अध्याय – १

श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेले स्वामी महाराजांना भगवान दत्तात्रयांनी दर्शन देऊन प्रासादिक पादुका व छडी दिलेली आहे.


श्रीगणेशाय नमः । श्रीसद्गुरवे नमः । श्रीसरस्वत्यै नमः ।
श्रीगणेशा अंबाकुमरा । विघ्ननाशना तुज नमो ।
मंगलमूर्ते वक्रतुंडा । बुद्धिदाता तुज नमो ॥१ ॥
हंसवाहिनी तू सरस्वती । देई मजला तू मती ।
येवो मज आता स्फूर्ती । श्रीसद्गुरू चरित्र लिहाया ॥२ ॥
हे शंकरा गंगाधरा । मदनांतक तू गौरीहरा ।
नमन तुजसी महेश्वरा । कृपा करावी दासावरी ॥३ ॥
भाग्यलरेखा लिहसी तू । चतुरानन ब्रह्मा तू ।
लेखनसवेचे भाग्य तू । लिहावेस माझ्या प्राक्तनी ॥४॥
राहसी तू क्षीरसागरी । तूंचि लक्ष्मीकांत श्रीहरी ।
मजवरी आता कृपा करी । सद्गुरूकथा लेखन ॥५॥
यदु अलर्का एकनाथा । चरणी मी ठेवितो माथा ।
श्रीसद्गुरूंची चरित्रकथा । लिहाया आशीष द्यावा ॥६॥
आता नमितो कुलदेवता । शांतवी मम चित्ता ।
त्रिलोकी असे सत्ता । गुणगान लिहवी मजकडुनी ॥७॥
हे सच्चिदानंद स्वामी । दत्तात्रेय तू स्मर्तृगामी ।
यश द्यावे मज ह्या कामी । चरित्र लेखनाच्या ॥८॥
श्रीसद्गुरूंची करणी । चालवावी माझी लेखणी ।
गुण गाया न पुरे वाणी । श्रीसच्चिदानंद चरित्र हे ॥९॥
म्या मूढे चरित्र लिहावे । छे! तयांनी लिहवून घ्यावे ।
मी निमित्तमात्र असावे । ही श्रीसद्गुरुंची इच्छा ॥१० ॥
श्रीसद्गुरू गभस्तीसम । मी तर असे काजव्यासम ।
श्रीसद्गुरूकृपार्णव असीम । मी तयांतील एक मीन ॥११॥
श्रीसद्गुरू असती ज्ञानराशी । मी तर फक्त पापराशी ।
नष्ट करिती झट्दिशी । ज्ञानशूल मारूनी ॥१२ ॥
चरित्र ऐका सद्गुरूंचे । कान करूनी सर्वांगाचे ।
श्रीसच्चिदानंद महाराजांचे । चरणी शत शत नमन ॥१३ ॥
श्रीक्षेत्र माहूर नांदेड प्रांत । नजीकच्या एका ग्रामात ।
लाहोरकर वंशात । दत्तात्रेय नामे एक द्विज ॥१४॥
लक्ष्मी असे त्याची भार्या । सुलक्षणी सुमुखी आर्या ।
तिचे मन सदा देवकार्या । गुंतलेले असे नित्यनेमे ॥१५ ॥
दत्तात्रेयलक्ष्मी दंपती । उत्तम संसार करिती ।
अन्नधान्याची नसे भ्रांती । सुरळीत चाले संसार ॥१६ ॥
काळा डाग जरी उमटला । शोभा न ये श्वेतवस्त्राला ।
नसता फूल संसारवेलीला । संसार होई निरर्थक ॥१७ ॥
वंशात न होई पुत्रोदय । पतीपत्नींचा विचारविनिमय ।
आता करावा काय उपाय । कोणा जावे शरण ॥१८ ॥
ईश्वरेच्छा बलीयसि । ती येई द्विजाच्या मानसी ।
आळवावे श्रीदत्तासी । करावे अनुष्ठान ॥१९ ॥
माहुरगड असे बहु पवित्र । दत्ताचे तीर्थक्षेत्र ।
तप करिती भक्त सत्पात्र । स्मरातृगामी दत्तप्रभू ॥२ ०॥
ह्याच माहूरगडावरी । जाऊन दत्त शिखरावरी ।
अनुष्ठान करावे वैखरी । मनी विचार येई द्विजाच्या ॥२१ ॥
लक्ष्मीभार्या वदे द्विजासी । साथ द्याया मी येते तुम्हांसी ।
जोडीने करु तपाचरणासी । फळ निश्चित मिळेल ॥२२ ॥
द्विज म्हणे हे लक्ष्मी । तू आहेस गृहलक्ष्मी ।
जातो तपासी एकटाच मी । वाढव तू गृहशोभा ॥२३ ॥
पत्नीचा निरोप घेऊन । दत्तशिखरावरी जाऊन ।
पद्मासन घालून । अनुष्ठान आरंभले दत्तविप्राने ॥२४॥
अनुष्ठान सुरू जाहले । बहुत दिन सरले ।
दत्तविप्राने आळविले । धांव धांव दयाळा ॥२५ ॥
स्वप्नी विप्रास दृष्टांत होई । दत्तप्रभू दर्शन देई ।
विप्रासी गहिवरून येई । लोटांगण घाली चरणी ॥२६॥
दत्तप्रभू वदले विप्रासी । मी प्रसन्न झालो तुजसी ।
पुरे कर अनुष्ठानासी । होईल तुझी इच्छा पूर्ण ॥२७॥
वाढेल तुझा वंश । जन्मास येईल माझा अंश ।
लाहोरकरकुलावतंस । जगी श्रेष्ठ होईल ॥२८ ॥
दत्ते ऐसे बोलिले वचन । पाणावले द्विजाचे नयन ।
विप्र वदे धन्य जीवन । माझे जाहले आजि ॥२९॥
विप्रासी दत्ताज्ञा प्रमाण । केले गृहासी प्रयाण ।
कथिले भार्येसी वर्तमान । श्रीदत्तकृपा जाहली ॥३०॥
दत्तवचनाची प्रचीती । लक्ष्मी जाहली गर्भवती ।
दीप्तीमान तिची कांती । गर्भाच्या तेजाने ॥३१॥
लक्ष्मीसी लागले डोहाळे । असती बहु वेगळे ।
मुखकमल तिचे उजळे । दत्तांश वाढे गर्भात ॥३२॥
कीर्तन प्रवचन श्रवण करावे । सदा दत्तभजन करावे ।
दत्तासी नित्य आळवावे । ऐसे डोहाळे तिज असती ॥३३॥
दिव्य स्वप्न दिसत निद्रेत । सिद्धयोगी दर्शन देत ।
दिव्य सुगंध पसरत । भोवताली लक्ष्मीच्या ॥३४॥
मिलाफ भक्ती आणि श्रद्धेचा । पाठ करी श्रीमद्भागवताचा ।
लक्ष्मीच्या उपासनेचा । प्रत्यय येई लवकरी ॥
नऊ मास भरले लक्ष्मीचे । वेध लागले पुत्राचे ।
वायू सुटले प्रसूतीचे । आली आनंदाची वेळ ॥३५ ॥
तिथी भाद्रपद पौर्णिमेत । शके १७०२ असत
१८३६ असे संवत । पुत्रोदय झाला हो ॥३६॥
पुत्राकडे पाहता लक्ष्मीने । डोळे दीपले तेजाने ।
साखर वाटली दत्तविप्राने । मंगल वाद्ये वाजू लागली ॥३७ ॥
सृष्टीत चैतन्य पसरले । गंधर्व किन्नर गाऊ लागले ।
पर्णसंभारांनी वृक्ष सजले । जन्मताच दिव्य बालक ॥३८ ॥
सिद्धमुनी आणि यती । सूक्ष्मरूप घेऊन येती ।
दर्शन घेऊनी आनंदित होती । ह्या दिव्य बालकाचे ॥३९ ॥
आसपासची मंडळी येती । दिव्य बालकासी कुरवाळिती ।
दर्शनाने धन्य होती । बालक असे दत्तांश ॥४० ॥
ठेवावयास अभिधान । निश्चित केला बारावा दिन ।
सुवासिनी करिती औक्षण । पाळण्यात घालती बालकासी ॥४१ ॥
गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या । दामोदर घ्या कोणी माधव घ्या ।
अत्रिसुत घ्या कोणी श्रीदत्त घ्या । जोजविती बाळासी ॥४२ ॥
वंश हा धर्मपरायण । नांव ठेविले नारायण ।
सुस्वरे गाती पाळणा । आनंदाने त्या वेळी ॥४३॥
जो जो जो जो रे । नारायणा । लाहोरकरकुलभूषणा ॥४४॥
पाहता मुखकमल । मन निर्मल । नष्ट होती पापे सकल ॥४५॥
अंश तू दत्ताचा । सर्व जगताचा । पालक तू सृष्टीचा ॥४६॥
जडमूढ ताराया । दत्तात्रेया । अवतरसी तू सदया ॥४७॥
आनंदे पाळणा गातो । तुज भजतो । वैभव शीर नमवितो ॥४८ ॥
आपुला सनातन धर्म । सांगे चार आश्रमांचे वर्म ।
गृहस्थाश्रमाचे कर्म । करावे श्रद्धेने ॥४९ ॥
गृहस्थाश्रमी उत्तम संतती । होवो इच्छिती जे दंपती ।
प्रथम अध्याय वाचा निश्चिती । मनोरथ पूर्ण होईल ॥५० ॥
वर्णन अवतार प्रसंगाचे । पुष्प प्रथम अध्यायाचे ।
श्रीसद्गुरूंच्या चरणांचे । ध्यान सदा मज लागो ॥५१॥

इति श्रीसच्चिदानंदचरितामृते श्रीदासवैभव विरचिते प्रथमोSध्यायः

N/A

References : N/A
Last Updated : August 24, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP