अध्याय – १०

श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेले स्वामी महाराजांना भगवान दत्तात्रयांनी दर्शन देऊन प्रासादिक पादुका व छडी दिलेली आहे.


श्रीसच्चिदानंद स्वामींची । कथा समाधी योगाची ।
वर्णिली बहुत साची । मागील अध्यायी ॥
स्वामींच्या समाधीनंतर । माधवदासांनी निरंतर ।
न पडू दिले कधी अंतर । भजनपूजनी दत्ताच्या ॥
गोपाळमूर्तीसी पूजिती । विठ्ठलमूर्तीसी भजती ।
मुखाने संवाद साधती । कोणीच नसे तयांजवळी ॥
आजूबाजूला कोणी नसे । स्वामीवियोगाने लागले का पिसे ।
माधवदास का बोलती ऐसे । प्रश्न पडे भक्तांना ॥
माधवदास तयांसी वदती । श्रोतेहो ऐका सावचित्ती ।
श्रीसच्चिदानंद स्वामी साधती । संवाद समाधीतूनी ॥
वार्तालाप चाले सतत । माधवदास स्वामींसह बोलत ।
विविध चर्चा करीत । श्रीसच्चिदानंद स्वामींच्या समाधीपुढे ॥
स्वामींची समाधी पाहून । माधवदासांसी वैराग्य येऊन ।
गेले माहूरास निघून । रावेराहून माधवदास ॥
माहूरगडावर संत असती । परंपरा असे भारती ।
माधवदासांसी ते वदती । येथे कासया आलात ॥
साक्षात दत्त आहे रावेरी । न यावे आपण गडावरी ।
परतून जावे माघारी । दत्तगादी सांभाळावी ॥
ऐसे संतांनी समजावले । माधवदास पुनश्च आले ।
रावेरी सेवा करु लागले । स्वामींच्या समाधीची ॥
यावल तालुक्यात । त्यातील अंजाळे ग्रामात ।
लक्ष्मीनारायण मूर्ती स्थापित । माधवदास त्यास्थानी ॥
श्रीसच्चिदानंद स्वामी पुण्यतिथी अन् मत्स्य जयंती । दोन उत्सव सुरू करिती ।
स्वामीपादुका स्थापन करिती । माधवदास त्या मंदिरात ॥
अंजाळे गावातील गावकरी । रावेर परंपरेचे पालन करी ।
तेथील मंदिरांचे अधिकारी । येती रावेरी मंदिरात ॥
ग्रामस्थ अंजाळे गावाचे । शिष्य ते रावेर परंपरेचे ।
कीर्तन करिती काल्याचे । दत्तमंदिरी रावेरी ॥
दूरदुरनी भक्त येती । स्वामींच्या समाधीचे दर्शन घेती ।
दत्तावतारी टेंब्ये स्वामी येती । रावेरी समाधी दर्शनासाठी ॥
जैसा वृक्षावरी फलभार होय । तैसा वृक्ष झुकूनी जाय ।
जैसे संत भगवंतमय । तैसी नम्रता तयांची वाढतसे ॥
संत घेती संतांचे दर्शन । बंधुत्वाचे असे तयांचे वर्तन ।
भगवन्नामाचे आवर्तन । होतसे संतांमध्ये सदा ॥
संत दर्शने लाभ जाहला । हृदयामाजीं मोद दाटला ।
देव सदेह अवतरला । असे ही संतांची किमया ॥
प्रवासाची साधने नसती । तरीही संतभेटी होती ।
पायी प्रवास करिती । संत एकमेकांना भेटावया ॥
असे भारतवर्षातची रीती । जी मूर्ती संत स्थापिती ।
धार्मिक क्षेत्र संतांची निर्मिती । महिमा तयाचा विशेष ॥
अनेक संतमहंत । समाधीचे दर्शन घेत ।
श्रीसांईबाबा शिर्डीतून येत । समाधीच्या दर्शनासाठी ॥
मागील आठव्या अध्यायात । नानांचा उल्लेख असत ।
माधवदासांचे ते अनुज होत । खांडवाचे मंदिर सांभाळिती ॥
भगवद्भक्त असती नाना । करिती अनेक रचना ।
अष्टक स्तोत्र प्रार्थना । रचिती श्रीसच्चिदानंद स्वामींवरी ॥
गृहस्थाश्रमाची कर्तव्ये करिती । चतुर्थाश्रम स्वीकारिती ।
नाना नाव धारण करिती । आनंदानंद स्वामी महाराज ॥
ज्ञानेश्वरांचे सहोदर निवृत्तीनाथ । ते असती श्रीसद्गुरूनाथ ।
कृपा करोनी करिती सनाथ । नानांचे सद्गुरू माधवदास ॥
ह्या बंधू – सद्गुरूंवरती । नाना अनेक रचना करिती ।
प्रासादिक अष्टक रचिती । भक्तांनी अवश्य वाचावे ॥

॥ अष्टक ॥

गुरुभक्त तुम्हा असा कोणी नाही
म्हणोनी तुम्हा वर्णिती भक्त तेही
गुरूच्या अनुज्ञेकरी उत्सवाला
नमस्कारितो श्रीगुरू माधवदाजीला
संसार साधोनि विरक्ती मोठी
अभिमान तोही असे नाचि पोटी
सदा शांतवृत्ती असे हो मनाला
नमस्कारितो श्रीगुरू माधवदाजीला
सदा सर्वदा नाम वाचेसी घेई
सदा लक्ष्य ठेवी गुरुचेचि पायी
सदा सद्गुरू नाम घेऊनी ध्याला
नमस्कारितो श्रीगुरू माधवदाजीला
सदा शिष्यवर्गावरी प्रीतीपाही
उणे ते कुणाचे पहाणेचि नाही*
*सद्गुरूकृपेची आस नित्य सेवकाला
नमस्कारितो श्रीगुरू माधवदाजीला
एक नाम जो सर्व जनांसि सांगे
गुरुदेव संतांसि सेवी निजांगे
श्रीगुरुदेव दत्त ऐसा निजबोध केला
नमस्कारितो श्रीगुरू माधवदाजीला
मजवरी पूर्ण कृपा असू दे
कुर्वडुनी टाकू तनू सिवाटे
गुरुकृपेने परिपूर्ण झाला
नमस्कारितो श्रीगुरू माधवदाजीला
मना तूंचि रे श्रीगुरुसीच भावे
तया चिंतुनी नाम त्याचेचि घ्यावे*
अशा अल्पमतीने करी मी स्तुतीला
नमस्कारितो श्रीगुरू माधवदाजीला
जया पाहता शंकर मूर्ती भासे
कुबुद्धी दर्शनेहोताचीच नासे
करी नाना ह्या अष्टकाला
नमस्कारितो श्रीगुरू माधवदाजीला

॥ ओवी ॥

श्रीसच्चिदानंद स्वामी वृंदावनात । एकदा होते निवास करित ।
तेथे हस्तलिखित मिळत । भक्तमाल ग्रंथाचे ॥
ग्रंथमहिमा असे बहुत । श्रीसच्चिदानंद स्वामी जवळी ठेवत ।
असे ग्रंथ नित्य उपासनेत । श्रीसच्चिदानंद स्वामींच्या ॥
भक्तमाल ग्रंथाचे नित्यपठण । खांडवा मंदिरी करिती भक्तजन ।
करावे नित्य अध्ययन । प्रथा सुरू करिती नाना महाराज ॥
भगवद्दर्शनाचि दाखवी वाट । कठीण असो कर्माचा घाट ।
संतचरित्र करिते सपाट । संतचरित्राने देव भेटतो ॥
ऐसा नानांचा दृढ विश्वास । भक्तमाल ग्रंथ आवडतो देवास ।
लावावा तो मस्तकास । समाधीचे वेळी ॥
नाना महाराज ऐसे सांगती । माधवदास उपस्थित असती ।
केशवदासही सवे येती । नानांच्या समाधीयोगावेळी ॥
माधवदासांच्या आधी । नाना घेती समाधी ।
भक्तमाल ग्रंथ डोईवरी आधी । ठेवा म्हणती नाना ॥
श्रीसच्चिदानंद स्वामींचे नाव घेतले । शरीर भूवरी ठेविले ।
नाना समाधिस्थ झाले । अक्षय्य तृतिया सन एकोणीसशे सहा ॥
वैशाख तृतीया जी अक्षय्य । नानांची भक्तीसुद्धा अक्षय्य ।
हीच पुण्यतिथी होय । नाना महाराजांची ॥
नानांच्या समाधीनंतर । खांडवा दत्त मंदिर ।
माधवदास पाहती व्यवहार । कुशलतेने मंदिराचा ॥
ह्या संपूर्ण चरित्रात । माधवदासांचा उल्लेख असत ।
भक्त तयांना भाऊ संबोधत । शिष्यपरिवार मोठा असे ॥
गुरुमंत्र देण्याचा अधिकार । परंपरेचे सर्वाधिकार ।
खांडवा रावेर मंदिर । दिले होते श्रीसच्चिदानंद स्वामींनी ॥
चतुर्थाश्रम स्वीकारला । आचरिले संन्यास धर्माला ।
नृसिंहसरस्वती स्वामी नावाला । धारण केले तयांनी ॥
अंतकाळ समीप आला । चैत्र वद्य नवमीला
सन एकोणीसशे तेराला । समाधी घेती माधवदास ॥
समाधी बांधावी दूर । नको स्वामींच्या समाधीसमोर ।
माधवदास असती थोर । दुर्मिळ ऐसे शिष्य ॥
रावेर बऱ्हाणपूर मार्गात । माधवदासांची समाधी असत ।
खांडवा भक्तमंडळी बांधत । सुंदर समाधी तयांची ॥
माधवदासांनंतर । दत्तपीठ रावेर ।
तयाचा पूर्ण अधिकार । प्राप्त होई केशवदासांना ॥
सुरू करिती नमसप्ताहास । बांधिती विठुमंदिराच्या मंडपास ।
केशवदास पाहती व्यवस्थेस । रावेर खांडवा दत्तमंदिर ॥
स्वामींचा वरदहस्त । केशवदासांवरी असत ।
विविध सुधारणा करित । केशवदास दत्तमंदिरात ॥
दत्तमंदिर फैजपुरात । केशवदास बांधत ।
नामसप्ताह सुरू करीत । श्रीगुरुदेव दत्त नाम ॥
केशवदास खांडव्यात । नानांची समाधी बांधत ।
एक यवन जागा देत । समाधी बांधायासी ॥
केशवदासांची माता । जानकीबाई पतिव्रता ।
अनंतकाळ समीप येता । चाहूल लागे जानकीबाईंना ॥
एक धाबळ अंथरती । जानकीबाई त्यावर निजती ।
मुखी दत्तनाम घेती । करिती चित्त शांत ॥
म्हणती त्या केशवदासांसी । मी चालले निजधामासी ।
घेते भगवन्नामासी । आता पुन्हा नको जन्म ॥
माझी इहलोकीयात्रा संपेल । त्यानंतर तुज पुत्र होईल ।
मंदिराचा महिमा वाढेल । जानकीबाईंचा आशीष केशवदासांसी ॥
दत्तभक्तीत झाले रममाण । दत्तावीण न काही आन ।
दत्तरथाच्यामागे धावून । केशवदास सेविती रथोत्सवात ॥
अनवाणी पायाने चालती । रथोत्सवात धांवती ।
दत्तात्रेयांस नवस करिती । तेणे होय पुत्रप्राप्ती ॥
नाव ठेविले पुत्राचे । असे नाथांच्या पणजोबांचे ।
भानुदास नाम बाळाचे । जन्म गोकुळाष्टमीस ॥
कथा तयांच्या जन्माची । असे विलक्षण अनुभूतीची ।
येथे वर्णिली साची । ऐकावे सावचित्त होऊनी ॥
चंद्रशेखरानंद सरस्वती । ओंकारेश्वरी राहती ।
आपुल्या शिष्यांसी पाठविती । खांडवा दत्तमंदिरात ॥
म्हणती ते धाडावा । सत्वर रावेरी सांगावा ।
जन्म जो पुत्र नवा । रावेरच्या दत्तपरंपरेत ॥
माझा आशीष त्या पुत्रासी । कळवावे रावेरी भक्तांसी ।
द्यावे ह्या निरोपासी । वदले चंद्रशेखरानंद सरस्वती ॥
रावेरकर जन अचंबित । पुत्रजन्मवार्ता कैसी पोहोचत ।
चंद्रशेखरानंदसरस्वती कैसे जाणत । ओंकारेश्वरी राहूनी ॥
दूरध्वनी साधने नव्हती । परि भानुदासांची कीर्ती ।
चंद्रशेखरानंद सरस्वतींप्रती । पोहोचली असे सर्वथा ॥
केशवदास पत्नीसमवेत । भानुदासांसी सवे घेत ।
ओंकारेश्वरी पोहोचत । चंद्रशेखरानंद सरस्वतींकडे ॥
भस्म धुनीतील चिमूटभर । भानुदासांच्या मस्तकावर ।
चंद्रशेखरानंद यतीवर । आशीष देती बाल भानुदासांना ॥
पंचेचाळीस वर्षे गुरुगादी सांभाळत । रावेर पंचक्रोशीत शिष्य निर्मित ।
खांडव्यासी शिष्यपरंपरा स्थापित । केशवदासांचे कार्य मोठे ॥
महिमा वाढविती मंदिराचा । प्रसार करिती दत्तभक्तीचा ।
श्रीसच्चिदानंद स्वामींचा । आशीष असे केशवदासांवरी ॥
सर्वसिद्धांत त्रयोदशी । म्हणजेच चैत्र वद्य त्रयोदशी ।
केशवदास ह्या तिथीसी । देह ठेविती रावेरी ॥
केशवदासांनतर । दत्तगादीचे सर्व अधिकार ।
भानुदास करिती स्वीकार । सेवा करिती समाधीची ॥
संतकृपा ज्यावरी । त्यावरी कृपा करी हरी ।
नामदेवांची कृपा जनीवरी । विठू दळितो जनीघरी ॥
श्रीसच्चिदानंद स्वामींचा वरदहस्त । ह्या कुटुंबावरी असत ।
सद्भाग्य घेऊनी जन्मा येत । ह्या परंपरेतील सत्पुरुष ॥
जो धरितो पाय संतांचे । काळ वंदी पाय त्याचे ।
सुटतो जन्ममरण फेरा । तयासी मिळतो मोक्ष खरा ॥
संतचरणरजाचा स्पर्श जाहला । षड्रिपूंनी पोबारा केला ।
सात्विक भाव मनी जागला । शुद्ध होतसे अंतरंग
संतांसी पाहता सुखाविती नेत्र । संतध्यान करिता निवतात गात्र ।
आनंद भरोनी राहे सर्वत्र । सर्वभूतांठायी परमेश्वर ॥
भानुदास नित्य श्लोक म्हणत । श्लोक सच्चिदानंद स्वामींचा असत ।
तो अपूर्ण आहे ऐसे भासत । श्लोक वाचावा भक्त हो ॥


॥ श्लोक ॥

श्रीसच्चिदानंद राजागुरुदत्तमूर्ती ।
महाराज योगी सखा चक्रवर्ती ॥
तुझिया कृपेने मूढ सूज्ञ झाले ।
तुझे नाम घेता मन हे निमाले ॥

॥ ओवी ॥

भानुदास दत्तभक्तीत लीन । श्रीसच्चिदानंद स्वामी प्रगटती समाधीतून ।
घ्यावा एक श्लोक सुधारून । वदले स्वामी भानुदासांना ॥
म्हणूनी ज्याचा पूर्ण अवतार झाला ।
नमस्कार श्रीसच्चिदानंदजीला ॥
ऐसे लिहावेत दोन चरण । श्लोक पूर्ण होईल जाण ।
करावा तो मजसी अर्पण । ऐसे सांगती महाराज ॥
पवित्र मार्गशीर्ष महिन्यात । मोठा रथोत्सव असत ।
प्रचंड पर्जन्यवृष्टी होत । एक दिवस आधी ॥
भानुदास होती चिंतित । सच्चिदानंद स्वामी दृष्टांत देत ।
उद्या रथोत्सव छान होत । चिंता करू नकोस ॥
काळे मेघ जाती पळूनी । आकाश स्वछ दिसे नयनी ।
रथोत्सवाची पर्वणी । उत्तम साजरी होतसे ॥
चैत्र अमावास्या तिथी । भानुदासांची पुण्यतिथी ।
धरेसी देह अर्पण करिती । दत्तभक्त भानुदास ॥
भानुदासांचा सुत । नाम श्रीपाद असत ।
खांडवा रावेर मंदिर सांभाळत । विद्यमान गादीपुरूष ते ॥
श्रीपाद महाराजांचे दोन सुत । दतातमंदिरमहिमा वाढवत ।
सदा दत्तनामी रत । असती परंपरेचे अधिकारी ॥
श्रीसच्चिदानंद स्वामींनी लाविला । दत्तनामवेलु गगनी गेला ।
निजभक्तकल्याणाला । करिती श्रीसच्चिदानंद स्वामी ॥
दत्त-नाथ परंपरा माहिती । दिधली मी यथामती ।
येथे आता शब्द थांबती । पूर्ण जाहला दहावा अध्याय ॥

इति श्रीदासवैभवविरचिते श्रीसद्गुरू सच्चिदानंदचरितामृते दशमोSध्यायः ।

N/A

References : N/A
Last Updated : August 24, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP