मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीनाथलीलामृत| अध्याय १९ वा श्रीनाथलीलामृत प्रस्तावना अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा श्रीनाथलीलामृत - अध्याय १९ वा नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे. Tags : adinathagorakshanathaआदिनाथगोरक्षनाथ अध्याय १९ वा Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः ॥ श्री नमो स जयजयाति । जिचेनि चराचर आलें व्यक्ती । आदिपुरुष आदिशक्ति । ते प्रकृतीपुरुष वंदिलें ॥१॥जो आदिमध्यअवसानरहित अजअजितअव्ययविरहित । जो होय त्रिगुणातीत । आभासभास वेगळा ॥२॥असो गतकथाध्यायीं कथासंबंध । कूपीं टाकिला महान सिध्द । राजमाता करी खेद । शोध कांहिं न लागे ॥३॥दुर्बुध्दीनें वरिला नृपाळ । दुर्दशेची सूदली माळ । सद्बुध्दि भाजा केवळ । कीर्ती रुसोनि जातसे ॥४॥अज्ञानतिमिरनिशा दाटली । दुर्बुध्दीची निद्रा आली । गाढमूढ अति दाटली । मुमुर्षुसक्त होऊनी ॥५॥पूर्वपुण्याचा अभ्युदय । तेवी होतसे भास्करोदय । नित्यनैमित्त सारुन पाहे । राव होय जागृत ॥६॥प्रभातकाळ करी जागृत । घडियाळघटका झणत्कारित । परि अज्ञानसक्त निद्रिस्त । न होती जागृत कदाही ॥७॥ऐसा होतां प्रातःकाळ । सभेस पातला तो भूपाळ । कुळाभिपट्ट अढळ । तयावरी आरुढला ॥८॥दुरभिमानाचा माथां मुकूट । गर्वावतंस खोविला सधट । मीपणाचा तिलक सुभट । मदमृगमद रेखिला ॥९॥दुःखउद्वेग कुश्रवणीं । आक्रोशतांबूल रंगला वदनीं । प्रलापचंदन भूषणीं । विकल्प परिमळगंध पैं ॥१०॥अविद्येची एकावळी । चिंतापदक वरी झळाळी । तळपत तळमळ तेजागळी । षडविकारें तळपती ॥११॥लोलुप्य तेचि केयूरभूषण । अर्चनहीन अदातृत्वकंकण । अनेक संशय मुद्रिका जाण । अंगुळींत मिरवल्या ॥१२॥पदीं निंदेचा तोडर । अहंपणाचा शब्द गजर । सिध्दस्पर्धा निरंतर । नेपुरवाद्य सघोषें ॥१३॥अविचारचीर परिधान । विकाराचें उत्तरीवसन । अज्ञानखर्ग करभूषण । हिंसा तेजें लखलखीत ॥१४॥अविद्येचें वोडण करीं । गुप्त कटीं वासना सुरी असंतोषछ्त्र वरी । प्रपंचचामरें ढळतातीं ॥१५॥दुर्वासनेचें लघुचीर । रजतमविभागी वेत्रधर । उभे उभय निरंतर । रायापुढें तिष्ठती ॥१६॥आशातृष्णेचें होत नृत्य । षडविकारराग सुसंगीत । चिंतालाप आलापीत । मूर्छत करिताती ॥१७॥यापरी लोटतां कांहीं दिवस । एके दिवशीं तो नरेश । अंतःपुरी अनायास । नित्याभ्यासें येतसे ॥१८॥तो परात्पर परसांत । राजमाता पांच मंदिरी निवांत । सप्तखण दामोदरांत । द्विदळ द्वारीं पाहतसे ॥१९॥मलयाचळ संभूत चंदन । चौरंगीं बैसे नृपनंदन । स्त्रिया तल्लीन पाहून वदन । तिष्ठताती सेवेतें ॥२०॥अगरअर्गजासुगंध बहुत । सुवासतैलाभ्यंग करीत । लावण्यलतिका स्वहस्तें । नृपांगातें मर्दिती ॥२१॥गौरवर्ण निरखिली पृष्ठी । मुक्ताजाळी वीरगुंठी । अकस्मात गेली दृष्टि । मैनावतीची ते काळीं ॥२२॥तनु तप्तसुवर्णदीप्ति । अगम्य लावण्यव्यक्ति । दुजा शोधूं जातां जगतीं । भुवनत्रयी असेना ॥२३॥मनीं विचारी राजजननी । ऐसाचि त्रैलोक्यचंद्र चूडामणि । तोही पडला मृत्युव्यसनीं । विचित्र करणी काळाची ॥२४॥जो अरळ सुमनांचे शेजेवरी । निद्रा करणार दिवारात्रीं । तों स्मशानीं चितेवरी । भस्म झाला क्षणांत ॥२५॥तैसा हा पुत्र रुपावंतस । परि मृत्युमुखीं होईल ग्रास । तेणें सुदुःखित मानस । कुमारमोहें कळवळली ॥२६॥सदुःखें अश्रु स्त्रवती । नेत्रोदकाचे बिंदु पडती । नृपस्कंधीं निश्चिती । अकस्मात पडियेले ।\२७॥जळबिंदु पृष्ठीं पतन । होतां जाणवे नृपनंदन । चतुर्दिशा विलोकून । आश्चर्य करिता जाहला ॥२८॥वृक्ष पक्षीं नसतां घन । जळबिंदु पडिलासे कोठून । पुन्हा ऊर्ध्व पाहतसे जाण । तों स्वमातेतें देखिलें ॥२९॥आरक्तता लेऊन नयनीं । सजल लोचन म्लान आननीं । रुदन करितां देखिली जननी । विस्मित मनीं होतसे ॥३०॥म्हणे अंबे मर्यादवेली । दुःखाब्धीनें कां उल्लंघिली । मज चिंता उदेली । ह्रदयामध्यें आजि पैं ॥३१॥कोणे मंदिरी अमर्याद । निष्ठुरोत्तरी वाग्वाद । की नगरजनीं जनापवाद । म्हणोन खेद पावसी ॥३२॥जेवी जननीचे कैवारें । निक्षेत्री केली पृथ्वी परशधरें । तेवीं शत्रु मर्दीन सारे । दुष्टां दंडीन प्रतापें ॥३३॥तरी ऐकें पुत्रा त्रिभुवनसुंदरा । चातुर्यवैडूर्यवैरागरा । देखोनि तव तनु सकुमारा । खेद उदेला अंतरीं ॥३४॥तव पिता लावण्यराशी । त्रैलोक्यचंद्र वदती त्यासी । तोही पडिला मृत्युफांसी । दग्ध झाला स्मशानीं ॥३५॥या शरिराचे तीन क्रम । कृमि विष्ठा आणि भस्म । हाचि देहाचा परिणाम । यावीण आन असेना ॥३६॥सुवर्णापरी अंगकांति । परि हुतवदनीं मिळती । अलक तृणप्राय आहळती । अस्थि जळती तडतडां ॥३७॥यापरी देहाचा होय अंत । दारापुत्रीं भ्रांतनिभ्रांत । मोहमंदिरें मदोन्मत्त । परिनाम स्वार्थ नेणती ॥३८॥विषयतरुंचीं उभयफळें । कांताकांचन हीं जावळें की काळकूटाचें जळ सोज्वळ । सेवितां मृत्यु खरा ॥३९॥पाहा व्याळफणीचिये छाये । मुषक मानी सुखावह । की गोरियाचे गायन पाहे । मृगें फांसा पडियेलीं ॥४०॥विषयआमिष विषापरी । मत्स्य गिळितां प्राणा हारी । तैसे जीव भरिले भरीं । हव्यासप्रवाहीं पडियेले ॥४१॥गृह धन पशु जाया सर्व । पुत्र पौत्र राज्यवैभव । काळें विषय घालोनि कव । मायाफांसी गुंतवी ॥४२॥ मृषा मृगजळीं मृग धावती । रानोरान हिंपुटी होती । तैसे जीव हव्यासें गुंतती । परिणाम नेणती मूर्खत्वें ॥४३॥तैसा काळ उशां बैसला जपत । कितीएक पक्षियां श्येन टपत । किंवा बक बैसे निवांत । मत्स्याहार करावया ॥४४॥हिंसक स्कंधी वाहे मेष । तो क्षणिक होत अतिसंतोष । परि परिणामीं प्राणनाश । भविष्य नेणे ज्यापरी ॥४५॥तरी पुत्रा सुजाण ऐक । हा भ्रांतिभ्रमप्रसर मायिक । नश्वर हें मायिक । जळबुद्वुद ज्यापरी ॥४६॥तव तनु पाहोन कोवळी । अंती पडेल काळानळीम । या दुःखी ह्र्दयीं कळवळी । तुझिये मोहेंकरुनी ॥४७॥राव म्हणे जननिये । जन्मला त्यासी मृत्युभय । महामृत्युचा महाअपाय । यासी उपाय नसेचि ॥४८॥मुळीच मृत्युलोकींची वस्ती । मागें मेले पुढें मरती । य़ाची कायसी करावी खंती । जेवी गभस्ती उदयास्त ॥४९॥अनेक जन्ममृत्यूंचे पंक्ति । मागें झाल्या पुढें होती । कोण अमर झाला क्षिती । तो मजप्रति सांग पैं ॥५०॥बोले मैनावती वचन । कांही केलिया भगवत्साधन । तेनें चुके जन्ममरण । सत्य सत्य त्रिवाचा ॥५१॥भर्तृहरि जारा चक्रवर्ति । शरण गेला गोरक्षाप्रति । तेणें चुकविली पुनरावृत्ति । जन्ममृत्युयातना ॥५२॥श्रीगोरक्षमहाराज । नव्याण्णव कोटी भूभुज । चिरंजीव केले सहज । गुरुप्रतापेंकरुनी ॥५३॥ऐसियाची पडे गांठी । तरी जन्ममरणा होय तुटी । कैवल्यलाभ उठाउठी । प्राप्त होय निश्चयें ॥५४॥ऐसेचि आपलें नगरांत । होते जालंधर गुरु समर्थ । परि आतां कोठें सांप्रत । नाथमहिमा कळेना ॥५५॥जेवीं वसिष्ठ कीं विश्वामित्र । अगस्ति जमदग्नि अंगिरासुत । दुर्वास दुजा भाळनेत्र । तेवी योगींद्र मज गमे ॥५६॥त्याचा महिमा अभिनव । जीवाचा करी तत्काळ शिव । तें सत्सुखाचें राणीव । प्राप्त होय गुरुकृपें ॥५७॥तो जरी असता स्वामी आजी । चिरंजीव करिता क्षणामाजीं । काया वाचा वृत्ति माझी । त्याचे चरणीं गुंतली ॥५८॥कधीं पाहेन त्याचे चरण । जाय पळ निमिष युगासमान । उदास उद्विग्न माझें मन । चैन न पडे क्षणभरी ॥५९॥जिकडे असती सद्गुरुनाथ । तिकडे येवो मजवरी मारुत । तेणें होईन कृतकृतार्थ । मत्स्वार्थ जाण इतुकेनि ॥६०॥कायावाचामनें दासी । त्याची म्हणवितें अहर्निशीं । गुरुपद झाडीन आपुले केशीं । वाहे मानसी आवडीं ॥६१॥गुरुवार्तेचें वर्तमान । श्रवणीं आतुर माझें मन । परि गहन पूर्वप्राक्तन । कोणी वार्ता न वदती ॥६२॥गुरुपदींच्या पादुका । कधीं मस्तकीं वाहीन देखा । पार नसे तया सुखा । गुरुनायका वंदीन ॥६३॥गुरुगृहींची दासानुदासी । धिक्कारीन ते इंद्रपदासी । सदा सादर गुरुपदासीं । स्वानंदराशी भोगीत ॥६४॥भ्रमर येतां पुसे त्यास । तुझा गुरुपदाब्जीं रहिवास । सांगें सद्गुरु कोणे स्थळास । मग पुढारी जाय तूं ॥६५॥गुरुपदकमळींचा आमोद । सेवून धुंद झाला मकरंद । तो न करीच अनुवाद । स्वानंद्छंदें झुंकारी ॥६६॥असो जे आणिले आपुले मंदिरीं । कोठें गेले दीनोध्दारी । मज पाडोनि अंधारी । गुप्त प्रगट नेणवे ॥६७॥अवचट लाभ झाला मजला । अमृतघन सकृप वळला । प्रारब्धवातें दुरावला । वितळोन गेला दुर्दैवें ॥६८॥त्रयोदशवर्षपर्यंत । दर्शनोद्देशें मी व्रतस्थ । न कळे कोठें समाधिस्थ । बैसले स्वस्थ जाउनी ॥६९॥देशांतर फिरत फिरत । सप्तशत शिष्यांसमवेत । येता झाला कानीफनाथ । रावें नृपनाथ असती ॥७०॥सेनासंभारेसी नृपति । सांप्रदायी नाथपंथी । गज सज्जवाजी पदाती । सेवेंत सदा तत्पर ॥७१॥तंव श्रोते करिती प्रश्न । कानीफनाथ हा कवणाचा कवण । करावें जी निरोपण । आर्त श्रवण श्रवनार्थी ॥७२॥तरी परिसा जी एकाग्र चित्ती । मद्रदेशींचा देशाधिपति । सुरथनामें अपारकीर्ति । शांत दांत प्रतापी ॥७३॥तयाची भार्या सुलक्षण । भामिनी नामें अतिलावण्य । उदरीं नसे संतान । सदा उद्विग्न उभयतां ॥७४॥रायें केलें शक्तिआराधन । तत्काळ देवता झाली प्रसन्न । तीतें करी साष्टांगनमन । वरं ब्रूहि वदतसे ॥७५॥येरु प्रार्थी जोडले करीं । मातें पुत्र नसे उदरीं । माते जननी कृपा करीं । पुत्रोद्देशें प्रार्थित ॥७६॥जगन्माता वदे वचन । संततिहीन तव प्राक्तन । अन्य मागें वरदान । तुज मी देईन निश्चयें ॥७७॥पुन्हा प्रार्थिता झाला नृप । असे तव कृपें राज्यवैभव । तव अनुष्ठानाला साक्षेप । संततिइच्छा धरोनी ॥७८॥कल्पतरुनें इच्छिलें फळ । तरी आर्ताचें काय बळ । शरणागताचा प्रतिपाळ । न करितां देव कैसेनि ॥७९॥पुन्हा देवता झाली वदती । संचितीं नसे तुझे संतति । ऐसें वदोनि निश्चितीं । अंतर्धान पावली ॥८०॥यावरी कांहीं लोटतां दिवस । जालंधर पातले भिक्षेस । रायें वंदोनि नाथास । बध्दपाणी विनवीत ॥८१॥भामिनी येऊन लागे चरणीं । प्रार्थितसे दीनवाणी । पुत्रानन पाहून नयनीं । अर्पण चरणीं करीन मी ॥८२॥अवश्य म्हणतसे योगिराज । भस्म देतसे तेजःपुंज । म्हणे पुत्र होईल निश्चयें तुज । अंशावतारी जाण पां ॥८३॥अभयगिरा वदोन वदनीं । जाते झाले दुसरे सदनी । राव विस्मित होय मनीं । म्हणे अघटित केवीं घडे ॥८४॥राववीर्योदक स्वातिजळ । गर्भशुक्तिकेंत सांठवलें । संभवे दिव्य मुक्ताफळ । देदीप्यमान अमौल्य ॥८५॥उत्तरोत्तर लोटतां दिवस । पूर्ण झाले नवमास । पुत्र जन्मला रुपस । बृहस्पतीसारिखा ॥८६॥विशाल भाळ वक्षस्थळ । आकर्ण नेत्र नासिक सरळ । गौरवर्ण कोमळ तेजाळ । सर्व लक्षणीम नेटका ॥८७॥रायें पुत्रोत्साह बहुत केला । आनंदाब्धि उचंबळला । ब्रह्मानंदी सुखावला । हर्ष झाला बहुत पैं ॥८८॥जयवाद्य मंगळतुरीं । शर्करा वांटिती घरोघरीं । मखरें मंडप उभविल्लीं द्वारीं । आनंद अंबरी न समाये ॥८९॥जातकर्म नामकरण । विधियुक्त केलें संपादन । आवडीं ठेविलें नामाभिधान । भद्रसेन विख्यात ॥९०॥गणक ज्योतिषी विद्वज्जन । वस्त्रें भूषणें देऊन धन । संतुष्ट केले याचकजन । सुवर्णमुद्रा देउनी ॥९१॥येतां कुमर दशेंत । चौदा विद्या पारंगत । चौसष्टी कळा सुसंगीत । वेदविशारद होतसे ॥९२॥राव विचारी निजांतरीं । पुत्र करावा राज्याधिकारी । आप्ण जावें वनांतरीं । परत्रसाधना आपुले ॥९३॥सर्वांस मानला विचार । परि भामिनी चिंतातुर । जालंधराचा वरदपुत्र । त्यास हा अर्पावा ॥९४॥प्रधान म्हणती काय अशक्य । तयाचे भार सुवर्ण दे इतुकें । परि सिंहासनीं आवश्यक । सुमुहूर्ते बैसवूं ॥९५॥ज्योतिषी रायातें वदती । उदयीक सुमुहुर्ते अभिजिती । तरी प्रारब्धाची विचित्र गति । होणार निश्चित चुकेना ॥९६॥निशी क्रमितां अकस्मात । राजपुत्र झाला प्राणहत । एकचि झाला आकांत । दुःखसमुद्र फुटला ॥९७॥राव गडबडां लोळत । जेवीं झाला वज्रपात । कपाळ शूळें अरंबळत । महाव्याघ्र जैसा पैं ॥९८॥भामिनी येऊनि तये क्षणीं । मस्तक पिटी उभयपाणी । धबधबां वक्षस्थळ बडवुनी । मृत्तिका वदनीं घाली ती ॥९९॥म्हणे एकुलतें माझें पाडस । परम डोळस अतिरुपस । उडोनि गेला कोठें हंस । दशदिशांसी दिसेना ॥१००॥प्रळय वोढवला अनर्थ । एकचि होतसे कल्पांत । प्रजाजन परम दुःखित । शोका अंत नसेचि ॥१॥राजा मनीं भाव भावी । आराधिली सुप्रसन्न देवी । नृपा परिसें तुझ्या दैवीं । संतति नाहीं निश्चयें ॥२॥परि अगाध सिध्दाचा प्रताप । जालंधर होऊन सकृप । पुत्र दिधला दुजा कंदर्प । वंशदीप उजळिला ॥३॥धिक्कार असो दुष्ट संचित । तों प्रारब्धें सुटला प्रळयवात । झडपोनि नेला अकस्मात । पुत्रशोक मजलागीं ॥४॥अभ्युदयाची पाहाट फुटली । कीं निर्दैवा कमळा भेटली । तेवी जालंधर ते वेळीं । येते झाले अनायासे ॥५॥जेवीं मृत्युग्रस्ता अमृतपान । कीं अवर्षणीं वर्षे घन । तेवीं सद्गुरुचें आगमन । वांछित समयीं जाहलें ॥६॥नृपति घाली लोटांगण । प्रार्थिता झाला दीनवदन । स्वामी दिधलें पुत्रदान । तोही निधन पावला ॥७॥तो अंतरसाक्ष सर्वज्ञ । जाणी भूरभविष्य वर्तमान । तो रायासी वदे वचन । सावधान ऐक पैं ॥८॥पुत्राभिलाष धरोनि मनीं । बैसवितां राज्यासनीं । ईश्वरमायेची विचित्र करणी । केवी मिथ्या होईल ॥९॥स्वअपराधें नृप लज्जित । अधोवदनी विलोकित । जेवीं दिव्य होतां सत्य । होय लज्जित ज्यापरी ॥११०॥अपराध स्पर्शतां आंगी । यास्तव वाग्देवी राहे उभी । तों भामिनी गणी सवेगी । वंदिती झाली नाथातें ॥११॥म्हणे स्वामी दयानिधि । आम्हां कैची निश्चयबुध्दि । सर्वस्वें म्हणवितों अपराधी । पतित त्रिशुध्दि तुमचें कृपें ॥१२॥आम्ही अन्यायी अज्ञानमूढ । याचा अभिमान धरावा दृढ । दीनोध्दार हे पवाडे । पदीं तोडर ब्रीदांचा ॥१३॥अनेक जन्मींचें अघ दुस्तर । निरसे दर्शनें सकृत मात्र । जेवीं शुष्कतृण समग्र । दग्ध करी प्रळयाग्नि ॥१४॥प्रारब्ध असतां निर्फळ । मज वरदें दिधलें पुत्रफळ । परि परिणामीं निष्फळ । हतभाग्य केवळ मी असें ॥१५॥ऐसें परिसोन द्रवलें मन । करिते झाले शृंगीवादन । वामकरें धरोनि श्रवण । निद्रिस्ता जागृति ज्यापरी ॥१६॥विबुध बैसोनि विमानयानीं । वोपिते झाले अपार सुमनीं । मंगळवाद्य जय जय ध्वनि । सर्वां वदनीं जाण पां ॥१७॥उल्हाटयंत्राचे पैं शब्द । शर्करा वाटिती सुख अगाध । ऋषि देती आशीर्वाद । थोर आनंद होतसे ॥१८॥जिंतवणादि दानप्रसंग । राव राहाटे सर्व सांग । कोठें न पडे कांहीं व्यंग । याचकवृंदे तोषवी ॥१९॥असो राजपुत्र तये क्षणीं । मूर्ध्नि ठेवी सद्गुरुचरणीं । मस्तकीं ठेवून वरदपाणि । आशीर्वाद देतसे ॥१२०॥दीर्घायुषी चिरंजीव । अखंड प्राप्त योगवैभव । तव दर्शनें जीव रौरव । चुकोनि गौरव पैं होती ॥२१॥शृंगीवाद्य धरिला कर्ण । यास्तव कानीफनाथ नामाभिधान । मूळ मंत्र उपदेशून । दीक्षा ग्रहण करविली ॥२२॥अलक्षादेश अगोचर । करिता झाला मुखोच्चार । मातृभिक्षा तदोत्तर । आणवी सत्वर श्रीगुरु ॥२३॥प्रबुध्द पौरज वदती वदनीं । न कळे काळगतीची मांडणी । प्रारब्धाची विचित्र करणी । विधिलेख चुकेना ॥२४॥जो सूर्यवंशावतंस । दाशरथी अयोध्याधीश । प्रभातीं योजिला राज्यासनास । परि अरण्यवास चुकेना ॥२५॥ मुकुट कुंडल पीतवसन । त्यागून वल्कलें परिधान । जटामंडित भस्मलेपन । साम्राज्यपद त्यागिलें ॥२६॥येवोनियां विश्वामित्र । सवें नेतसे राम सौमित्र । तैसाचि आतां राजपुत्र । जोगडा घेऊन जातसे ॥२७॥दशरथातें पुत्रवियोग । होतां झाला प्राणत्याग । तैसाचि हाही दिसे योग । दुःखप्रसंग सर्वांसी ॥२८॥अनेक परी अन्योन्य जन । सदुःखित मुखें म्लान । एक म्हणती हा भगवान । नाथरुपें प्रगटला ॥२९॥जो महाराज सद्गुरु समर्थ । अघटित जयाचें सामर्थ्य । जेणें जीवविला राजसुत । क्षणमात्र न लगतां ॥१३०॥सद्गदित । प्रेमाश्रु विमळ स्त्रवत । म्हणे दासानुदास मी निश्चित । उत्तीर्ण होऊं कैसेनि ॥३१॥तूं भवकाननदहनकृशान । कीं माया समुद्रीं कुंभोत्पन्न । तूं जीवशिवात्मककारण । अपरोक्षज्ञानकारक तूं ॥३२॥राव म्हणे मी अनन्यशरण । काया वाचा पंचप्राण । सर्वस्व नाथपदीं समर्पण । निश्चयेंसी करीतसे ॥३३॥तंव शीघ्र येवोनि राजभार्या । आम्हां त्यागोनियां वायां । प्रार्थिती झाली प्रतापवर्या । सवें तनया नेतसां ॥३४॥पुत्रधनाचें दावोनि स्वप्न । जागृतीं पाहूनि मी निर्धन । असो माझेंचि दुष्ट प्राक्तन । काय करिसी दयाळा ॥३५॥पुत्रें न देखिलें राज्यसुख । पूर्वप्राक्तन वैराग्यदुःख । कांहीं मीं न केलें कौतुक । लालनपालन ईत्यादि ॥३६॥हांसोनि बोले योगेश्वर । त्याचा चुकविला यमप्रहार । जन्मजरामृत्यु समग्र । निरसून चिरंजीव पैं केला ॥३७॥देहसंबंधें म्हणसी पुत्र । तरी आत्मत्वीं नसे पुत्रमित्र । गृहधनादि सुह्रदगोत्र । याहूनि स्वतंत्र वेगळा ॥३८॥वैराग्यभाग्या भाग्यवैभव । वैडूर्य वैरागरीचें ऐश्वर्य । त्रैलोक्यसाम्राज्य अभिनव । स्वयमेव भोगी हा ॥३९॥राजा वदे औदार्यौदधि । विधिनिर्मित नसतां प्रारब्धीं । ती पावली प्रसादसिध्दि । कृपानिधि तव कृपें ॥१४०॥तरी आतां येतसें स्वामीसवें । मज न लगे राज्यवैभव । अहर्निशीं सवें वसावें । असेंचि मज गमे ॥४१॥ऐसा पाहोनि निर्धार । देते झाले दुजा वर । तूंतें होईल दिव्यकुमर । परमप्रतापी दुसरा ॥४२॥सुप्रसन्न प्रसाद आशीर्वाद । देऊनि जातसे महासिध्द । ज्याचा महिमा अगाध । भुवनत्रयीं न समाये ॥४३॥झाला एकचि जयजयकार । आनंदले नारीनर । नमस्कारिती वारंवार । हर्षसमुद्र उचंबळला ॥४४॥नृपपरिवार पौरज प्रधान । उभे तिष्ठती कर जोडून । गजवाजिशिबिकास्यंदन । सिध्द असती तत्पर ॥४५॥कानीफ धरोनियां करीं । जाते झाले जालंधरी । नगरनागरिक नरनारी । पाठोपाठीं धावती ॥४६॥जेवीं मथुरेसी गेला गोविंद । गोप गोपी करिती खेद । तेवीं नगरजनांचे वृंद । शोक करिती आक्रोशें ॥४७॥नगरप्रदेशी उपवनीं । उभे असती ते क्षणीं । सर्वत्रांतें आज्ञावचनीं । जावें सदनीं आपुले ॥४८॥जी जी इच्छा धराल मनीं । ती ती पावाल माझिये वचनीं । राजा विनवी कर जोडूनी । पुनर्दर्शन मज द्यावें ॥४९॥अवश्य वदोनि सद्गुरुनाथ । जाते झाले उत्तरपंथ । कानीफातें आज्ञापीत । तीर्थयात्रा करावी ॥१५०॥राजे जाहले मददुर्मद । तयां बोधूनि करीं शुध्द । नाथपंथ हा अगाध । प्रकट करीं तूं सुजाणा ॥५१॥राजयोग राजऐश्वर्य । जगद्वंद्य तूं प्रतापसूर्य । नृपउध्दरणार्थ तूं आर्य । वसों देही तुझिया ॥५२॥राजे माजले दुर्धर । निक्षेत्री करी परशधर । कृष्णार्जुन तदोत्तर । भार हरिला पृथ्वीचा ॥५३॥यावरी जगद्गुरु आदिनाथें । आज्ञापिलें गोरक्षातें । तूं जाऊनि चक्रवर्तीतें । उपदेशुनी उध्दरी ॥५४॥नव्याण्णव कोटि नरेंद्र । उपदेशी गोरक्ष योगेंद्र । परमप्रतापी प्रतापरुद्र । भद्रकारका सुभद्रा ॥५५॥असो गुरुपदीं ठेवूनि मौळ । कानीफ जाय उतावेळ । देश उल्लंघितां सकळ । नृपाळ येती दर्शना ॥५६॥यावरी कानीफनाथें । नृप उपदेशिले सप्तशतें । सवें होऊन दीक्षायुक्त । वैराग्ययुक्त ज्यासवें ॥५७॥राज्य आणि तनमनधन । सर्वस्व करिती गुरुअर्पण । अहर्निशीं अनन्यशरण । सदा सेवे तिष्ठती ॥५८॥मदोन्मत्त भद्रजाति । रहंवर वाजी पदाती । अनर्ध्य रत्नें संपत्ति । अर्पिताती सद्भावें ॥५९॥मुकुट मुद्रा मुकुटावतंस । स्वरुप रुपें अतिडोळस । मुक्तामाळा सुप्रकाश । जडितमेखळा विराजे ॥१६०॥रत्नभूषणीं मंडितकर । कुबजा पाचूची मनोहर । कांचनाचा वाम तोडर । पदीं पादुका हिरियांच्या ॥६१॥रत्नजडिताचें सिंहासन । सुप्रभ दिव्य देदीप्यमान । भूप तिष्ठती कर जोडून । चामरें ढाळिती मस्तकीं ॥६२॥अनेक सांप्रदायी नृपवर । सेनेसह सेवा सादर । भिक्षार्थ वोपिती करभार । देशोदेशींचे येउनी ॥६३॥असो इकडे जालंधरी । पर्यटन करितां ते अवसरीं । येते झाले कांचनपुरीं । स्वेच्छचारी स्वइच्छें ॥६४॥आदरें केला श्रोतीं प्रश्न । यास्तव केलें निरुपण । गोरक्षचरित्रसंगतीनें । कानीफाआख्यान कथियेलें ॥६५॥पुढील इतिहासकौतुक । परमरहस्य सुखदायक । श्रोते परिसोत श्रवणसुख । सुरस पीय़ूष पैं जाणिजे ॥६६॥हा ग्रंथ मी स्वयें कर्ता । ही नसे मज अभिमानवार्ता । अंतरसाक्ष जाणता । नव्हे अन्यथा ही वाणी ॥६७॥रथातळीं चाले श्वान । ते आंगी वाहतसे अभिमान । रहंवर चाले मत्सत्तेनें । चंदनवाहक मी स्वयें ॥६८॥पुष्पदंतें केलें महिम्न । परि आंगीं झाला तो अभिमान । तो हास्य करी शिववहन । तंव दशनीं श्लोक देखिले ॥६९॥नाथघरींचा अनाक रंक । सिध्दसाधूंचा मी सेवक । तुम्हां मागत प्रसादभातुक । पोसणें घेणें मजप्रति ॥१७०॥तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानेशमूर्ति । पशुमुखेसीं वदलां श्रुति । तैसीच आहे ही रीति । उपकार किती वदावा ॥७१॥शुष्ककाष्ठा फुटले पल्लव । प्रताप जयाचा अभिनव । तोचि ज्ञानेश सद्गुरु भैरव । आदिनाथभावें वंदित ॥७२॥श्रीमत् आदिनाथलीलामृत । गोपेंदुआख्यान जगविख्यात । बध्दहस्तीं शरणागत । द्वितीयोऽध्यायीं नमियेलें ॥७३॥नाथप्रताप पूर्णसागर । स्वात्मसुखाचें हें आगर । देशभाषांकित नागर । सुगर श्रोतयां सुप्रिय ॥७४॥हा अध्याय एकुणिसावा । की चोविसांत एकुणिसावा । कीं साठीमाझी येकुणिसावा । भावें अर्चितां फळ लाभे ॥१७५॥ N/A References : N/A Last Updated : February 07, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP