मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पाळणे|
मथुरेमध्यें अवतार धरिला ॥...

पाळणा - मथुरेमध्यें अवतार धरिला ॥...

पाळणे - Palane are the marathi lullby songs usually sung at Naming Ceremony called "Barase" (बारसे). These are also sung while putting child to sleep in a swing.


मथुरेमध्यें अवतार धरिला ॥ कृष्ण देवकीच्या गर्भासी आला ॥

तोडून बेड्या बंद सोडिला ॥ चरणांच्या प्रतापें मार्ग दाविला ॥जो०॥१॥

गोकुळामध्यें श्रीकृष्ण आला ॥ नंदाच्या घरीं आनंद झाला ॥

गुढ्या तोरणें शिखरीं बांधिती ॥ कुसुमांचे हार देव वर्षती ॥जो०॥२॥

तिसर्‍या दिवशीं वाजे वाजंत्रीं ॥ तासे नौबती उत्सव करिती ।

सर्वांच्या मुखीं कृष्ण हा शब्द । त्याचे छंदानें नाचे गोविंद ॥जो०॥३॥

चवथ्या दिवशीं चवथी चौकी ॥ बाळबाळंतीणीचीं न्हाणीं हो होतीं ॥

निंबें डाळिंबें नारळ आणिती ॥ सख्या मिळोनी दृष्ट काढिती ॥जो०॥४॥

पांचव्या दिवशीं पाटापूजन ॥ बांधिला फुलवरा वाक्या तोरण ॥

सरी बिंदलीं आंगडे पैरण । खिरी भरल्या ताटें ठेविलीं वाढून ॥जो०॥५॥

सहाव्या दिवशीं सटवीपूजन ॥ हळदीकुंकवाची देताती वाणं ।

एकमेकींसी सखया होऊन ॥ पानसुपार्‍या खोबरें वाटिलें ॥जो०॥६॥

सातव्या दिवशीं सटवीचा फेरा । गोपां बाळंतीण आवरुन धरा ॥

सांजच्या प्रहरीं अंगारा करा ॥ गाईं वासरां मुलालेकरां ॥जो०॥७॥

आठव्या दिवशीं आठवी चौकी ॥ गोपां बाळंतीण नवतीस न्हाती ॥

सखया मिळोनि जाग्रण करिती ॥ जो बाळा जो०॥८॥

नवव्या दिवशीं नवस केला ॥ खेळणें पाळणें वाहीन तुजला ॥

कृष्ण पालख लागूं दे मजला ॥ जो बाळा जो०॥९॥

दहाव्या दिवशीं दहावी चौकी ॥ न्हावी बोळवून सारवल्या भिंती ॥

मूठभरल्या ओटया दिधल्या लावूनी ॥जो०॥१०॥

अकराव्या दिवशीं अकरावी चौकी । येश्वदा बसली मंचकावरती ॥

नयनाच्या कोरीं काजळ भरी ॥ बाळ्यांचा नाद उमटें मंदिरीं ॥जो०॥११॥

बाराव्या दिवशीं बारसें येती ॥ परोपकारी पक्वान्नें समयें करितीं ॥

लाडू मोदक पंखा वारिती ॥ खीर भरल्या वाटया साखर मिळविती ॥जो०॥१२॥

तेराव्या दिवशीं तेरावी चौकी ॥ बारीक जुनें नेसून येती ॥

मोर गर्जती चौखंडावरती ॥जो०॥१३॥

चवदाव्या दिवशीं चवदावी चौकी ॥ नंदी महादेव परतुनी येती ॥

गोपांचे मीठ बळीराम घेती ॥ जो बाळा जो०॥१४॥

पंधराव्या दिवशीं पंधरावी चौकी ॥ नगरीच्या नारी मिळून येती ॥

एक म्हणती गोविंदा घ्यावा ॥ एक म्हणती माधव घ्यावा ॥

पालखीमध्यें देव मुरारी ॥ नांव ठेविलें श्रीकृष्णहरी ॥जो बाळा जो०॥१५॥

सोळाव्या दिवशीं सोहळा केला ॥ गोपी गवळणीनें कृष्ण आळवीला ॥

एका जनार्दनीं पाळणा गाईला ॥ जो बाळा जो०॥जो जो रे॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : October 14, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP