अध्याय – ७

श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेले स्वामी महाराजांना भगवान दत्तात्रयांनी दर्शन देऊन प्रासादिक पादुका व छडी दिलेली आहे.


जेथे घडतो चमत्कार । तेथे होतो नमस्कार ।
प्रेरणा देतो ईश्वर । संतांच्या चमत्कारासी ॥
न घडे तो कधीही ठरवून । येतो तो आपोआप घडून ।
प्रसंगानुरूप शिकवून । जाती संत आपणासी ॥
रावेरी एक ज्योतिषी । स्वतःसी म्हणवी सिद्धांत ज्योतिषी ।
ग्रामस्थ जाती त्याच्यापाशी । भविष्य जाणून घ्याया ॥
एक गुजराथी कासार । त्यासी दुःख अपार ।
असे तो बिजवर । राही दोन पत्नींसमवेत ॥
जरी द्विभार्या असती । परी नसे तयासी संतती ।
कैसी होईल पुत्रप्राप्ती । सदा चिंता तयाच्या मनी ॥
दोन कलत्रांसी घेऊनी । आला तो ज्योतिषसदनी ।
सांगावे पत्रिका पाहूनी । वदे तो ज्योतिषासी ॥
ज्योतिषाने पत्रिका पाहिली । दोन्ही पत्नींची हस्तरेषा वाचली ।
थोडी आकडेमोड केली । केला चेहरा गंभीर ॥
ज्योतिषी म्हणे कासारासी । देतो मी आता उत्तरासी ।
पुत्र न होणार तुम्हांसी । ग्रहस्थिती प्रतिकूल ॥
पत्नींची पाहिली पत्रिका । अभ्यासली मी हस्तरेखा ।
माझे सांगणे ऐका । पुत्रप्राप्ती योग नसे तुम्हासी ॥
परंतु केले अनुष्ठान जपतपा । झाली विधात्याची कृपा ।
जन्म देई कन्यारूपा । तुमची कनिष्ठ भार्या ॥
कासार बहु दुःखित । मनाशी विचार करित ।
म्हणे मी जाईन नरकात । पुत्राविना कैसे जीवन ॥
अतिशय खिन्न मनाने । कासार चाले वाटेने ।
अचानक त्याच्या दृष्टीने । पाहिले तेथे दत्तस्वामी ॥
दत्तस्वामी म्हणती कासारासी । काय रे झाले तुजसी ।
का खिन्नता तव मानसी । उपजली असे व्यर्थ ॥
घडलेला सर्व वृत्तांत । कासार कथन करित ।
पुत्रसुख नाही नशीबात । सांगे तो दत्तस्वामींना ॥
ऐकूनी तयाचे आर्जव । दत्तस्वामींचे शब्द मार्दव ।
असती साक्षात दयार्णव । देती आशीष कासारासी ॥
जेव्हा संपतील बारा मास । पुत्र होईल प्रथम भार्येस ।
जन्म देईल द्वितीय पुत्रास । कनिष्ठ भार्या त्यानंतर ॥
स्वामी वचनाप्रमाणे । प्रसविला पुत्र प्रथम भार्येने ।
हे घडले एक वर्षाने । दत्तस्वामींचा शब्द असे ॥
कासार गेला आनंदुनी । द्वितीय भार्येपासूनी ।
पुत्र कन्या प्राप्त होवोनी । सुखी जाहला मानसी ॥
श्रीसद्गुरू असे दयावान । नसे त्यावीण आन ।
न करावा कधी अनमान । श्रीसद्गुरू आज्ञेचा ॥
श्रीसद्गुरूंचे वचन । असे ब्रह्मदेवाचे कथन ।
दृढ श्रद्धा ठेवून । नाम घ्यावे श्रीसद्गुरूंचे ॥
दत्तस्वामी चमत्कार करिती । दूर पसरे तयांची कीर्ती ।
दूरदूरोनी भक्त येती । दत्तस्वामींच्या दर्शनासी ॥
वालचंद शेट श्रीमंत । रावेरातील लक्ष्मीवंत ।
आले तयांच्या मनांत । दत्तस्वामींची पूजावे ॥
सुंदर मेणा करविला । त्यावरी मोत्यांच्या माला ।
उत्तम सुशोभित केला । वालचंद शेट यांनी ॥
आले वालचंद मेणा घेऊनी । नमन दत्तस्वामींलागुनी ।
करिती विनंती हात जोडोनी । चलावे मम गृहासी ॥
गृहासी आपुले लागता चरण । धन्य होईल माझे जनन ।
होईल भवसागरतरण । कृपा करावी दत्तस्वामी ॥
वालचंदाची ऐकूनी विनंती । दत्तस्वामी देती सहमती ।
मेण्यात बैसोनी जाती । वालचंदाच्या गृही ॥
वालचंद करी अन्नसंतर्पण । करितसे नैवेद्य अर्पण ।
निष्ठा तयाची असे पूर्ण । दत्तस्वामींवरी बहुत ॥
त्याची श्रद्धा पाहून । दत्तस्वामींचे संतुष्ट मन ।
नित्य षोडशोपचारे पूजन । भजन चाले दत्तस्वामींचे ॥
त्या परिसरातील न्यायालयात । एक शिरस्तेदार असत ।
त्याचा एक मुलगा असत । पिशाच्च बाधा असे ॥
मांत्रिक केले पुष्कळ । यत्न होती निष्फळ ।
शिव्या देई अमंगळ । पिशाच्च बाधित मुलगा ॥
शिरस्तेदारासी वार्ता कळली । दत्तस्वामी सामर्थ्यशाली ।
पावले त्याची वळली । दत्तस्वामींच्या दर्शनासी ॥
दत्तस्वामी आसनी बैसले । दत्तभजन होते चालले ।
भक्तजन रंगूनी गेले । होते भजनानंदात ॥
शिरस्तेदार मुलासहित । आला वालचंदाच्या घरात ।
दत्तस्वामी दृष्टी ठेवत । पिशाच्चबाधित मुलावरी ॥
तो मुलगा उड्या मारित । जोरजोरात ओरडत ।
दत्या दत्या ऐशा शिव्या देत । करितसे थयथयाट ॥
काठी हाती घेतली स्वामींनी । दिधली जी दत्तप्रभूंनी ।
दत्तनाम घेऊनी मुखानी । मारिली जोरात मुलावरी ॥
त्या काठीच्या आघाताने । अंग टाकिले मुलाने ।
सोडून दिले पिशाच्चाने । त्या मुलाचे शरीर ॥
काठीचा जेव्हा स्पर्श झाला । मुक्ती मिळाली पिशाच्चाला ।
गेले ते दत्तलोकाला । दत्तस्वामींच्या कृपेने ॥
दत्तभजन झाल्यावरी । तो मुलगा आला शुद्धीवरी ॥
प्रसाद देऊनी पाठविले घरी । दत्तसावामींनी तयासी ॥
जोवरी नसे गभस्ती । नभी चंद्राची वसती ।
जंबूक वनी गर्जती । जोवरी नसे मृगेंद्र ॥
भूत पिशाच्चांची मस्ती । न चाले दत्तप्रभूंपुढती ।
भूतयोनीतून मुक्त करती । दत्तप्रभूं दुष्ट शक्तींना ॥
दत्तस्वामींची अशी थोरवी । कोणाची बाधा घालवी ।
कोणास देवदर्शन घडवी । दत्तावतारी दत्तस्वामी ॥
रावेरी असे कासार बाई । दत्तस्वामींच्या दर्शनासी जाई ।
निष्ठा तिची स्वामींच्या पायी । शिष्य ती दत्तस्वामींची ॥
दत्त दर्शनाचा तिचा नेम । मुखी असे दत्तनाम ।
दत्तमंदिर तिचे सुखधाम । नित्य येई रावेरी मंदिरात ॥
ऐसे अनेक मास लोटले । डोईवरील केस पिकले ।
मुखातील दात गळले । वृद्ध कासार बाई ॥
एके दिनी रोजच्याप्रमाणे । झाले तिचे मंदिरात येणे ।
केले तिने एक मागणे । दत्तस्वामींच्या पुढती ॥
म्हणे ती दत्तस्वामींस । जायचे आहे मज काशीस ।
वृद्धत्व आले शरीरास । कैसे जाऊ मी आता ॥
प्रवास मी करु कैसा । मजकडे नाही पैसा ।
अळीस भ्रमरध्यास जैसा । मन धावते काशीस ॥
दत्तस्वामी तियेसी वदले । हेच काशीस्थान आपुले ।
रावेरी विश्वनाथ बैसले । का जायचे तुज काशीस ॥
परि तिची समजूत पटेना । आपुला हट्ट ती सोडीना ।
म्हणे दत्तस्वामींना । सांगा काशीस कैसे जाऊ ॥
दत्तस्वामी स्मितहास्य करिती । कासार बाईच्या डोईवरती ।
आपुला वरदहस्त ठेविती । म्हणती तिजला ध्यान लाव ॥
बाई बंद करी डोळे । चित्र पालटले सगळे ।
जी अभिषिक्त गंगाजळे । शिवपिंडी दिसे तिजला ॥
दर्शन होई विश्वनाथाचे । सार्थक होतसे जन्माचे ।
शिवस्तुती ती करी वाचे । समाधी अवस्था अनुभवली ॥

॥ शिवस्तुती ॥

मज दर्शन द्या हो शंकरा भोलेनाथा ॥धृ ॥
समुद्रमंथनातून हलाहल विष येई
प्राशूनी तयाला नीलकंठ तो होई
स्वये सांब धरी डोईवरती निशिकांता
मज दर्शन द्या हो शंकरा भोलेनाथा ॥१ ॥
व्याघ्रचर्म पांघरी चिताभस्म अंगा
मस्तकावरी वाहते जटागंगा
नंदी भृंगी रुद्रगण नमिती पशुपतीनाथा
मज मज दर्शन द्या हो शंकरा भोलेनाथा ॥२ ॥
डमडमडम डमरू उच्चरवे वाजती
नटराज ताडव नृत्य तदा करिती
नमू सांब शिवासी सकल जगत त्राता
मज दर्शन द्या हो शंकरा भोलेनाथा ॥३ ॥

॥ ओवी ॥

कासार बाई भानावरी येई । विश्वनाथाचे दर्शन होई ।
बहुत असे ते सुखदायी । दत्तस्वामींची कृपा ॥
ब्रह्मा विष्णू शिवाचे । असे रूप दत्ताचे ।
दत्तात्रेयाच्या अवताराचे । पूर्णरूप दत्तस्वामी ॥
ह्याच शिवाच्या अंशाचे । विश्वनाथाच्या रूपाचे ।
दर्शन घडविले साचे । दत्तस्वामींची कासार बाईस ॥
पवित्र असे काशीपुरी । दत्तात्रेयांची तेथे होय फेरी ।
दत्तस्वामी संचार करी । जरी असले रावेरात ॥
दत्तस्वामींसी सर्व शक्य । तयांचे असे ब्रह्मवाक्य ।
पंचमहाभूतांशी ऐक्य । सहज साधती दत्तस्वामी ॥
ऐका आता पुढची कथा । वानू दत्तस्वामी समर्था ।
कळोन येईल सर्वथा । अधिकार दत्तस्वामींचा ॥
रावेर ग्रामाजवळ । असे एक धरणगाव ।
तेथील जोशी कुटुंबाचा भाव । असे दत्तस्वामींवरी ॥
रावेरी मंदिरी येवोनी । जोशी करिती विनवणी ।
चलावे अमुच्या सदनी । धरणगावी स्वामी हो ॥
दत्तस्वामी तेथे जाती । भक्त पूजन करिती ।
दत्तस्वामी प्रसन्न होती । दत्तनामस्मरणाने ॥
जेव्हा असे परधाम । तेव्हा दोन दिन करावा मुक्काम ।
दत्तस्वामींचा असे नियम । कुठेही न राहती तिसरे दिनी ॥
होतसे दत्तनामसंकीर्तन । दत्तमय होती भक्तजन ।
दत्तस्वामींना न मोडवे मन । वस्ती केली दुसरे दिनी ॥
तिसरे दिनी भानू उदित । नरवेल ग्रामी स्वामी निघत ।
धरणगाव भक्त म्हणत । जाऊ नका स्वामी हो ॥
दत्तस्वामी समजूत घालत । भक्तांचा निरोप घेत ।
बैलगाडीत बैसत । संध्याकाळ जाहली ॥
सूर्यप्रभा लया गेली । पर्जन्यवृष्टी सुरु झाली ।
माती वाहून आली । नरवेलच्या मार्गात ॥
बैलगाडीचे चाक घसरत । बैलांचे पाय सटकत ।
भक्तमंडळी विनवित । माघारी फिरावे दत्तस्वामी ॥
दत्तस्वामी म्हणती भक्तांसी । काळजी कासयासी ।
भजा तुम्ही दत्तासी । तोचि तारून नेईल ॥
दत्तस्वामी डोळे मिटती । दत्ताचे स्मरण करिती ।
दत्तनामाचा जयघोष करिती । श्रीगुरुदेव दत्त दत्त ॥
आणि चमत्कार जाहला । सर्वांसी प्रकाश दिसला ।
बैलगाडीचे बाजूला । दोन मशाली दिसू लागल्या ॥
त्या मशालींच्या प्रकाशात । सर्व बैलगाड्या धावत ।
दत्तरूपाचे दर्शन होत । दत्तस्वामींमध्ये भक्तांना ॥
नरवेल ग्रामस्थ वेशीवर येत । दत्तस्वामींची वाट पाहत ।
दुरून बैलगाड्या दिसत । मशाली दोन्ही बाजूंस ॥
नरवेलची वेस जवळ आली । गुप्त झाल्या मशाली ।
भक्तमंडळी चकित झाली । पाहूनी हा चमत्कार ॥
दत्तस्वामींचे स्वागत । झाले नरवेल गावात ।
भक्तमंडळी स्वामींसी पुसत । मशाली कश्या लागल्या ॥
दत्तस्वामी स्मितहास्य करिती । काहीही न बोलती ।
सर्व भक्त जाणती । ही असे दत्तप्रभूंची किमया ॥
जैसे नाथांचे चोपदार । झाले दत्त दिगंबर ।
तैसै दत्तप्रभूंचे कर । धरिती मशाली स्वामींकारणे ॥
अनेक चमत्कार घडत । दत्तस्वामींच्या अवतारात ।
भक्तांनी घ्यावा ध्यानात । दत्तस्वामींचा अधिकार ॥
दत्त आणि दत्तस्वामी । भिन्नरूपे एक नामी ।
रूपे असती बहुआयामी । श्रीसद्गुरूतत्व एक असे ॥
भक्तांना भुलविण्यासी । कधी न करिती चमत्कारासी ।
संत महिमा वाढविण्यासी । होती ऐसे चमत्कार ॥
संतांसी ह्याची नाही जरूर । चमत्कार घडवितो ईश्वर ।
सामर्थ्य असे अपार प। ईश्वरशक्तीचे संतांमध्ये ॥
गेलो आपण मंदिरात । ईश्वरसेवा घडत ।
परि पाहिजे पूर्वसुकृत ।श्रीसद्गुरू सेवेसाठी ॥
सोपे ईश्वराचे दर्शन । कठीण संतचरणसेवन ।
जर पवित्र असे प्राक्तन । तर श्रीसद्गुरू भेटतील ॥
जरी ईश्वर आला सामोरी । तरी सद्गुरूसी जो नमस्कारी ।
ऐसा श्रीसद्गुरू अधिकारी । ईश्वराहून श्रेष्ठ असे ॥
श्रीसद्गुरू सेवा ज्याची घडली । त्याची पापे गळाली ।
मोक्षप्राप्ती तयासी झाली । जन्ममृत्यू चक्र संपले ॥
न अडकावे चमत्कारांत । अडकावे चमत्कार करणाऱ्यांत ।
म्हणजेच श्रीसद्गुरूंत । अडकवावे आपुले मन ॥
अनुभवामृताची गोडी । चाखावी भक्तांनी आवडी ।
दासवैभव हात जोडी । सातवा अध्याय पूर्ण ॥

इति श्रीसच्चिदानंदचरितामृते श्रीदासवैभव विरचिते सप्तमोSध्यायः

N/A

References : N/A
Last Updated : August 24, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP