऐसा मज बोध केला । यालागि माझा भववेध गेला ॥६२॥

वंदूनिया बोधरता प्रधाना । निष्काम तीर्थींच मनास न्हाणा ॥

निरंतरा सर्व गतासि जाणा । मी तोचि तोमी प्रचितीस आणा ॥६३॥

विद्वज्जनाचा भजनीं निवाला । चिन्मात्र तोही बरवा निवला ॥

आनंदराशी परिपूर्ण झाला । आत्मत्व बोधें भजतां तयाला ॥६४॥

जनीं वनीं हरि लक्षुमि खेळे । उघडुनि निज निर्मळ डोळे ॥

तरि जडाजड वेदन नासे । अति सुखें हरि सर्वहि भासे ॥६५॥

विज्ञान मंत्रावळि प्राप्त झाली । हृत्पंकजीं अक्षरवस्तु आली ॥

निःशेष गेली समनिष्क माया । यालागि नाहीं मजलागि काया ॥६६॥

विषय वर्जुन साधन त्यागिती । अचळ होउनि चिद्‌घन भोगिती ॥

परम मंगळ दायक ते भले । निजपदारुढ केवळ देखिले ॥६७॥

विरक्तिहे टाकुनि ज्यासि गेली । ज्याच्या गृहींहूनि दया पळाली ॥

क्षमा जया पूर्ण उदासि झाली । त्याच्या पदीं भ्रांति फळासि आली ॥६८॥

विलोकितां मंगळ लोचनातें । विदारिले शोकघना मनाते ॥

झालों महत्पावन तीर्थवासी । यालागि मी अक्षर पूर्णराशी ॥६९॥

विचारें बरें वृत्ति सोज्वल्य केली । तनूदायनी शीघ्र तेणेंचि मेली ॥

जगज्जाल हा पूर्ण चिद्गोळ झाला । मुनी सर्वदा आत्मलाभें निवाला ॥७०॥

वंदूनिया सद्गुरुनाथ शक्रा । निर्दाळिले म्या भवघोर चक्रा ॥

झालों सुखी देह नव्हेचि ठावा । आतां कसा काळ करिल दावा ॥७१॥

विलोकितां सर्व गताशिवासी । संसार झाला समसार रासी ॥

गेल्या क्रिया सर्व सुखालयासि । बोले कवी आत्म विवाहवासी ॥७२॥

उपरमे ममता अति बोलिली । ह्मणउनि समता मज भाळली ॥

कवळुनी धरली मग सादरें । सममुखें न दिसे तव दूसरें ॥७३॥

उपरमे मुनिची करणीहो । विसरती अवघी करणीहो ।

मिरवति घनचिन्मय योगें । निजसुखें निवती अतिवेगें ॥७४॥

विषय वमन त्यागी सर्वसंगीं विरागे । कवळुनि हरिलागीं तो असे सानुरागें ॥

ह्मणवुनि तनु भागा नातळे सर्व दागा । करुनि त्रिविध यागा पावला चित्पदागा ॥७५॥

वंदूनिया सद्गुरुनायकाहो । सत्‌शास्त्र हें सादर आयकाहो ॥

करा क्रिया मंगळ दायकाहो । सेवा सदोदीत विनायकाहो ॥७६॥

वेदांतशास्त्रीं समपुण्यराशी । समर्पिता चित्तशशी तयाशी ॥

मी सर्वदा आत्मप्रवीण झालों । भेदेविना पूर्णसुखें निवालों ॥७७॥

विचारिता सर्व गताभिरामा । हे नातळे चित्त कदापि कामा ॥

संसारधामा प्रति शीघ्रसांडी । तोडी क्रियाजाळ परेश जोडी ॥७८॥

विलोकिती चिन्मय ब्रह्मडोळा । ब्रह्मार्णवीं मज्जति वेळ वेळां ॥

हे जाणती सर्वहि ब्रह्मपाही । त्या वेगळें आणिक ब्रह्मनाहीं ॥७९॥

वंदूनिया सज्जन पादरक्षा । नारायणी चित्त निवांत रक्षा ॥

क्षरा करा ब्रह्मसुखे भवाची । ऐसें कवी मंगळशास्त्र वाची ॥८०॥

लघुनाम ज्यासि कांहीं न साचे । गुरुनाम हें बोलतां देव लाजे ॥

असा तो गुरु संचला पूर्णपाही । तया लक्षितां विश्व झालेंचि नाहीं ॥८१॥

लखलखी गगनीं विज जैशी । हरिकथा श्रवणीं मति तैशी ॥

धगधगी बरवी विजतेजें । निजपदीं मिरवें निजभोजे ॥८२॥

लोकत्रयाचें निजधाम साचें । संसार हे केवळ नाम ज्याचें ॥

निर्नाम तो नाम महामुनी हो । विलोकिता सर्व श्रमाधुणीहो ॥८३॥

निष्काम तीर्थी निजवास केला । जळोनियां पातकराशि गेला ॥

आनंद झाला बरवा मनींहो । मनास ही वेच निरंजनीं हो ॥८४॥

निष्कामधामा परिपूर्णकामा । निर्नामनामा रमणीय रामा ॥

सन्मात्रसारा अमराअपारा । स्वानंदथारा मज दे उदारा ॥८५॥

निरावलंबींच कबंधनाचे । जाणेल तो एक मरोनि वांचे ॥

ऐश्वर्य ह्मणणें ह्मणणेचि खोटें । हे लोटले सर्व अचिंत्यलोटे ॥८६॥

निर्मत्सराच्या चरणासि लागे । वेदांत शास्त्रींच अखंडजागे ॥

स्वानंदराशी निज रामराणा । भेटेल वेगीं तरि पूर्ण जाणा ॥८७॥

न चलता अमलासमतापथा । न करितां गतिची बरवी कथा ॥

न भजता हृदयीं हरिची कथा । अति कथा करणें तितुकें वृथा ॥८८॥

नारायणीं जो नर थांबला रे । संसार त्याचा दुरि लांबलारें ॥

धरावया बोधकबाध गेला । झाला नसे यागती पळाला ॥८९॥

निराश्रमीं आश्रम आजि केला । वर्णाश्रमाचा श्रम सर्व गेला ॥

विमुक्त झालों बरवा निवालों । अवाच्यते मी गुज काय बोलो ॥९०॥

निरसुनी मद मत्सर मेले । हरिपदीं स्थिर होउनि ठेले ॥

तरि दिसे हरि सर्वही पाही । हरि विना मग कांहींच नाहीं ॥९१॥

निष्काम धामीं रमती यतीहो । यालागि मायातम नेणतीहो ॥

घेती निजानंद प्रकाश गोडी । त्याची दया ब्रह्मकटाह मोडी ॥९२॥

निष्काम बोधें परिपक्व झाले । अपार हें आत्मप्रकाश ल्याले ॥

ते भेटले तारक ब्रह्मयोगी । यालागिं झालों परब्रह्मवेगीं ॥९३॥

निवांत जो चिन्मय दीपदावी । क्षरीं सदा सन्मय राम दावी ॥

त्याच्या पदीं तन्मय नित्य व्हावें । कवी ह्मणे अद्वय सूख घ्यावें ॥९४॥

निरंतरी संत दयाळ सेवा । निरंतरीं राम मनींच ठेवा ॥

निरंतरीं मोक्षपदासि पाहो । निरंतरी अद्वयलाभ घ्या हो ॥९५॥

निराकार संकल्प ग्रासूनि पाहे । निराधार संपूर्ण जाणूनि राहे ॥

निरालंब जो याचि देहींच झाला । नमस्कार माझा तया योगियाला ॥९६॥

नामें तोडी काम संकल्प बेडी । त्याच्यापायीं लागली पूर्ण गोडी ॥

माया वेडी नासली भेद खोडी । भाग्यें आह्मी जोडिला राम जोडी ॥९७॥

निःशेष माया मय पाश तोडूं । बोधें चिदानंद घनाशि जोडूं ॥

मोडूं महाशोक विकारसद्म । भोगूं सुखें बुद्ध अभोग्य पद्म ॥९८॥

निजकरीं धरुनि हरि दाविती । हरि पदी बरवी रतिलाविती ॥

मजगणी मगती हरितेखरे । क्षणभरी भजतां भव वोसरे ॥९९॥

नानापरी ऐक हरी असेहो । हरी क्रिया जलप तया दिसेहो ॥

दिसे तरी दृश्य तरी नसेहो । स्वयें सदोदीत हरी वसेंहो ॥१००॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-12-16T21:07:35.4500000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

inelastic action

  • अप्रत्यास्थ क्रिया 
RANDOM WORD

Did you know?

नजर लागते किंवा दृष्ट लागते म्हणजे काय? त्यावर उपाय काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site