मराठी मुख्य सूची|विधी|शांती विधी|प्रकार १|
स्थंडिलकर्म

स्थंडिलकर्म

वास्तु्शांती म्हणजे वास्तु उभारताना यजमानाच्या हातून विविध चुका होतात किंवा दोष घडतात, त्यांची शांती. वास्तुपुरुषाची शांती नव्हे.


विधी - १७

अग्निमुख / स्थंडिलकर्म

यजमान हस्तप्रमाणं चतुरस्त्रं चतुरंगुलोन्नतं स्थंडिलं विरच्य ।

हल्ली लोखंडाचे होमकुंड बरेच जण वापरतात. जर असे लोखंडाचे अग्निकुंड वापरावयाचे असेल तर त्यात थोडी वाळू किंवा ढोबळमनाने माती घालावी. विटांचे होमकुंड करावयाचे असल्यास खाली ८ व वर ८ अशा १६ विटांचे होमकुंड तयार करावे. शक्य असल्यास गायीच्या शेणाने किंवा लाल मातीने लिंपून सारवून घ्यावे. त्यात थोडी वाळू किंवा माती घालावी. होमकुंड मुख्य देवतांचे समोर असावे.

स्थंडिलं गोमयेन उपलिप्य पंचगव्येन प्रोक्ष्य दक्षिणे अष्टौ उदीच्यं व्दे प्रतीच्यां चतुः प्राच्यां अर्धं इति अंगुलानि त्यक्त्वा

शेणाच्या पाण्याने स्थंडिल प्रदक्षिणकार प्रोक्षण करावे. त्यानंतर पूर्वी बनविलेले पंचगव्य गोलाकार शिंपडावे. दक्षिणेस ८, उत्तरेस २, पश्चिमेस ४ व पुर्वेस अर्धे आंगुळ (बोट) जागा सोडावी.

दक्षिणोपक्रमामुदक्संस्थां प्रादेशमात्रां एकां लेखां तस्या दक्षिणोत्तरयोः प्रागायते प्रादेशसंमिते व्दे लेखे लिखित्वा

समिधेने दक्षिणेकडून उत्तरेकडे टीचभर लांबीची एक रेषा काढावी. त्याचे दक्षिणेकडे व उत्तरेकडे पश्चिमेकडे सुरू करून पूर्वेकडे दोन रेषा काढाव्यात.

तयोर्मध्ये परस्परं असंसृष्टाः प्रागायताः प्रादेश स्मितास्तिस्त्र इति षड् लेखां यज्ञियशकलमूलेन दक्षिण हस्तेन उल्लिख्य

त्या दोन रेषांमध्ये समांतर अंतरावर पश्चिमेकडून पूर्वेकडे तीन रेषा काढाव्यात. अशा एकूण सहा रेषा काढाव्यात.

तच्छकलं उदग अग्रं निधाय स्थंडिलं अद्भिः अभ्युक्ष्य शकलं भंक्त्वा आग्नेयां निरस्य पाणिं प्रक्षाल्य वाग्यतो भवेत्

ती समिधा उत्तरेकडे अग्र करून ठेवावी. स्थंडिलावर पाणी शिंपडावे. समिधा मोडून स्थंडिलाचे बाहेर आग्नेय कोनात टाकावी. हात धुवावा. अग्नि स्थापनेपर्यंत बोलू नये.

ततस्तैजसेनासंभवे मृण्मयेनवा पात्रयुग्मेन संपुटीकृत्य सुवासिन्या श्रोत्रीयागारात्स्वगृहाद्वसमृद्धं निर्धूममग्निं आह्रतं स्थंडिलादाग्नेय्यां निधाय । अग्निं आह्रत्य ।

अग्निं आह्रत्य-अग्निचे आवाहन

यजमानाच्या पत्‍नीकडून ताम्हणातून अग्निवर दुसर्‍या ताम्हणाचे झाकण ठेऊन अग्नि आणावा. त्यावेळी अग्नीचा ध्यान मंत्र म्हणावा.

एह्येहि सर्वामरहव्यवाह मुनिप्रवर्यैरभितोभिजुष्ट । तेजोवतां लोकगणेन सार्ध्दं ममाध्वरं पाहि कवे नमस्ते । आच्छादनं दूरिकृत्य

(अग्नीवरील आंब्याची पाने दूर करावीत.)

वैश्वानर नमस्तेस्तु हुताशन नमोऽस्तुते । देवानां प्रीणनार्थाय तिष्ठात्र मम स्थंडिले । आत्माभिमुखं कृत्वा वरद नाम अग्निं प्रतिष्ठापयामि ।

ताटलीतील अग्नी उचलून स्थंडिलात ठेववा. ताटली पुन्हा जागेवर ठेवावी. त्यावर पळीभर पाणी टाकावे.

प्रोक्षतेंधनानि निक्षिप्य । वेणु धमन्यां प्रबोध्य ध्यायेत् ।

इंधनावर-लाकडांवर पाणी प्रोक्षण करून ते इंधन अग्निवर घालावे. वेळूच्या फुंकणीने फूंकून ज्वाळा काढावी व अग्नीचे ध्यान करावे.

अग्निचे ध्यान

इष्टां शक्तिं स्वस्तिकाभितिमुच्चै र्दीघैर्दोर्भिर्धारयंतं जपाभम् । हेमाकल्पं पद्मसंस्थं त्रिनेत्र ध्यायेत् वह्निं बद्धमौलिं जटाभिः ।

सप्तहस्तश्चतुः श्रृंगः सप्तजिव्हो व्दिशीर्षकः । त्रिपात्प्रसन्न वदनः सुखासीनः शुचिस्मितः । स्वाहांतु दक्षिणे पार्श्वे देविं वामे स्वधां तथा ।

बिभ्रद्दक्षिण हस्तैस्तु शक्तिमन्नं स्रुचं स्त्रुवं । तोमरं व्यंजनं वामैर्घृतपात्रं च धारयन् । मेषारूढो जटाबद्धो गौरवर्णो महौजसः ।

धूम्रध्वजो लोहिताक्षः सप्तार्चिः सर्वकामदः । आत्माभिमुखमासीन एवं रूपो हुताशनः । अग्ने वैश्वानर । शांडिल्यगोत्र मेषध्वज प्राङ्‌मुखो देव मम संमुखो वरदो भव ।

यानंतर नवग्रह स्थापन करावेत.

अन्वाधान

अन्वाधान म्हणजे स्थापन केलेल्या देवतांना कोणकोणत्या हविर्द्रव्यांच्या किती आहुती द्यायच्या हे सांगणे. त्यासाठी उजव्या हातात उभ्या दोन समिधा धरून उजव्या मांडीवर डावा हात उफडा ठेवून त्यावर त्या समिधा धरून पुढील संकल्प म्हणावा.

समिव्दयं आदाय क्रियमाणे सनवग्रहमख वास्तुशांत्याख्यस्य कर्मणे देवत परिग्रहार्थं अन्वाधानं करिष्ये । उदक सोडावे.

अस्मिन् अन्वाहित अग्नौ जातवेद समग्निं इध्मेन प्रजापतिं प्रजापतिं च आघार देवते आज्येन अग्निषोमौ चक्षुषी आज्येन अत्र प्रधानं-गणपतिं वराहुतिं आज्येन ।

गणपतीस तुपाची आहुति

पुनरत्र प्रधानं- आदित्यादि नवग्रह देवताः एताः प्रधान देवताः प्रत्येकं प्रतिद्रव्यं अष्टाविशंति/अष्ट/ -अष्ट अन्यतर संख्याहुतिभिः यथालाभं अर्कादि समित्तंडुल आज्याहुतिभिः ।

सूर्यादि नवग्रहांसाठी समिधा, तांदूळ व तूप या द्रव्यांच्या २८-२८ किंवा ८-८ किंवा अन्य संख्येच्या आहुति

अधिदेवता प्रत्याधिदेवताश्च प्रत्येकं प्रतिद्रव्यं अष्टाष्ट (८-८) चतुश्चतुः (४-४) अन्यतर संखाहुतिभिः यथालाभं पूर्वोक्त द्रव्याहुतिभिः ।

अधिदेवता- प्रत्यधिदेवतांसाठी वरील द्रव्यांच्या ८-८ किंवा ४-४ किंवा अन्य संख्येच्या आहुति

विनायकादि क्रतु साद्रुण्यदेवताः इंद्रादि क्रतुसंरक्षक देवताश्च प्रत्येकं प्रतिद्रव्यं चतुश्चतुः (४-४) द्वाभ्यां द्वाभ्यां (२-२) अन्यतर संख्याहुतिभिः यथालाभं पूर्वोक्त द्रव्याहुतिभिः ।

गणपतिसह क्रतु सादगुन्यदेवता व इंद्रादि क्रतुसंरक्षक देवतांसाठी वरील द्रव्यांच्या ४-४ किंवा २-२ किंवा अन्य संख्येच्या आहुति

(सूर्यादि देवतांना २८ आहुति घेतल्या तर अधिदेवता-प्रत्यधिदेवतांसाठी ८-८, विनायकादि क्रतु साद्गुण्यदेवता, इंद्रादि क्रतुसंरक्षक देवतांसाठी ४-४ आहुतीचे प्रमाण असते व सूर्यादि देवताम्ना ८-८ आहुति घेतल्या तर अधिदेवता-प्रत्यधिदेवतांसाठी ४-४ विनायकादि क्रतु साद्गुण्यदेवता इंद्रादि क्रतुसंरक्शक देवतांसाठी २-२ आहुती द्याव्यात.)

पहिले प्रमाण १०८-२८-८/दुसरे एक प्रमाण २८-८-४/तिसरे प्रमाण ८-४-२/चौथे प्रमाण १०-१-१

(राहू व त्याची अधिदेवता-प्रत्यधिदेवता यांना समिधाऐवजी मुळासह दुर्वांची आहुति द्यावी. तसेच केतू व त्याची अधिदेवता-प्रत्यधिदेवता यांना समिधाऐवजी ३-३ दर्भांची आहुती द्यावी.)

पुनरत्र प्रधानं-शिख्यादि वास्तुपीठ देवताः एताः पंचचत्वारिंशत् देवताः प्रत्येकं प्रतिद्रव्यं समित्तिल क्षीराक्त तंडुल आज्याहुतिभिः अष्टाविंशति संख्याभिर्वा

(२८ किंवा अन्य कोणतीही संख्या )

अन्यतर संख्याहुतिभिः ।

शिख्यादि ४५ देवतांसाठी दूध घातलेले तांदूळ, समिधा, तीळ व तूप या द्रव्यांच्या २८-२८ आहुति किंवा ४-४ किंवा १-१ संख्येच्या आहुति

तथा वास्तोष्पतिं प्रतिद्रव्यं अष्टोत्तर शत (१०८) किंवा २८ आहुति तसेच बिल्व पत्राच्या किंवा बेलफळाच्या ५ आहुति

तथा चरक्यादि देवताः अष्टाष्ट (८-८) अन्यतर संखाहुतिभिः पूर्वोक्त द्रव्याहुतिभिः । इंद्रादि अष्ट लोकपालं प्रत्येकं प्रतिद्रव्यं चतुश्चतुः (४-४) अन्यतर संखाहुतिभिः पूर्वोक्त द्रव्याहुतिभि । इंद्रादि अष्ट लोकपालं प्रत्येकं प्रतिद्रव्यं चतुश्चतुः (४-४) अन्यतर संखाहुतिभिः पूर्वोक्त द्रव्याहुतिभिः यक्ष्ये ।

शिख्यादि देवतांसाठी २८-२८ तर चरक्यादि देवतांसाठी ८-८ अष्ट लोकपाल देवतांसाठी ४-४ किंवा शिख्यादि देवतांसाठी ८-८ तर चरक्यादि देवतांसाठी ४-४ अष्ट लोकपाल देवतांसाठी २-२

प्रमाण २८-८/४ ४-२-१ किंवा १-१-१

शेषेण स्विष्टकृतं इध्मसन्नहनेन रुद्रं अयासं अग्निं देवान् विष्णुं अग्निं वायुं सूर्यं प्रजापतिं च एताः प्रायश्चित्त देवता आज्येन ज्ञाताज्ञात दोष निबर्हणार्थं त्रिवारमग्निं मरुतश्चाज्येन विश्वान् देवान् संस्त्रावेण अंगदेवताः प्रधानदेवताः सर्वाः सन्निहितः संतु संगोपांगेन कर्मणा सद्यो यक्षे । प्रजापतये नमो नमः । प्रजापतय इदं न मम ।

असे म्हणून त्या समिधा अग्निवर द्याव्यात.

इध्माबर्हिषोश्च सन्नहनं । स्थंडिलाच्या उत्तरेस ठेवलेल्या इध्मा व बर्हीस हात लावावा.

परिसमूहनम्

अग्नीच्या ईशान्य कोनातुन सुरू करून पूर्वेकडे ईशान्येपर्यंत गोलाकार स्थंडिलाच्या बाहेरून आठ अंगुळे अंतरावरून तीन वेळा पाणी सोडावे व म्हणावे

अग्निं परिसमूहनम् । अग्निं परिसमूहनम् । अग्निं परिसमूहनम् ।

परिस्तरणम् - स्थंडिलाच्या बाहेर १० अंगुले अंतरावर चारी बाजूस ४-४ दर्भ पसरावेत. उत्तरेकडील दर्भाच्या शेंड्यावर पूर्वेकडील दर्भाचे शेंडे, उत्तरेकडील दर्भाचे मुळांवर पश्चिमेकडील दर्भाचे शेंडे, पूर्वेकडील व पश्चिमेकडील दर्भाच्या मुळांवर दक्षिणेकडील दर्भ आकृतीत दाखविल्याप्रमाणे पसरावेत. यानंतर त्या परिस्तरणास हात लावून खालीलप्रमाणे म्हणावे.

पूर्व दिशा - पुरस्तात्

दक्षिण दिशा - दक्षिणतः ।

पश्चिम दिशा - पश्चात्तात् ।

उत्तर दिशा - उत्तरतः ।

पर्युक्षणम् -

अग्निच्या ईशान्य कोनातून सुरू करून पूर्वेकडून ईशान्येपर्यंत गोलाकार स्थंडिलाच्या बाहेरून तीन वेळा पाणी टाकावे. व म्हणावे

अग्निं पर्युक्षणम् ।

पात्रासाधनम्

स्थंडिलाच्या उत्तरेस परिस्तरणाच्या बाहेर काही दर्भ पूर्वेकडे अग्र करून पसरावेत. त्यावर पश्चिमेकडून पूर्वेकडे.

पहिली ओळ - तंडुल स्थाली, तिल स्थाली, क्षीराक्त तंडुल स्थाली व प्रोक्षणी

दुसरी ओळ - दर्वि, स्त्रुवा.

तिसरी ओळ - प्रणिता, आज्यपात्र.

चौथी ओळ - इध्मा, बर्हि असे ठेवावे. सर्व पात्रे पालथी ठेवावीत. दोन्ही हातात दोन दर्भ सुटे सुटे घेऊन खालीलप्रमाणे पहिल्या ओळीपासून सुरू करून सर्वांना दर्भाचा स्पर्श करावा.

(इध्मा म्हणजे दर्भाच्या दोरीने बांधलेल्या १५ समिधा व बर्ही म्हणजे दर्भाच्या दोरीने बांधलेले एक वीत लांबीचे दर्भांचे तुकडे-मुष्ठी ३ दर्भांचा १ पेड असे ३ पेड घेऊन दोरी वळावी. या तिपदरी दोरीस पुढे ३ ठिकाणी जोड द्यावेत. त्यासाठी एकूण ३६ दर्भ लागतात. अशा ३ जोड असलेल्या दोरीस त्रिसंधानरुद्र म्हणतात. या दोरीने १५ समीधा बांधाव्यात त्याला इध्मा म्हणतात. दर्भाच्या साध्या दोरीला रज्जू म्हणतात. त्याने दर्भ बांधावेत त्याला बर्ही म्हणतात.)

उत्तरास्तीर्णेषु दर्भेषु दक्षिणसव्य पाणिभ्यां क्रमेण तंडुल स्थाली, तिल स्थाली, क्षीराक्त तंडुल स्थाली, प्रोक्षणी, स्रुवा, दर्वी, प्रणिता, आज्यपात्र, इध्मा, बर्हि इति व्दे व्दे उदगपवर्गं प्राक्संस्थं न्युब्जान्या सादयेत् ।

ततः प्रोक्षणी पात्रं उत्तानं कृत्वा तत्रानंतर्गत साग्रसम स्थूल प्रादेशमात्रे कुशव्दयरूपे पवित्रे निधाय ।

शुद्धाभिरद्भिस्तत्पात्रं पूरयित्वा गंधाक्षतान् क्षिप्त्वा हस्तयोरंगुष्टोप कनिष्टिकाभ्यां उत्तानाभ्यां उदगग्रे पृथक् पवित्रे धृत्वा अपस्त्रिकरुत्पूय सर्वाणि पात्राणि उत्तानानि कृत्वा इध्मंच विस्रस्य सर्वाणि पात्राणि त्रिः प्रोक्षेत् ।

ता आपः किंचित् कमंडलौ क्षिपेत् इति इत्येके ।

वरीलप्रमाणे नावे घेऊन दर्भाचा स्पर्श करावा. प्रोक्शणीपात्रावर टीचभर लांबीचे पूर्वेकडे अग्र केलेले दोन दर्भ ठेवावेत. प्रोक्षणी पात्रात शुद्ध जल घालावे. त्यात गंध, अक्षता व फूल घालावे. दोन्ही हातांचे अंगठे व करंगळी यांनी उताण्या हातांनी प्रोक्षणीवरील दर्भ उत्तरेकडे अग्र करून सुटे सुटे धरून त्या दर्भाने प्रोक्षणीतील पाणी तीन वेळ वर हलवावे. सर्व पात्रे उताणी करावी. इध्म्याच्या दोरीची गाठ सोडावी. त्या सर्वांवर प्रोक्षणीतील पाणी दर्भाने तीन वेळा शिंपडावे. थोडे पाणी तांब्यात घालावे असे काहींचे मत आहे.

प्रणीता पात्रं अग्नीं प्रत्यङ्‌निधाय । तत्र प्रागग्रे पवित्रे निधाय । उत्पूताभिरद्भिस्तत्पात्रं पूरयित्वा गंधाक्षतान् निक्षिप्य ।

मुखसनं उद्धत्य । ॐ प्रणय । अग्नेः उत्तरतो दर्भेषु निधाय ।

प्रणीता पात्र अग्नीच्या पश्चिमेस ठेवावे. त्यात प्रोक्षणीवरील दर्भ पूर्वेकडे अग्र करून ठेवावेत. त्यात शुद्ध जल घालावे. त्यात गंध-अक्षता, फूल घालावे. डाव्या हाताने पात्र उचलून धरावे व त्यावर उजवा हात पालथा धरून आपल्या मुखापर्यंत उचलून असे म्हणावे. त्यानंतर ते पात्र अग्नीच्या उत्तरेस दर्भावर ठेवावे.

ते पवित्रे गृहित्वा अन्यैः दर्भैः आच्छादयेत् । ते पवित्रे आज्यपात्रे निधाय । तस्मिन् आज्यपात्रं पुरतः संस्थाप्य तस्मिन् आज्यं आसिच्य ।

अग्नेः उत्तरतः स्थित अंगारान् भस्मानासह अग्नेः उदग् परिस्तरणात् बहिर्निरुह्य । तेष्व आज्यपात्रं अधिश्रित्य ।

प्रणीतेतील दर्भ हातात घेऊन प्रणीतेवर दुसरे चार दर्भ ठेवावेत. प्रोक्षणीवरसुद्धा दुसरे ३ दर्भ ठेवावेत. हातातील दर्भ तुपाच्या पात्रावर ठेवावेत. तुपाचे पात्र आपल्यापुढे ठेवून त्यात तूप घालावे. त्यानंतर अग्नीच्या उत्तरेस परिस्तरणाच्या बाहेर अग्नीतील राखविरहित अंगार घ्यावा. त्यावर हे तुपाचे पात्र ठेवावे.

ज्वलता दर्भोल्मुकेन आवज्वल्य । अंगुष्टपर्व मात्रं प्रक्षालित दर्भाग्र व्दयं आज्ये प्रक्षिप्य ।

अग्नेः उदग् आस्तिर्णेषु दर्भेषु पात्रे तंडुल तिलैः क्षीराक्त तंडुल पृथक् पूरयित्वा ।

पुनर्ज्वलता तेनैव दर्भोल्मुकेन त्रिः पर्याग्निं कृत्वा उल्मुकं निरस्य अपः स्पृष्ट्‌वा आज्यपात्रं भुविकषन् निवोद्‌गुद्वास्य । अग्नौ प्रास्य तत्रस्थमेव आज्यं पवित्राभ्यां

हातामध्ये दोन तीन दर्भ घेऊन त्याचे शेंडे अग्नीवर धरून पेटवावेत. याला उल्मुक म्हणतात. हे दर्भोल्मुक तुपाच्या पात्रावर तीन वेळा फिरवावे. ते उल्मुक खाली ठेवावे. दुसर्‍या दोन दर्भाच्या शेंड्यांचे आंगठ्यांच्या पेराएवढे दोन तुकडे तोडून प्रणीतेतील पाण्यात भिजवून तुपाच्या पात्रात घालावेत. अग्नीच्या उत्तरेस मांडलेल्या पहिल्या ओळीतील पात्रांमध्ये क्रमाने तांदूळ, तीळ व तांदळात थोडे दूध घालून बनविलेले क्षीराक्त तंडुल घालावेत. पुन्हा ते उल्म्क तुपाच्या पात्रासह सर्व पात्रांवर तीन वेळा गोलाकार फिरवावे. ते उल्मुक विझवावेत. हात धुवून टाकावेत. निखार्‍यावरून तुपाचेपात्र उचलून उत्तरेकडील दर्भावर पूर्वीच्या जागेवर ठेवावे. निखारे स्थंडिलात ठेवावेत. तुपाच्या पात्रातील दर्भ घेऊन पूर्वीप्रमाणे अंगठा व करंगळीत सुटे सुटे धरून खालील मंत्र म्हणत एकदा व न म्हणता दोन वेळा असे एकंदर तीन वेळा तूप हलवावे. त्यानंतर ते दर्भ प्रणितेतील पाण्यात भिजवून अग्निवर द्यावेत व

स्कंदाय नमः । स्कंदाय इदं न ममं असे म्हणावे.

सर्पिरेतस्त्पवित्राभ्यां यज्ञार्ह मनवस्करम् । करोम्युत्पूयकिरणैः सूर्यस्य सवितुर्वसोः ।

इति प्रागुत्पुनाति सन्मंत्रेन द्विस्तूष्णीम् पवित्रे अद्भिः प्रोक्ष्य अग्न्यावनुहरेत्तूष्णीं । स्कंदाय नमः । स्कंदाय इदं न मम् ।

तत आत्मनः अग्रतो भूमिं प्रोक्ष्य तत्र बर्हिः सन्नहनीं रज्जुं उदगग्रां प्रसार्य तस्यां बर्हिः प्रागग्रं उदगपवर्ग

अविरलं आस्तीर्य तस्मिन् आज्यपात्रं निधाय स्रुवाद संमार्जयेत् । दक्षिण हस्ते स्रुवं दर्वी गृहीत्वा सव्येन

कांश्चिद्दर्भानादाय सहैवाग्नौ प्रताप्य दर्वी आज्यपात्रस्य उत्तरतो निधाय स्रुवं वाम हस्ते गृहीत्वा दक्षिण हस्तेन

स्रुवस्य बिलं दर्भाग्रेः प्रागादि प्रागवर्गं त्रिः संमृज्य । ततो दर्भाणां मूलैर्दंडस्य अधस्ताद् बिल पृष्ठात् आरभ्य यावत्

उपरिष्टाद् बिल तावत् त्रिः संमृज्य प्रोक्ष्य प्रताप्य स्रुवां आज्यस्थाल्यां उत्तरतो निधाय । दर्वी वामहस्ते गृहीत्वा संमाजयेत् । दर्भान् अद्भिः क्षालयित्वा अग्नावनुप्रहरेत् ।

आपल्या समोरील भूमीवर प्रणितेतील पाणी शिंपडावे. उत्तरेकडे ठेवलेल्या बर्हिच्या दोरीची गाठ सोडून ती दोरी प्रोक्षण केलेल्या जागेवर उत्तरेकडे दर्भाचे अग्र करून पसरावी. त्यावर बर्हिचे दर्भ दाट पसरावेत. त्यावर तुपाचे पात्र ठेवावे. स्रुवा दर्वी उजव्या हातात व काही दर्भ डाव्या हातात धरून दोन्ही अग्निवर थोडे तापवावे. दर्वी आज्यपात्राच्या उत्तरेस ठेवून स्रुवा फक्त डाव्या हातात व दर्भ उजव्या हातात धरावे. दर्भाचे अग्र स्रुवेच्या बिळात पूर्वेकडून पूर्वेकडे गोलाकार तीन वेळा फिरवावे. स्रुवेच्या पाठीमागील भागापासून सुरू करून स्रुवेच्या तोंडापर्यंत दर्भाच्या मुळांचा स्पर्श करावा. स्रुवेस प्रणीतेतील जलाने प्रोक्षण करावे. स्रुवा व दर्भ पुन्हा अग्निवर तापवावेत. स्रुवा आज्यपात्राच्या उत्तरेस ठेवावी व दर्वीचे असेच संमार्जन करावे व स्रुवेच्या उत्तरेस ठेवावी. त्यानंतर हातातील दर्भ प्रणीतेत बुडवून अग्नीवर द्यावेत.

ततो हविर्द्रव्यं अभिघार्य तत् पात्राणि आज्यस्थाली अग्निर्मध्यतो निधाय आज्याद्दक्षिणतो बर्हिष्यासाद्य अभिघार्य नवाभिघार्य

हविर्द्रव्यांच्या पात्रातील हविर्द्रव्यांवर आज्य पात्रातील तूप घालावे. यालाच अभिघार करणे असे म्हणतात. त्यानंतर ती पात्रे आज्यपात्र व अग्नी यांच्यामधून नेऊन आज्यपात्रांच्या दक्षिणेस त्याच क्रमाने ठेवावीत. त्यावर पुन्हा तुपाचा अभिघार करावा किंवा करू नये.

इथपर्यंतच्या कृतीस (कारिका) पात्रासाधन करणे असे म्हणतात.

 

अग्निची पूजा

एकादशांगुल परिमिते देशे गंधाक्षत पुष्पैः प्रागादि प्रागः अग्निं अर्चयेत्‌ । अग्नये जातवेदसे नमः । अग्नये सप्तजिव्हाय नमः ।

अग्नये हव्यवाहनाय नमः । अग्नयेऽश्वोदराय नमः । अग्नये वैश्वानराय नमः । अग्नये कौमारतेजसे नमः ।

अग्नये विश्वतो मुखाय नमः । अग्नये देव मुखाय नमः । यस्मै कृशानो कृतिने सुलोकं करोषि यष्ट्रे सुखकारकं त्वं ।

बव्हश्वगोवीरधनैरुपेतं धनं समाप्नोत्यविनश्वरं सः । इति उपस्थाय इध्म आत्मानं च अलंकृत्य हस्तं प्रक्षाल्य ।

इध्म रज्युं इध्मस्थाने निधाय पाणिन्‌ इध्मं आदाय मूल मध्य अग्रेषु स्रुवेण त्रिः अभिघार्य । मूलमध्ययोर्मध्यभागे गृहीत्वा ।

स्थंडिलाच्या ११ बोटांच्या परिमितीत पूर्वेपासून आठ दिशांना गंध, अक्षता, फुले यांनी अग्निची पूजा करावी. त्यावेळी वरील नावे घ्यावीत. उदा. पूर्वेसाठी अग्नये जातवेदसे नमः । म्हणावे. अग्निला सफेद फुले वहावीत.

त्यानंतर आपल्या कपाळास थोड्या अक्षता लावून घ्याव्यात. हात धुवावेत. इध्म्याच्या समिधांना बांधलेली दोरी सोडून ती त्याच जागी ठेवावी व इध्म्याच्या समिधा हातात घ्याव्यात. त्यांच्या मूल मध्य व अग्र या ठिकाणी तुपाचा अभिघार करावा. त्यानंतर मूल व मध्य यांच्या मध्यभागी समिधा धरून खालील मंत्र म्हणून अग्निवर द्याव्यात.

भो जातवेदस्तव चेदमिध्म आत्मा प्रदीप्तो भव वर्धमानः ।

अस्मान् प्रजाभिः पशुभिः समृद्धान् कुरु त्वमग्ने धनधान्ययुक्तान् । जातवेदसे अग्नये नमो नमः । जातवेदसे अग्नय इदं न मम ।

आघार होम

अग्नीच्या वायव्य कोनापासून आग्नेय कोनापर्यंत तुपाची धार सोडताना मनातल्या मनात प्रजापतये म्हणावे व मोठ्याने फक्त नमः म्हणावे. असेच नैऋत्येपासून ईशान्येपर्यंत धार सोडताना करावे. अग्नीच्या उत्तरेस तुपाची एक आहुति - अग्नये नमः । अग्नय इदं न मम ।

अग्नीच्या दक्षिणेस तुपाची एक आहुति - सोमाय नमः । सोमाय इदं न मम ।

वराहुति

दर्वीत ४ पळ्या तूप काढून घ्यावे व खालील मंत्र म्हणून आहुति द्यावी.

अभीप्सितार्थ सिध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः । सर्व विघ्न हरस्तस्मै गणाधिपतये नमः । गणपतये नमः । गणपतय इदं न मम ।

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP