मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सच्चिदानंद स्वामी पोथी| अध्याय – ९ सच्चिदानंद स्वामी पोथी सद्गुरू सच्चिदानंद स्वामींचे चरित्र अध्याय – १ अध्याय – २ अध्याय – ३ अध्याय – ४ अध्याय – ५ अध्याय – ६ अध्याय – ७ अध्याय – ८ अध्याय – ९ अध्याय – १० ११ अध्याय – ९ श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेले स्वामी महाराजांना भगवान दत्तात्रयांनी दर्शन देऊन प्रासादिक पादुका व छडी दिलेली आहे. Tags : pothisacchidanandपोथीसच्चिदानंद अध्याय – ९ Translation - भाषांतर संन्यासाश्रम स्वीकारला । काळ मागे सरला ।कंपवात शरीरास झाला । श्रीसच्चिदानंद स्वामींच्या ॥सदा दत्तनाम चित्ती । पूर्वस्मृती जागृत होती ।श्रीसच्चिदानंद स्वामी सांगती । माधवदासांसी अनेक गोष्टी ॥रेवापरिक्रमा केली तरुणपणी । तेव्हा स्नानासी थंडपाणी ।कडुलिंबाचे सेवन प्रतिदिनी । केले मी माधवा रे ॥कडुलिंबाचे अतिसेवन । सदा शीतजलाने स्नान ।त्यामुळे आता शरीरास कंपन । भोग आहेत शरीराचे ॥स्वामी म्हणती माधवदासास । माझ्या आलिया भोगास ।परंतु त्रास होतो तूस । परि तू सेवा करतोस माझी ॥कंपवाताने क्षीण प्रकृती । परि साधनातेज मुखावरती ।भगवन्नामी रंगून जाती । सदासर्वकाळ स्वामी ॥शरीर झाले जर्जर । परि दत्तनामाचा निर्झर ।स्वामीमुखातूंनी वाहे भरभर । दत्तप्रभू देती संकेत ॥देहाची खोळ सांडावी । संजीवन समाधी घ्यावी ।अवतार समाप्ती करावी । ऐसी दत्ताज्ञा होय स्वामींसी ॥वार्धक्याने थकून । गेल्या भुवया पडून ।त्याखालील मांसल भाग गळून । खाली आला स्वामींचा ॥मांसल भाग येई डोळ्यावरी । त्यामुळे न दिसे समोरी ।कोण भेटाया आले सत्वरी । सांगू शक्ती स्वामी ॥स्वामींसी असे दिव्यदृष्टी । त्यांना दिसे सर्व सृष्टी ।स्वामी करिती अमृतवृष्टी । आपुल्या प्रिय भक्तांवरी ॥सहावा महिना हिंदू वर्षाचा । असे तो भाद्रपदाचा ।गणपती गौरी उत्सवाचा । अन् स्वामींच्या निर्वाणाचा ॥माधवदासांसी स्वामी वदले । अवतारकार्य आता संपले ।आता थोडेच दिन उरले । आम्ही संजीवन समाधी घेणार ॥दत्तभजनी घालवा काळ । सेवा दत्तप्रभूंसी सर्वकाळ ।तेच करतील प्रतिपाळ । माधवा तुझ्या वंशजांचा ॥सर्वस्व अर्पण केलेस मजला । माधवा, मम आशीष तुजला ।ह्या मंदिराच्या व्यवस्थेला । आता पुढे चालवावे ॥ऐकूनी ही स्वामीवाणी । माधवदासांच्या डोळा येई पाणी ।त्यांची चर्या दीनवाणी । सद्गतित झाले माधवदास ॥जैसा मासा जळावीण । पाडसाविना अस्वस्थ हरिण ।जैसी गाय वासरावीण । तैसी अवस्था माधवदासांची ॥परंतु श्रीसद्गुरूंची इच्छा प्रमाण । स्वये माधवदास आपण ।शोकाकुल अंतःकरण जाण । करू लागले सर्व तयारी ॥बोचरे नाम ब्राह्मण । नित्य करिती भागवत पठण ।संस्कृत मूलपाठ वाचन । श्रीसच्चिदानंद महाराजांपुढे ॥सुरू होई भगवद्गीतापठण । आणि दत्तनामस्मरण ।स्वामींच्या आवडीचे भजन । सुरू होई मंदिरात ॥सकाळ अन् संध्याकाळ । पायात बांधूनी चाळ ।भजननेम सदासर्वकाळ । श्रीसच्चिदानंद स्वामींचा ॥गळ्यात वीणा चाळ पायात । दत्तगायत्री संकीर्तनात ।समाधीयोगाच्या सकाळ प्रहरात । कीर्तन केले स्वामींनी ॥ही वार्ता रावेरात पसरली । मंडळी दर्शनासी येऊ लागली ।श्रीसच्चिदानंदमाऊली । आशीष देतसे सर्वांना ॥मातेशिवाय तान्हे कैसे । हरिणीविना पाडस कैसे ।दत्तमाऊलीस सोडून कैसे । राहतील श्रीसच्चिदानंद स्वामी ॥स्वामींचे माधवदासांसी आज्ञापन । दत्तचरणासी समाधीस्थान ।संन्यासाचे जरी पूर्वेसी आनन । परि पश्चिमुखी मी होणार ॥समाधीव्यवस्था झाली । श्रीसच्चिदानंद स्वामींनी हाक मारली ।माधवा, अरे दत्तमाऊली । बोलविते आहे आज मजला ॥वद्य पक्ष नवमी भाद्रपद मास । घातले स्वामींनी पद्मासनास ।शुचिर्भूत होवोनी दत्तास । प्रार्थिती श्रीसच्चिदानंद स्वामी ॥अनंत जन्मीचे सुकृत फळले । श्रीदत्ताचे दर्शन झाले ।आता हे शरीर थकले । द्यावा विसावा चरणापाशी ॥केली दत्तप्रभूंची सेवा । चाखला दत्तभक्तीचा मेवा ।आता चरणी ठाव द्यावा । आला समाधीक्षण जवळी ॥नेसली होती धाबळ सुंदर । भस्मांकित कांती मनोहर ।श्रीसच्चिदानंद यतिवर । चालले आता निजधामी ॥स्वामी म्हणती माधवासी । कोणी न यावे माझ्यापाशी ।श्रीदत्ताच्या चरणासी । रहावयासी चाललो आम्ही ॥तेवढ्यात जानकीबाई येती । केशवदास सोबत असती ।म्हणती त्या स्वामींप्रती । लेकरासी आशीर्वाद द्यावा ॥उचलावे माझ्या हस्तकी । ठेवावा केशवाचे मस्तकी ।शरीर माझे थकले की । स्वामी सांगती जानकीसी ॥स्वामी म्हणती जानकीबाईंसी । माझा आशीष केशवासी ।सेवा तुम्ही श्रीदत्तासी । योगक्षेम तोचि चालवेल ॥श्रीसच्चिदानंद स्वामींनी हात जोडले । श्रीगुरुदेव दत्त उच्चारिले ।नेत्रकमल मिटले । देहासी समाधीअवस्था ॥चित्ताचा होय लय । प्राणाचा पंचमहाभूंतांत होय विलय ।देह होतसे चैतन्याचा आलय । अशी समाधीअवस्था ॥दत्तात्रय अवधूता । जनार्दन स्वामी एकनाथा ।श्रीसच्चिदानंद स्वामी कृपा करा । ऐसा होतसे जयघोष ॥घेतली मोठी परात । स्वामींसी ठेविले त्यात ।श्रीदत्तमूर्ती लगत । ठेविले श्रीसच्चिदानंद स्वामींना ॥जैसी सुंदर वेल उपटावी गजाने । आकाश व्यापावे काळोखाने ।तैसी मनोवस्था झाल्याने । सर्व भक्तांसी होती क्लेश ॥ज्यांनी बालपणी सांभाळ केला । ज्यांनी लाविले भक्तीमार्गाला ।ज्यांनी दाविल्या अनंत लीला । त्यांचा विरह सहन न होय ॥माधवदासांनी घट्ट केले मन । केले और्ध्वोदेहिक तर्पण ।जैसे सांगती विद्वान । तैसे केले संन्यासी स्वामींचे कार्य ॥श्रीदत्तचरण हेचि गेह । श्रीसच्चिदानंद स्वामीदेह ।मनी न उरे संदेह । संजीवन समाधी जाहली ॥वय वर्षे अष्टोत्तर शत । इसवीसन अठराशे अठ्ठ्यांशी असत ।उत्सवप्रसंगी अन् प्रतिदिनी । समाधीपूजा होते सुगंधी द्रव्यांनी ।चैतन्यमय अद्वितीय सुगंधांनी । क्वचित वातावरण भरते ॥ह्या सुगंधाची अनुभूती । क्वचित प्रसंगी येते प्रचिती ।तपश्चर्येत सामर्थ्य असती । श्रीसच्चिदानंद स्वामींच्या ॥संजीवन समाधी आहे का खरी । शंका येई परोपरी ।ऐसे बोलती वैखरी । अतिशहाणे विप्र समाधी आधी ॥त्यावेळी स्वामी बोलिले । विद्वत्तेचे नको दाखले ।ज्ञानेश्वर अन् नाथांनी केले । तैसेच सत्य दावीन मी ॥समाधीवेळी चमत्कार घडला । बजाज कुटुंब होते खांडव्याला ।‘श्रीगुरूदेव दत्त ध्वनी’ आला । घरातील खांबांतूनी ॥समाधी योगावेळी स्वामीयती । श्रीगुरुदेव दत्त म्हणती ।त्याचवेळी खांबातूनी येती । श्रीगुरुदेव दत्त एसे ध्वनी ॥बजाज कुटुंब खांबाची महती । ह्याच ग्रंथांत वर्णिली यथामती ।पुन्हा नको पुनरावृत्ती । ग्रंथ विस्तारभयास्तव ॥खांडवा भक्तजन रावेरी येती । हा वृत्तांत सांगती ।संजीवन समाधी प्रचिती । चूक मान्य केली विप्रांनी ॥आमुच्या मनी आला संशय । संजीवन समाधी विषय ।आता दुःख अतिशय । क्षमा करावी विप्र म्हणती ॥स्वामींचे लाडके कुत्रे दोन । त्यांचेही अस्वस्थ झाले मन ।एका कुत्र्याने सोडला प्राण । समाधीवरी मस्तक ठेवूनिया ॥कालांतराने दुसरा श्वान । नीरस झाले त्याचे जीवन ।भागवत सप्ताह ऐकून । त्यानेही केला प्राणत्याग ॥कुत्रे दोन्ही बहुत निष्ठावंत । कृपा करिती भगवंत ।जाहला तयांचा देहांत । मोक्षपद प्राप्त जाहले ॥श्रीसच्चिदानंद स्वामींनी । संजीवन समाधी घेऊनी ।मोक्षप्राप्ती दिली करूनी । जडमूढ अज्ञजनांसी ॥श्रीसच्चिदानंदस्वामींचे रूप । झाले सर्वांसी ते अरूप ।भक्तांनी जाणावे स्वस्वरूप । भक्त प्रार्थिती एकमुखाने ॥॥ प्रार्थना ॥श्रीसच्चिदानंद स्वामीराया, आतुरलो रूप पहाया ॥आजानुबाहू शरीर टोपी मुकुटाकाररूप तुझे सगुण साकार ॥रावेर दत्तमंदिर तुमचे स्थानगातो आम्ही तुमचे गान ॥श्रीसच्चिदानंद स्वामी हो, धरितो पायमाय तुम्ही वत्सा जैसी गाय ॥विश्वावरी तुमची सत्ता ब्रह्मांड नायकाआशीष द्यावा आम्हा बालका ॥भवनदी तरण्यासाठी आळवू स्वामीवैभव तल्लीन तव नामी ॥ऐसी प्रार्थना करुनिया । सांगता करितो अध्याया ।श्रीसच्चिदानंद स्वामींच्या पाया । साष्टांग नमस्कार करितो ॥इति श्रीसच्चिदानंदचरितामृते श्रीदासवैभव विरचिते नवमोSध्यायः N/A References : N/A Last Updated : August 24, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP