मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सच्चिदानंद स्वामी पोथी| अध्याय – ५ सच्चिदानंद स्वामी पोथी सद्गुरू सच्चिदानंद स्वामींचे चरित्र अध्याय – १ अध्याय – २ अध्याय – ३ अध्याय – ४ अध्याय – ५ अध्याय – ६ अध्याय – ७ अध्याय – ८ अध्याय – ९ अध्याय – १० ११ अध्याय – ५ श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेले स्वामी महाराजांना भगवान दत्तात्रयांनी दर्शन देऊन प्रासादिक पादुका व छडी दिलेली आहे. Tags : pothisacchidanandपोथीसच्चिदानंद अध्याय – ५ Translation - भाषांतर मागील अध्यायी पाहिले । स्वामी रावेरग्रामी आले ।नाल्याजवळी वस्ती राहिले । पावन झाली ती जागा ॥उभारावे येथे राऊळासी । आले स्वामींच्या मानसी ।लाकडाचे मंदिर बांधायासी । लाकडे पाहिजेत चांगली ॥शेषाद्रीबुवांची स्वामीसेवा । म्हणती मज अनुग्रह द्यावा ।मला चरणासी ठेवा । शेषाद्रीबुवा प्रार्थिती स्वामींना ॥स्वामी देती अनुग्रहास । ठेविती वरदहस्तास ।पावन करिती शेषाद्रीबुवास । शेषाद्रीबुवा शिष्योत्तम ॥एकदा आले स्वामींच्या मनास । जावे आता माहूरास ।हा विचार शेषाद्रीबुवांस । सांगितला स्वामींनी ॥बुवांनी बैलगाडी जोडली । स्वामींची स्वारी निघाली ।वाहती शब्दसुमनांजली । दत्तस्वामी दत्ताला ॥शेषाद्रीबुवा आणि दत्तस्वामी । रंगून गेले दत्तनामी ।आले दोघे निबिड काननी । माहूरगडाच्या पायथ्याशी ॥मातृतीर्थ कुंड असे । परशुरामांनी तयार केलेसे ।तीर्थ बहुत पावन असे । स्नान करिता मिळे पुण्य ॥दत्तस्वामी वदले बुवांस । मी आता करितो स्नानास ।बैस तू ह्या स्थानास । मी येतोच झडकरी ॥स्वामी बोलले वैखरी । सूर मारिला कुंडाभीतरी ।शेषाद्रीबुवा चातकापरि । वाट पहात बसले ॥एक प्रहर उलटला । सूर्य अस्तास गेला ।भीती वाटली बुवांच्या मनाला । कुठे गेले स्वामी ॥स्नानासाठी उतरले कुंडात । कुठे गेले स्वामी तीर्थात ।कां अदृश्य झाले जळांत? । चिंता करिती बुवा ॥हाय माझ्या दुर्दैवा । स्वामींचा ठिकाणा कसा कळावा ।सांगावा काय धाडावा । रावेरासी आता मी ॥बुवांच्या मनी असे चिंता । स्वस्थता नसे तयांच्या चित्ता ।कुठे शोधू स्वामींसी आता । शेषाद्रीबुवा संकटात ॥स्वामींसी हाका मारिती । शेषाद्रीबुवा गडावरी जाती ।दत्तशिखरावरी पोहोचती । तेथे असती हिंस्र प्राणी ॥काही द्विज दिसती आसपास । त्या कण्वशाखी विप्रांस ।विचारावे ऐसे मनांस । आले शेषाद्रीबुवांच्या ॥कण्वशाखी विप्र सांगती । परंपरा असे भारती ।तेथे काही महंत असती । विचारावे तयांना ॥शेषाद्रीबुवा भ्रमण करिती । एक चौथरा पाहती ।दत्तस्वामी तेथे दिसती । संतांसवे बसलेले ॥पाहिले स्वामींचे हास्यवदन । शांत झाले बुवांचे मन ।बुवा करिती साष्टांगनमन । दिसे अनसूयागर्भरत्न ॥पाहुनिया ते दिव्य तेज । साक्षात अनसूयाअत्रिज ।शेषाद्रीबुवा द्विज । स्तुती गाऊ लागले ॥॥अभंग ॥चाल – ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरलेदत्तस्वामी दत्तात्रेय नव्हेत दोन्ही भिन्नसेवा करिता तिन्ही देव होती प्रसन्न ॥धृ॥रावेरग्रामी वसती आजानुबाहू दत्तस्वामी ।दत्तावतारी स्वामी वाणी रत दत्तनामी ॥ १॥दत्तशिखरावरी आजि पाहिले मी डोळादत्तस्वामी फुलवीती दत्तभक्तीचा मळा ॥२ ॥॥ ओवी ॥साक्षात दत्तमूर्ती दिसली । शेषाद्रीबुवांची खात्री पटली ।दत्तस्वामी माउली । साक्षात दत्तावतारी ॥श्रेष्ठ असती सद्गुरू । साक्षात ईश्वराचा अवतारू ।नेती भक्तांसी पैलपारू । भवनदी पार करूनिया ॥त्रिगुणात्मक अवतार । संतांचा सगुण साकार ।तयांना करावा नमस्कार । देवाहून श्रेष्ठ संत ॥ईश्वरासी कैसे जाणावे । ईश्वरासी कैसे भजावे ।ईश्वरासी कैसे स्तवावे । संत देती शिकवण ॥ईश्वराहूनी श्रेष्ठतम । संत निवारिती अज्ञानतम ।नसे दुजा संतांसम । पवित्र कोणी संसारी ॥दत्तस्वामी बुवांसी म्हणती । आता थांबवावी फिरस्ती ।रावेरी करावी वस्ती । आदेश दत्तप्रभूंचा ॥पवित्र असे तापीकाठ । स्थापन करावे दत्तपीठ ।कण्वप्रदेश असे सुभट । मार्ग दाविती दत्तप्रभू ॥शेषाद्रीबुवांसमवेत । दत्तस्वामी आले रावेरांत ।घडलेला सर्व वृत्तांत । सांगितला बुवांनी ग्रामस्थांना ॥नित्य ब्राह्ममुहूर्ती उठावे । तापीस्नानासी जावे ।असे नित्यनेमे करावे । परिपाठ दत्तस्वामींचा ॥पांढऱ्याशुभ्र अश्वावरी । बैसूनी जाती तापी किनारी ।दत्तस्वामी वरचेवरी । स्नानसंध्यादि करावयासी ॥किल्ला असे बऱ्हाणपूरास । आला तो मोडकळीस ।वार्ता येतसे दत्त स्वामींस । योजना असे दत्तांची ॥किल्ल्याची लाकडे बहुत । कलाकुसर असे मजबूत ।आणूनिया रावेरांत । मंदिर उभारणी करावी ॥ह्या संकेतानुसार । लाकडे आणली सत्वर ।दत्तस्वामींनी उभारले मंदिर । रावेर ग्रामी तेधवा ॥तेथील एक कासार । बोलाविले तयासी सत्वर ।करावी दत्तमूर्ती तयार । स्वामी आज्ञापिती कासारासी ॥पंचप्राण पंचमहाभूते । पंचधातूंच्या प्रमाणाते ।स्वमुखे सांगितले कासाराते । दत्तस्वामींनी संकेताने ॥मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी तिथी । रावेर नगरी सोहळा करिती ।दत्तमूर्ती स्थापन करिती । दत्तस्वामी स्वहस्ते ॥स्वहस्ते दत्तस्वामींनी । दत्तात्रयांचे यंत्र तयार करुनी ।ठेविले ते पूजनी । विजयादशमीस पूजा होत ॥दत्तस्वामींचे असे वचन । अर्पावे चमेली पुष्प अन् चंदन ।हेचि दत्तात्रयांचे स्थान । बहुत पवित्र यंत्र असे ।*तेजस्वी दत्तमूर्ती पाहूनी । भक्तिभाव दाटे नयनी ।दत्तस्तुती स्फुरली वदनी । गाती दत्तस्वामी ॥॥ दत्तस्तुती ॥चला घालू हो प्रदक्षिणा श्रीदत्तस्थानाला ।मुखी घोळवत ठेऊ सदा श्रीदत्तनामाला ॥धृ ॥टाळ मृदुंग वीणा घेऊ रावेरासी जाऊ ॥भजनानंदी तल्लीन होऊ भक्तीरसात न्हाऊ ॥१ ॥श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ऐसा गजर ऐकला ॥दर्शनासी भक्त येती पीठापूर *कुरवपुराला ॥२ ॥औदुंबर गिरनार माहूर असे श्रीदत्त तीर्थक्षेत्रसद्भक्तांवर नित्य असे श्रीदत्तगुरु कृपाछत्र ॥३॥चला चला रे सर्व मिळून जाऊ गाणगापुरासी ।खांद्यावरी घेऊया श्रीदत्ताच्या पालखीसी ॥४॥प्रदक्षिणा करुनी भक्ता पुण्य लाभतसेहात जोडोनी *दत्तस्वामी*चरणी नमितसे ॥५॥॥ओवी ॥अनंतराव कुलकर्णी नाम । तांदलवाडी असे ग्राम ।दत्तस्वामींवर श्रद्धा निष्काम । येती ते रावेरासी ॥अनंतरावांचे दोन सुत । सीताराम आणि नाना असत ।पित्यासवे रावेरी येत । दर्शनासी दत्तस्वामींच्या ॥दत्तस्वामी म्हणती अनंतरावांसी । तुझा ज्येष्ठ पुत्र द्यावा मजसी ।माझ्यासाठीच घेतले जन्मासी । सीतारामाने मर्त्यलोकी ॥अनंतरावांनी पुत्रासी अर्पण केले । दत्तस्वामींनी नामकरण केले ।माधव ऐसे नाम ठेविले । हेच असती माधवदास ॥जैसी सूर्य आणि छाया । दिसती एकाच ठाया ।तैसी माधवदासांसी काया । झिजली स्वामीसेवेत ॥तन मन धन अर्पून । दत्तस्वामींची सेवा करून ।सार्थक केले आपुले जीवन । माधवदासांनी ॥माधवदासांचे चरित्रसार । सांगता होय ग्रंथविस्तार ।माधवदास कथासार । पाहूया योग्य अध्यायी ॥जैसी मूर्ती विजयी पांडुरंगाची । नाथांघरी आली साची ।तैसीच मूर्ती गोपाळाची । येतसे दत्तस्वामींच्या मंदिरी ॥घेऊनी मलंग वेषास । दत्तात्रयदर्शन नाथांस ।तैसेचि दर्शन दत्तस्वामींस । दिधले अनसूयात्मजाने ॥परंपरा दत्तस्वामींची । असे संत एकनाथांची ।पुनरावृत्ती होतसे घटनांची । एकाच परंपरेत ॥देवही येती मूर्तीरूपात । दत्तस्वामींच्या मंदिरात ।चमत्कार घडती रावेरात । ऐका श्रोतेहो आता ॥मध्यप्रदेश प्रांत खरगोन ग्राम । रायरीकर असे कुलनाम ।तेथे असे कृष्णधाम । गोपाळकृष्णाची मूर्ती ॥रायरीकर विप्रासी दृष्टांत । पंधरा दिवस होई सतत ।विप्रासी सांगे भगवंत । मला नेई तू रावेरासी ॥विद्वत् सभा विप्राने बोलाविली । सर्वांसी दृष्टांत वार्ता सांगितली ।सर्वांसी सल्लामसलत केली । न्यावे का कृष्णासी रावेरी ॥सर्व द्विजवृंद सांगत । पुनश्च दृष्टांत जरी होत ।तरी न्यावा देवकीसुत । रावेरी निश्चयेसी ॥त्याच रात्री पुन्हा दृष्टांत । भगवंत होई क्रोधित ।का व्हावे तुझे दुमत । आज्ञा पाळ तू रायरीकरा ॥दुसरे दिनी रायरीकराने । कृष्णमूर्ती बांधली धोतराने ।दुःखी अंतःकरणाने । बैलगाडी जोडली ॥आपल्या सहकाऱ्यांसमवेत । बसला बैलगाडीत ।आला रावेरच्या वेशीत । रायरीकर विप्र ॥अचानक गाडीचे बैल बसले । उठविण्याचे यत्न झाले ।परंतु ते नाही फळले । रायरीकर विप्र चिंतित ॥रावेर ग्रामस्थ आले । रायरीकर विप्रासी पुसले ।धोतरात बांधून काय आणिले । ह्या मूर्तीचे काय प्रयोजन ॥तेव्हा रायरीकर म्हणती । आम्हांस श्रीकृष्ण आज्ञापिती ।दत्तस्वामींकडे न्यावे म्हणती । रावेर ग्रामात ॥तेव्हा रावेरकर गावकरी । म्हणती चला दत्तमंदिरी ।तेथे दत्तमूर्ती गोजिरी । सवे आहेत दत्तस्वामी ॥ऐसे ऐकून बैल उठती । सर्व गावकरी जमती ।दत्तमंदिरापाशी येती । गावकरी मूर्तीसमवेत ॥ह्या घटनेआधी काही दिन । दत्तस्वामींजवळी भक्तजन ।करावया ज्ञानामृत प्राशन । माधवदासांसवे बैसले ॥दत्तस्वामी म्हणती माधवदासांसी । चला उठा आता वेगेसी ।करावे आता व्यवस्थेसी । गोपालजी आ रहे है ॥त्यावेळी माधवदासांना । स्वामींचे बोलणे उमगेना ।आता पाहिली ही घटना । माधवदासांसी सर्व कळले ॥मूर्ती घेऊनी गावकरी । आले दत्तमंदिराचे द्वारी ।दत्तस्वामींची स्वारी । स्वये आली द्वारात ।कथिला रायरीकर द्विजाने । सर्व वृत्तांत प्रामाणिकपणे ।दत्तस्वामींनी बहु हर्षाने । मूर्ती स्वीकारली श्रीकृष्णाची ॥दत्तस्वामींचा जयजयकार होत । मूर्तीसी गोपालजी संबोधत ।सर्व भक्त भजन करीत । राधा राधाकृष्ण राधा ॥पंचामृताचा अभिषेक करून । सुंदर महिरप सजवून ।विधीवत पूजा करुन । गोपालजींची स्थापना झाली ॥दत्तस्वामींच्या मंदिरी । स्वये येई गिरिधारी ।सत्पुरुष असती अधिकारी । अध्यात्ममार्गाचे ॥दत्तस्वामी करिती नमन । गोपालजींचे गुणगान ।तेव्हा स्फुरतसे स्तवन । वाचा भाविकजन हो ॥॥ श्रीगोपालजी स्तवन ॥मथुरेच्या कारागृहीबंदी वसुदेव देवकीश्रीविष्णू अवतरलाश्रीकृष्णजन्माष्टमीला ॥१॥उघडली दारे गळली बंधनेकृष्ण डोईवरी वसुदेव चालेयमुनाईचा पूर ओसरेशेष नाग हा मस्तकी डोले ॥२॥आनंदोत्सव गोकुळासीनंदाघरी सौख्यपर्वणीयशोदा खेळवी केशवालाजमले सारे देव अंगणी ॥३॥गोपाळांसवे खेळे मुरारीगौळणींच्या हृदयी राहीयमुनाडोही कालियामर्दनसामर्थ्य दावी जना लवलाही ॥४॥दही दूध लोणी चोरूनी खाईगोपिकांची वस्त्रे लपवुनी नेईपूतना राक्षसी दैत्य संहारीकंसासुर हा भयभीत होई ॥५॥कृष्णा तुझ्या मुरलीनेगुंग होती गोपबालावृंदावनी रासक्रीडाराधा म्हणे कान्हा आला ॥६॥राधेच्या वत्सल प्रेमात न्हाऊनीरासक्रीडा खेळी कृष्णहृदयी अढळपद देऊनी तिजलामथुरेसी जाई श्री कृष्ण ॥७॥चाणूर मल्ल कंसासुर मर्दूनीराज्य दिधले उग्रसेनालासोबत राही बलराम प्रभूच्याबंदीमुक्त केले वसुदेव देवकीला ॥८॥सांदिपनींचा शिष्य होऊनीगुरुगृही केला विद्याभ्यासद्रौपदीने धांवा करिताझडकरी तारि पांडवांस ॥९॥कुरुक्षेत्री धर्मयुद्ध होईपार्थ न धरी धनुष्यबाणभगवद्गीता उपदेशी त्यासीचराचरव्यापी मला तू जाण ॥१० ॥सोळा सहस्र पत्नी असुनीम्हणती तुला सदा ब्रह्मचारीमीरा के प्रभू गिरीधर नागरपावा वाजवी कृष्ण मुरारी ॥११॥गोकुळासी होई गोपाळकालापूजिती तुजला हे गोपालादत्तस्वामी नमितो तव चरणालादेई तू निरंतर स्वात्मसुखाला ॥१२॥गोपाळजींची शाळिग्राम मूर्ती । पसरली चहूकडे कीर्ती ।जन्माष्टमीचा उत्सव करिती । प्रतिवर्षी दत्तस्वामी ॥रावेर नजिक एक ग्राम । रसनपूर असे नाम ।एका परिवाराचे ते धाम । आनंदाने राहती तेथे ॥होई सतत दृष्टांतास । गृही असे देवीचा वास ।केले कुटुंबाने सायास । दृष्टांताचे प्रयोजन काय ॥त्या घराची भिंत एक । झाली होती पडीक ।बोलावून कारागीर एक । कुटुंबाने भिंत उतरविली ॥तेव्हा घडला चमत्कार । मूर्ती सगुण साकार ।भिंतीमध्ये मिळाली सत्वर । रामवरदायिनी रूप ॥रामवरदायिनी कथा आता । सांगतो स्वस्थचित्ता ।त्रेतायुगात वनांत शोध घेता । चालले होते श्रीराम ॥एके दिनी माता पार्वती । प्रगट झाली श्रीरामांपुढती ।सीतेचे रूप घेऊन सती । वदली श्रीरामांना ॥मीच असे तुमची सीता । माझा स्वीकार करा आता ।श्रमलात मला शोधता शोधता । प्राणनाथा श्रीरामा ॥किंतु श्रीरामांनी ओळखले । विनम्रपणे ते वदले ।पार्वतीमाते का कष्ट घेतले । मजसमोरी यावयाचे ॥तेव्हा मूळ रूप प्रगटले । पार्वतीने आशीष दिधले ।मन आनंदित ठेवा आपुले । कार्य सिद्धीस जाईल ॥श्रीरामांना वरदा पार्वती । रामवरदायिनी असे जगती ।आशीर्वाद मुद्रा हाती । ऐसे रूप तियेचे ॥परिवार गेला आनंदून । मूर्ती दिली घरी ठेवून ।परंतु पुन्हा दृष्टांत देऊन । देवी वदली परिवारासी ॥हे नव्हे माझे स्थान । संतांजवळी माझा मान ।न करावा माझा अवमान । मजला न्यावे संतांकडे ॥दृष्टांताचे नाही पालन । काकुळतीला आले परिवारजन ।परिवारास झाले अनशन । न पाळली देव्याज्ञा ॥परिवारावरी आले संकट । अवस्था झाली बिकट ।आर्थिक चिंता कटकट । अनिष्ट गोष्टी घडू लागल्या ।परिवार आला दत्तस्वामींकडे । परिवार प्रमुख रडे ।दत्तस्वामींस घातले साकडे । निवारण करा व्यथेचे ॥रामवरदायिनी देवीची । इच्छा संतांकडे जावयाची ।पूर्ण करा ती साची । स्वामी वदले परिवारास ॥परिवार म्हणाला स्वामींस । तुम्हांसारख्या संतांस ।अर्पण करतो मूर्तीस । घ्यावी आमुची सेवा ॥स्वहस्ते स्थापली रामवरदायिनी । दत्तावतारी दत्तस्वामींनी ।पंचामृताचा अभिषेक करूनी । सुंदर स्तुती गायिली ॥कृपा करी अंबे कृपा करी अंबेकृपा करी जगदंबिकेनवरात्र उत्सव जाहला सुंदरपूजितो रामवरदायिके ॥धृ ॥सरळ भांग सर्पाकृती वेणी निबिंदी कुंकुम शोभे भालावरीजाई जुई बटमोगरा मालतीपुष्पे सुगंधी डोईवरी ॥१॥कर्ण भूषणे कानी नथ शोभे नाकीहेमहार रुळे वक्षावरीसरी ठुशी मोहनमाळ अलंकारसोनपट्टा दिसे कमरेवरी ॥२॥दंडाला वाकी अन् हाती कंकण साजेडोळ्यांत साठवू रूप तुझेपायी पैंजण नाद करिती किणकिणध्यानी तल्लीन राहो मन माझे ॥३॥हंसवाहिनी सरस्वती तूंचि गेकमळात उभी तू पद्मिनीविक्राळ रूप धारण करिसी तूकालीमाता सिंहवाहिनी ॥४॥शुंभनिशुंभांचा नाश तू करिसीसंहारिसी तू महिषासुराजगन्माता जगज्जननी असे तूजोडतो तुज दोन्ही करा ॥५॥नवरात्री जागरण भारूड गोंधळरासखेळ जोगवा मागतीदैवी अंश येई मानवी देहातअष्टमी ला घागरी फुंकिती ॥६॥नवरात्र नवरंग नवविधा भक्तीनेध्यातो तुजला आम्ही आदिमातासंकटहरिणी भक्त वरदायिनीनसे तुजवीण कोणी दुजा त्राता ॥७॥साडेतीन शक्तीपीठे सप्तशृंगीतुळजाभवानी अंबा रेणुकातुजसी लीन दत्तस्वामी आजिकृपा असावी मम साधका ॥८॥सुरू केला नवरात्रोत्सव । श्रावणात कृष्णजन्मोत्सव ।मार्गशीर्षात दत्तजन्मोत्सव । सुरु केले दत्तस्वामींनी ॥एक नागर ब्राह्मण असत । तो महालक्ष्मीमुखवटे देत ।रावेरी दत्तस्वामी स्थापित । भाद्रपदी उत्सव मुखवट्यांचा ॥विठ्ठल रखुमाई मूर्ती । एक संत दत्तस्वामींस देती ।नित्यपूजेत ती ठेविती । दत्तस्वामी सर्वदा ॥दत्तस्वामी एका पर्वकाळी । स्नान करिती चंद्रभागाजळी ।मातीने भरती झोळी । संतचरणरज असती ते ॥विठुरायाचे दर्शन घेती । रावेरी प्रयाण करिती ।झोळी जड झाली म्हणती । श्रीदत्तस्वामी तेधवा ॥झोळीत घालती आपुले कर । होई तेव्हा चमत्कार ।विठुरायाची मूर्ती सुंदर । प्रगटली झोळीमाजी ॥झोळीतील संतचरणरजांची । मूर्ती घडली विठ्ठलाची ।रखुमाईवराच्या कृपेची । साऊली असे दत्तस्वामींवरी ॥अति भाग्याचे संतचरण । त्याहूनही मोठे रजकण ।सांब ब्रह्मा नारायण । पावन होती कणस्पर्शाने ॥ह्या संतचरणांवरती । सर्व सुखे लोळण घेती ।चारी मुक्ती साधती । संतचरणरजस्पर्शे ॥जंव भवतापाने जीव पोळला । तंव संतचरणरज हाती लागला ।देह अभिमान सुटला । स्वस्वरूपाची होई जाणीव ॥कथिले सर्व संतांनी । शरण जावे मुमुक्षूंनी ।पुनीत व्हावे संतचरणरजांनी । मोक्षप्राप्ती होईल ॥गोपालजी विठ्ठल देवी । दत्तस्थानी शोभा वाढवी ।दत्तस्थानास पुनीत करवी । प्रासादिक दत्तपादुका ॥दत्तस्वामींचा अधिकार जाणून । सर्व मूर्ती आल्या आपणहून ।भांडारातून पैसे खर्चून । नाही आणिल्या मूर्ती ॥श्रीदत्तमंदिराची कथा । एकता दूर होती व्यथा ।श्रीदत्तस्वामींची लीलागाथा । वर्णिली पुढील अध्यायी ॥तू बुद्धीच्या दातारा । नमन माझे सद्गुरूवरा ।चुकवी जन्ममरण फेरा । पाचवा अध्याय पूर्ण ॥इति श्रीसच्चिदानंदचरितामृते श्रीदासवैभव विरचिते पंचमोSध्यायः N/A References : N/A Last Updated : August 24, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP