अध्याय – ६
श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेले स्वामी महाराजांना भगवान दत्तात्रयांनी दर्शन देऊन प्रासादिक पादुका व छडी दिलेली आहे.
साधू जरी असती वेगळाले । परि ते स्वस्वरूपी मिळाले ।
श्रीसद्गुरूतत्वाशी जोडले । अनुसंधान तयांनी ॥
रावेरनजिक वाघोड ग्राम । संत कुंवरस्वामी नाम ।
दत्तस्वामींवरी निष्ठा निष्काम । महायोगी कुंवरस्वामी ॥
दत्तस्वामींची आज्ञा पाळती । दत्तमंदिरात भोजन घेती ।
दतमंदिरात कधी वस्ती करिती । कुंवरस्वामी ॥
कुंवरस्वामींचा एक सेवक असे । तयांच्या बरोबरी नित्य राहतसे ।
गांजाची गोळी देतसे । कुंवरस्वामी महाराजांना ॥
ती गोळी चिलीमीत ठेवून । चिलीम टाकिती पिऊन ।
अनेकदा दिवसातून । चिलीम ओढती कुंवरस्वामी ॥
आकार न कमी होई । गोळी जशीच्या तशी राही ।
कुंवरस्वामींची असे नवलाई । जन्मभर पुरली एक गोळी ॥
रावेर दत्तमंदिरालगत । एक नाला असत ।
मलमूत्र त्यातून वाहत । फिरती साप आणि जनावरे ॥
कुंवरस्वामी जाती नाल्यावरी । साप धरून आणिती मंदिरी ।
असती साप विषारी । चावती ते कुंवरस्वामींना ॥
अंगी असे बहुत सामर्थ्य । सर्पदंश होतसे व्यर्थ ।
ह्या कृतीतील मथितार्थ । सांगती कुंवरस्वामी ॥
षड्रिपू हे सर्प असती । क्षणोक्षणी दंश करिती ।
बुद्धीसी भ्रमित करिती । कलियुगाचा महिमा ॥
ईश्वरी चित्त लावावे । षड्रिपूसर्पभय नसावे ।
सतत अनुसंधान ठेवावे । जागृत असावे मनुष्याने ॥
दत्तमंदिराच्या जमिनीवरती । सर्प सभोवताली फिरती ।
भक्तजन बहुत घाबरती । घाबरू नका कुंवरस्वामी म्हणती ॥
जेव्हा दत्तस्वामी आज्ञापिती । कुंवरस्वामी सर्पांसी घेती ।
नागझिरी नदीकाठी सोडती । कुंवरस्वामी महाराज ॥
एक विहीर दत्तमंदिरालगत । तेथे कुंवरस्वामी उभे राहत ।
काही माणसे सोबत असत । कुंवरस्वामी महाराजांच्या ॥
कुंवरस्वामी माणसांना सांगत । विहिरीतून पाणी काढा म्हणत ।
माझ्या अंगावर ओता म्हणत । मी पुरे म्हणेपर्यंत ॥
माणसे पाणी ओतती । अनेक बादल्या रित्या होती ।
कुंवरस्वामी म्हणती । अजून ओता पाणी ॥
शेवटी माणसे थकली । पाणी ओतायची शक्ती नुरली ।
कुंवरस्वामींना दया आली । माणसांना सांगती जा आता ।
एक कांबळे घेऊन । ओले अंग पुसून ।
दत्तमंदिरात जाऊन । वरच्या माळ्यावर झोपले कुंवरस्वामी ॥
कांबळे घेऊन अंगावरती । तीन दिवस आणि राती ।
कुंवरस्वामी निद्रा घेती । कळजी वाटे माधवदासांना ॥
तिसरे दिवशी माधवदास । विचारती जवळील माणसांस।
कुंवरस्वामींच्या तब्येतीस । काय झाले तीन दिन ॥
जवळील माणसे म्हणाली । कुंवरस्वामींची प्राणज्योत विझली ।
पुढची तयारी करू लागली । इतक्यात झाला चमत्कार ॥
कुंवरस्वामींनी कांबळे काढले । मैं जिंदा हूँ ऐसे वदले ।
सर्वजण चकित जाहले । ऐसी लीला कुंवरस्वामींची ॥
रावेर दत्तमंदिरालगत । नाल्यात बहुत कचरा असत ।
कुंवरस्वामी पळत जात । एके दिनी नाल्यावरी ॥
तेथील सर्व कचरा आणून । दत्तमंदिरात ढीग करून ।
कचऱ्याला आग लावून । शेकत बसती कुंवरस्वामी ॥
प्रचंड मोठा जाळ करत । ज्वाला छतासी जाऊन भिडत ।
सर्वांना भय वाटत । मंदिराचे छत काळे होणार ॥
परंतु जेव्हा अग्नी शांत झाला । काही न होई छताला ।
कुंवरस्वामींची अगम्य लीला । असती बहुत रहस्यमय ॥
संत मस्तानशहावली । दत्तस्वामींशी भेट झाली ।
दत्तमहाराजांशी मैत्री केली । बहुवेळा येती मंदिरात ॥
मस्तानशहांचे कर्णभेदन । करिती ते रुद्राक्ष धारण ।
हिंदू आहेत की मुसलमान । न कळे भक्तांना ॥
मस्तानशहांच्या मस्तकावरती । एक जखम झाली होती ।
काही औषधोपचार न करती । मस्तानशहावली जखमेसी ॥
कालांतराने ह्या जखमेत । अनेक अळ्या वळवळत ।
जनतेसी किळस येत । दिसता मस्तानशहावली ॥
ह्या अळ्या मरू नयेत । काळजी मस्तानशहा घेत ।
अळ्यांसी साखर देत । डोक्यावरील जखमेत ॥
जखमेतूनी जरी अळी खालती ।अरे मर जाएगी मस्तानशहा म्हणती ।
पुन्हा उचलोनी ठेविती । जखमेमध्ये अळीला ॥
ह्यात दडला आहे परमार्थ । तो जाणून घ्यावा यथार्थ ।
न घ्यावा चुकीचा अर्थ । मस्तानशहावलींच्या कृतीचा ॥
जे जे दिसे भूत । ते ते मानिजे भगवंत ।
ऐसी धारणा निश्चित । होती मस्तानशहांची ॥
श्रीसद्गुरूतत्व व्यापक असे । पंचमहाभूतांतही वसे ।
आपपरभाव नसे । कधीही संतांच्या ठिकाणी ॥
स्वहृदयी जो भगवंत । तोच प्राणिमात्रांच्या अंतरात ।
संत असती कृपावंत । सर्वव्यापी परमेश्वर ॥
तान्हे बाळ जोराने रडते । कोSहं ऐसे विचारते ।
जर श्रीसद्गुरू कृपा होते । त्या बाळावरी ॥
सद्गुरूकृपा होता बाळावरी । चित्तवृत्ती पालटती ।
सो हं चे ज्ञान होय भीतरी । बाळाच्या अंतरंगात ॥
जैसे भ्रमराच्या ध्यासाने । भ्रमररूप घ्यावे सुरवंटाने ।
तैसे ईश्वराच्या ध्यासाने । ईश्वररूपी होती संत ॥
मस्तानशहावली दत्तस्वामी । एकत्र येती कुंवरस्वामी ।
सत्संग होतसे बहु नामी । सदा भगवंताची चर्चा ॥
कुंवरस्वामी विचारिती । भक्ताची लक्षणे कैसी असती ।
सांगावीत ती आम्हाप्रती । म्हणती मस्तानशहावली ॥
दत्तस्वामी उपदेश करित । तुकोबांचा अभंग सांगत ।
विविध दृष्टांत देत । मांडिती ते सिद्धांत ॥
पाणी आवश्यक मानवास । तैसे ते आवश्यक मत्स्यास ।
जरी पाणी न मिळे तयास । मृत्यू पावतो तत्काळ ॥
जरी भक्तासी देव आवडतो । परि खरा भक्त तो असतो ।
ज्याचा जीव व्याकूळ होतो । भगवंताच्या विस्मरणाने ॥
जैसे सूर्यप्रकाश मिळे सर्वांसी । परि आवश्यकता कमळासी ।
तैसे योग्य भक्तासी । नामस्मरण महत्त्व कळते ॥
सुंदर बाळ गोजिरवाणे । रूप अतिशय लोभसवाणे ।
आनंद होतो त्याकारणे । सर्व नातेवाईकांना ॥
परंतु बाळाची काळजी मातेसी । तैसेच नाते ईश्वरासी ।
जो ठेवितो निश्चियेसी । तोचि खरा भक्त जाणावा ॥
ज्याच्या मनी जैसा भाव । तैसा तेथे राहतो देव ।
देवाचा अंश असे जीव । महत्त्वाचा असे सिद्धांत ॥
कुंवरस्वामी पुन्हा विचारिती । नाममहिमा सांगावा म्हणती ।
दत्तस्वामी महिमा वर्णिती । आपुल्या रसाळ वाणीतुनी ॥
नाम सदा स्मरावे । नाम सदा मुखी घ्यावे ।
स्वतःचे विस्मरण व्हावे । नामरंगी तल्लीन होता ॥
नामस्मरण करता सद्गुरूंचे । सार्थक होईल जन्माचे ।
काळ वंदितो पाय त्याचे । असे नामाचा महिमा ॥
नामाने तारिले प्रल्हाद बाळा । रामनामे तरल्या जडशीळा ।
नामाने प्राप्त कृष्णसांवळा । झाला मीराबाईस ॥
सद्गुरूंच्या स्मरणात । स्वतःच्या विस्मरणात ।
रंगून जावे नामस्मरणात । मोक्षपद प्राप्त होईल ॥
नामसंकीर्तन होतसे । मुखातुनी वाक्सुधा वाहतसे ।
अध्यात्मज्ञान मिळतसे । दत्तस्वामींकडून संतांसी ॥
दत्तस्वामींच्या समकालीन । कुंवरस्वामी मस्तानशहा दोन ।
संत एक होत्या अजून । रामबाई नाव तयांचे ॥
संत रामबाई असे नाम । मध्यप्रदेश खेडीघाट ग्राम ।
सदा मुखी रामनाम । असे रामबाईंच्या ॥
रामबाईंचा निवर्तला धव । आता ध्यास रमाधव ।
रामनामाचा अर्णव । उसळे निरंतर हृदयी ॥
खेडीघाट ग्रामात । रामबाईंचा दरबार असत ।
एका पातेल्यात धान्य घेत । वाटावयासी गरिबांना ॥
शेवटचा भिक्षुक येईपर्यंत । पातेल्यातील धान्य न संपत ।
पातेले सदा भरलेले राहत । परमहंस योगिनी राम बाई ॥
रामबाई येती रावेरी । निष्ठा तयांची दत्तस्वामींवरी ।
भेट होतसे वरचेवरी । दत्तस्वामी आणि रामबाईंची ॥
रावेर दत्तमंदिरालगत । एक विप्र होते राहत ।
अग्निहोत्री उपनाम असत । होते बहुत शंकेखोर ॥
दत्तस्वामी आणि रामबाई । कधी एकांतात भेट होई ।
अग्निहोत्री विप्रामनी विकल्प येई । संशयपिशाच्च मानेवरी ॥
अग्निहोत्री म्हणे विप्रांना । का पूजिता तुम्ही दत्तस्वामींना ।
शुद्ध चारित्र्य मुळीच ना । ढोंगी आहे दत्तस्वामी ॥
रामबाई मंदिरात येते । दत्तस्वामींसवे गोष्टी करिते ।
एकांतात तयाजवळी बसते । दांभिक असती हे दोघे ॥
ह्यांसी कैसे म्हणावे संत । शुद्धता नसे हृदयांत ।
कैसा भेटला भगवंत । भोंदू दत्तस्वामी अन् रामबाई ॥
जरी अग्निहोत्री बोल लाविती । दत्तस्वामी शांत असती ।
जरी कोणी सूर्यावर थुंकती । सूर्यासी काय त्याचे ॥
दत्तमंदिरी एके दिनी । येती रामबाई योगिनी ।
दत्तस्वामींसी नमस्कार करूनी । बैसल्या त्या पाटावरी ॥
भोजनाची वेळ झाली । नैवेद्याची ताटे मांडली कुंवरस्वामी मस्तानशहावली । उपस्थित होत तेथे ॥
तेव्हा दत्तस्वामी म्हणती । रमाबाई, अर्पण करा नैवेद्याप्रती ।
रामबाई भिंतीस टेकती । घेती मुखाने रामनाम ॥
नेत्रकमले मिटली । रामबाईंची समाधी लागली ।
जाणीव काही नुरली । आत्मानंदमग्न रामबाई ॥
रामबाई ज्या भिंतीसी टेकती । तेथे लाकडी फळ्या असती ।
फटीतून ढेकूण येती । चावती रामबाईंना ॥
रामबाईंचे रक्त पिऊनी । ढेकूण जाती टम्म फुगुनी ।
नवीन ढेकूण येती फळीतूनी । ढेकणांची रांग तेथे ॥
दत्तस्वामी आज्ञापिती । अग्निहोत्री द्विजासी बोलविती ।
अग्निहोत्री स्वतः पाहती । दृश्य ते रामबाईंचे ॥
अग्निहोत्रींसी चूक उमगली । म्हणती व्यर्थ निंदा केली ।
योग्यता नाही मी जाणली । परमहंस योगिनी रामबाई ॥
आळंदीचे नृसिंहसरस्वती । दत्त स्वामींचे दर्शन घेती ।
ऐशा भेटी वारंवार होती चालती । मोठा अधिकार दत्तस्वामींचा ॥
श्रीसद्गुरूतत्वाची रूपे अनंत । त्याचा कधी कळेना अंत ।
अनेक रूपे घेतसे भगवंत । अज्ञानी आपणास कसे ज्ञात ॥
संतांसी ओळखण्यासी । हवे शुद्ध अंतःकरणासी ।
लोळण घ्यावी संतपदासी । लीन शुद्ध भाव ठेऊनी ॥
संतांच्या बाह्यरूपावरूनी । न घ्यावे तयांसी जाणूनी ।
बुद्धीचे वजन लावूनी । न मोजावे तराजूत ॥
सहाव्या अध्यायात जाणून । घेतला संत महिमान ।
भक्तांचे होवो कल्याण । प्रार्थितो वैभव संतचरणी ॥
इति श्रीसच्चिदानंदचरितामृते श्रीदासवैभव विरचिते षष्ठमोSध्यायः
N/A
References : N/A
Last Updated : August 24, 2026

TOP