मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सच्चिदानंद स्वामी पोथी| अध्याय – ८ सच्चिदानंद स्वामी पोथी सद्गुरू सच्चिदानंद स्वामींचे चरित्र अध्याय – १ अध्याय – २ अध्याय – ३ अध्याय – ४ अध्याय – ५ अध्याय – ६ अध्याय – ७ अध्याय – ८ अध्याय – ९ अध्याय – १० ११ अध्याय – ८ श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेले स्वामी महाराजांना भगवान दत्तात्रयांनी दर्शन देऊन प्रासादिक पादुका व छडी दिलेली आहे. Tags : pothisacchidanandपोथीसच्चिदानंद अध्याय – ८ Translation - भाषांतर दत्तस्वामी लीला करिती । दत्तात्रेय प्रेरणा देती ।भक्तांचे भवभय हरती । कृपा करिती भक्तांवरी ॥मुका बोलू लागत । पांगळा चालू लागत ।निपुत्रीकासी पुत्र होत । दत्तस्वामींच्या कृपेने ॥एकदा खरगोण भिकणगावी । स्वामींची स्वारी बरवी ।येऊनी स्थिरावे अटवी । भक्तमंडळी जमली शेकडो ॥दर्शनार्थी भक्तांसी । द्यावे स्वहस्ते श्रीफलासी ।दत्तस्वामींच्या मनासी । ऐसा येई विचार ॥नारळ थोडेच कोठीत । कोठीवाला होई चिंतित ।वदे तो स्वामींसी त्वरित । नारळ कमी आहेत ॥दत्तस्वामी प्रसन्नतेने । वदले त्यास निश्चयाने ।का ग्रासिले तुज चिंतेने ॥ दत्तप्रभूंवरी ठेव निष्ठा ॥नारळ ठेव माझ्या पडशीत । दत्तप्रभू सांभाळून घेत ।विश्वासंचालन तेच करित । कासया काळजी करावी ॥दत्तस्वामींनी छाटी घेतली । ती पडशीवरती टाकली ।दत्तस्वामींची करूणा भाकली । स्मर्तृगामी दत्तप्रभू ॥जो जो येई दर्शनासी । त्यासी स्वामी देती श्रीफलासी ।शेकडो भक्त येती त्या दिवशी । दत्तस्वामी देती नारळ ॥नारळ नाही कमी पडले । सर्वांना देऊन उरले ।दत्तस्वामींचे सामर्थ्य समजले । भक्त करिती स्तुती ॥ज्याचा सखा असे हरी । त्यावरी विश्व कृपा करी ।न भ्यावे कधी अंतरी । दत्तप्रभूंची किमया असे ॥एके दिनी दत्तमंदिरात । भक्तजन होते सेवा करित ।अचानक तेजःपुंज साधू येत । भगवी कफनी परिधान ॥दत्तस्वामी तयांना पाहती । आपल्या आसनावरून उठती ।साधूंचे चरण वंदिती । बसविती आपुले आसनी ॥चरणप्रक्षालन करिती । षोडशोपचार पूजा करिती ।नैवेद्य अर्पण करिती । दत्तस्वामी साधूंना ॥प्रथम साधूंसी भोजन द्यावे । पश्चात स्वये भोजन करावे ।ऐसे प्रतिदिनी करावे । दत्तस्वामींचा नेम असे ॥ऐसे बरेच दिन सरती । एके दिनी दत्तस्वामी म्हणती ।साधू महाराज मजप्रती । द्यावा काहीतरी प्रसाद ॥दत्तस्वामींना परभाषा येत । संवाद चाले फारशी भाषेत ।भक्तांसी नाही उमगत । अर्थ दोघांच्या संवादातील ॥दत्तस्वामी प्रार्थिती साधूंसी । प्रसाद द्यावा मजसी ।साधू देती स्वामींसी । पांढरे निशाण ॥गंधयुक्त पूजा करावी । धूपारती ओवाळावी ।निशाणावरी श्रद्धा ठेवावी । दसऱ्याच्या दिवशी पूजा ॥नाथ महाराजांच्या परंपरेत । निशाणांचे पूजन होत ।दत्तस्वामींची परंपरा असत । नाथ संप्रदायाची ॥हे साधू म्हणजे साक्षात । प्रभू दत्तात्रेय असत ।स्वामींवरी पुनश्च कृपा करित । पांढरी निशाणे देऊनिया ॥एकदा रावेरी दत्तमंदिरात । संत हरिदास येत ।दत्तस्वामींचे श्रीसद्गुरू असत । वर्णिले मी द्वितीय अध्यायी ॥शिष्य आरूढ सिद्धपदासी । मीलन तयाचे परब्रह्मासी ।ते सुख पहावयासी । आले संत हरिदास ॥गुरु शिष्याची भेट झाली । दत्तस्थानाची महती वाढली ।दत्तस्वामींनी सेवा केली । सद्गुरू हरिदासांची ॥उत्तम घोडा सद्गुरूंसी दिला । वेशीपर्यंत जाऊनी निरोप दिला ।पुनःपुन्हा नमस्कार केला । दत्तस्वामींनी हरिदासांना ॥सद्गुरू हरिदासांचे रावेरागमन । ह्याची कथा केली कथन ।आता ऐका चित्त स्थिर करून । कथा दत्तस्वामीशिष्याची ॥दत्तस्वामींचे करिती सेवाकाम । गोपाळदास जोशी नाम ।कधीही नाही केला आराम । कुचराई नाही सेवेत ॥स्वामींच्या घोड्याची काळजी घेणे । गाई वासरांना सांभाळणे ।पहाटे घोडा तयार ठेवणे । तापीस्नानास्तव जाती दत्तस्वामी ॥गोपाळदासांची सेवा सुंदर । शुद्ध असे तयांचे अंतर ।मुखी दत्ताचे नाम निरंतर । वयाने ते तरूण ॥धरणगावची कन्या उपवर । मंडळी येती रावेरी सत्वर ।गोपाळदास असे सुयोग्य वर । योजिला मंडळींनी मनात ॥मंडळी आली स्वामी दर्शनासी । स्वामी पुसती तयांसी ।का येणे केले रावेरासी । सांगावे धरणगाव मंडळींनो ॥कन्यादान करावे गोपाळदासांसी । ऐसा विचार आमुचे मानसी ।द्यावे आपण आशीर्वादासी । निर्विघ्न होवो विवाह ॥दत्तस्वामी क्षणभर स्तब्ध झाले । सर्व मंडळींसी वदले ।आत्ता योग नाहीत चांगले । नको लग्न गोपाळदासासी ॥धक्का बसला सर्वांस । काय झाले दत्तस्वामींस ।का न देती अनुमतीस । लग्न नको असे का म्हणती ॥दत्तस्वामींची आज्ञा प्रमाण । मंडळी परतली स्वस्थान ।सरले काही मास अन् दिन । गोपाळदासांसी मृत्यू आला ॥दत्तस्वामींनी आज्ञा दिली । गोपाळदासांची समाधी बांधली ।गोपाळदासांना मुक्ती मिळाली । दत्तस्वामींच्या कृपेने ॥सामर्थ्य असे दूरदृष्टीचे । वैधव्य टळले मुलीचे ।भूत वर्तमान भविष्याचे । ज्ञान असे दत्तस्वामींना ॥पवित्र श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर । तेथे निर्मिला शिष्यपरिवार ।दत्तस्वामी श्रीसद्गुरूवर । मठ स्थापिती तेथे ॥अनेक रंजले गांजले येत । दत्तस्वामींचे दर्शन घेत ।एक गृहस्थ रावेरात । पुंडलिकबुवा नाव असे ॥तयांची पत्नी गर्भार । स्वामींच्या दर्शनासी येई सत्वर ।स्वामी देती तिजला वर । मुलगी होईल म्हणती ॥तुला होईल जी संतती । देई माझ्या माधवाप्रती ।स्नुषा माझी होईल निश्चिती । माधवाची भार्या ॥वैद्यकशास्त्र नव्हते प्रगत । गर्भातील कन्या स्वामींसी दिसत ।योगदृष्टीने स्वामी पाहत । दत्तस्वामींचे सामर्थ्य थोर ॥जानकी नाव ठेविले ऐसे । जेव्हा वयात येतसे ।स्वामी आज्ञेनुसार लग्न होतसे । जानकी माधवदासांचे ॥स्वतः स्वामी संन्यस्त असती । परि माधवदासांचे लग्न करविती ।मानसपुत्र शिष्य असती । माधवदास दत्तस्वामींचे ॥जानकीबाईमाधवदास । उत्तम करिती संसारास ।परंतु दुःख होते मनास । नसे तयांसी पुत्र ॥जर न होई पुत्रप्राप्ती । तर नरकात जावे निश्चिती ।ऐसी समजूत होती । त्या काळी समाजाची ॥दत्तस्वामींसी करावी प्रदक्षिणा । नमस्कार करावा चरणा ।करावे स्वामींच्या ध्याना । जानकीबाईंचा नेम असे ॥रोजच्याप्रमाणे एके दिवशी । घातले जानकीबाईंनी प्रदक्षिणेसी ।केले साष्टांग नमस्कारासी । मनोभावे दत्तस्वामींना ॥आशीर्वादपर उंचावला हात । हात घातला झोळीत ।जानकीबाईंच्या ओटीत । एक श्रीफळ ठेविले ॥स्वामी म्हणाले जानकीबाईंस । चिंता तुज कासयास ।ओटीत दिधले मी प्रसादासी । होशील तू पुत्रवती ॥जानकीबाईंसी पुत्र जाहला । केशव ठेविले अभिधानाला ।दत्तस्वामींचा आशीष लाभला । कुलकर्णी वंश पिढ्यांना ॥कनिष्ठ बंधू माधवदासांचे । नाना असे नाव तयांचे ।खांडवा विठ्ठलमंदिराचे । प्रमुख ते असती ॥नागर द्विजे असे खांडव्यात । त्यास दत्तस्वामींचे दर्शन होत ।स्वामींपायी त्याची श्रद्धा असत । शिष्य जाहला तो स्वामीचा ॥तो जातसे जयपूरात । असे ते राजस्थान राज्यात ।सुंदर दत्तमूर्ती त्यासी दिसत । बांधून घेई तो पाठीवरी ॥पाठीवरी मूर्ती घेऊन । खांडवा विठ्ठलमंदिरी येऊन ।दत्तस्वामींसी हात जोडून ।प्रार्थना करी नागर विप्र ॥दत्तप्रभूंच्या संकेतानुसार । करावा ह्या मूर्तीचा स्वीकार ।दत्तप्रभू सगुण साकार । मूर्तीस्वरूपात अवतरले ॥खांडवा विठ्ठलमंदिरात । दत्तस्वामी स्वहस्ते स्थापना करित ।मुखाने दत्तस्तुती गात । भावविभोर होऊनिया ॥॥ दत्तस्तुती ॥जा शरण दत्ताचे दरी चरण रे ॥धृ॥पुनरपि जनन पुनरपि मरणजन्ममृत्यू फेऱ्यातूनी सुटशील रे ॥ १ ॥बालक होऊनी चरणी लोळण घे तूदत्तमाय पाजी तुजला प्रेमपय रे ॥२ ॥षड्रिपूंपासूनी मुक्त करतील तेघेई हाती दत्तनामाची माळ रे ॥३॥कृपा करी दीनावरी दत्तभक्तसदयादत्तदास मी असे चरणरज रे ॥४॥॥ओवी ॥ह्या खांडव्याच्या मंदिरात । दत्तस्वामींची खुर्ची असत ।अजूनही आहे सुस्थितीत । स्वामींच्या चर्मपादुका असती तेथे ॥माधवदास सेवा करिती । तन मन धन अर्पिती ।दत्तस्वामींवरी बहु प्रीती । पट्टशिष्य ते दत्तस्वामींचे ॥हनुमान सेवा करी श्रीरामांची । माधवदास सेवा करिती स्वामींची ।आठवण येई पुंडलिकाची । माधवदासांकडे पाहता ॥एकदा माधवदास जाती स्नानासी । दत्तस्वामी मारिती हाकेसी ।माधवा, माधवा ध्वनीसी । ऐकती माधवदास ॥स्नान अर्धवट सोडोनी । ओला पंचा गुंडाळूनी ।माधवदास आले धावोनी । दत्तस्वामींजवळी ॥देहधर्म करण्यास्तव । स्वामींनी हाक मारली माधव ।लघुशंकेसी नेले जंव । तंव दत्तस्वामी म्हणती ॥किती सेवा करितोस माधवा । तुजला मोक्ष मिळावा ।आशीष माझा सदा रहावा । तुझ्याजवळी माधवा रे ॥दत्तस्वामींचे थकले शरीर । माधवाचा धरोनी कर ।स्वामी करिती व्यवहार । वार्धक्य येतसे स्वामींना ॥शंभर वर्षे पूर्ण होत । दत्तस्वामी शतायुषी होत ।दाढी जटा काढून टाकत । मुखात येती दात पुनश्च ॥ज्ञानेश्वरीत वर्णिती माउली । योग्यांची लक्षणे सांगितली ।वृत्ती स्वरूपानंदी रमली ।लक्षण असे हे योग्याचे ॥योग्यांची सर्व लक्षणे । दत्तस्वामींसी लागू होणे ।आता संन्यासदीक्षा घेणे । विचार करिती दत्तस्वामी ॥मीपणाचा सागर आटावा । अंतःकरणातील मी विसरावा ।तोचि संन्यासी जाणावा । ऐसे संन्यासी लक्षण ॥होवो अंतःकरणाची शुद्धी । होवो निःस्पृहतेची वृद्धी ।दत्तचरणी जडो बुद्धी । हेचि संन्यास लक्षण ॥षड्रिपूंपासूनी होवो अलिप्त । मन असावे सदा तृप्त।ज्यास नसे कोणीही आप्त । त्यास संन्यासी म्हणावे ॥चतुर्थाश्रमाची महती । माधवदासांसी सांगती ।दत्तस्वामी म्हणती । करा तयारी दीक्षेची ॥दीक्षेची तयारी सुरू केली । विप्रांची मांदियाळी जमली ।गोत्राची विचारणा केली । संन्यासदीक्षा देणाऱ्या द्विजाने ॥आम्ही कण्वशाखीय । आहोत शुक्ल यजुर्वेदीय ।गोत्र आमुचे दत्तात्रेय । सांगती दत्तस्वामी सर्वांना ॥विधी संपन्न जाहला । घेतले संन्यासदीक्षेला ।सच्चिदानंद नावाला। धारण केले स्वामींनी ॥पूर्वाश्रमीचे दत्तस्वामी । आता श्रीसच्चिदानंद सरस्वती स्वामी ।रावेरी दत्तमंदिरधामी । राहती ते संन्यस्तवृत्तीने ॥केला संन्यासग्रहण । केले शास्त्रोक्त आचरण ।एकशे दोन वर्षे आयुर्मान । संन्यासग्रहण समयी ॥श्रीसच्चिदानंद स्वामी सांगती । अन्नदान श्रेष्ठ असे जगती ।संतुष्ट होतो श्रीपती । सदा अन्नदान करावे ॥करावा अन्नदानाचा संकल्प । मनी आणू नये विकल्प ।अन्नदान केले जरी अल्प । मोधधाम पावतो अन्नदाता ॥माधवदास नित्य करिती अन्नदान । श्रीसच्चिदानंद स्वामींचा शब्द प्रमाण ।नाही केला कधी अनमान । माधवदासांनी गुर्वाज्ञेचा ॥श्रीसच्चिदानंदस्वामींच्या सेवेत । माधवदास वाहून घेत ।प्रभाती तयांसी उठवीत । स्वामींची भूपाळी गाऊनी ॥॥भूपाळी ॥उठा सच्चिदानंद स्वामी उषःकाल जाहलावंदन करण्या तुजला गगनी भास्कर अवतरला ॥पहाट झाली जाते आता विलया तमरजनीअष्टसात्विक भाव दाटले भक्तांच्या हृन्मनी ॥१ ॥सनई चौघडे वाजती भक्त भूपाळी गातीकोटी सूर्यतेज विलसे तव मुखकमलावरती ॥२ ॥सप्तसागर सप्तनद्या तव चरणाशी येतीपापक्षालन करण्यास्तव तव चरणप्रक्षाळिती ॥३॥भक्तांचे मन गुंतले श्रीसच्चिदानंदचरणीश्रीसच्चिदानंदस्वामी वसो हृदयसिंहासनी ॥४॥॥ ओवी ॥स्वामी करिती मुखमार्जन । पश्चात करिती दुग्धप्राशन ।माधवदास घालिती स्नान । नित्यनेमे स्वामींना ॥श्रीसच्चिदानंद महाराजांसी । माधवदास नेसविती वस्त्रांसी ।करूनिया मृदू आसनासी । बसविती स्वामींसी प्रेमाने ॥जेव्हा होई मध्यान्ह । माधवदास करिती पूर्णान्न ।अर्पिती नैवेद्यान्न । श्रीसच्चिदानंद स्वामींसी ॥श्रीसच्चिदानंदस्वामींचे चाले भोजन । माधवदास म्हणती कवन ।अश्रूंनी भरूनी येती नयन । माधवदासांचे त्या वेळी ॥॥ कवन ॥नैवेद्य स्वीकारा स्वामी हो, श्रीसच्चिदानंदा ॥धृ ॥मध्याह्न झाली आले सूर्यबिंब डोईवरीभोजनाची वेळ झाली सेवन करा भाकरी ॥१ ॥गोडवरणभात त्यावरी शुद्ध लिंबूरसमेळवूनी लवण त्यावरी सेवा स्वामी षड्रस ॥ २॥पंचपक्वान्नांचा प्रसाद अर्पितो आम्ही सुग्राससेवन करा पदार्थ जे आवडती तुम्हा खास ॥३ ॥नैवेद्य सेवन करूनी द्यावा तृप्तीचा ढेकरभक्तजन नमिती तुम्हा जोडोनिया दोन्ही कर ॥४॥॥ओवी ॥ऐसी प्रार्थना करूनी । स्वामींचे हस्तप्रक्षालन करुनी ।विडा देती बनवूनी । माधवदास स्वामींना ॥विड्याने होई मुखशुद्धी । तैसेची होई आत्मशुद्धी ।होय भक्तीची वृद्धी । माधवदासांच्या अंतरात ॥॥ विडा ॥विडा घ्या श्रीसच्चिदानंदा सर्व दुःखाच्या हन्तामुखशुद्धी करा आता तांबूल देतो भगवंता ॥१॥षड्रिपूंची सुपारी मी फोडिली अडकित्ते दुर्गुणसद्भक्तीचा गुलकंद एकजीव केले मिश्रण ॥२॥सद्गुणांचे वेलदोडे नवविधा भक्ती कातद्वेताद्वैताचा चुना क्षमा खोबरे तयात ॥३ ॥क्रोधरहित जायफळ बडिशेप अंतरंगत्रिगुणाचे बदाम घालू तांबूल शोभे लालरंग ॥४॥एकादश इंद्रियांचा आता विडा बनवलाश्रीसच्चिदानंदस्वामींच्या चरणी माथा ठेविला ॥५॥॥ ओवी ॥मध्यान्ह भोजन झाल्यावरी । स्वामींची विश्रांती प्रहरभरी ।स्वामींच्या शरीरावरी । माधवदास वारा घालिती ॥जेव्हा अस्तासी जाई तमारी । चंद्रबिंब येई नभावरी ।श्रीसच्चिदानंद स्वामींची स्वारी । निद्रा शयन करितसे ॥स्वामींच्या शेजेभोवती । माधवदास उभे राहती ।पंख्याने वारा घालती । शेजारती म्हणती मुखाने ॥श्रीसच्चिदानंद स्वामींना फुलांची शेज ।दीपले आमुचे डोळे तुमचे पाहुनिया तेज ॥ धृ ॥दिनरात्र भक्त येती तुमच्या दर्शनापुरविती मनोरथ तुम्ही भक्तकामना ॥संसारत्रस्तांसाठी तुम्ही कृपेची साऊलीभक्त म्हणती श्रीसच्चिदानंद माऊली ॥देह अहंभाव पंखा वारा घालितोसद्गुणांची शाल तुमच्या देही पांघरतो ॥दया क्षमा शांती दासी चरण सेवितीषड्रिपूंचा अग्नी पेटवूनी हुक्का तुम्हा देती ॥भक्तकृपेस्तव धावूनी स्वामी देह शिणलासेवेळ झाली निजावयाची भक्त नमितसे ॥अशाप्रकारे माधवदास । स्वामीसेवा करिती खास ।श्रीसच्चिदानंदस्वामींचा ध्यास । सदा लागे माधवदासांसी ॥अध्याय असे हा आठवा । समाप्त होत असे बरवा ।नमन श्रीसद्गुरूवरा । वैभव करितो श्रद्धेने ॥इति श्रीदासवैभवविरचिते श्रीसच्चिदानंदचरिते अष्टमोSध्यायः । N/A References : N/A Last Updated : August 24, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP