मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पाळणे|
शाहूचा पाळणा

शाहूचा पाळणा

शाहूचा पाळणा Shahu Palana


सन अठराशे सत्याण्णव सालात । आनंद झाला करवीरा शहरात ।

पहिल्या शुक्रवारी श्रावण महिन्यात । पुत्र झाला शाहुराजासी विश्रांत ।

चंद्र उगवला लक्ष्मी महालात । जो बाळा जो ॥१॥

शाहुराजाची पुण्याई थोर । गुढ्या उभ्या शहरात तोफेचा मारा ।

झाला आनंद होतो गजर । पानसुपारी वाटिती साखर ।

झडे चौघडा अंबेचे पुढे । जो बाळा जो ॥२॥

राणी सरकार प्रसूत झाली । घड्याळे नवबंदी झडू लागली ।

शाहुराजासी वरदी कळली । पूर्व पुण्याई ईश्‍वरे केली ।

ऎसे शंकराला पार्वती बोलली । जो बाळा जो ॥३॥

शाहूच्या गादीला चढले भूषण । आनंद झाला पुत्र पाहून ।

मानपानकरणी आल्या धावून । करिती सत्कार बाळावरुन ।

वाटिती विडे मानाप्रमाणे । जो बाळा जो ॥४॥

बिजलीच्या बत्तीचा प्रकाश भारी । लाह्या टाकिल्या राजमंदिरी ।

पाहून तृप्त झाल्या नगरीच्या नारी । आणुनि ओतीती पाण्याच्या घागरी ।

खण नारळांनी ओट्या सावरती । जो बाळा जो ॥५॥

दोन्ही हिरकण्यावरती जन्मला हिरा । मोठमोठ्या शहरी पाठविल्या तारा ।

बंदी कैद्यामध्ये फोडल्या मोहरा । जागोजागी निशाणे तोरणे भरारा ।

पहिल्या दिवसाचा मजकुर सारा । जो बाळा जो ॥६॥

दुसरे दिवशी दुसरा प्रकार । हत्तीवरोनी वाटिती साखर ।

घोडे कोतवाल जिलेबी पूड । घणघण बाजा होतो सुंदर ।

घरोघरी वाटी भरुनि साखर । जो बाळा जो ॥७॥

तिसरे दिवशी त्रिभुवन मूर्ती । दत्ताची छाया बालकावरती ।

आपल्या नावाने पाषाण करिती । करुनि पूजा ओवाळी आरती ।

जो बाळा जो ॥८॥

चवथे दिवशी चंदु पुजेचा । गजानन महाराज साह्यक बाळाचा ।

खेळ खेळतो कृष्ण गोकुळीचा । प्रकाश पडला महाली सूर्याचा ।

जो बाळा जो ॥९॥

पाचवे दिवशी सटवीचा मान । तिला आज्ञा दिली परमेश्‍वरानं ।

लिहिते अक्षर आपल्या हातानं । कुवारणी पुजूनि झाला सन्मान ।

हळदीकुंकु घेऊनि नागरणी जाण । जो बाळा जो ॥१०॥

सहावे दिवशी सहावा उल्हास । सडासारवण केले वाड्यास ।

तेले सुवासिक लावी अंगास । पाणी घालिती तान्ह्या बाळास ।

जो बाळा जो ॥११॥

सातवे दिवशी साती आसरा । गुप्त रीतीचा घालिती फेरा ।

लिंबू, नारळ टाका उतारा । पाणी घालिती सखया सुंदरा ।

दॄष्टि काढुनि लाविती अंगारा । जो बाळा जो ॥१२॥

आठवे दिवशी आठवा आनंद । पोटी जन्मला कृष्ण गोविंद ।

हार पुष्पांचा सुटतो सुंगध । जो बाळा जो ॥१३॥

नवव्या दिवशी नवस केला । खेळणे पाळणे वाहीन तुला ।

कृष्ण पालख लाभू दे मला । जो बाळ जो ॥१४॥

दहावे दिवशी दहावा उल्हास । हांडी झुंबर महाली करुनि आरास ।

तेल सुवासिक लावूनि अंगास । पाणी घालिती तान्ह्या बाळास ।

जो बाळा जो ॥१५॥

अकरावे दिवशी अकरावे लिंग । दास रामाचा उभा बजरंग ।

पाची हत्यारे प्रभुच्या संग । जो बाळा जो ॥१६॥

बारावे दिवशी केले बारशाला । सोन्याचा पाळणा मोत्यांनी गुंफला ।

आंगडे टोपडे किनखापी त्याला । हिरे जडित कोंदण पिंपळपानाला ।

शाहूच्या गादीला प्रभू निपजला । राजाराम नाव ठेविले जाहीर सर्वाला ।

जो बाळा जो ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP