श्रीनाथलीलामृत - अध्याय १७ वा

नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.


श्रीगणेशाय नमः ॥
श्रीआदिनाथ त्रिभुवनेश्वरा । त्रिशूळपाणि त्रितापहारा । त्रिनेत्र त्र्यंबका त्रिपुरसंहारा । लोकत्रया वंद्य तूं ॥१॥
तूं स्वयंप्रकाशद्योतका । सद्योजाता कामांतका । स्वयंवेद्या भवनाशका । सुखकारका सुखाब्धि ॥२॥
भेदइभविदारणकेसरी । मायातमनाशका तमारि । आतां दर्शन देऊन अभ्यंतरीं । कथा पुढारी वदे तूं ॥३॥
असो पुण्यश्लोक भर्तृहरि भूपाळ । केवळ भूमंडळीचा आखंडळ । सत्कीर्तिनभींचा सोज्वळ । प्रतापमार्तंड शोभला ॥४॥
जेवीं चित्स्वरुपाची चिच्छक्ति । तेवीं भार्या पिंगळा सती । लावण्यउपमे उणी रति । हातकवर्ण नेटकी ॥५॥
त्रैलोक्य सौंदर्य एकवटोन । विरंचीनें केली निर्माण । नागकन्या वोवाळून । जियेवरुन सांडाव्या ॥६॥
जे अपर प्रतिमा दमयंती । जे चातुर्य उपमे सरस्वती । रंभा तिलोत्तमा सरी न पवती । तें स्वरुप किती वर्णावें ॥७॥
मागें झाल्या पतिव्रता । तेवीं पिंगळा लावण्यसरिता । तीतें पाहून तत्त्वतां । आंदोलिती मस्तक ॥८॥
जेवीं मनबुध्दि एकमतें । तेवी उभययुग्में ऐक्यचित्तें । जे इष्ट आराध्य मानी पतीतें । ते पतिव्रता जाणावी ॥९॥
गभस्तीसवें जेवीं दीप्ति । कीं शशीसवें कळा विराजती । की अग्नीसवें ज्वाळा वसती । तेवी सती अर्धांगी ॥१०॥
उभयप्रीति प्रिय अन्योन्य । जेवीं रतिमीनकेतन । सुरतानंदवृध्दि अनुदिन । शुक्लपक्षचंद्रन्यायेंसी ॥११॥
राज्य चालवी यथानुक्रमें । प्रजा वर्तती स्वधर्मे । वापी कूप तडाग आरामें । नूतन निर्मी भूप तो ॥१२॥
शिवालय विष्णु मंदिरें । धर्मशाळा मठागारें । ठायीं ठायीं अन्नछत्रें । रायें स्थापिली आवडीं ॥१३॥
पुण्यपरायण तो नरेंद्र । राज्यांत नसे दुःखदारिद्र । परमप्रतापी प्रतापरुद्र । सत्कीर्तिध्वज पैं ॥१४॥
जेणें स्वप्रतापें करुनी । जिंकोनि पर्णिली हे मेदिनी । पालाणिली सत्तावसनीं । जो सार्वभौम भूपति ॥१५॥
एके दिनीं वनविहारार्थ । जाता झाला नृपनाथ । सवें सेना असंख्यात । अत्यद्भुत द्ळभार ॥१६॥
असंख्य भद्रजाती । श्रवणीं चामरें डोलताती । सालंकारी मिरवती । घंटाघोष सुशब्दीं ॥१७॥
पृष्ठीं पांखरा तळपती । अनर्ध्यरत्नीं दिव्यदीप्ति । चौफेर झालरे शोभती । चवरडोल मणिमय ॥१८॥
गंगातरंग धवलवर्णी । तेवीं अश्व ते चंद्रकिरणी । सालंकारी वस्त्राभरणीं । रत्नकोंदणीं शोभला ॥१९॥
मनपवनाची संगती । चपळचपळ्त्वें चंचळगतीं । निराळमार्गे ते उफाळती । चौताळती सरोषें ॥२०॥
वीर झुंजार धनुर्वाडे । युध्दीं न पाहती मागेंपुढें । वीरश्रीचे पडिपाडें । परमगाढे शस्त्रास्त्रीं ॥२१॥
ब्रीदावळी मकरध्वज । सुवर्णतगटी तेजःपुंज । सेनासमुद्रीचीं जाहाजें । तेवी रथ ते दिसती ॥२२॥
बंदीजन ते यश वर्णिती । अत्यद्भुत जयाची सत्कीर्ति । वेत्रपाणि पुढें धावती । त्रिजगतींही न समाये ॥२३॥
निर्जरसह पाकशासनी । जेवीं जातसे नंदनवनीं । तेवीं राजचूडामणि । नगरगर्भी मिरवतसे ॥२४॥
शस्त्रधर लघुयंत्रधारी । तो बृहच्छब्द न माये अंबरी । उल्हाटयंत्रे त्यामाझारीं । धूम्र दाटे दशदिशें ॥२५॥
लागली वाद्यांची धुमाळी । नाद न माय महीमंडळी । दुंदुभि तुरें एक वेळीम । वाजों लागलीं तत्समयीं ॥२६॥
मनासवें इंद्रियें असतीं । कीं रवीसवें सकिरणदीप्ति । तेवीं सेनेसह नृपति । जाता झाला वनक्रीडे ॥२७॥
राव आरुढे हेमस्यंदनी । सुखासनीं पिंगळा राणी । सूर्यपानें सूर्यकिरणीं । तळपताती सतेज ॥२८॥
इंदुसम ढाळिती चामरें । रत्नजडित सुवर्णछ्त्रें । कळस झळकती जेवी नक्षत्रे । चित्रविचित्र पैं ध्वज ॥२९॥
पाहूं पातल्या पौरजयुवती । राजदर्शनाचिये आर्ती । उपरी वळंघोनि विलोकिती । सौंदर्य ऐश्वर्य रायाचें ॥३०॥
जै जै शब्दाचे बोभाटी । सुमनें वोपिती राजमुकुटीं । नीरांजनें रत्नताटी । अक्षयवाणें करिती पैं ॥३१॥
उभयभागी नगरजन । उभे ठाकती कर जोडून । भूप निरखोनि करिती गमन । जेवीं विबुध इंद्रातें ॥३२॥
यावरी रावचूडारत्न । प्रवेशला रम्य कानन | तरु फुललें सफळ सघन । वनश्रीतें शृंगारी ॥३३॥
निंब जंबीर औदुबर । कदंब सलंब निविरसंभार । बदरी बकुळी दाळिंब समग्र । नभस्पर्श इच्छिती ॥३४॥
अशोक अश्वत्थ देवदार । कुंद माकंद मांदार । चंदन रातांजन सुंदर । गगनचुंबनीं मिसळले ॥३५॥
अठरा भार वनस्पति । प्रफुल्ल वनश्रीसंपत्ति । शृंगारवनवधूचा पति । कुसुमाकर शोभला ॥३६॥
आंवळी पोफळी नारळी । सुवर्णकर्दळी सारफळी । फणस अंजीर सदाफळी । शर्करानिंबें नारिंगें ॥३७॥
जेवीं अल्पविद्यागर्वित । तेवीं ताड वंश मदोन्मत्त । एक सद्विद्यें अतिविनीत । तरू डोलत सनम्र ॥३८॥
कीं पुण्यश्लोक पाहून नृपती । द्रुममस्तकें आंदोलिती । वायुवेगें वृक्ष डोलती । धन्य मानिती मज गमे ॥३९॥
पिक पिंगळे शब्द करिती । शुक साळया संवादती । शिखी स्वानंदें नाचती । बक चक्रवाक सुपक्षी ॥४०॥
जळसंघाट पाटप्रवाह । पाटमळे स्थळ अपूर्व । सुमनवाटिके सुगंध वाहे । गुंजारवे षट‌‍पदीं ॥४१॥
यापरी निरखूनि वनगौरव । क्षणेक स्थिरावला धरादेव । पुढें जातां घोर अटव्य । विलोकिता पैं झाला ॥४२॥
वनीं वनचरांचे संभार । वृक व्याघ्रादि रीसे सूकर । पृष्ठी लागती अश्वभार । परम आवेशेंकरोनियां ॥४३॥
मृगापाठीं धावती श्वान । पक्ष्यांवरी झडपिती श्येन । नकुळ सरोषेंकरुन । सर्पामागें लागती ॥४४॥
वागुरा उभवोनि चौफेर । पाश पसरिले पृथ्वीवर । चाप टणत्कारोनि निर्धार । पारधी मारी शरघायें ॥४५॥
जेवीं अकाळकाळीं प्राप्त मृत । तेवी ससाणे मारिती अडजातें । चिते चपेटिती वनचरातें । परमनिघातेंकरुनी ॥४६॥
वीर मारिती पंचानन । शोधिती वनउपवन । पशु पावती परत्रभुवन । अगणित गणने न येती ॥४७॥
तों अकस्मात कुरंगे । नृपें त्यागोन चातुरंग । पृष्ठी धावती तुरंग । एकाएकीं एकला ॥४८॥
दूर ना समीप दिसे मृग । राव निरखिता होय सवेग । करिता झाला पाठिलाग । मावें भरुन भूप तो ॥४९॥
जेवीं मायामृग देखून । त्वरें जाय रघुनंदन । कीं नळें कलिपक्षी लक्षून । जाय तेवी भूप तो ॥५०॥
रायें वोढोनि मार्गण । मृग मारिला न लगतां क्षण । तो होवोनि गतप्राण । स्वर्गभुवनातें पावे ॥५१॥
तंव मृगी पातली तेथ । देखोनि प्राणेशप्राणांत । पशु होऊनि सहगमनार्थ । येती झाली ते काळीं ॥५२॥
मृगशृंगेंमुखेंकरुन । ऊर्ध्व करिती झाली हरिण । त्रिवार घालून प्रदक्षिण । किराण सत्राणें मारिलें ॥५३॥
शरीर पडतां शृंगावरी । उदर फुटोनि शृंगें बाहेरी । येती झाली ते अवसरीं । प्राणा मुकली हरिणी ते ॥५४॥
रायें चोज देखोन दृष्टी । आश्चर्य करी आपुले पोटी । म्हणे पशु होऊन मृगासाठीं । प्राणत्याग पैं केला ॥५५॥
होणार तैसी बुध्दि होय । उपाय योजितां होय अपाय । जय किंवा पराजय । भविष्य कांहीं नेणवे ॥५६॥
आमंत्रणाचेनि मिसें । अंध देखणें येती सरसें । तेवीं सुखदुःख आपैसें । वाढोवाढी ज्यापरी ॥५७॥
रायें विचारोनि मानसी । म्हणे हें चरित्र दाऊं पिंगळेसी । सवेंचि प्रेरी सेवकासी । शीघ्र राणी आणिजे ॥५८॥
तों पिंगळा पातली सत्वर । तीतें निवेदी वृत्त समग्र । पुन्हा देत प्रत्युत्तर । विचारश्रेष्ठा अवधारी ॥५९॥
परपुरुष हा वैश्वानर । यासी सप्राण अर्पितां शरीर । तरी हाही धर्मव्यभिचार । नव्हे धर्म स्त्रियांचा ॥६०॥
अग्निसंगें निमिष एक । कृत्तिका सगर्भ झाल्या देख । जन्मलासे स्वामी कार्तिक । षडानन शिवपुत्र ॥६१॥
एक बलात्कारेंकरुन । पतीसवें करिती शय्यागमन । तरी ती आत्महत्या जाण । निंद्य धर्म स्त्रियांचा ॥६२॥
अग्निघात शस्त्रघात । जळघात मौळघात । येणेंचि घडे प्राणांत । यांत आश्चर्य कायसें ॥६३॥
वल्लभा म्हणे हेंचि प्रतिज्ञावचन । जरी भर्ता पावता निधन । हाहाकारुनियां स्मरण । प्राणत्याग करीजे ॥६४॥
तरी त्या पतिव्रता निश्चित । येर त्या स्त्रिया सजीव प्रेत । पतिदुःखें ज्या दुःखित । भ्रतारसेवेंत निरत ज्या ॥६५॥
चमत्कारुन नृपति मनीं । मंदहास्य मौनवदनी । परम विस्मय करोनी । राव राहे निवांत ॥६६॥
यापरी परिसोनि उत्तर । परीक्षाभावें ह्रदयांकुर । वाढता झाला तरुवर । विनोदरुपें सपुष्पीं ॥६७॥
यावरी रावचूडामणि । सेनेसह पातला भुवनीं । सवें असे पिंगळाराणी । पतिव्रता सती ते ॥६८॥
कांहीं लोटतां पक्षमास । तों भवितव्याचा प्राप्त दिवस । कदा न चुके ब्रह्मादिकांस । बुध्दिभ्रंश नृपातें ॥६९॥
दुसरेनि मृगया लागून । भूप निघे दळसंपन्न । लंघिता झाला घोर कानन । पशुपक्षी मारीत ॥७०॥
ऋणानुबंधाची सरतां अवधि । तदनुसार उपजे बुध्दि । विधिनिर्मित जें प्रारब्धीं । नोहे कधीं अन्यथा ॥७१॥
नळयुधिष्ठिरें खेळून पाश । राज्य त्यागून गेले वनास । तेवीं बुध्दि झाली नृपास । साहसयुक्ति योजिली ॥७२॥
असो मारिले मृगत्रय । नृप विनोद करी अभिनव । पिंगळेचा पाहे निश्चय । उपाय काय योजिला ॥७३॥
आणूनि सुवर्णपात्र । मग रुधिरें तिवोनि वस्त्र । माजीं ठेविले मृगनेत्र । क्रिया कृत्रिम करीतसे ॥७४॥
पाचारुनि भृत्य धूर्त । तयातें नृप आज्ञापित । तुवां जावोनि वृत्तांत । पिंगळेतें निवेदी ॥७५॥
सांगें मृगया खेळतां वनांतें । राव निमाला व्याघ्रघातें । यापरी वार्ता जाऊन तेथें । ममाज्ञेनें सांगावी ॥७६॥
असत्याचें करुन सत्य । तरीच विश्वासू माझा भृत्य । कृत्रिमाचें करुनि सत्य । तीतें चोजवी सुजाणा ॥७७॥
स्वामीचे कार्यास्तव । न धरीं असत्याचें भय । माझें तूंतें त्रिवार अभय । पुढें वैभव पावसी ॥७८॥
पाहे श्रीकृष्णाचें वचन । युधिष्ठिर वदे नरवारण । तेवीं माझी आज्ञा तुज प्रमाण । वेदवाक्यासारिखी ॥७९॥
राज्यकार्याकारण । वेचिती सर्वस्वें जीवप्राण । तरी तुवां तेथें जाऊन । कार्यसिध्दि करावी ॥८०॥
राजाज्ञा शिरसावंद्य । संशय न धरी न म्हणे निंद्य । कार्य करोनि येसी साध्य । तरीच धन्य दास तूं ॥८१॥
येरु आज्ञा वंदून । करिता झाला शीघ्र गमन । सत्वर पावला राजभुवन । राजकांता जे स्थळीं ॥८२॥
तंव ते बैसली वृंदावनीं । राजभार्या लावण्यखाणी । सदा निरत पतिसेवनीं । दृष्टि देवोनि नासाग्रीं ॥८३॥
जेवीं गौरीवेष्टित । सिध्दींचें वृंद दिसत । तेवीं दासी समस्त । उभ्या सेवेंत असती ॥८४॥
वदनवर्जित सेवक निकटीं । उभा ठेला अधोदृष्टीं । सरक्त वसनें रत्नताटीं । पुढें ठेवी सदुःखी ॥८५॥
म्लान शरीर म्लान वदन । सद्गद कंठ सजल नयन । ऐसें पिंगळेनें अवलोकून । भ्रूसंकेतें पुसतसे ॥८६॥
तंव्व तो स्फुंदोन रुदन करी । कांही न वदे ते अवसरीं । येरी होवोनि घाबरी । पुसे सती तयातें ॥८७॥
दास उदास देखोन चिन्ह । परम भयाभीत होऊन मन । संशयसमुद्रप्रवाही जाण । पडती झाली ते समयीं ॥८८॥
तंव तो वदे ऐक जननी । राव मारिला व्याघ्रें वनीं । तदंगवसनें पाहे नयनीं । विलोकुनी वोळखी ॥८९॥
एकचि झाला हाहाःकार । दुःखार्णवाचा लोटला पूर । रुदन करिती नारीनर । नगरवासी सर्वही ॥९०॥
ते महापतिव्रता सती । अंतरदृष्टीं पाहे चित्तीं । परीक्षा पाहे माझी नृपति । विनोदें कसोटी घेतसे ॥९१॥
म्हणे प्राणप्रियाचे पायांवरुन । प्राण करीन निंबलोण । आज अथवा शतामरण । मृत्यु पण चुकेना ॥९२॥
जेवीं वायुवेगें कर्दळी । उसळोनि पडे भूमंडळीं । कीं चपळा प्रळयकाळीं । भूमंदळीं पडतसे ॥९३॥
गतप्राण झाले शरीर । सहचरी धावे ते एकसरें । प्रजेसी दुःखाचे गिरिवर । एकदाचि कोसळले ॥९४॥
सुभटवीर्या सांगती मात । ऐकोनि वोढवला अनर्थ । प्रजा करिती परम आकांत । अतिआक्रोशेंकरोनी ॥९५॥
समारंभें मंगळतुरीं । सौभाग्यभूषणें अर्पिती नारी । हरिद्राकुंकुमें अंबरी । उधळिताती सपुष्पें ॥९६॥
सुगंधद्रव्य रंगचूर्ण । सुगंधपुष्पें सुवर्णसुमन । विखरून टाकिती दिव्यरत्न । कांचनमुद्रा ते वेळीं ॥९७॥
प्रेत संभ्रमें क्षिप्रेतीरीं । आणिते झाले ते अवसरीं । चंदनचिता कर्पूरकस्तुरी । बिल्व तुळसी काष्ठें पैं ॥९८॥
कुणपास स्नान करवोन । हरिद्राकुंकुमें लेपवून । प्रज्वाळिला द्विजमूर्ध्न । विध्युक्तविधिमंत्रें ॥९९॥
शिबिरें उभवूनि स्मशानीं । राहाते झाले ते स्थानीं । इकडे राजसेवकांनी । वर्तली वार्ता सांगितली ॥१००॥
ऐकोनि दचके राव चित्ती । पाहूं गेलों जों प्रचीती । आपुलाचि घात आपुले हाती । स्वयें केला निश्चयें ॥१॥
स्वअपराधातें राव विचारी । मीच झालों आपुला वैरी । स्वहस्तें काळजी सुरी । विनोदार्थी घातली ॥२॥
आपुलें अपूर्व रम्य सदन । विनोदें लाविला त्या कृशान । कीं विषप्रचीती पाहूं म्हणून । दुर्धर विष सेविलें ॥३॥
कीं कपाळशूळाचेनि व्यथे । व्याघ्र आरंबळे वनांत । तेवीं दुःखें आरंबळे नृपनाथ । शोकार्णवीं बुडाला ॥४॥
प्रधान करिती शांतवन । परि न मानी जयाचें मन । राव म्हणे हे भगवान । काय अंत पाहसी ॥५॥
ऋणानुबंध आज सुटला । ब्रह्मसूत्ररज्जु तुटला । मृत्यु येऊनि झगटला । उपाय खुंटला सर्वही ॥६॥
राव दुःखें झाला दीन । राहुग्रस्तेंदुवदन । म्हणे तुजवीण राज्य तुच्छ सदन । वदन दावी पिंगळे ॥७॥
हुंहुं म्हणोनि हय । वाग्दोर तुटोनि सैरा जाय । नृप होऊन विगतधैर्य । कांही उपाय सुचेना ॥८॥
हा धूम्र पिंगळेचा म्हणून । घेत वक्षस्थळ बडवोन । अट्टाहास्ये कारी रुदन । अवलोकीत दिशा दाही ॥९॥
संचित चितेचिये निकटीं । राव पातला उठाउठीं । गडबडा लोळे पृथ्वीतटीं । म्हणे परमेष्ठी काय हें ॥११०॥
अरे विधारया विश्व सृजिलें । परि माझे पारब्धी लिहिलें । ही वज्ररेषा कदा न टळे । ध्रुवनिश्चय असे की ॥११॥
पूर्वसंचिताचें हे फळ । तरी तुजवरी कायसा बोल । क्रियमाण क्रियेसी आलें । भोगिल्यावीण न सोडी ॥१२॥
तो कल्पांतप्रळय प्राप्त झाला । प्रजा प्रधान ते वेळां । दुःखाचा प्रळयानळ धडकला । तो शांत कैसा होईल ॥१३॥
राव वदे प्रधानासी । राज्याभिषेक करी सुभटासी । गंतव्य करी नगरासी । आज्ञा प्रमाण पैं माझी ॥१४॥
जे स्थळीं गेली पिंगळा । तें स्थळ पाहीन आजि डोळां । कैलासीचा सुखसोहळा । कैसी भोगील एकटी ॥१५॥
पिंगळा विरहानळें पाही । भूपास दाहाती दिशा दाही । तळमळ करी सर्वदाही । कांही न सुचे तयातें ॥१६॥
चितेभोवतें फिरोन । रक्षेस देत आलिंगन । हाहा पिंगळें म्हणोन । श्वासोच्छावस टाकीत ॥१७॥
अमर्याद विरहाब्धि फुटी पाहे । पिंगळे म्हणोनि बोभाये । विरहबाण मज न साहे । घायें घायाळ जाहलों ॥१८॥
पिंगळे तुझे आंदोलनीं । हार न साहे मजलागोनी । ह्र्दयीं रुपती म्हणोनी । त्यागीत होतों गुणज्ञे ॥१९॥
जन वदती तये वेळाम । नृपा स्मशानी संचार झाला । कीं स्मशानवैराग्य तयाला । झालें ऐसें वाटतें ॥१२०॥
एक वदती राजवार्ता । कदा न बोलावी सर्वथा । भविष्य होणार अन्यथा । कैसें होईल जाण पां ॥२१॥
हें पिंगळे निष्ठूर कैसी । आजि झालीस तूं मानसीं । कीं उबग मानून गेलीसी । सक्रोध होऊन मजवरी ॥२२॥
पिंगळे ऐसें आतां रत्न । कैं पाहीन मी लोचन । अहा पिंगळे म्हणोन । चितेभोवता फिरतसे ॥२३॥
कामवैराग्य पडला व्यसनीं । जेवीं विष्णु वृंदेस्मशानी । तेवीं भर्तृहरीलागोनी । पिंगळेचा निजच्छंद ॥२४॥
कीं सीतावियोगें रघुनंदन । आलिंगीत वृक्षपाषाण । अहा जानकी म्हणोन । वेधें वेधला श्रीराम ॥२५॥
पाहा ऋतुपर्णाचे सदनीं । दमयंती स्मरे अनुदिनीं । हाहा दमयंती म्हणोनी । वोसणावे नळ नृप ॥२६॥
तेवीं झाले भर्तृहरीतें । सदा स्मरे पिंगळेतें । अहा पिंगळे मज वनातें । त्यागून गेलीस एकटी ॥२७॥
असो बुडतां भवार्णवांत । तारूं धावले सद्गुरुनाथ । तों गोरक्ष अकस्मात । येते झाले स्वइच्छें ॥२८॥
दुरी राहोनि क्षण एक । पाहता झाला नृपकौतुक । पिंगळे म्हणून देत हाक । सुख स्मरोनि सदुःखें ॥२९॥
अहा पिंगळा पीनस्तनी । अहा पिंगळा विलोलनयनी । अहा पिंगळा सुरतरमणी । अहा पिंगळा तन्वंगी ॥१३०॥
अहा पिंगळे सुखसौभाग्य । अहा पिंगळे शुभशुभांगे । अहा पिंगळे स्वरुपसुभगे । कुरंगनेत्री पिंगळे ॥३१॥
अहा पिंगळे पीनपयोधरी । अहा पिंगळे बिंबाधरी । अहा पिंगळे कुलोध्दारी । परमप्रिय पिंगळे प्राणप्रदे ॥३२॥
अहा पिंगळे प्राणप्रमदे । अहा पिंगळे सुरतसुखदे । अहा पिंगळे सुधाशब्दे । पिंगळें प्रमदे प्रिय तूं ॥३३॥
अहा पिंगळे कमळनेत्रे । अहा पिंगळे चारुगात्रे । अहा पिंगळें सुपवित्रे । प्राणप्रिये त्यागिसी ।\३४॥
जो लीलाविग्रही भगवान । चरित्र करी न लगतां क्षण । करी कुमंडलीं पाणिग्रहण । स्वयें स्वलीलें पैं ॥३५॥
तेथें एकट निकट तिष्ठोन । विस्तीर्ण पाहून पाषाण । कराग्रीहूनि कुंडली पतन । भग्न होवोनि पडियेली ॥३६॥
अहा कुमंडली प्राणरक्षनी । अहा कुमंडली वपूपोषणी । अहा कुमंडली तृषाहरिणी । भूषणी तूं होसी ॥३७॥
अहा कुंमंडली वैराग्यजननी । तुझेनि कुमंडली तृप्त जीवनीं । अहा कुमंडली म्हणोनी । गोरक्ष वदनी विलपती ॥३८॥
अहा कुमंडले म्हणोन । स्वयें घालीत प्रदक्षिण । वारंवार कुमंडल स्मरण । कुमंडली सव्य घालीत ॥३९॥
राव वदे अहा पिंगळे । गोरक्ष वदे अहा कुमंडले । नृप गोरक्षातें बोले । विनोद करिसी जोगडया ॥१४०॥
तूं भिक्षुक दीन तापसी । मज भर्तृहरीसी स्पर्धा करिसी । काय योजिलें त्वां मानसी । चेष्टा करिसी श्रेष्ठाची ॥४१॥
तुझी तुंबडी तुंबिनीची । पालट देईन सुवर्णाची । परि मज पिंगळा कैची । भेटी देईल वल्लभा ॥४२॥
ऐक राया निश्चयेसी । तुझी पिंगळा शरीर शोषी । माझी तुंबडी काया पोसी । हें तूं नेणसी नरेंद्रा ॥४३॥
तुझी पिंगळा भवाब्धी बुडवी । हे तुंबडी भवाब्धी तरवी । हे कैवल्यसुखातें गौरवी । शिवचि करवी जीवातें ॥४४॥
स्त्रीरुपें हे काळसर्पिणी । कंठी झोंबली विषसर्पिणी । शक्तिहरिणी रुधिरशोषिणी । धनसर्वस्वहरणी हे ॥४५॥
इचें विष परमदुर्धर । विषयांध होती नर पामर । भुली पाडी अतिदुस्तर । विषयगरळा विषवल्ली ॥४६॥
स्वधर्माचरण शर्करापय । कटु वाटे त्या निश्चय । क्षारनिंबमिष्टविषय । मृत्यु अपाय हाचि की ॥४७॥
प्रत्यक्ष स्त्रीरुपें राक्षसी । दंतेंव्विना भक्षी नरासी । रक्तमांसत्वचा शोषी । अस्थिपंजरीवरी बैसे ॥४८॥
परि पिंगळेचा नृपासी छंद । वारंवार करी खेद । म्हणे पिंगळे मुखारविंद । दावी मज गे षट्‍पदा ॥४९॥
जेवी मातेस छंद घे बाळ । माता पुरवी तयाचे लळे । तेवीं सकृप दीनदयाळ । होते झाले ते काळी ॥१५०॥
ऐक भर्तृहरि एक उपाय । माझे वचनीं धरीम निश्चय । तूं त्रिवार पिंगळेतें बाहे । हाचि उपाय तव सिध्दी ॥५१॥
ऐसें ऐकोनि तये वेळीं । दीर्घस्वरें हाक फोडिली । कोटि चपळा सुतेजाळी । कडकडोनि प्रगटल्या ॥५२॥
गोरक्षप्रताप परमाद्भुत । पिंगळा प्रगटल्या असंख्यात । एकसारिख्या एक समस्त । कांहीं द्वैत असेना ॥५३॥
एकासारिख्या एक दिसती । तिळप्राय भिन्न न दिसती । योगमायेची विचित्रगति । ब्रह्मादिकां न कळे ॥५४॥
जेवीं आदर्शनिकेतनीं । एकचि अनेक दिसती नयनीं । तेवीं नृपें अनेक भामिनी । पिंगळारुपें देखिल्या  ॥५५॥
गोरक्षकृपेचा नीरद । वृष्टि करीतसे अभेद । पिंगळा विशद बुद्बुद । अगाध प्रताप जयाचा ॥५६॥
कीं ब्रह्मापासून जगदाकार । कीं ओंकारापासोनि शब्दाकार । कीं वत्त्क्या पासोन शब्दालंकार । तेवीं दिसे पैं ॥५७॥
रुपें गुणें गुणसंपन्न । याहुन देवांगना तल्लीन । अष्टनायका म्हणती धन्य । म्हणती अन्य दिसेना ॥५८॥
असो गोरक्ष अभतवचन । असंख्य पिंगळा निर्माण । विबुध विमानांतून सुमन । गोरक्षमस्तकीं वोपिती ॥५९॥
राव चाकटला पाहोन नयनीं । खुणें लक्षितां संपूर्णचिन्हीं । सालंकारीं लक्षणीं । वस्त्रालंकारीं देखिल्या ॥१६०॥
गोरक्ष वदती ऐक नृपति । वोळखोन पिंगळ धरी हातीं । राव विस्मित होय चित्ती । नमन करी साष्टांग ॥६१॥
आपुली पिंगळा आपुले सदनीं । घेऊन बैसे राज्यासनीं । सत्कीर्ति मिरवी हे मेदिनी । स्वस्थ जाईं स्वस्थानीं ॥६२॥
राव विनवी कर जोडून । सुधा सांडून विषप्राशन । ऐसा मूर्ख असेल कोण । जाणत असतां नेणता ॥६३॥
इंदिरा होतां सुप्रसन्न । मग कोण भोगील दरिद्रदैन्य । किंवा सांपडतां दिव्यरत्न । मग पाषाण कासया ॥६४॥
हातींचा त्यागून परिस । मग कासय सुवर्णसायास । प्रत्यक्ष भेटतां व्योमकेश । मग सांडणें भूतांस कासया ॥६५॥
कैचें राज्य कैची भार्या । इंद्रजाळवत्‍ प्रपंचमाया । गेला जन्म व्यर्थ वायां । श्रीगुरुपायांवांचोनी ॥६६॥
चौर्‍यांशीं लक्ष जन्ममाळा । त्यांत नरदेह मेरु आगळा । यांत आत्मत्वीं चुकला । पतन पावला निश्चयें ॥६७॥
पुरे पुरे हें राज्यसुख । अमृत त्यागून न घे विख । कस्तुरी सांडोनि घे राख । दुःखशोक प्रपंचीं ॥६८॥
जेवीं छंद घेऊन अर्भकें ।  मातेस मागे विषयभातुकें । त्याचे लळे पुरवी कौतुकें । तेवीं झकविता मजप्रति ॥६९॥
ब्रह्मींचें साम्राज्य द्यावें स्वामी । या ऐहिक राज्यास काय करुं मी । म्हणोन गोरक्षातें प्रणामी । वारंवार नरेंद्र ॥१७०॥
ज्ञानोदयाचा होतां प्रकाश । अज्ञान -अंधकाराचा होय नाश । जेवीं नक्षत्रें होतीं अदृश्य । तेवीं पिंगळा विराल्या ॥७१॥
कीं विवेकें विरती कल्पणा । कीं मनोन्मनी विरती वासना । तेवीं पिंगळाभास नाना । अंतर्धान पावल्या ॥७२॥
तंव उत्तरीय वस्त्र फाडून देख । गळां घालून लाविली राख । शब्द गाजवून अलख । उपदेशभीक मागतां ॥७३॥
मुकुटकुंडलें झुगारिलीं । नवरत्नांची माळा तोडिली । राज्यसंपदा त्यागिली । तुच्छ मानून सर्वही ॥७४॥
निश्चय निरखूनि निश्चळ । कळवळी भक्तवत्सल । वर देते झाले अचळ । न चळे वचन कल्पांतीं ॥७५॥
यावत्‍ चंद्रसूर्यधरित्री । तावत्‍ चिरंजीव भर्तृहरि । ऐसी वदली वैखरी । गोरक्षाची ते वेळीं ॥७६॥
नाथदीक्षा परमपावन । गोरक्षहस्तें करी ग्रहण । शैली शृंगी काषायवसन । मेखळाभूषण भस्मांगीं ॥७७॥
श्रवणीं दिव्यमुद्रा तळपती । उपदेशी तो भूपती । उर्वीवरी झाली कीर्ति । अद्यापि गाती सर्वत्रही ॥७८॥
रघुवीर होऊन वीतरागी । अयोध्येचें राज्य त्यागी । भस्म चर्चून झाला योगी । जतामुकुट मस्तकीं ॥७९॥
तैसा भर्तृहरी पाही । राज्य त्यागूनि झाला विदेही । गोरक्षकृपें अद्यापिही । चिरंजीव जाहला ॥१८०॥
हटयोग षट्‍चक्रें भेदून । खेचरी मुद्रा अवलोकून । सहस्त्रदळीं होऊन लीन । ब्रह्मरंध्रीं स्थिरावे ॥८१॥
भर्तृहरिगुहा उज्जनीक्षेत्रीं । अद्यापि पाहती सर्व नेत्रीं । महिमा काय वदूं वक्त्रीं । क्षेत्रमहिमा तेथींचा ॥८२॥
भर्तृहरिनाथाचें आख्यान । भावें करितां श्रवणमनन । आयुरारोग्यऐश्वर्यवान । गोरक्षदर्शन होय त्या ॥८३॥
हा अध्याय सर्वात श्रेष्ठ । प्रत्यक्ष महाकाळ नीळकंठ । याचा केलियानि पाठ । दुर्घट संकट नाशी हा ॥८४॥
हे कामदुग्धा भर्तृहरि-आख्यान । सत्रावीचें करवी पान । येणेंचि साध्य सर्व साधन । तो हा अध्याय सत्रावा ॥८५॥
ज्याचे गृहीं नाथलीलाग्रंथ । तेथें कदा न राहे भूतप्रेत । हा अध्याय जो पठण करीत । श्रेयस्कर होय त्या ॥८६॥
यक्षराक्षस सर्पभय । तया न बाधी गोरक्षअभय । या वचनीं धरितां निश्चय । तया सफळ सिध्दि ॥८७॥
ग्रहगंडांतर योगशमन । सर्वविजय जयसंपन्न । सुख ऐश्वर्य क्षेमकल्याण । सफळ साधन तयाचें ॥८८॥
श्रीमत आदिनाथलीलाग्रंथ । साध्यसाधक हा परमार्थ । भैरवपदीं आदिनाथ । सप्तदशांतें वंदिलें ॥१८९॥

N/A

References : N/A
Last Updated : February 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP