अध्याय - ११

श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेले स्वामी महाराजांना भगवान दत्तात्रयांनी दर्शन देऊन प्रासादिक पादुका व छडी दिलेली आहे.


विविध संतांची जयंती पुण्यतिथी । विविध उत्सव साजरे होती ।
रावेरी दत्तमंदिरी येती । भक्तजन उत्सवासाठी ॥
साजरे होती तिथीवार । तसैचि पवित्र सणवार ।
आनंद होतसे अपार । रावेरकर भक्तांसी ॥
भाद्रपदात मोठे उत्सव । भाद्रपद पौर्णिमा अन् वद्य नवमी उत्सव ।
हेचि श्रीसच्चिदानंद स्वामींचे उत्सव । साजरे होती उत्साहात ॥
दत्तजयंती सोहळ्याचे । त्यातील विविध पर्वणींचे ।
प्रसिद्ध रथोत्सवाचे । आकर्षण असे भक्तांना ॥
संपूर्ण भारतवर्षांत । एकमेव रथोत्सव असत ।
दत्तपादुका रथांत । ठेवोनी परिक्रमा करिती ॥
नागदिवाळी तिथीस । श्रीसच्चिदानंद स्वामींस ।
प्रथम देऊनी निमंत्रणास । इतरांस निमंत्रण उत्सवाचे ॥
मस्तनशहावली कुंवरस्वामी । अन्य संत रामबाई स्वामी ।
जे जे रंगले दतातनामी । तयांसी निमंत्रण जाते ॥
निमंत्रण दिंडी सोहळा असे । सर्वधर्मीय जनांचा सहभाग असे ।
सर्व जातींचाही वाटा असे । एकोपा सर्वधर्मसमभावाचा ॥
मोक्षदा एकादशी पासून । दत्तजन्मोत्सव सुरू होऊन ।
पंचमीसी प्रक्षाळपूजन । सात दिवस कीर्तन असे ॥
श्रीसच्चिदानंद स्वामींच्या ध्वजाचे । श्रीसद्गुरूंच्या पोथीचे ।
श्रीगुरुचरित्र ग्रंथाचे । पूजन होतसे उत्सवात ॥
मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेसी । भक्त जमती रथोत्सवासी ।
लाकडाच्या ह्या रथासी । ओढती श्रद्धेने भक्त ॥
काष्ठाचे अश्व सुंदर । रथासी छान कलाकुसर ।
रथात बैसे योगेश्वर । सारथ्य करी अर्जुन ॥
असे चित्र कल्पून । रथ दिला भेट म्हणून ।
उत्तमप्रकारे सजवून । बेटावदच्या रतनबाईंनी ॥
श्रीसच्चिदानंद स्वामींसी । अग्रवालशेट देती रथासी ।
रतनबाई देती नवीन रथासी । तोच आता उपयोगी ॥
जेव्हा दत्तात्रेयांची इच्छा होय । तेव्हा रथ ओढला जाय ।
थकती सर्व उपाय । जर नसे देवाची इच्छा ॥
ह्या घटनेची प्रचिती । आजही अनेक भक्त घेती ।
रथ हाताने ओढती । रथ मार्ग आठवडीबाजारातून ॥
प्रचंड मोठा रथ चालत । छोट्या मार्गातून जात ।
भक्त होती अचंबित । पाहून हा चमत्कार ॥
भक्तजन हंडी फोडती । विविधरंगी फटाके फोडती ।
आतषबाजी त्यास म्हणती । भक्त तालावरी नाचती ॥
दत्तपादुका प्रासादिक । तयांचे होतसे कौतुक ।
दत्तपादुकांचे अर्चक । करिती प्रक्षाळपूजा ॥
दत्त गुरू पालखीत बैसती । नगरपरिक्रमा करिती ।
मंदिरी पुन्हा येती । पाऊलांच्या ठश्यांची प्रक्षाळपूजा ॥
तीळगूळ मिश्रित । रेवडीचा प्रसाद असत ।
सेवन करूनी तृप्त होत । भक्तजन रथोत्सवात ॥
मार्गशीर्ष वद्य द्वितीया । पालखीत बैसे विठुराया ।
पालखीचे भोई व्हाया । आवडे बहुत भक्तांना ॥
सजवलेल्या पालखीत । दत्तपादुका असत ।
विठ्ठलमूर्ती समवेत । गोपालजी असती तेथे ॥
नगरपरिक्रमा करून । दत्तमंदिरासी प्रदक्षिणा घालून ।
पालखी येई मंदिरी परतून । अतिरम्य तो सोहळा ॥
पंचमी तिथीसी अन्नदान । होतसे सहस्रभोजन ।
भक्तांसी वाटे समाधान । होय उत्सवाची सांगता ॥
असाच उत्सव खांडव्याला । श्रीसच्चिदानंद स्वामींनी सुरू केला ।
गुरूपौर्णिमा उत्सवाला । तेथे असती गादीपुरूष ॥
रावेरच्या भक्तांचा । उत्सव गुरूपौर्णिमेचा ।
उत्सव दत्तजयंतीचा । हाचि असे एकमेव ॥
नमूनिया दत्तपादुका । उत्सव करिती निका ।
आता येथे अवतरणिका । लिहविली मजकडूनी ॥
पहिल्या अध्यायात । श्रीसच्चिदानंदस्वामी जन्मकथा असत ।
स्वामींपित्यासी दत्तदर्शन होत । ते सविस्तर वर्णिले ॥
श्रीसद्गुरूंची होई प्राप्ती । श्रीदत्तगुरू दर्शन देती ।
छडी प्रसादपादुका मिळती । कथिले दुसरे अध्यायी ॥
स्वामींची नर्मदापरिक्रमा । ज्ञानपटाचा महिमा ।
स्वामी घेती दत्तनामा । वर्णिले तिसरे अध्यायी ॥
पुढील चौथ्या अध्यायात । रावेरी आगमन होत ।
स्वामी दत्तपीठ स्थापित । वाचावी ही कथा ॥
पाचवे अध्यायी वर्णिले । कैसे गोपालजी अवतरले ।
मूर्तीरूपी प्रगटले । दत्त विठ्ठल आणि देवी ॥
संत असती समकालीन । कैसे ते स्वामींचरणी लीन ।
सहावे अध्यायी केले कथन । वाचावे भक्तहो ॥
असे अध्याय सातवा । वर्णिले स्वामींच्या अनुभवा ।
अवतार दत्ताचा जाणावा । श्रीसच्चिदानंद स्वामी ॥
कथा दत्त दर्शनाची । कथा पांढऱ्या निशाणाची ।
स्वामींच्या चतुर्थाश्रमाची । कथा असे आठवे अध्यायी ॥
कथा नवव्या अध्यायात । समाधी योगाची असत ।
संजीवन समाधी घेत । वाचावे लक्षपूर्वक ॥
श्रीसच्चिदानंद स्वामींचे उत्तराधिकारी ।
परंपरा तयांची सारी ।
स्वामींची कृपा वंशजांवरी । वर्णिली दहावे अध्यायी ।
दत्तमंदिर रावेर । साजरे होती सणवार ।
उत्सवास भक्त थोर । कथिले अकरावे अध्यायी ॥
ऐसे वर्णिले चरित्राला । भाद्रपद वद्य नवमीला ।
एकोणिसशे पंचेचाळीस शकाला । ग्रंथराज पूर्ण जाहला ॥
ह्या ग्रंथाची होतसे पूर्ती । दिगंती जाईल ग्रंथकीर्ती ।
मज होय काव्यस्फूर्ती । नयनी अश्रू दाटले ॥

॥ काव्य ॥

श्रीसच्चिदानंद स्वामींनी आजि कृपा केली
स्वामीस्तुती लिहिण्याची सेवा मज दिधली ॥ धृ ॥
श्रीसच्चिदानंद नाम राहे शब्दे भरोनिया
अक्षररूपे स्वामीमूर्ती साकार झालीया
स्वामीगुणगान मी आवडीने गातो
चराचरी सर्व जगती स्वामींना मी पाहतो
सप्तसागराची शाई असे कागद धरणी
स्वामीस्तुती लिहावयाला न पुरे लेखणी
मज पामराकडूनी घडली स्वामीचरित्र सेवा
वैभवासी ठाव द्यावा हीच इच्छा देवा ॥
श्रीदासगणू विरचित । श्रीसच्चिदानंदलीलामृत ।
हाचि पाया ग्रंथाचा असत । त्यावरी चरितामृत कळस ॥
श्रीआनंदानंदस्वामी म्हणजेच नाना । करिती अष्टकांच्या रचना ।
उपयोग त्याचा चरित्रलेखना । बहुत झाला उत्तम ॥
श्रीसच्चिदानंदस्वामींचे हस्ताक्षर । ज्ञानपट जो रचिती ज्ञानेश्वर ।
गुरूपरंपरेचे सार । उपलब्ध आहे रावेरी ॥
इंग्रज सरकारने काढला । नंतर केशवदासांनीसुद्धा काढला ।
अतिशय जपोनी ठेविला । श्रीसच्चिदानंदस्वामींचा फोटो ॥
श्रीसच्चिदानंद चरितामृताचा । विधी ऐका पारायणाचा ।
एक दिन अथवा तीन दिन वाचा । पुण्यप्रद हा ग्रंथराज ॥
घेऊनी गहू मूठभरी । पसरून ते चौरंगावरी ।
कलश ठेऊनी त्यावरी । कलशांत पाणी ठेवावे ॥
शेजारी कलशाच्या । फोटो सच्चिदानंद स्वामींचा ।
नसल्यास श्रीदत्ताचा । ठेवावा बहुत आदराने ॥
कलश आणि फोटो पुजून । चमेलीची फुले वाहून ।
नसल्यास उपलब्ध फुले अर्पून । करावे ग्रंथाचे पूजन ॥
शुद्ध तुपाचा दिवा लावणे । धूतवस्त्र धारण करणे ।
स्वच्छ आसनावरी बसणे । पवित्र असावे मन ।
पहिले दिनी चार अध्याय । दुसरे दिनी चार अध्याय ।
तिसरे दिनी तीन अध्याय । वाचोनी आरती करावी ॥
देवासी नैवेद्य अर्पून । विप्रासी दक्षिणा देऊन ।
ब्राह्मणभोजन घालून । करावी पारायण समाप्ती ॥
ऐसे करिता पारायण । प्रसन्न होईल अत्रिनंदन ।
सुखसमृद्धीने भरेल जीवन । श्रीसच्चिदानंद स्वामींच्या कृपेने ॥
देवाहून श्रेष्ठ श्रीसद्गुरू । ठेविला त्यांनी कृपाकरू ।
बुद्धिवैभवाचा दातारु । एकमेव श्रीसद्गुरूराव ॥
श्रीसद्गुरूंनी जे लिहवीले । ते येथे प्रगट जाहले ।
माझे काही न उरले । ग्रंथ अर्पण करितो आता ॥
श्रीसद्गुरू आनंदकंद । स्वामी श्रीसच्चिदानंद ।
दासवैभव पदारविंद । शत शत नमन करितो ॥


इति श्रीदासवैभवविरचिते श्रीसद्गुरू सच्चिदानंदचरितामृते एकादशोध्यायः

N/A

References : N/A
Last Updated : August 24, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP