श्रीनाथलीलामृत - अध्याय ८ वा

नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.


श्रीगणेशाय नमः ॥
आदि आदेश प्रणव ओंकार । जो इच्छाशक्तीचा निजवर । ब्रह्मा विष्णु आणि शंकर । पादपद्मीं पुजारी ॥१॥
तो परात्पर परशिव । जया म्हणती देवाधिदेव । तो ज्योतिर्मय स्वयमेव । नामरुपावेगळा ॥२॥
जो सत्य शाश्वत चैतन्य । व्योमातीत निरंजन । जो नादबिंदुकळा विहीन जो अगोचर निगमातें ॥३॥
जें चराचरव्यापी स्थावरजंगम । जें मायातीत परब्रह्म । जें परेहून परधाम । भेदाभेदरहित जें ॥४॥
तो गुरु ब्रह्मा विष्णु म्हेश्वर । गुरु परब्रह्म निर्विकार । गुरु ज्ञप्तिमात्र प्रणववोंकार । तया निरंतर ध्यातसे ॥५॥
ध्यानमूल दर्शन । पूजामूल गुरुअर्चन । मंत्रमूल गुरुभजन । मूळगुरुकृपा मोक्ष हा ॥६॥
संचित क्रियमाण प्रारब्ध । गुरुप्रतापें होती दग्ध । सद्गुरुमहिमा अगाध । नाशी भेद जीवाचा ॥७॥
भवसिंधूचें आगमन । अगस्तिरुपें करुन । दुर्धरमाया विपिनदहन । अज्ञानतमनाशन गुरुदेव ॥८॥
जेणें जन्ममृत्युजळद वितळे । गुरुमुखमंत्रद्वाराअनिळें । तेथें पाप पुण्याचा विटाळ । धरणें पळवी काळाचें ॥९॥
ऐसे व्हावे तरी उपाय । भावें घ्यावे सद्गुरुपाय । तुटे तेणें जन्ममृत्युअपाय । स्वरुपीं होय समरस ॥१०॥
मग जीवशिवाऐक्य होती । जेवीं दीपे प्रकाशती । उगमीं संगमसरिता सरती । तेवीं लीन होतसे ॥११॥
कीं लवणसमुद्रीचें लवण । तें सागरापासोन उत्पन्न । पाहतां सजड आणि कठिण । सिंधुमिळणीं अभेद ॥१२॥
निर्गुणापासोनि सगुण । कीं शिवापासोनि जीवपण । स्वरुपी झालिया रममाण । द्वैतपणें तेथें हरपत ॥१३॥
श्रीगुरुतें न जातां शरण । केवीं घडे मोक्षसाधन । व्रततपादि अनुष्ठान । तेणें भवबंधन तुटेना ॥१४॥
न करी जप तप तीर्थाटण । न लगे यज्ञदान अनुष्ठान । न लगे वातांबुपर्णाशन । करी सेवन गुरुचें ॥१५॥
यज्ञयोगयाग करिती । यज्ञें होय स्वर्गप्राप्ति । पुण्य सरतां ययाती । लोटोनि देती तयातें ॥१६॥
प्रपंचवृक्षा जोडफळीं । सुखदुःखादिक जावळें । तपें व्हावें जैं भूपाळें । अंती नरक होय पैं ॥१७॥
नरक तो गर्भवास जाण । मातृजठरीं नवमास पूर्ण । मळमूत्राचे दाथरेंकरुन । यातना कठिण पावती ॥१८॥
जे नेणती गुरुमहिमान । जेवीं रोगिया दिव्य पक्वान्न । कीं मृतशय्या अरळ सुमज । श्वानासी काय होतसे ॥१९॥
एक म्हणती धन्य ऐश्वर्य । काय अर्पावें हें नैश्वर्य । तो चांडाळ कृतघ्न होय । न पाहावे मुख तयाचें ॥२०॥
गुरुगृहीं दैन्य विपत्ति । आपण भोगी सुखसंपत्ति । तयातें प्रहार न चुकती । अधोगतीतें पावे पैं ॥२१॥
यास्तव सद्गुरुसेवा पाही । याहून साधन इतर नाहीं । महान अवतारादिकही । शरण जाती गुरुतें ॥२२॥
सतत रामनामस्मरण । स्मरतां तुटतें भवबंधन । तोही वसिष्ठासीं जाय शरण । हेंही ऐश्वर्य मज वाटे ॥२३॥
जो पूर्णब्रह्म भगवान । लीलाविग्रही रुक्मिणीरमण । तोही धरी दुर्वासचरण । हें महिमान जयाचें ॥२४॥
तरी गुरुभक्तिवीण पाहातां । कोणा लागली सायुज्यता । भूत भविष्य पाहूं जातां । नाढळे सर्वथा कोठेंही ॥२५॥
विपाई ऐसें प्रसंगी घडे । ब्रह्मांड थिल्लरोदकीं बुडे । प्रळयवात मुष्टीत सापडे । परि जन्म न घडे गुरुभक्तां ॥२६॥
पुण्याचें फळ सुखप्राप्ति । पापाचे परिणाम दुःख जाणती । परि गुरुसेवेतें नाचरती । पापाचरणीं तत्पर ॥२७॥
असो गुरुभक्ती जे परायण । त्यांसी माझें साष्टांग नमन । त्यांचे पदपादुकीं हा देह जाण । असो माझा अखंड ॥२८॥
तैसा सद्गुरु समर्थ मत्स्येंद्र । शिष्य एक गोरक्ष वीर । गुरुसेवेचा जो पूर्ण समुद्र । पार न पवे तयाचा ॥२९॥
गतकथाध्यायीं इतिहास । परमपावन कथा सुरस । उध्दरिला नृप ब्रह्मराक्षस । सुकृत सकृप होऊनि ॥३०॥
सिंदुरपुरीचा राजेंद्र । उध्दरिला भूपाळचंद्र । तेथूनि निघाले नाथ मत्स्येंद्र । सवे गोरक्ष घेवोनि ॥३१॥
मनोवेगेंकरुन । पवनगती गमन । तों विष्णुनगर शोभायमान । मनोरम्य देखिलें ॥३२॥
नगरनिकटीं नदी निर्मळ । चर्मण्यवतीचें वाहे जळ । तीरीं वृक्ष डोलती सफळ । शिवप्रसादें शोभली ॥३३॥
पाटांगणें दिव्यघाट । उभयभागीं श्रीपादमठ । विद्यामठी वेद्पीथ । निघंटादि पवमानें ॥३४॥
रम्यस्थळीं करोनि वास । गुरु आज्ञापिती गोरक्षास । तुवां जावोनि आणावें भिक्षेस । नगरीं प्रवेश करोनि ॥३५॥
आज्ञा वंदोनि ते क्षणीं । निघते झाले गोरक्षमुनि । तो जातां नगरामधूनि । आश्चर्य एक वर्तलें ॥३६॥  
मार्गी जातां सत्वर । तों रुदन करी विप्रकुमार । माता म्हणतसे निर्धार । कान कापी जोगिया ॥३७॥
अवश्य म्हणोनि ते क्षणी । शस्त्र घाली बाळाश्रवणीं हाहाःकारें रडे जननी । आश्चर्य करिती जन सर्व ॥३८॥
जननी म्हणे रे कानफाड्या । कान फाडिला कैसा वेडया । चाल चावडी राजवाडया । शिक्षा तूंतें करुं बरी ॥३९॥
मी वदलीं विनोदेंकरुन । तेचि केलें सत्य प्रमाण । या विनोदाचें काय घेण । जन सर्वही बोलती ॥४०॥
पाहो पातला पौरजपाळा । आसमंत मिळोन पाहती डोळां । म्हणती जोगडया चांडाळा । दुःख दिलें बाळातें ॥४१॥
नाथ वदती सत्यवचन । कर्ण छेदिला मातृआज्ञेकरुन । टवाळ हंसती टाळी पिटोन । ग्रीवा तुकाविती सर्वही ॥४२॥
एक वदती भंगीचंगी । पुंगी वाजवोनी झाला जोगी । प्रपंचत्यागी हा वीतरागी भंगट भुलवी जगातें ॥४३॥
नाना मतांचे त्रिविध जन । तर्क करिती स्वमतीकरुन । म्हणती दीक्षा करोनि ग्रहण । हे वेषधारी मारक ॥४४॥
शस्त्र घेऊनि फिरती गुप्त । अतीत वेषें करिती घात । भिक्षा मागती सर्वातीत । लुंठन करिती सर्वस्वें ॥४५॥
हे उदरनिमित्त वेषधारी । भिक्षा मागती घरोघरी । पारि कान कापिती घेऊनि सुरी । हें आश्चर्य देखिलें ॥४६॥
साधुवेष मैंद जाण । ब्रह्मारण्यीं घेती प्राण । दृश्य अळंकार हरुन । जीव घेती तयाचा ॥४७॥
हे वास करिती निरांजनवनीं । कोणी येतां तयें स्थानी । जीवासी ब्रह्मभुवनीं । अक्षयपदीं स्थापिती ॥४८॥
महाअनर्थ ओढवला नगरांत । बाळें संरक्षा गृहांत । नाही तरी होईल घात । दुष्ट स्वप्न दिसतसे ॥४९॥
एक म्हणती हे राक्षसी । पोरांभोंवतीं आली विवसी । हे पूतना पुरुषवेषी । प्राप्त झाली पैं येथें ॥५०॥
गोरक्षप्रताप परम गहन । योगमायेचें विचित्र विंदान । तिचा भ्रतार तो ब्राह्मण । पुत्र स्कंधी आणीतसे ॥५१॥
तो वदे वेडे मूर्खे । आपुला पुत्र हा वोळखे । पाहतां दोघेही सारिखे । वायां शोकें आहळसी ॥५२॥
माझा मजजवळी पुत्र आहे । व्यर्थ गळां पडसी काये । तूं आपला वोळखोन पाहे । व्यर्थ द्रोह साधूचा ॥५३॥
लीलाविग्रही गुरुनायक । भक्तां दावी स्वकौतुक । उभयसारिखें सुरेख । चकित लोक पाहती ॥५४॥
धन्य महिमा म्हणून । नमन करिती सर्वही जन । गोरक्ष करिती पुढें गमन । द्विजनंदन घेउनी ॥५५॥
जेवीं व्यासोपदेशीं संजय । तैसा सहज साधो विप्रतनय । यास्तव संजयनाथ ठेवी नांव । उपदेशदीक्षा अर्पिली ॥५६॥
तया आज्ञा करी गुरुनाथा । जाई वेगीं तीर्थाटणार्थ । तीर्थी भेटती सिध्द समर्थ । तेणें कृतार्थ होसी तूं ॥५७॥
ऐसें सांगून जाय पुढारी । जो सच्चिदानंद निर्विकारी । भिक्षार्थ हिंडे घरोघरी । तों चरित्र एक वर्तलें ॥५८॥
भिक्षार्थ गेले एक सदनीं । करिते झाले अलक्षध्वनि । तेथें स्वयंपाक करी द्विजपत्नी । भोवतें रडे अर्भक ॥५९॥
तेणें घाबरली बहुतें । संतापें वदे गोरक्षातें । यासी घालावें झोळींत । अवश्य म्हणती नाथजी ॥६०॥
सत्वर उचलोनि ते वेळीं । सद्गुरु घालिते झाले झोळीं । पुत्रमाता चाकटली । तटस्थ पाहे मुखातें ॥६१॥
जाते झाले द्वारप्रदेशीं । तेव्हां सत्य भासे मातेसी । रुदन करी अट्टहासीं । तों पतीसी जाणवलें ॥६२॥
भिक्षेसी कानफाडा आला । झोळींत घालोन बाळ नेला । पाहा आतां जाऊनि त्याला । घात केला स्वहस्तें ॥६४॥
आंगावरी असती भूषण । हिरोनि घेईल त्याचा प्राण । एकुलतें लेकरुं सांडून । काय वदन दावूं मी ॥६५॥
माता पिता धांवती सत्वर । अट्टहास करिती एकसर । आतां कैचा गृहसंसार । धिक्कार जीवित आमुचें ॥६६॥
द्विज धांव्वूनि करी शंख । पाहूं आले इतर लोक । जनक जननी जन शोक । करिती शोक सर्वही ॥६७॥
चोहटा येऊनि जंव पाहती । तंव उभी असे नाथमूर्ति । द्विज पाहून नाथाप्रति । अद्वातद्वा वदतसे ॥६८॥
गुरु वदती तया उत्तर । घेईं आपुला सत्वर कुमर । घेता झाला सत्वर कुमर । परि बाळ न जाय त्यापासीं ॥६९॥
गुरुसमागम निमिषभरी । होतां ज्ञान होय ते अवसरीं । काम महिमा वदूं वैखरी । अगाध प्रताप तयाचा ॥७०॥
माता म्हणे रे सकुमारा । चाल सत्वर आपुल्या घरां । येरु वदे तदोत्तरा । कैचें घर मजप्रति ॥७१॥
कैचें गृह कैचा देह । पांचभौतिक क्षणिक पाहें । नाशिवंत ब्रह्मांड जाय । स्वप्न होय वगैरे ॥७२॥
मातृपितृकलत्रपुत्र मित्रगोत्रसुह्र्दमात्र । कन्याभगिनी दौहित्र । हे सर्वत्र क्षणिक पैं ॥७३॥
जेथें तेथें जनक जननी । फेरें फिरलों चौर्‍यांशीं योनीं । परि सद्गुरु न देखें नयनी । तो लाभ प्राप्त मज आज ॥७४॥
अनंत जन्मीचें सुकृतांती । तेंच घडे सद्गुरुप्राप्ती । अनंत जन्ममरणपंक्ती । नाशीतसे क्षणमात्रें ॥७५॥
आतां कैची मातातात । आतां कैचा जन्म मृत्यु । आतां मी आत्मा ओतप्रोत । आब्रह्मस्तंब परिपूर्ण ॥७६॥
मी पापपुण्याहून वेगळा । मी त्रिपुटीहून निराळा । येचि देहीं सुखसोहळा । डोळां देखिला गुरुकृपें ॥७७॥
आतां पाहा मिथ्याभास । आत्मत्वीं होय समरस । अखंड दंडायमान अविनाश । चिदाकाशीं वर्तत ॥७८॥
मी ब्रह्म असोनि स्वयें । मग ब्रह्म म्हणावया काय भय । मायेनें केला हा अपाय । जीवदशेसी आणोनि ॥७९॥
ब्रह्मा असतां निरंतर । तेथें झाला मायाविकार । औडंबर रचिली साकार । असत्य सत्य भासवी ॥८०॥
कैचा रज्जू कैचा सर्प । भ्रमभ्रांति वाहे दर्प । मृगजळाचा साक्षेप । हव्यास कासया व्यर्थचि ॥८१॥
वंध्यापुत्र गगनसुमना । आणोनि देती भीष्मकन्या । तीसी लावूनि कन्या । संततीनें वाढवी ॥८२॥
गंधर्वहुडे दुर्गसदनीं । दांपत्य राहे दिनरजनी । अरुणानुजा लागोनि । चित्रफणीनें डंखिलें ॥८३॥
कांसवीचें घालोनि घृत । खद्योतदीप्तीनें प्रज्वळित । अग्निजळे उदकांत । काय मात सांगावी ॥८४॥
ऐसें देखिलें गुरुअंजनें । ब्रह्मांडकरंडा चिद्रत्नें । अनेक प्रदीप्त तारांगणीं । विद्युल्लता तळपती ॥८५॥
क्षणांत ब्रह्मसाक्षात्कार । ब्रह्मभूत होय शरीर । हेचि सांप्रदायी निर्धार । न कळे पार नाथांचा ॥८६॥
ये देही होय विदेही । मुक्तिस्थिति बाणे पाही । ऐसा अनुभव इतरां नाहीं । अकळा कळा नाथाची ॥८७॥
जीवशिवाचा द्वैतभेद । वस्तुतां होती अभेद । ऐक्यात्वें ऐक्यसंबंध । साध्यसिध्द शोधावा ॥८८॥
भवसमुद्रडोहीं खोल । त्यांत सोडिला विषगळ । दाही दिशा लक्षी काळ । व्याळ जेवीं मूषका ॥८९॥
मरीचिजळन्यायेंकरुन । कीं गंधर्वनगर शोभायमान । तैसा हा नरदेहजनन । विद्युत्स्फुरण ज्यापरी ॥९०॥
की पालाशरंग क्षणिक । तैसी माया हे माय्क । गारुडियाचा खेळ कौतुक । रावरंक बहुरुपी ॥९१॥
तैसी क्षणिक हे नरतनु । साधन केलिया काय वर्णू । व्यर्थ जातसे आयुष्यभानु । काय म्हणावे तुम्हांतें ॥९२॥
आपुले स्वार्था सर्व शाहणे । परि परमार्थी होती पाहुणे । जाणून दुःख करिती पेणें । मूर्खपणें नाडती ॥९३॥
सदन बांधिती पायाखोल । क्षणायूची येतसे वोल । हे बोल वाटती फोल । अकाळ काळ नेणती ॥९४॥
होणार तें न चुके सर्वथा । साधन साधाया परमार्था । व्यर्थ गुंतोनि विषयस्वार्था मृत्यु अन्यथा नव्हेचि ॥९५॥
गुरु भक्तांचें भय पाही । यम पळतसे लवलाही । मृत्यूसी मृत्यु येतसे ठायीं । काळ काळा ग्रासित ॥९६॥
जेवीं राजद्वारीचे सेवक । धिक्कारिती पाहून रंक । तेवीं अष्टसिध्दयादिक । गुरुपुत्र तुच्छ मानिती ॥९७॥
अज्ञानतिमिराची राती । सद्गुरुकृपें उदया येती । तें ज्ञानप्रकाशगभस्ति । अज्ञानरजनीनाशक जें ॥९८॥
अनंत जन्मीचें हरपलें । तें मजमाजी सांपडलें । सद्गुरुकृपेचे बळें । द्वैत गेलें लयातें ॥॥९९॥
त्वं तत्‍ आणि आसि । एवं वदे तत्त्वमासि । तोचि आत्मा मी अविनाशी । क्षराक्षरासी वेगळा ॥१००॥
माता म्हणे वत्सा तान्हया । माझी त्यागून जासी माया । दुःखदायक उदरीं कासया । आलासी माझे गुणज्ञा ॥१॥
यापरी निरोपोनि निर्वाणज्ञान । आश्चर्य करिती सर्व जन । हा योगभ्रष्ट पावला जनन । दर्शनें उध्दरी सर्व जीव ॥२॥
दोन वर्षांचें बाळ सान । तयांसी झालें आत्मज्ञान । धन्य सद्गुरुमहिमान । पूणब्रह्म पै केलें ॥३॥
जनक्जननीनें परिसोन ज्ञान । तया सद्बोधवैराग्य होऊन । तटस्थ पाहती सर्व जन । वृत्ति एकाग्र होऊनी ॥४॥
ब्रह्मनिष्ठ झालिया नंदन । त्याचें करावें अवश्य वंदन । पूर्वजां प्राप्त कैवल्यसदन । श्रुति प्रमाण वदतसे ॥५॥
पिता माता उभयतां । वंदिती झालीं गोरक्षनाथा । पुरे पुरे हा प्रपंच आतां । आम्हां समर्था उध्दरीं ॥६॥
तीतें म्हणती गोरक्षानाथ । पुत्र दिधला भिक्षार्थ । तो रक्षिला झोळीआंत । धन्य कृति त्वां केली ॥७॥
पुत्रा दीक्षा दिधली त्वरित । नाम ठेविलें विमळनाथ । आज्ञापिती करी तीर्थ । बदरिकाश्रमीं असावें ॥८॥
लोहासी लागतां परिस । तात्काळी होय बावन्नकस । केवळ सान बाळ राजस । समरस झालें स्वस्वरुपीं ॥९॥
परीस दृष्टांत एकदेशी । सोनें लावितां लोहासी । तो लोहता जाईल कैसी । सामर्थ्य तें परिस ॥११०॥
तैसा नव्हे सद्गुरु जाण । शिष्या करी आपणांसमान । त्याचे उध्दरती सकळ जन । भवबंधन तोडीतसे ॥११॥
असो तेथोनि गंतव्य करीत । महाराज श्रीगोरक्षनाथ । पुढें जात द्विजसदनांत । मंगळ उत्साह देखिला ॥१२॥
अलक्ष जागवोनि आननीं । भिक्षा देई वो जननी । स्वरुपसौंदर्य सुलक्षणी । पाहोन वेधले जन सर्व ॥१३॥
ऐसा पुरुषसौंदर्य व्यक्ति । प्रत्यक्ष दैदीप्य विष्णुमूर्ति । किंवा हो उमापति । आज जगतीं देखिला ॥१४॥
पक्वान्न भरोन सुवर्णपात्र । दिव्य अन्नें पदार्थ मात्र । स्वादिष्ट चतुर्विध पवित्र । अर्पिती सत्वर सद्भावें ॥१५॥
तेथून पातले मत्स्येंद्रस्थळीं । स्वामीपुढें ठेविली झोळी । भिक्षाग्रहण तये काळीं । करिते झाले नाथजी ॥१६॥
अन्न षड्रस बहुत । दध्योदन वटक मिष्ट लागत । तयावरी अद्भुत प्रीत । संतोषत तयावरी ॥१७॥
गोरक्ष प्रसाद करी ग्रहण । उच्छिष्टशेष दुर्लभ म्हणून । स्वीकारिती प्रीतीकरुन । आनंदमय होऊनी ॥१८॥
असो दुसरे दिवशी जाणें । गोरक्षातें मत्स्येंद्र म्हणे । तूं सत्वर जावें येथून । भिक्षा आणी कालची ॥१९॥
माषान्नवटक अति रुचिकर । आणी कां अतिसत्वर । आज्ञा होतां गोरक्षवीर । जाते झाले गुरुआज्ञें ॥१२०॥
हरपले स्थळीं पाहावें म्हणून । त्या गृहीच करावें शोधन । पूर्वद्वार लागलें म्हणून । पश्चिमद्वारें जातसे ॥२१॥
तेथें सडासंमार्जन करिती । उच्छिष्टपात्रें उध्दर्तिती । तेथें अलक्ष उच्चरिती । भिक्षा मागती स्त्रियातें ॥२२॥
भिक्षा आणितां तांदुळ । तों न घे मत्स्येंद्रबाळ । म्हणे माषान्नवटक द्यावे पुष्कळ । मिष्ट रुचिकर लागती ॥२३॥
म्हणे योगिया अवधारी । काल प्रयोजन होतें घरीं । अन्नें पचविलीं नानापरी । आज कैचे आसती ॥२४॥
अतिथि म्हणे लडिवाळ । आमचे परवावे तुम्ही आळ । यास्तव मागणें तुम्हांजवळ । तरी आतां पूर्ण करावें ॥२५॥
अतिथी देतां इच्छाभोजन । इच्छिलें पावती सत्य जाण । त्यासी धर्मशास्त्र प्रमाण । जाणत असां सर्वही ॥२६॥
कुंडलाकृती माषान्न क। नाथासी अर्पितां अपारपुण्य । हें कराल वचन मान्य । कीर्ति धन्य त्रिलोकीं ॥२७॥
रिक्त गेलिया अतीत । तरी गृहस्थ होय पुण्यहत । यास्तव विचारा परमार्थ । सार्थक करा देहाचें ॥२८॥
पाहा शिबिराजयानें । आपुली वपू केली छेदन । कीं श्रियाळ मांसदानें । अतिथि तोषवी शंकर ॥२९॥
हरिश्वंद्र स्वप्नीं दान । विश्वामित्रा करी अर्पण । समग्र राज्य देऊन । आपण जाय वनातें ॥१३०॥
बळीनें अर्पूण शरीर । तोषविला अदितिकुमर । कीं कर्णासीं मागे इंद्र । कवचकुंडलें देत तया ॥३१॥
यावरी स्त्रिया बोलति वचन । तक्रार्थ कथन रामायण । कळले तुझें ब्रह्मज्ञान । उदरभरणार्थ दिसतसे ॥३२॥
पूर्ववय वैराग्य घेऊन । रसना इच्छी मिष्टान्न । काय बाह्य भस्म चर्चून । वासनात्याग नव्हेचि ॥३३॥
नाना असत्य बोलून । करिती आपुलें कार्यसाधन । हेम प्राणिमात्रीं ध्यान । धूर्तलक्षण हें होय ॥३४॥
येरु म्हणे घेतल्यावीण । येथून न जाय अर्धक्षण । स्त्रिया म्हणती काय कारण । आग्रह करणें भिक्षेचा ॥३५॥
अल्पसंतुष्ट असावें । मनइच्छेनें जो लाभ पावे । तेणें सुखातें पावावें । नैराश्य व्हावें अंतरी ॥३६॥
अतिथि हा आतित्याई । आर्षबुध्दी न कळे कांही । तंदुळ अर्पी ते भिक्षा घेई । कांहीं न मिळे यापरतें ॥३७॥
अरे सकुमारा योगिया । भलता घेऊं नको थाया । व्यर्थ होती श्रम वाया । अर्थ साध्या नव्हेचि ॥३८॥
तुझे आकर्ण नेत्र दिसती । तें काढून देई आम्हांप्रति । अवश्य म्हणूनि नाथमूर्ति । अंगुळी घाली चक्षूतें ॥३९॥
गोरक्षें अक्ष काढिला । रुधिरप्रवाह चालिला । भूमीवरी तत्काळ पडिला । तेणें भ्याला अंतरीं ॥१४०॥
राजशिक्षाभयेंकरुन । ललना झाल्या म्लानवदन । स्वपल्लवें नेत्र पुसोन । चरण धरूं धांवती ॥४१॥
गोरक्ष म्हणती सर्व पावलें । वटक आणा उतावेळें । लगबग होऊन सोवळें । पाकनिष्पत्ती करिताती ॥४२॥
घाबर्‍या होऊन युवती । भयें भरली भावनाभक्ति । उत्पन्न झाली भयप्रीति । पक्वान्न करिती पैं ॥४३॥
घृतपक्व पचवोनी । आणिल्या झाल्या नितंबिनी । अपूपवटक घालोनि दध्योदनीं । वडे स्थूळ आणिले ॥४४॥
झोळींत भरोनि आपुल्या हातें । देती तेव्हां गोरक्षातें । जेवीं यज्ञपत्न्या कृष्णातें । अर्पित्या झाल्या सद्भावें ॥४५॥
कपाटें करुन मुक्त । बोळविले गोरक्षनाथ । नेत्र धरुन वामहस्तें । मत्स्येंद्रदर्शना जातसे ॥४६॥
लीईलानाटकी दावी चरित्र । ब्रह्मादिकां न कळे सूत्र । तो गुरुकार्या देऊन नेत्र । मत्स्येंद्रपुत्र येतसे ॥४७॥
सद्गुरुतें करुन नमन । पुढें ठेविलें भिक्षान्न । गुरु बोले काय कारण । नेत्र झांकलें मद्वत्सा ॥४८॥
गोरक्ष वदती सत्य वचन । भिक्षा आणिली नेत्र देऊन । गुरु म्हणती करी अर्पण । एक चक्षु आमुतें ॥४९॥
आज्ञा होतां ते क्षणीं । नेत्र अर्पिला गुरुचरणीं । धन्य म्हणोनि आकाशवाणी । होती झाली ते वेळां ॥१५०॥
जेवीं कमलावर कमलपत्राक्ष । विरुपाक्षा अर्पित कमलदलाक्ष । परीक्षा पाहे सर्वसाक्ष । कमल प्रत्यक्ष गुप्त करी ॥५१॥
उणें होतां पुष्पकमळ । करांगुळीनें नेत्रकमळ । काढोनियां उतावेळ । जाश्वनीळा अर्पित ॥५२॥
तोचि एक राहिला म्हणून । गोरक्ष अवतारीं करीं अर्पण । धन्य गुरुभक्तीचें महिमान । अवतार घेत यास्तव ॥५३॥
चर्मचक्षूचा त्याग करुन । नेत्री सूदलें दिव्यांजन । तेव्हां ज्ञानचक्षु प्रगटोन । ब्रह्मैव भासे सबाह्य ॥५४॥
गोरक्ष अवतारीं मत्स्येंद्रसेवनीं । कृष्णअवतारीं सांदीपनी । कलीत एका जनार्दनीं । गुरुसेवन जाणती ॥५५॥
आदिमध्यअवसानीं । आदिनाथ व्याप्त जनीं वनीं । कर्ता करविता त्यावांचोनि । नसे दुजा निश्चय ॥५६॥
या अध्यायाचे करितां आवर्तन । त्यास अष्टसिध्दि सुप्रसन्न । अष्टांगयोगाचें श्रेय पूर्ण । प्राप्त होय जाण पां ॥५७॥
अष्टाध्याय अष्टदिक्पाळ । कीं अष्टभैरवचि हे प्रबळ । कीं अष्टविनायकनिश्वळ । त्या अष्टभाव साष्टांगीं ॥५८॥
येथें आर्ताचे अष्टभोग सरती । येथें एकाग्र अष्टधाप्रकृति । येथें अष्टदेह सामावती । अध्यायाष्टक श्रेष्ठ हें ॥५९॥
पुढें कथा अतिरसाळ । गुरुभक्त परिसोत प्रेमळ । श्रवणपठणें सकळ । गुरुपुत्र प्रेमा जाणती ॥१६०॥
अदिनाथलीला प्रयाग जाण । भाव माघमास आर्तेकरुन । ग्रंथश्रवणीं करा स्नान । येणें कैवल्य ये हातां ॥६१॥
हा ग्रंथ त्रिवेणीसंगम । येथें समाधि ज्या निःसीम । तोचि स्वयं परब्रह्म । उध्दरी दर्शनें बहुतांसी ॥६२॥
श्रीमत् आदिनाथलीला प्रसिध्द । भैरवपदाब्जीं षट्‍पद । आदिनाथ होऊनि मिलिंद । अष्टमोध्याय सुरस हा ॥१६३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP