मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सच्चिदानंद स्वामी पोथी| अध्याय – ३ सच्चिदानंद स्वामी पोथी सद्गुरू सच्चिदानंद स्वामींचे चरित्र अध्याय – १ अध्याय – २ अध्याय – ३ अध्याय – ४ अध्याय – ५ अध्याय – ६ अध्याय – ७ अध्याय – ८ अध्याय – ९ अध्याय – १० ११ अध्याय – ३ श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेले स्वामी महाराजांना भगवान दत्तात्रयांनी दर्शन देऊन प्रासादिक पादुका व छडी दिलेली आहे. Tags : pothisacchidanandपोथीसच्चिदानंद अध्याय – ३ Translation - भाषांतर मागील अध्यायी वाचले । एकनाथांनी वर्णन केले ।ज्ञानपटाचे मर्म सांगितले । उलगडून स्वामींना ॥मुक्ताई सोपानदेवासी । ज्ञानपट दिधला खेळण्यासी ।ज्ञानेश्वरांनी केले निर्माणासी । फक्त ज्ञानी लोकांसाठी ॥माऊलींनी नाथांसी समजाविला । नाथांनी स्वामींसी कथिला ।स्वामींनी हुबेहुब रेखाटिला । ज्ञानपट असे पवित्र ॥ज्ञानपट सापशिडीचा खेळ । भगवद्भजनी ठेवा वेळ ।पाप पुण्याचा जमावा मेळ । ऐसा हा पट आगळा ॥अंगी असती सद्गुण । पुण्याची शिडी चढून ।पवित्र लोकी जाऊन । पुण्यात्मा घेई विसावा ॥अंगी असती अवगुण । सर्प टाकी गिळून ।नरकलोकी जाऊन । यातना भोगी जीवात्मा ॥मनी उपजे दया । प्राप्त होतो जनलोक तया ।यज्ञ आवडी बहु जया । स्वर्गलोकी जातो जीवात्मा ॥तपश्चर्या ज्याची असे । तपोलोक प्राप्त होतसे ।सदा धर्माने जो वागतसे । जाई तो इंद्रलोकी ॥वैराग्याने मन तप्त । इंद्रलोक होतो प्राप्त ।परमार्थाने जीवन व्याप्त । गुरुपद मिळते जीवासी ॥भक्ती असे सर्वश्रेष्ठ । प्राप्त होतसे वैकुंठ ।सुधर्म जो करी वरिष्ठ । सायुज्यपद प्राप्त होय ॥मनी असे ज्याच्या कपट । नरक प्राप्त होई दुर्घटप्राप्त सर्पयोनी सरपट । पापवासना धरिता मनी ॥हिंसा करिता निशिदिनी । प्राप्त कीटकयोनी ।परदारा भोगता झणि । दुर्गती प्राप्त होतसे ॥ज्याने ब्रह्मद्वेष केला । त्याचा कुलक्षय झाला ।कुंभपाक नरक मिळाला । धरिली द्रव्य अभिलाषा ॥क्रोध अतिहानीकारक । जीवात्म्यासी मृत्यूलोक ।निंदा करिता असुरलोक । प्राप्त होई जीवासी ॥ज्ञानपटाचे ऐसे वर्णन । सावध व्हावे श्रोतेजन ।शास्त्रसंमत असावे वर्तन । पुण्यसाठा करावा ॥ज्ञानपटाचे ज्ञान व्हावे । गुरुभक्ती करा शुद्ध भावे ।स्वामी गादीपुरूष चौदावे । दत्त नाथ परंपरेतील ॥स्वामींमुळे सर्व वैष्णवांसी । ठेवा प्राप्त झाला निश्चयेसी ।अभिमानास्पद कार्यासी । केले श्रीदत्तस्वामींनी ॥मागील अध्यायी श्रोतेजन । वर्णिले दत्त दर्शन ।झाले स्वामींलागून । परंपरेसहित हे अवघे ॥स्वामींच्या आले मनास । जावे आता तीर्थयात्रेस ।स्वामी निघाले उत्तरेस । बद्रिकाश्रमी राहिले ॥केदारनाथासी पाहिले । विश्वेश्वरासी वंदिले ।लाहोर येथे वास्तव्य केले । सहा मास स्वामींनी ॥होता काळ मोगलाईचा । छळ होई साधुसंतांचा ।वेश घेऊनी फकिराचा । फिरती स्वामी तये वेळी ॥कफनी अंगावर असे । लंगोटी कटेवर दिसे ।हाती झोळी घेतसे । कमालुद्दीन ऐसे नाव सांगती ॥लोक समजती मुसलमान । न करिती अवमान ।स्वामींच्या मुखी असे नाम । दत्त दत्त ऐसे नित्य ॥स्वामींची उत्तरयात्रा संपली । स्वारी दक्षिणेकडे निघाली ।नर्मदा नदी दिसली । परिक्रमा करावे मनी आले ॥स्वामींनी केले नर्मदास्नान । केले तिला सादर वंदन ।सद्गदित झाले तयांचे मन । सुरू केली परिक्रमा ॥॥श्लोक ॥यानि कानि च पापानि जन्मान्तर कृतानि च ।तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे ॥॥ओवी ॥परिक्रमा अवघड असे । हिंस्र श्वापदांची भीती असे ।चोर लुटूनी नेतसे । परिक्रमावासींना ॥कडुलिंबाचा पाला खाऊन । नर्मदाजल पिऊन ।आले परिक्रमा करुन । मनदेहशुद्धीस्तव ॥श्रीदत्तप्रभूंचा संदेश आला । पुनश्च जावे परिक्रमेला ।सिद्ध झाले परिक्रमेला । स्वामी दत्ताज्ञेप्रमाणे ॥गोमूत्र सेवन करून । नर्मदाजल पिऊन ।द्वितीय परिक्रमा करुन । आले पुन्हा स्वामी ॥दत्तसंकेतानुसार । परिक्रमेसी निघाले सत्वर ।अनेक संकटे आली घोर । परिक्रमा मार्गात ॥एके ठिकाणी दलदल असे । पाय चिखलात रुतलासे ।देह खोलखोल जातसे । दलदलीत स्वामींचा ॥प्रयत्न केले पुष्कळ । परंतु ठरले निष्फळ ।नर्मदामैय्या केवळ । वाचवू शकेल स्वामींना ॥स्वामी नर्मदेचा धावा करिती । आर्ततेने साद घालिती ।माते तुझ्यावीण सद्गती । कोण देईल आता ॥मी येथेच रहावे ऐसे । माते तुला वाटते का कसे ।तुझी इच्छा असेल तसे । होईल आता निश्चित ॥तू माय मी लेकरु । तू गाय मी तव वासरू ।माझी नाव ने पैलपारु । मज दूर नको करु ॥अचानक दिव्य प्रभा दिसे । नर्मदामैय्या प्रगट होतसे ।दलदलीतून बाहेर काढीतसे । वदे ती जा बाळा जा ॥पाहूनी मैय्याचे रूप । स्वामींसी वाटे अप्रूप ।आनंद झालासे अमूप । नर्मदास्तुती करिती स्वामी ॥अगणित तीर्थे पृथ्वीवरती पवित्र तीर्थ नर्मदाजडमूढजन सुखविसी माते नष्ट तयांच्या आपदा ॥१॥प्रलयंकारी राहसी स्थिर वर्णितसे स्कंध पुराणअठरा पुराणांमध्ये श्रेष्ठ असे तुझे नर्मदापुराणअथर्ववेदासम पावित्र्य तुझे पुण्यसाठा दर्शनमात्रेतुझ्याच दोन्ही तटांवरती साठ हजार तीर्थक्षेत्रेषड्गुणैश्वर्य देसी माते जे करिती तुझी परिक्रमाभक्तिभावे शरण येता उद्धरिसी तू दुष्टाधमाअमृतासम असे तुझे जल हे करावे नर्मदास्नानसंत सत्पुरुष स्तविती तुजसी मी बालक आहे सानअधिदैविक अधिभौतिक आणिक आध्यात्मिक त्रितापझडकरी तुझ्या जलस्पर्शाने सर्व निवती आपोआपगोकुळाचे पालन करी जैसा अमुचा कृष्णकन्हैय्यासांभाळिसी तू शरणागतासी तू अमुची नर्मदामैय्यापुनीत झालो तुझ्या दर्शने नमितो मी दास दत्तानर्मदास्तवन गाईल जो नर सुखवी तू त्याच्या चित्ता ॥८॥तिसऱ्या परिक्रमेत । नर्मदा दर्शन देत ।स्वामी कृतकृत्य होत । पावले ते समाधान ॥तीन गाकर बनवत । एक गाईसी अन् एक विप्रासी देत ।एक स्वतः सेवन करित । तिसऱ्या परिक्रमेत स्वामी ॥नर्मदा परिक्रमा केल्यावरी । स्वामी आले इंदौरी ।तेथे एका टेकडीवरी । वास्तव केले तयांनी ॥स्वामींचे तेज अद्भुत । विशाल नेत्र असत ।जटा दाढी वाढत । स्वामी तल्लीन दत्त नामात ॥गोरगरीब दर्शना येत । आपुली व्यथा सांगत ।स्वामी दुःखे निवारत । भक्तांची सर्वदा ॥तुकोजीराव होळकर । राजा असे इंदौर ।असे प्रीती स्वामींवर । मेणा पाठविती स्वामींसी ॥स्वामी बैसले मेण्यात । होळकरी राजवाड्यात ।तुकोजीराव पूजा करत । षोडशोपचारे स्वामींची ॥विपुल दिले धनधान्य । सेवा मम करावी मान्य ।होई माझे कुळ धन्य । प्रार्थना केली तुकोजींनी ॥स्वामी स्वीकार न करत । गोरगरिबांना वाटून देत ।स्वतः निःसंग राहत । तुकोजींना दुःख होई ॥तुकोजीरावांची विनंती । गावांचे इनाम देती ।देवांचा नैवेद्य होऊ दे म्हणती । तुकोजीराव स्वामींना ॥स्वामी म्हणती तुकोजीसी । अरे कासया दान करिसी ।नको अत्रिनंदनासी । तुझे सर्व वैभव ॥एकाएकी तेथून निघत । येती खांडवा ग्रामात ।असे ते मध्यप्रदेशात । पद्मकुंडी राहिले स्वामी ॥किर्र झाडी एकांत । हिंस्र पशूंचा आकांत ।परि स्वामी असती ध्यानांत । सदा दत्तप्रभूंच्या ॥बजाज आडनाव एक नारी । होती बहुत म्हातारी ।घाली तेथे येरझारी । दुरुन पाही स्वामींना ॥आजानुबाहू स्वामी असती । दाढीजटा शिरी वाढती ।डोळे टपोरे असती । स्वामींचे रूप तेजस्वी ॥तेथे ही वृद्ध नारी । लाकडे, गोवऱ्या गोळा करी ।निशिदिनी नमस्कार करी । श्रद्धेने ती स्वामींना ॥‘चल रंडे भाग यहाँ से’ । स्वामी ओरडत ऐसे ।दगड भिरकावून देतसे । तिच्या दिशेने स्वामी ॥तरीही ती वृद्ध नारी । नित्य नमस्कार करी ।मस्तक ठेवी चरणांवरी । एके दिनी स्वामींच्या ॥वदे ती स्वामींसी । द्यावे मज आशीर्वादासी ।यावे मम गृहासी । स्वामी म्हणती ‘तथास्तू’॥स्वामींची झाले आगमन । वृद्धेने केले त्यांचे पूजन ।लाडू केले मूग घालून । अर्पण केले स्वामींना ॥स्वामींनी हा लाडू फोडून । दिला सर्वदूर भिरकावून ।त्या दिवसापासून । दारिद्र्य गेले वृद्धेचे ॥वृद्ध स्त्रीची परिस्थिती सुधारत । खांडवा मुंबई बाजारात ।एका खांबाची स्थापना करवून घेत । स्वामींच्या हस्ते ती वृद्धा ॥तेथे बांधले मोठे घर । वाढला बजाज परिवार ।करिती दिवाळी सणवार । पूजा खांबाची अद्यापि ॥स्वामींनी दिली श्रीमंती । ऐशा लीला करिती ।विठुमंदिरी निवास करिती । खांडवा येथे स्वामी ॥हे बुद्धीच्या दातारा । नमन श्रीसद्गुरूवरा ।गोड मानूनी कृपा करा । तिसरा अध्याय अर्पण ॥ ५९ ॥इति श्रीसच्चिदानंदचरितामृते श्रीदासवैभव विरचिते तृतीयोSध्यायः N/A References : N/A Last Updated : August 24, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP