मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीनाथलीलामृत| अध्याय ३ रा श्रीनाथलीलामृत प्रस्तावना अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा श्रीनाथलीलामृत - अध्याय ३ रा नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे. Tags : adinathagorakshanathaआदिनाथगोरक्षनाथ अध्याय ३ रा Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः ॥ ॐ नमो जी आदेश नाथ निरंजना । अलक्ष अगोचर सनातना । आदि अनादि पुरातना । स्वयंप्रकाश गुरुनाथा ॥१॥तव नाम कल्याणकारक । भवतरुकुठारच्छेदक । तूं माया विपिनदहनपावक । सुखकारक तव नाम ॥२॥धन्य धन्य तेचि जन । जे गुरुभक्तिपरायण । श्रवण मनन गुरुसेवन । अहर्निशीं ध्यान करिती जे ॥३॥ते जीवन्मुक्त नरदेही । देही असोनि विदेही । त्यांचे दर्शने कित्येक पाही । उध्दरती हा निश्चय ॥४॥सर्व व्रतांत व्रतोत्तम । गुरुभजनीं ज्याचा नेम । इतर धर्मातें सार्वभौम । गुरु परब्रह्म भजे जो ॥५॥ते चिच्छक्ति प्रणवरुपिणी । जे जगत्साक्षिणी श्रीमृडानी । शरण गेला वसिष्ठास । गुरुसेवनीं तत्पर ॥७॥जो श्रीकृष्ण भगवान । सांदीपनीस गेला शरण । व्यासास नारद आपण । उपदेश देत तयातें ॥८॥चतुरानन आदि नारायण । हंसरुपें उपदीशून । कच होऊनि अनन्य । शरण गेला शुक्रातें ॥९॥गुरुभक्तांत चूडामणि । गोरक्ष मत्स्येंद्रचरणीं । जालंदरीचा कानिफ सद्गुणी । निवृत्तीचा ज्ञानेश ॥१०॥नामदेवासी साक्षात्कार सगुण । तयातें बोधी रुक्मिणीरमण । खेचरातें जाऊन शरण । आत्मज्ञान संपादी ॥११॥गुरु भक्तांत परमनिपुण । तो एका एक जनार्दन । सवेंच व्हावया उत्तीर्ण । स्वयें कृष्ण दास्यत्व करी ॥१२॥नाना करितां तपानुष्ठान । न सुटे चवर्यांशींबंधन । एका सद्गुरुवांचून । जन्ममरण सुटेना ॥१३॥वेदशास्त्रीं निश्चयोत्तर । गुरुभक्तीचा महिमा थोर । अठ्ठ्यांशी सहस्त्र ऋषीश्वर । गुरुभक्तीत श्रेष्ठ पै ॥१४॥गुरुनामाचा मुखीं चाळा । तेणें जिंकिलें कळिकाळा । स्वानंदसुखाचा सोहळा । तया प्राप्त होतसे ॥१५॥जे नाथादि सांप्रदाय मूळ । मत्स्येंद्र गोरक्ष ज्ञानेश कुळ । इष्ट आराध्यही सकळ । पूर्वजसूत्र आमुचें ॥१६॥गुरुआज्ञा प्राधान्यरेषा । नुलंघवे मर्यादवेळ जैसा । तया सद्गुरु परमपुरुषा । सिंधुरुपें वंदितों ॥१७॥तुम्ही श्रोते परिसा परी । परिसा विज्ञप्ति वैखरी । तुमचें अवधान अभयोत्तरीं । सुवर्णवाणी होतसे ॥१८॥पायाळ डोळस निर्लाछन । लेवोनि गुरुआज्ञेचें अंजन । भाग्यरेषा सुप्रसन्न । निधान जोडे गुरुकृपें ॥१९॥असो गत कथाध्याय़ीम इतिहास । मत्स्येंद्रोत्पत्ति परम सुरस । शिवआज्ञेवरुन तीर्थाटणास । जगदोध्दारी जातसे ॥२०॥आतां परिसा कथारहस्य । श्रवण करावें निरालस्य । इहपरकीर्ति जोडे यश । अविनाशपद ये हातां ॥२१॥तंअ श्रोते म्हणती सुखकारक । कथारहस्य अलौकिक । श्रवणयुक्तिकास्वात्युदक । मुक्ताफळ इच्छिती ॥२२॥मत्स्येंद्रकथा महदाख्यान । प्रम पावन ते निरुपण । ऐकोनी तृप्त झाले श्रवण । परी एक इच्छा आमुची ॥२३॥श्रीगोरक्षप्रसादत्पत्ति । ती परिसावी यथानिगुती । श्रवण चकोराचे आर्ति । चंद्रामृतीं तोषती ॥२४॥जी जी आज्ञा म्हणून । वक्ता वदे प्रतिवचन । गोरक्षउत्पत्ति कथा गहन । श्रवण करावी आदरें ॥२५॥शर्करा आवडे रसने । तीच इष्ट गृही मिष्ट पक्वान्ने । ते सुरस स्वाद सेवणें । जिव्हा आवेश पैं ॥२६॥परमभक्ति या कथेची । आज्ञा प्रमाण श्रोतयांची । गंगा लाधली अमृताची । स्नानपाना पवित्र ॥२७॥ग्रंथब्धिमंथनीं अमृत । सुरस श्रोतयां हो प्राप्त । आतां एकाग्र करोनि चित्त । उचित ग्रंथ परिसावा ॥२८॥अपूर्व पुण्यपुरी । अयोध्यानिकत जयश्रीनगरी । विजयध्वज राज्याधिकारी । प्रतापी नरेंद्र पैं ॥२९॥सत्कीर्ति नामे अंगना । सगुण गुणें लावण्या । सुशीळा पतिव्रता निपुणा । परमप्रिय पतीतें ॥३०॥वीर्य शौर्य प्रतापवर्य । अगाधसिंधूसम गांभीर्य । ऐश्वर्य औदार्य । वदान्य नृपवर होत तो ॥३१॥स्वधर्मे करी प्रजारक्षण । राज्यांत नसे अधर्माचरण । सुखी असती गोब्राह्मण । पुराणश्रवणसन्मार्गे ॥३२॥घरोघरीं अग्निसेवन । करिती वेदाध्ययन । अभ्यास पवमान । वेदघोषे घरोघरीं ॥३३॥शिष्यमर्यादा गुरुआज्ञा । सेवक न करिती स्वामी अवज्ञा । स्त्रिया पतिव्रता गुणज्ञा । संकेतसंज्ञा जाणती ॥३४॥दोष दुष्काळ दरिद्र दैन्य । रोग गंडांतर नसे जाण । पुत्र करिती पितृसेवन । यथाकाळी घनवृष्टि ॥३५॥असो पुण्यभूमि पावन । तेथें गृहस्थ तद्देशी ब्राह्मण । वेद आणि धनसंपन्न । व्यवसायी द्रव्याचा ॥३६॥सद्वोध नामाभिमान । स्त्री सद्वृत्ति नामेंकरुन । पतिशुश्रूषें सदा मन । गजांतलक्ष्मी ते गृहीं ॥३७॥नामासारिखी कृति । हें तों पूर्वसुकृती । जया नाम बृहस्पति । परि स्खलित वाणी प्रतिशब्दी ॥३८॥अमर नाम ठेवी संतोषे । अल्पायुषी मरतसे । नाम ठेवी वेदव्यास । परि पिसें तयासी प्रारब्धें ॥३९॥नाम ठेविलें कुबेर । तो भिक्षा मागे घरोघर । नाम जयाचें कमलनेत्र । अंध डोळां दिसेना ॥४०॥नाम जयाचे अर्जुन । युध्दापुढें जाय पळोन । नाम धन्वंतरी जाण । रोगग्रस्त सर्वदा ॥४१॥नाम ठेविलें रामचंद्र । पिषाच झडपी वारंवार । नाम जया क्षीरसागर । तो तक्रईच्छा करी ॥४२॥ऐसा नव्हे तो गृहस्थ । परम उदार भगवद्भक्त । अतिथिसेवन सतत । परमार्थ स्वार्थ जयाचा ॥४३॥करी नित्यानित्यविचार । वेदांती निमग्न अहोरात्र । दानशीळ परम थोर । गृहस्थाश्रम संपादी ॥४४॥दहा सहस्त्र धेनु गृहीं । संपत्तीस तया पार नाहीं । संततीवीण पाहीं । सदा दाही चिंताग्नि ॥४५॥नित्य द्वादशगोप्रदान । गोसेवा कारी आपण । हरिहरादि देवतार्चन । कीर्तनीं श्रवण पैं ॥४६॥एकादशी निःसीम नेम । दिवानिशी आचरे सत्करं । द्वादशीचा विशेष धर्म विष्णुतिथिते लक्षुनी ॥४७॥शतगोदानें ते दिनीं । द्वादशशत द्विज भोजनीं । सद्भावें अतिथी पूजुनी । दानाध्यक्ष नेटका ॥४८॥पुण्य तेथें पुरुषार्थ । सुख तेथें विश्रांत । क्षमा तेथें दय वस्त । सत्संग होय अनायासें ॥४९॥अभ्दुदयाची पहाट फुटे । इच्छित लाभ तात्काळ भेटे । पूर्वसुकृतबळ वरिष्ठ । लावी वाटे सुखाच्या ॥५०॥असो पूर्वानुसंधान । श्रीमत्स्येंद्र शिवाअज्ञेन । करित झाले तेथून गमन । तों अवलोकिलें वैकुंठ ॥५१॥सर्वोत्कृष्ट वैकुंठ श्रेष्ठ । भोवतीं तुळ्सीवनें दाट । सत्वर पावले तयानिकट । तों वाटेस भेटले श्रीहरि ॥५२॥परस्पारें करोनि नमन । सप्रेमें देती आलिंगन । पुसता झाला मधुसूदन । गमन कोठें करीतसां ॥५३॥मत्स्येंद्र वदे गा रमापति । तव दर्शन उद्देशआर्ति । भविष्य जाणोनियां चित्ती । हास्य करी जगदात्मा ॥५४॥मग मत्स्येंद्र निघती तेथून । द्वीपांतरा द्वीपीं फिरोन । जयश्री करुन आगमन । बोधभुवन देखिलें ॥५५॥द्वारप्रदेशी अलक्ष शब्द । करिते झाले महासिध्द । सद्वृत्तिश्रवणीं सब्दोश । होता झाला ते वेळी ॥५६॥गृहस्थलालना पाहे । लावण्यमूर्ति उभी आहे । परम दैदीप्य दिसताहे । उपमा नसे दुजी ॥५७॥शशिसूर्याहूनि दीप्ति । तेवीं मिरवे अंगकांति । कबरी मस्तकीं विराजती । विशाळ भाळ कमळाक्ष ॥५८॥अनंत जन्मी साधिलें अंजन । प्रत्यक्ष देखिलें निधान । अनर्ध्य रत्नांची उघडली खाण । पहातेपण तटस्थ ॥५९॥भ्रूचाप टणत्कारुन । खेचरी उन्मन कटाक्ष मार्गण । धारणेचें निजसंधान । टाकी मुखातें लक्षोनी ॥६०॥योगसंग्रामीं दक्ष कुशल । विंधिता झाला सहस्त्रदळ । जीवशिव ऐक्यस्थळ । निमग्न होवोनि विचरती ॥६१॥इडा पिंगळा ऊर्ध्वगति । चंद्रसूर्य तयातें वद्ती । नासापुटीं केली वस्ती । सरळ नासिक शोभलें ॥६२॥निमिषानिमिष न लगे पाती । खुंटली काळाची गति । आरक्त अधर बिंबाकृति । सोहंस्मरणीं रंगले ॥६३॥श्रवणी मुद्रा नक्षत्रापरी । कीं बृहस्पति शुक्र निर्धारी । जगद्गुरुतें अवधारी । मार्ग पुसती योगाचा ॥६४॥म्हणती भस्म कां केलें लेपन । झणी दृष्टि लागेल म्हणून । शिवें स्वहस्तें चर्चून । सकुमार तनु आच्छादी ॥६५॥की सुस्वरुप मदनातें । हें जाणोनि अपर्णानाथें । तेचि स्वयें चिताभस्मातें । चर्चिता झाला मत्स्येंद्रा ॥६६॥कीं अहं जाळोनि राख । सोहंभस्म चर्चिलें सुरेख । की काश्मीर कवच देख । दीपज्योतीते मिरवलें ॥६७॥पंचतत्त्वांची मेखळा आच्छादन । अरूणवर्णी काषायवसन । सहस्त्र सौदामिनी एकवटून । शोभाताती सुरंगी ॥६८॥कटीं मेखळा ऐशापरी । चिच्छक्ति शैलीवरी । शृंगी अनाहतगजरीं । प्रणवोच्चारी सुशब्दें ॥६९॥अजपामाळा रात्रंदिन । एकवीस सहस्त्र प्रमाण । फेरी फेरे सोहंस्मरण । तुर्या साक्षिणी तयाची ॥७०॥चारी मुक्तीची झोळी हातीं । भिक्षापात्र सब्दोधवृत्ति । शांती कुब्जा ते निवृत्ति । सदाचरणी पादुका ॥७१॥वज्रकौपीन मूळबंधी । उड्डियानक जालंधर त्रिबंधी । हटयोगाचा होय उदधि । सहज समाधि जयाची ॥७२॥सत्रावी भिक्षा घेऊन हातीं । पातली तेव्हां सद्वृत्ति । लावू विसरली नेत्रपातीं । स्वरुपस्थिति पाहतां ॥७३॥देवदानव मानवपंक्ति । अपरप्रतिमा न ये व्यक्ती । अनेकजन्मपूर्वसुकृतीं । अनुपम मूर्ति देखिली ॥७४॥भिक्षा अर्पूनि पदीं मूर्ध्नी । ठेविती झाली नितंबिनी । पंचप्राण वोवाळुनी । विनीतवचनी वदतसे ॥७५॥परम लाभ लाभले । जन्मसार्थक फळलें । पूर्वार्जित उदया आलें । कृतार्थ झाले निश्चयें ॥७६॥आज अकल्पित कल्पतरु । दृष्टी देखिले जगद्गुरु । कीं पूर्वपुण्याचा अचळ मेरू । नाथरुपें प्रगटला ॥७७॥जे वेदगर्भीचें सारांश । जे योगियांचें उपास्य । सिध्दि इच्छिती ज्यांचे दास्य । ते अविनाश प्रगटले ॥७८॥आज धन्य प्राप्तकाळ । आजन्म तरु पातलें फळ । पूर्व प्राक्तन सबळ । दीनदयाळ देखिले ॥७९॥महद्भाग्य मी सौभाग्य । अचल लक्ष्मी आयुरारोग्य । परि संततिहीन भाग्य । व्यंग हें सांग्ग करावें ॥८०॥तंव वदते झाले मत्स्येंद्रमुनि । निश्चयें निर्भय राहे जननी । विभूति देतसें तुजलागुनी । सदनांतरीं स्वीकारीं ॥८१॥माझा आशीर्वाद अवधारी । विष्णु येईल तव मंदिरीं । महद्भाग्य सुंदरी । उदरीं पुत्र लाभसी ॥८२॥भस्म करी बहु जतन । प्राप्त होईल पुत्रसंतान । आजि सरलें अप्राप्तकप्राक्तन । नूतन लाभ मानी हा ॥८३॥हें उभयवरदोत्तरीं । तोषोनि ग्रंथी बांधी पदरीं । हर्षउत्कर्ष ह्र्दयांतरी । आनंदउदधी उचंबळे ॥८४॥मस्तकीं ठेवोनी हस्त । गुप्त झाले मत्स्येंद्रनाथ । मंदिरीं गेली हर्षित । तो बाह्यसख्या मिळाल्या ॥८५॥स्त्रिया वदती शपथोत्तरीं । तूंतें भेटला त्रिपुरारी । अपार पुण्य जन्मांतरीं । तरीच दर्शन सिध्दाचें ॥८६॥एक वदती अहा वेडे । महामांत्रिक कानफाडे । कोणाचें बळ न चले त्यांपुढें । कुडेंकपट जाणती ॥८७॥महापुरुष हे महामैंद । ब्रह्मारण्यीं करिती बोध । निरंजनीं नेऊनि वध । तात्काळ करिती तयाचा ॥८८॥विषयसंग्रहाचें धन । जीव घेवोनि करी लुंठण । येणे जाणें मार्ग पुसोन । निर्मूळ शासन करी पैं ॥८९॥एक म्हणती अजा पक्षी शुनी । ते करिती न लगतां क्षणी । कांही सुकृत म्हणोनी । भक्षिली नाहीं विभूतीतें ॥९०॥प्रवृत्ति त्या निंद्य म्हणती । निवृत्ति त्या धन्य वदती । तूंचि धन्य ये जगतीं । सुशीळ म्हणोनि लाभ हा ॥९१॥पूर्वसंधींत सदाचरण । सदा सर्वदा पतिसेवन । अगम्य न गणवे तुझे गाण । सिध्द प्रसिध्द भेटला ॥९२॥बहुत मतांचे त्रिविध जन । कोणी करिती स्तवन । कोणी म्हणती ईश्वरदर्शन । झालें पुण्य पूर्वीचें ॥९३॥एक म्हणती कैचें काय । भस्म सर्वथा सेवूं नये । नेणो अपाय कीं उपाय । भविष्य जाणे ईश्वर ॥९४॥एक वदे त्यागी विभूति । न कळे पुढें होणार गति । भयाभीत होऊनि चित्ती । भस्म निश्चयें टाकिलें ॥९५॥गृहीं न ठेवी सुजाणे । या सत्वर बाहेर त्यागणें । नाहीं तरी गृही कठिण । काय होईल कळेना ॥९६॥गोमयगर्ता आवर्त । त्यांत टाकिली विभूत । प्रारब्ध अविधि विधिनिर्मित । ब्रह्मसूत्र टळेना ॥९७॥दशसहस्त्र धेनूंचे गोमय । दुर्बुध्दीनें केला अपाय । जन्मांधासी रत्न काय । प्राप्त कैसें होईल ॥९८॥विष्णुमाया गहन । बुध्दिभ्रंशप्राक्तनेंकरुन । न्यून अर्जित अर्चन । म्हणोनि बुध्दिभ्रष्ट पैं ॥९९॥जो सच्चिदानंद स्वयमेव । अज अजित निरामय । जो अजन्मा स्वयमेव । तो गर्भस्थ न होय सर्वथा ॥१००॥नित्यप्रत्यहीं गोमय । संचय होत पर्वतप्राय । मंगळ जननी गर्भस्थ राहे । मत्स्येंद्रबीज मज गमे ॥१॥गृहस्थभार्येसी ऐसें झालें । हातीचें निधान दवडिलें । चिंतामणी त्यागिले । पाषाण म्हणोनी ॥२॥कोमळ कल्पतरूची वल्ली । सदैवें द्वारी उदेली । ते दुर्दैवें खुडोनि टाकिली । तैसी झाली परी हे ॥३॥क्षुधितागृहीं क्षीराब्धि येत । दुर्बुध्दिमाक्षिका होय पात । कीं कामधेनू अकस्मात । पशु म्हणोनि दवडिली ॥४॥कीं विषभ्रांती पीयूष । वोतिलासे सुधारस । कीं वायस म्हणोनि राजहंस । तोडोनियां सांडिला ॥५॥स्वात्मबुध्दी हितार्थ । परबुध्दीनें घडे अनर्थ । गुरुबुध्दि स्वार्थपरमार्थ । प्रळयार्थ स्त्रीबुध्दि ॥६॥परबुध्दीनें भस्म त्यागिलें । गोमयगर्भी तें संचलें । अवतारांकुर कोमाईले । शुक्लपक्ष ज्यापरी ॥७॥उदयाहूनि पळे पळ । हेळामात्रीं किळा सबळ । कीं सत्पात्री दानें ब्रह्मांडगोळ । कीर्ति विस्तारेल पैं ॥८॥असो भूमिगर्भस्थ दिवसेंदिवस । शुभडोहळें होती आसपैस । गर्भच्छाया येतां महीस । दुर्भिक्ष दवडिलें पैं ॥९॥यथाकाळीं वर्षे धन । पत्रीं पुष्पीं तरु सघन । वृक्ष सकळ सुभिक्ष धान्य । जरामरण नसेचि ॥११०॥प्रजा सदाचरणी आचरणीम । दैन्यदरिद्र नसे मेदिनी । मंगळप्रद मंगळ जननी । सुमंगळ जाहली ॥११॥मंगळतुरे मंगळायतनीं । मंगळ भोजनीं गायनीं । मंगळ भूषणीं सुवासिनी । मंगळ द्रव्य वोपिती ॥१२॥सदुग्ध धेनु विपुल क्षीरें । घरोघरीं घुमती डेरे । शिवालय विष्णुमंदिरें । तोरणें मखरें चहुंकडे ॥१३॥दरिद्रिया निधानें लाधतीं । जन्मांधासी नेत्र येती । वंध्या योषा पुत्रवंती । मुके वदती वेदांत ॥१४॥तों मत्स्येंद्र स्वेच्छें विचरती । येते झाले बदरिकाश्रमाप्रति । तेथे देखिल्या सिध्दमूर्ति । जपी तपी तेजस्वी ॥१५॥त्यांते पाहून मनेच्छा झाली । योगसिध्दि साधावी आपुली । म्हणोनि नाथ तये वेळीं । बैसले कपाटी जावोनी ॥१६॥सूर्यसंख्या संवत्सर । समाधिस्थ मत्स्येंद्र । तो पातले तेथें महारुद्र । आदिनाथ सद्गुरु ॥१७॥वत्सा मत्स्येंद्रा स्वइच्छेनें । गूढदरीत योगसाधनें । कां करिसी वायुरोधनें । जगकल्याण करी कां ॥१८॥सावध होऊनि पाहे । नाथरुप अंतर्बाह्य । जगदोध्दार योजिलें कार्य । तूं कां येथें तप करिसी ॥१९॥मीही जावोनियां तेथें । दीक्षा देवोनि पातलों येथें । त्वां सत्वर जावें उपदेशातें । गोरक्षातें प्रगटवी ॥१२०॥आदिनाथचरणीं ठेवोनि मौळी । निघते झाले तात्काळीं । जयश्रीनगरीं उतावेळी । दीनदयाळ पातले ॥२१॥नगरागर्भी उर्वीस्थळीं । पूर्वद्वारीं अपूर्व वेळीं । आले तेथें पूर्वस्थळीं । पूर्वस्मृति पूर्वीच ॥२२॥अरुणोदयी अरुणवर्णी । काषायमेखळा रविकिरणी । श्रीमुख भासे प्रभाततरणी । द्वारप्रदेशी प्रगटला ॥२३॥अलक्षी लक्ष अलक्षोच्चार । भिक्षार्थ तिष्ठे मत्स्येंद्र । तों गृहस्थस्त्री सत्वर । द्वाराबाहेर पाहतसे ॥२४॥तिणें निरखिला ते क्षणीं । वोळखिलें तत्क्षणीं । मृगाक्षीतें सुलक्षणी । विवक्षा करी भिक्षेची ॥२५॥भिक्षा घेवोनी जातां । शाप देईल पाहातां । गुप्त गृहीं असतां । शाप सर्वथा चुकेना ॥२६॥उभयपक्षीं होय कठिण । मला दुजा रक्षील कोण । आतां होणार प्रमाण । जावें शरण तयातें ॥२७॥भिक्षा घेवोनि तदोत्तरीं । अधोवदन जाय सत्वरी । नम्र होवोनि नमस्कारी । भिक्षा पवित्र वोगरी पैं ॥२८॥मत्स्येंद्र वदे क्षेम कीं माते । सुपुत्र दावी आम्हातें । भस्म देवोनि गेलों तुम्हांतें । त्या तनयातें आणी कां ॥२९॥येरी सलज्ज सद्गद चित्तीं । रोमांचस्फुरण बाष्प स्त्रवती । भयाभीत सलज्जवृत्ति । स्तब्ध स्थिति होतसे ॥१३०॥प्रत्युत्तराचे आर्ती । पुण्हा तीतें नाथ पुसती । तरी वाकस्तंभ सरस्वती । स्तब्धमुद्रा अवलंबिली ॥३१॥तो अंतरसाक्षी सर्वज्ञ । जाणी भूतभविष्यवर्तमान । जो सर्वव्यापी परिपूर्ण । सर्वसाक्षी वेगळा ॥३२॥विस्मित होऊन अंतःकरणीं । मदाशीर्वादनिर्भयवाणी । तूंते पुत्र नसे झणी । हें आश्चर्य आमुतें ॥३३॥माझें झालिया वरदवाक्य । नुलंघिती ब्रह्मादिक । पुत्र व्हावा आवश्यक । नव्हे आवश्यक कल्पांती ॥३४॥आतां सत्योत्तर वदे पाही । भस्म सेविलें किंवा नाहीं । कीं टाकिलें कोणे ठायीं । तें स्थळ मातें दावी कां ॥३५॥जरी तूं न सांगसी सत्य । शाप देईन मी यथार्थ । ऐसें ऐकोनि भयाभीत । होती झाली तेधवां ॥३६॥मग विनीतभावें मंजुळ शब्दी । स्वामी मी असें अपराधी । लागूनियां परबुध्दी । नाश केला हिताचा ॥३७॥मातें भस्म त्यागिलें जेथें । शीघ्र घेऊन जावें तेथें । तेव्हां तर्जनीचे संकेतें । लक्षवी ते मृगाक्षी ॥३८॥ऐसें असतां अकस्मात । गृहांतूनि निघे गृहस्थ । भस्मवार्ता अव्यवस्थ । परिसोन स्वस्थ न वाटे ॥३९॥मग धांवूनि आला सवेगीं । नमस्कारी अंगप्रत्यंगीं । आश्वासितसे योगी । मस्तकीं हस्त ठेविला ॥१४०॥त्राहे त्राहे श्रीदातारा । आमुचा अपराध क्षमा करा । पतितोध्दरणा कृपा करा । मज दीनातें उध्दरी ॥४१॥मग म्हणे मत्स्येंद्रमुनि । गोमयसंमार्जनस्थानी । दिव्यमंडप उभवूणि । रंगमाळा सुरेख ॥४२॥कर्दळीस्तंभांची मखरें । मंगळपल्लवी मंगल तुरे । गुढिया उभवूनि एकसरें । मंगळजननी शृंगारा ॥४३॥आज्ञा होतां ते क्षणीं । नृपति येवोनि लागे चरणीं । थाट तिष्ठती पौरवश्रेणी । बावन्न वर्ण इत्यादि ॥४४॥भूमि शृंगारुनि सारी । सौभाग्यभूषित सौभाग्यनारी । हरिद्राकुंकुम घेऊनि करीं । परस्परें वोपिती ॥४५॥गोमयनिकटीं मत्स्येंद्रमुनि । दीर्घस्वरें अलक्षध्वनि । भूमींतून प्रतिध्वनि । ॐ नमो आदेश सद्गुरु ॥४६॥त्रिवार उच्चार अलक्षशब्द । आदेश गुरु शृंगीनाद । पुष्पें वोपिती विबुध । देव मानव संतोषती ॥४७॥देव दुंदुभी वाद्ये होती । गंधर्व सुस्वर गायन करिती । शची सावित्री अरुंधती । अक्षता टाकिती आनंदे ॥४८॥गोलोकीचें जें आराध्य । तेंचि झालें मत्स्येंद्र साध्य । न कळे ज्याचें आदिमध्य । गोमयीं गोरक्ष प्रगटला ॥४९॥गोसेवेची आवडी परम । तोचि गोकुळीं पुरुषोत्तम । गोपाळ गाई गोपिकाप्रेम । गोवर्धनी गोविंद ॥१५०॥पूर्वी अमित दैत्य मारिले । तेणें ह्र्दय कठोर झालें । तेंचि प्रायश्चित्त मज गमलें । स्वयें घेतलें विष्णूनें ॥५१॥जे महद्दोष प्रसिध्द । गोमयगोमूत्रीं होय शुध्द । ज्याचा महिमा अगाध । स्वयें गोरक्ष जाणती ॥५२॥मत्स्येंद्र भूमींत वेत्र स्पर्शित । तंव द्विभाग कुंभिनी तेव्हा होत । दीप्तज्वाळा अकस्मात । भूमींतूनि निघाल्या ॥५३॥सहस्त्र रवींचा प्रकाश । शशिविद्युल्लातासमरस । प्रकाश दाटला असमास । मानव नेत्र झाकिती ॥५४॥तये संधीस निर्जरभार । उभयांसी करुनि नमस्कार । प्रदक्षिणा करिती सत्वर । जाती स्वस्थानीं आपुल्या ॥५५॥क्षीराब्धींतूनि अमृतकर । उदयाचळाहूनि भास्कर । तैसा मेदिनीतूनि सुंदर । सुखरुप निघाला ॥५६॥कीं पाशुपतास्त्राची गवसणी । काढितां प्रकाश अनंततरणी । जळबुंथी त्यागुनी । दिनमणि प्रकाशे ॥५७॥स्वरुपें मदन की इंद्र । शतगुणें मत्स्येंद्रपुत्र । श्यामसुंदर आकर्णनेत्र । चक्रपाणि अवतरे ॥५८॥राजीवनेत्र सुहास्यवक्त्र । श्रोत्री मुद्रा चारुगात्र । कृष्णसूत्रें शैली पवित्र । काषायवस्त्रें शोभलीं ॥५९॥अरुणसंध्या सुरंगवर्णी । मेखळा तप्तसुवर्ण कर्णी । उत्तरी रुळे वस्त्रा भरणी । त्रिशूळपाणि विराजे ॥१६०॥भस्मोध्दूलित केशरी मळवट । मृगमदतिलक सुभट । वक्र भ्रुकुटिया नासापुट । रावे सलज्ज देखोनी ॥६१॥उभय अधर बिंबफळभ्रमें । कीर चंचु वोढवी प्रेमें । तेविं तो भास मज गमे । अन्य उपमा नसेचि ॥६२॥जो मत्स्येंद्रप्रियकुमर । द्वादशवर्षी तो सकुमार । पूर्ववय अपूर्व कुमार स्वकुमार दृढ करीतसे ॥६३॥त्या चिताभस्मेंकरुन । सर्वांगीं लाविलें भस्मलेपन । सक्रोध मदनदहन । द्वैत सर्व ग्रासिलें ॥६४॥मत्स्येंद्र पादारविंदमिलिंद । चरणांगुष्ठी सेवी अमोद । गोरक्ष गुंजारवें आनंद । वंदन करी ते वेळी ॥६५॥वरी मस्तक उचलोन । मत्स्येंद्र करी अवघ्राण । कृतकतार्थ संपूर्ण । परस्परें जाहले ॥६६॥कार्तिक्यां शुक्लपक्षे च रेवत्यां च त्रयोदशी । द्विपरार्धे दिवा विष्णोरंशो गोरक्षयोनिजः ॥१॥भस्मगोमयसंभूतो गोरक्षः स महामुनिः । भूमिगर्भसमुद्भूतं ध्यायेन्नाथं जगद्गुरुम् ॥२॥कार्तिक शुध्द त्रयोदशी । भृगुवासर रेवती दिवसीं । सवा प्रहर सुदिनेसीं । विष्णुअवतार उद्भवे ॥६७॥पुष्पवृष्टि पृथ्वीतटीं । जन पाहती संपूर्ण दृष्टीं । महत्पुण्याच्या अपार कोटि । कौतुकदृष्टीं पाहती ॥६८॥आदिनाथ जातकर्म । नामकर्म मत्स्येंद्रनेम । गोरक्षक नाम सर्वोत्तम । ठेविते झाले तयाचें ॥६९॥गोमयगर्भी रक्षा जाण । म्हणोनि गोरक्ष नामाभिधान । जें गोलोकाचें दिव्यज्ञान । गोमय उकरडीं प्रगटलें ॥१७०॥जो अज अजित अव्यय । अजन्म अयोनिसंभव । तेथें नाम रुपाचे वैभव । काय कैसें कळेना ॥७१॥जो अव्यक्त न ये व्यक्ती । अजन्मा नसे जन्मपंक्ति । अरुपासी रुपव्यक्ती । कोणत्या युक्ती स्तवावें ॥७२॥आदिनाथबीज मत्स्येंद्रवल्ली । पत्रपुष्पीं अति डवरिली । गोरक्षरुपें फळा आली । मुमुक्षुपक्ष्याकारणें ॥७३॥गोरक्षमौळी ठेवूनि कर । आनन कुरवाळी वारंवार । अंकी घेऊनि सत्वर । वदनेदु न्यहाळी ॥७४॥जीवी जीवा पडली गाठी । ते कदा नव्हे तुटी । जेवी कचबृहस्पतिभेटी । सुख झालें ज्यापरी ॥७५॥जेवीं शिवअंकीं गजानन । तेवीं दिसे शोभा गहन । आनंदमय परिपूर्ण । अगाध सोहळा ते वेळी ॥७६॥पंचानन षडानन । नारद आणि चतुरानन । कीं भरत आणि रघुनंदन । राम हनुमान ज्यापरी ॥७७॥ऐशा पौरव जनांच्या थाटी । पाहूं पातल्या उठाउठी । जय जय शब्दाचे बोभाटी । भुवनत्रय कोंदलें ॥७८॥सब्दोध आणि नृपनंदन । उभय उभयांचे वंदिती चरण । तेव्हां सद्वृत्ति येऊन । नमन करी सद्भावें ॥७९॥स्वामी बोले पीयूषघन । प्रारब्धवातें गेले वितळोन । आहा प्राक्तन बलिष्ठ गहन । भोग भोगवी पां ॥१८०॥परि उदारहस्तेंकरुन । दातृत्व केलें मजलागून । सेखी घेतसां फिरोन । थोरपण सांभाळावें ॥८१॥भवसिंधूंत अभयद्रोणीं । मज बैसविलें कृपा करोनी । मध्यें त्यागिसी मोक्षदानी । हे काय उचित विचारा ॥८२॥नाथ म्हणे वदसी सत्य । परि केला घात स्वहस्तें । आतां पुससी आमुतें । सत्य की असत्य वदा हें ॥८३॥वैद्यें दिधली दिव्य औषधी । सांगून गेला यथाविधि । पथ्य चुकून केला अविधि । व्याधि बरी कैसेनि ॥८४॥म्हणे मी अपराध खाणी । आपुली केली पावलें करणी । सदय व्हावें अंतःकरणीं । प्रार्थी प्रार्थना समर्था ॥८५॥मजपासून पडलें अंतर । आतां द्यावें अभयोत्तर । तुम्ही होऊनि सुधाकर । याचकचकोर तोषवा ॥८६॥माते वदसी सत्यभाव । हा अजन्म अयोनिसंभव । विष्णुअवतार स्वयमेव । तो मानवगर्भ नव्हे कीं ॥८७॥येरी वदे यथार्थवचन । मज झालें हरिहरदर्शन । आतां मी संतानहीन । यावरी पूर्वप्राक्तनें करंटी ॥८८॥बैसोन कल्पतरुचें तळवटी । केवी द्यावी झोळीस गाठी । चिंतामणि घेतां मुष्टीं । दरिद्रगोष्टी कासया ॥८९॥सुधारस घेतला ग्रासी । मग केवी राहे उपवासी । साधिलिया मनोन्मनासी । मग जीवदशा पैं कैची ॥१९०॥यावरी लल्लाटपटअक्षर । न चुके निश्चयोत्तर । काय रुसोनि देवावर । देहप्रारब्ध चुकेना ॥९१॥देहप्रारब्ध म्हणावें जरी । आयुर्मार्कंडेय षोडषसंवत्सरीं । सोळा कल्प करी त्रिपुरारी । प्रारब्ध बापुडे कायसें ॥९२॥आणि परिसिलें पुराणीं । असत्य नव्हे सिध्दवाणी । नसलें जरी प्राक्तनी । नूतन महर्षि निर्मिती ॥९३॥आपुलें ध्रुववचन यथार्थ । कदा न घडे असत्य । हा तों हाय निश्चितार्थ । निश्चय करोनि ठेविला ॥९४॥कीं सदैवदशेचा होतां लाभ । तोचि अभ्युदयप्रारंभ । दशा उजळोनि सुलभ । प्रयत्न न करितां अनायासें ॥९५॥पुत्राअभय प्रथमच आहे । तरी द्वितीय वर मी लाहें । प्रार्थनीं होऊनि साह्य । अभय द्यावें मजप्रति ॥९६॥नगरजनांचा उध्दार । दर्शनें जाहला निर्धार । परत्रप्राप्ति साचार । हा तो भरंवसा असे पैं ॥९७॥माझे जननीजनक । त्यांसी पुत्र द्यावा आवश्यक । उभयकुळीं सुखकारक । दर्शनें होय आपुल्या ॥९८॥ऐसा परिसोनि करुणावर । मत्स्येंद्र वदती अभयवर । सिध्दि पावती आर्त सर्व । निश्चयभाव असावा ॥९९॥पुत्र बंधु होती तुज । आर्ति सरती सहज । परि एक सांगतों गुज । अनुष्ठा तुम्ही सर्वही ॥२००॥कार्तिक शुध्द त्रयोदशीदिनी । गोमयभस्मप्रतिमार्जनी । गोरक्षक पूजावे भावेंकरोनि । प्रथमयामी जाणिजे ॥१॥कर्दळीस्तंभ मखरमंडप । पुष्प द्रुमपल्लव अमूप । रंगमाळा धूपदीप । सुंगंधपुष्पें अर्पावी ॥२॥मंगळतुरे जन्म कथन । मत्स्येंद्रगोरक्षाख्यान । परमहस्यनिरुपण । आनंदें कीर्तन करावें ॥३॥परिमळद्रव्य रंगचूर्ण । तुळसी बिल्व सुगंधचंदन । उधळोनि जयघोष पूर्ण । आदेशशब्द जागवा ॥४॥जागर जागवा रजनी । व्रतासांगता नाथार्चनी । नाथासह द्विज भोजनीं । तांबूल दक्षिणा अर्पिजे ॥५॥हें व्रताचरण आचरतां । सर्व सिध्दि येती हातां । त्याहुन लाभ नसे परता । परमार्थतें अधिकारी ॥६॥तुळसीवृंदावनीं जाण । हा अध्याय करितां पठण । त्यासी सर्व सिध्दि प्राप्त होऊन । कामना पूर्ण होतसे ॥७॥पठणामृत वृक्षातळीं । एक मंडळ प्रातःकाळीं । सुपुत्र होय कुळीं । पराक्रमी ज्ञाता पैं ॥८॥अशोकातळीं शोकहरण । औदुंबरीं होय ज्ञान । अश्वत्थीं महद्भाग्य परिपूर्ण । विकल्पवृक्षीं वैराग्य ॥९॥गोरक्षवल्लीसंनिध । पठणीं पुण्य अगाध । सर्व सिध्दि होती साध्य । प्रत्यक्ष ते स्थळीं ॥२१०॥पुत्र बंधु विदेशांतरीं । श्रवणीं भेटती निर्धारीं । संकट दुर्घट अशातें निवारी । स्वयें गोरक्ष आपण ॥११॥असो ते वेळी नगरनरेंद्र । नमस्कारोनि प्रार्थी मत्स्येंद्र । म्हणे स्वामी सदयसमुद्र । सुभद्र केलें समस्ता ॥१२॥कल्पतरुंचे झाले दर्शन । कैचें राहे दरिद्र दैन्य । मी आर्त शरण अनन्य । उपदेश देणे मजप्रति ॥१३॥नाथवदनीं घडे सकळ । पुनर्दर्शन उतावेळ । निश्चय असों द्या निश्चळ । तो तत्काळ काळ घालवा ॥१४॥अवतारादि उत्साहजयंती । सिध्दसाधूंच्य्दा पुण्यतिथि । पराक्रमी ज्यांच्या कृति । त्या जागृत कीर्ति जयांच्या ॥१५॥ऐसा तो अवतार उद्भवे । मत्स्येंद्र गोरक्ष जाती सवें । जनसमुदाय आणि रावे । बोलवीत जातसे ॥१६॥मधुमक्षिकान्यायेंकरुन । वेध वेधले सर्व जन । चमत्कारें करिती नमन । हा तो स्वभाव तयांचा ॥१७॥कथा पाल्हाळ म्हणून । श्रोतयांचे कंटाळ्दले मन । परि स्तवनप्रवाह गंगाजीवन । हव्यासबुध्दि नाटोपे ॥१८॥यापरी गोरक्ष उत्पत्ति । श्रोतयां निवेदिली यथामति । आरुषभावें संतांप्रति । विनंती हेचि अवधारा ॥१९॥पुढील कथेचें आमंत्रण । बहुत रसाळ सुरस गहन । श्रोतियां विज्ञापी कर जोडून । मंद प्राज्ञें प्रार्थितों ॥२२०॥सिध्दसिध्दामृतग्रंथी । तेचि धरोनि सत्संगती । आदिनाथलीलामृतीं । यथामति अनुवादे ॥२१॥अमनस्कग्रंथसारांश । वामदेवा कथिती महेश । गुरुकल्पखंडींचा इतिहास । उभयध्यायी कथियेला ॥२२॥इति श्रीमन्नाथलीलामृत । ग्रंथकर्ता भैरव समर्थ । तृतीयाध्यायीम आदिनाथ । नमन करी सद्भावें ॥२२३॥॥ श्लोक ॥२॥ ओव्या ॥२२३॥ N/A References : N/A Last Updated : February 06, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP