नागनाथ माहात्म्य - आलमखानचे पद

नागनाथ हे नवनाथापैकी असून ते साक्षात शंकराचाच अवतार होय.


श्रीवडवाळसिद्ध नागनाथांचे इतरही भक्त होऊन गेले. उदाहरणार्थ आलमखान हा पठाण असून नागनाथ भक्त होता.

त्याचे पुढील पद पहा

धन्य हे सुक्षेत्र परब्रह्म पीकले ।

धन्य हे सुनीलजडित रत्‍न देखिले ॥ध्रु॥

प्रवाळवर्ण शुक्तिकेत मुक्त तो दिसे ।

त्यात कृष्ण शुक्ल श्वेत ओतिले कसे ।

त्यावरी सुनील चंद्र सूर्य तो दिसे ।

कोटि बिंदु पीत बिंदु भासती ठसे ॥१॥

रामह्रदय शिव साक्षी श्रुती बोलली ।

तेवि मूर्ति या ठशात केवि ओतली ।

अलक्ष लक्षणासि केवि पातली ॥

नवल म्हणूनिया वेद नेति खुंटली ॥२॥

याचि विषयी विश्‍वरुप पाहु लाधला ।

कृपांजने कडुनि ज्ञानचक्षु पावला ।

पाहताचि स्वात्मसुख पाहु लावला ।

गोठला आकार आलमखान आटला ॥३॥

त्याचे पुढील पद पहा-

तुझे स्वरुप गुरुराया । पाहता निरसली माया ।

आता कुरवंडित काया । तू करि मजवरी दया ॥१॥

नीज रुपाची सीमा । पार नेणे शिव ब्रह्मा ।

काय देऊ उपमा । संत साधु विश्रामा ॥२॥

चिन्मय चिद्रूप घनदाट । पाहता दिसे लखलखाट ॥

त्यातुनि करावी वाट । मीन मार्गासी नीट ॥३॥

स्वयं ज्योती प्रकाश । अलक्षरुप अविनाश ।

काय करू विलास । संतजन लोकास ॥४॥

नागेशकृपे वरदान । अलमखान संतचरण ।

सबाह्य ब्रह्म परिपूर्ण । मन हे झाले उन्मन ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP