श्रीनाथलीलामृत - अध्याय ११ वा

नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.


ज़श्रीगणेशाय नमः ॥
जो देवाधिदेव परमेश्वर । जो परंज्योति परात्पर । जो आदिमायेचा निजवर । श्रीआदिनाथ सद्गुरु ॥१॥
जें आदि अनादि स्वसंवेद्य । जें ध्येय हरिहरादिआराध्य । जें निगमा गम्य परमवंद्य । तें साध्य होय सत्कृपें ॥२॥
जें आदिबीज जगदाकार । जें शुध्दभूमीं विरुढें अंकुर । तें सप्तभूमीं सविस्तर । अनुक्रमें परिसिजे ॥३॥
त्या सप्तभूमिका म्हणाल कवण । तरी योगवासिष्ठश्लोक प्रमाण । त्याचेंही परिसा लक्षण । अनुक्रमें वदतसें ॥४॥

ज्ञानभूमिः भुभेच्छाख्या प्रथमा समुद्राह्यता । विचारणा द्वितीया स्यात्‍ तृतीया तनुमानसा ॥१॥
सत्त्वायत्ती चतुर्थी स्यात्ततोऽसंसक्तिनामिका । पदार्थभाविनी षष्ठी सप्तमी तुर्यगा स्मृता ॥२॥


शुभेच्छा हे प्रथम निर्धारी । विचारणा नाम हे दुसरी । तनुमानसा हे तिसरी । सत्त्वायत्ती चौथी हे ॥५॥
असंसक्ति हे पंचमी पाहे । पदार्थभविनी सहावी होये । तुर्याभूमि सातवी हे । निश्चय झाला वेदोक्ती ॥६॥
तरी ते प्रथम भूमिका कोणती । शुभेच्छा म्हणती जियेप्रति । तेंही परिसा यथानिगुती । तत्त्वमस्यादि महावाक्य ॥७॥
माझें अज्ञानत्व कैं जाईल । कधी सद्गुरु भेटतील । रात्रंदिवस तळमळ । वाहे सदा सर्वदा ॥८॥
अखंड वैराग्य अंतःकरण । सर्वपदार्थी जो उदासीन । कैं श्रीगुरुतें रिघेन शरण । शुभेच्छा जाण या नांव ॥९॥
सद्गुरुमुखें विवरण । महावाक्यादि करी श्रवण । तदनुसार करी आचरण । नसे विचार दुजाही ॥१०॥
निर्विषय झालिया मनीषा । ऐहिकाची जया नैराश्या । श्रवणीं आवडी वैराग्यदशा । तनुमानसा हे तिसरी ॥११॥
श्रवण मनन निजध्यास । हे तिन्ही साध्य होती जयास । साक्षात्कार होय तयास । विचारासी जो पावे ॥१२॥
सम्यकज्ञान क्रियासहित । तेणेंचि पावे मन विश्रांत । सत्त्वायत्ती हे विख्यात । चतुर्थभूमि जाणिजे ॥१३॥
पदार्थमात्र दृश्यमान । कदा न गुंते जयाचे मन । सदा आनंदी निमग्न । असंसक्ति हे पांचवी ॥१४॥
पंचभूमी वोलांडून । पुढे अवशिष्ट ज्ञान जाण । भासे पदार्थी चिन्मय चैतन्य । पदार्थभविनी षष्ठम हे ॥१५॥
सहावी भूमिका आनुभव । भेदाभेद निरसिला सर्व । स्वस्वरुपी स्वयमेव । सातवी तुर्या पैं ॥१६॥
हें भूमिसप्तकशोधन । शुध्दभूमि पाहिजे जाण । शुध्दभूमीं बीजारोपण । सद्गुरुवाक्य ठसावें ॥१७॥
भूमीच्छा हें मूळकारण । येचविषयीं निरुपण । श्रोती करावें एकाग्रश्रवण । महदाख्यान सुरस जें ॥१८॥
सुदर्शन आणि लीलावती । गेली बदरिकाश्रमाप्रति, । इकडे चंद्रचूड सुभद्र नृपती । स्वनगरातें जाय ते काळीं ॥१९॥
चंद्रचूड राज्याधिपति । सुभद्र युवराज्यनीति । चालवितसे परमप्रीती । प्रजापाळी सर्वस्वें ॥२०॥
चंद्रचूड भोगी राज्यभोग । परी अंतरी शुभेच्छावैराग्य । गुरुचिंतनाचा अनुराग । सदा वाहे अंतरी ॥२१॥
जेवीं विरहिणी पतिवियोग । मानी खदिरांगार विषयभोग । कांही पदार्थ गोड न लागे । तळमळ वाहे अंतरी ॥२२॥
तया न रुचे शयनवसन । न रुचे मिष्टमिष्टाशन । गुरुदर्शनी वेधले मन । उत्कंठित आतुर पैं ॥२३॥
ऐसे लोटतां कांही दिवस । निश्चय जाणून जगन्निवास । आपुलें ऋण फेडावयास । सद्गुरुकृपें भेटती ॥२४॥
गतकथाध्याय़ीचा इतिहास । प्रत्यक्ष केला स्त्रीचा पुरुष । विश्वनाथ नाथ उमेश । गोरक्ष देती भिक्षेतें ॥२५॥
तो व्याघ्रचर्म परिधान । तत्काळ करी तो उमारमण । ऐसें सद्गुरुमहिमान । किती म्हणून वदावें ॥२७॥
गोमंतक गोरक्षतीर्थ । जेवीं प्रयाग गया गोकर्ण विख्यात । गोकुळ गोवर्धन पर्वत । तेवीं क्षेत्र होय तें ॥२८॥
असो तेथून उतावेळ । गमन करिती दीनदयाळ । येते झाले तत्काळ । निषधदेशी गोरक्ष ॥२९॥
इंद्रपुरी नामें नगरीं । पुरीं प्रवेशले दीनोध्दारी । तों चंद्रचूड उपरीवरी । सहजस्थिती पाहतसे ॥३०॥
नगरगर्भातूनि दूरी । दृष्टि गेली नाथावरी । वृत्ति झाली तदाकारी । मनोवेधें वेधली ॥३१॥
भिक्षा मागतां नगरांत । तंव प्रवेशले राजालयांत । दृष्टी देखिला सद्गुरुनाथ । हर्षयुक्त येतसे ॥३२॥
झाला आठव नाठव विसर । वृत्ति तन्मय तदाकार । विसर पडला आपपर । देहभाव मावळला ॥३३॥
लवडसवडी उतरे सोपान । करितां झाला साष्टांगनमन । वोवाळून पंचप्राण । अर्थभूत प्रार्थित ॥३४॥
म्हणे उदेलें पूर्वपुण्य । पूर्वकृत सुकृतप्राक्तन । सद्गुरु वोळले अमृतघन । मज चातकातें ये वेळी ॥३५॥
मृत्युसमयीं अमृत पान । जेवीं निर्जीवास संजीवन । तेवीं झाले समर्थागमन मग लाभणें काय ते ॥३६॥
जेवी इंदिरा येत मंदिरीं । दरिद्र पळी तत्काळ दुरी । कीं क्षुधार्थियाचे घरीं । क्षीरासिंधू पातला ॥३७॥
तव महिमा नेणती प्राकृतें । मी कृतार्थ पूर्वसुकृतें । सुकृतकृपा करोन मातें । दर्शनमात्रें उध्दरी ॥३८॥
जया ध्याती योगीजन । जयास्तव सेविती घोर विपिन । सिध्द साधिती रात्रंदिन । तें त्वरीत मज द्यावें ॥३९॥
क्षणांत ब्रह्मसाक्षात्कार । सत्वर अनुभव चमत्कार । मज पडिओन देहाचा विसर । ब्रह्मानंदी नांदवी ॥४०॥
संकल्प विकल्पात्मक केवळ । मग न राहे निश्वळ । मनोवेग अतिचपळ । नसे स्थिर क्षणभरी ॥४१॥
बंधमोक्षासी कारण । एक मनचि होय प्रमाण । मन एकाग्र झालियाविण । साध्य नव्हे साधकां ॥४२॥
पादचारी गगनीं गमन । हेंही होईल काळेंकरुन । परि एकग्रतेस मन । कदा न ये कल्पांती ॥४३॥
कर्मठ राहील समाधिस्थ । हें केवीं घडे अघटित । की जळीं मत्स्य निवांद्त्त । राहील कैसा स्वामिया ॥४४॥
यावरी वदती दीनदयाळ । गुरुवचनीं विश्वास अढळ । तरी पावे कैवल्यफल । निश्चयेसीं जाण पां ॥४५॥
निश्चयाचें होय बळ । तरी मन कां येतुलें चपळ । निश्चय राहील निश्वळ । तरी अचळ सुखातें पावती ॥४६॥
स्वस्वरुपीं होतसे लय । तेव्हां वासनेचा केला क्षय । मन करी अनेक अपाय । मग साधन केवीं घडेल ॥४७॥
चंचळ चपळ दुरावर्त मन । जो सृष्टिकर्ता चतुरानन । केलें कन्येतें अवलोकन । स्मरणस्फुरण तयातें ॥४८॥
तरी मन निग्रहाचे बंदीं । घालून साधी कार्यसिध्दि । तेणेंचि साधे आत्मसिध्दि । इंद्रियउपाधि नसेचि ॥४९॥
तुज मनाची चांचल्यता शंका । तरी परिसी निग्रहकुंचिका । सांगतों तुज वचन एका । न ऐके सर्वथा मनाचें ॥५०॥
मनाचे छंदी न लागावें । मन जाईल तेथे न जावें । मन पाहील तें न पाहावें । मन कोंडावें निश्चयें ॥५१॥
मनाचे कल्पना विकार । परमदुर्धर अविचार । करी नित्यानित्यविचार । धरी निर्धार गुरुवचनीं ॥५२॥
अरे हें मन ब्रह्मींचा अश । ब्रह्म न दिजे सामरस । चुकोन आलें स्वस्वरुपास । जेथील तेथें लावी कां ॥५३॥
जैसा जीवनांतील मीन । कदा कर्दमी न राहे क्षण । तो शोधी पूर्वस्थान । तेवीं मन उन्मन करी हें ॥५४॥
ऐसें बोलोनि तये वेळे । तया भ्रूसंधी भस्म चर्चिलें । अलक्षीं लक्ष लाविलें । मग गुप्त झाले गोरक्ष ॥५५॥
पाहत पाहत समाधि । वृत्ति गुंतली परमानंदी । विरोन गेली देहबुध्दि । तटस्थ तिष्ठे काष्ठ पैं ॥५६॥
झाला एकचि हाहाःकार । पाहूं पातले नारीनर । सुभद्रबंधु धांवे सत्वर । वक्षस्थ्ळ बडवीत ॥५७॥
वृध्दावृध्द तेथें येती । अनेक कल्पना तर्क करिती । पाहा अकस्मात रायाप्रति । काय झालें कळेना ॥५८॥
एक म्हणती धरा धरा । एक उपवस्त्रें घालिती वारा । एक म्हणती राजेश्वरा । अकाळ मृत्यु पावला ॥५९॥
कोणी म्हणती वायुचिन्ह । कोणी म्हणती पूर्वप्राक्तन । एक म्हणती पिशाच झडपण । कीं कुळदैवत क्षोभलें ॥६०॥
एक म्हणती नव्हे ऐसें । रायासी झाला सर्पदंश । कीं दुष्टग्रह दुष्टदोष । किंवा मंत्र चळला असे ॥६१॥
वैद्य वैदिक पंचाक्षरी । उतारे मांत्रिक धन्वंतरी । गणिती ज्योतिषी अहोरात्रीं । बैसविले सुभद्रें ॥६२॥
संततधारा ते ब्राह्मण । बैसविले विग्रहकरुन । मृत्युंजयाचें अनुष्ठान । करिते झाले मांत्रिक ॥६३॥
निग्रह नवग्रहादिहवन । कोणी म्हणती पवमान । कित्येक करिती वेदपठण । उपासिती उपासना ॥६४॥
गाणपत्य आराधिती गणपती । शाक्त ध्याती महाशक्ती । शैव सेविती पशुपती । वैष्णव ध्याती विष्णूतें ॥६५॥
सौर सविताआराधन । उपस्थानसूक्तें अनुष्ठान । स्तोत्रमंत्रयंत्रें साधन । गंडे दोरे अंगारे ॥६६॥
सप्तशतीचें करिता पठण । सप्ताह भागवतपारायण । कार्तवीर्यबटुकभैरवआराधन । नारसिंह मारुति ॥६७॥
नगर नागरिक प्रजाजन । सर्वही होती उद्विग्नमन । महत्प्रळय वोढवला पूर्ण । सुभद्र यत्न करीतसे ॥६८॥
ऐसा नृपवर चिंताक्रांत । प्रधानासी विचार करीत । म्हणे वोढवला अनर्थ । उपाय कांही सुचेना ॥६९॥
चिंताग्रस्त नृप विकळ । रात्रंदिन करी तळमळ । म्हणे प्रयत्नातें न होय फळ । शुष्कवृक्षासारिखें ॥७०॥
वाहावलों चिंतार्णवप्रवाहीं । मज त्राता सर्वथा नाहीं । कोण धांवेल ऐसे समयीं । दुर्धर अपायीं पडियेलों ॥७१॥
यापरी लोटले सप्तदिन । अंतरी पेटला चिंताकृशान । अकस्मात पूर्वस्मरण । होतें झालें तयातें ॥७२॥
म्हणे जयाचिये वरदवचन । आम्हां उभयतां झालें जनन । जेणें जीवनीं प्राणदान । देऊन रक्षिलें मजप्रति ॥७३॥
मातेतें देऊनि दिव्यांबर । केला मातृपितृउध्दार । आणि देते झाले वरदवर । गोरक्ष येतील म्हणोनि ॥७४॥
तों महाराज गोरक्षनाथ । प्रताप जयाचा जगविख्यात । स्मरतां सप्तही प्रगट होत । कोण कोण तें ऐका ॥७५॥

श्रीदत्तो नारदो व्यासःशुकश्व पवनात्मजः । कार्तवीर्यश्व गोरक्षः सप्तैते स्मृतिगामिनः ॥३॥

श्रीदत्त नारद बादरायण । शुकाचार्यादि हनुमान कार्तवीर्य गोरक्ष जाण । स्मरणें प्रगटती सप्तही ॥७६॥
ऐसी असतां जयांची कीर्ति । तरी कां न पवे एकांती । तों निशा सरतां जेवीं गभस्ति । उदया येत जाण पां ॥७७॥
तेजःपुंज दैदीप्यदीप्ति । जयाची स्वप्रकाश अगंकांति । अरुण वर्णवसनें विलसतीं । भव्य भस्म चर्चिलें ॥७९॥
विशाळ भाळ आकर्ण नयन । सुप्रभमुद्रा मंडित श्रवण । कुब्ज कमंड्ल्लु मृगाजिन । पदीं पादुका मिरवती ॥८०॥
सरळ शैली रुळे गळां । शोभे भगवी भूषित मेखळा । कुक्षीं झोळी करीं माळा । त्रिशूळ पाणीं विराजे ॥८१॥
वीरगुंठी अति शोभली । कुंतलमुकुटीं विराजली । शृंगी वाद्य तये वेळीं । अनुहतगजरीं वाजतसे ॥८२॥
मुक्त मुमुक्षु विषयी जन । पाहून करिती साष्टांगनमन । म्हणती आदिनाथ कीं आदिनारायण । दर्शन देऊं पातले ॥८३॥
शुक किंवा वामदेव । कपिलसिध्द दत्तात्रेय । सनक सनंदन ब्रह्मतनय । सनत्कुमार असेल ॥८४॥
स्त्रिया वदती धन्य जननी । प्रसवली रत्न वैडूर्यमणि सकुमार कुमार सुलक्षणीं । ऐसें निधान देखिलें ॥८५॥
अल्पवयांत दीक्षाग्रहण । यासी द्यावया काय कारण । प्रंपंच त्यागून मन कठिण । कां झालें हें कळेना ॥८६॥
एक वदे नव्हे मानव । अंशरुपें प्रगटे देव । उमाधव किंवा रमाधव । अनुष्ठानें प्रगटले ॥८७॥
पूर्वी लीलावतीतें मत्स्येंद्र । अर्पिते झाले कनकांबर । त्याचे वरदें वरदपुत्र । उभयांसी उभय जाहले ॥८८॥
एक बुडाला जळांत । तोही आणिला स्वसामर्थे । आतांही आला अकस्मात । परि त्याजऐसा दिसतो ॥८९॥
ऐसे बहुत मतांचे त्रिविधजन । करिती स्वबुध्दीं अनुमान । परि निर्देशाची निश्चयखूण । जीवकवि नेणती ॥९०॥
वार्ता प्रगटली नृपश्रवणीं । तत्काळ आला लोटांगणीं । विनीत होऊनि बध्दपाणि । नम्रवाणीं वदतसे ॥९१॥
जेवीं चातका वोळला घन । तेवीं स्वामीचें आजि दर्शन । कृतसंकल्प झाले पूर्ण । कृतार्थ झालो आजि मी ॥९२॥
प्रधान प्रार्थी कर जोडून । राव पडिला गतप्राण । आजि झाले सप्तदिन । कृपावलोकन करावें ॥९३॥
भगीरथप्रयत्नें साधे सिध्दि । नेणो काय लिखित प्रारब्धीं । ऐसें संकटी दयानिधि । स्वानंद उदधि लोटले ॥९४॥
अवश्य म्हणती गोरक्षनाथ । तों मंचकी मुमूर्ष नृपनाथ । देखून सकृप विलोकित । शृंगी श्रवणीं वाजवी ॥९५॥
ब्रह्मानंदीं ब्रह्मनंध्री भेद । नाद होतां झाला सावध । तत्काळ उठोन चरणारविंद । जेवी षट्‍पद झेंपावे ॥९६॥
जयजयकारें पिटोनि टाळी । आनंदली भक्तमंडळी । ब्रह्मानंदनाद निराळीं । तये वेळीं गाजला ॥९७॥
पौरजजन कनकसुमनीं वोपिते झाले अनर्ध्यरत्नीं । नीचयाती विविधदानीं । तोषविल्या अपार ॥९८॥
मंगळवाद्यें वाजतीं तुरे । उल्हाट यंत्राच्या भडिमारें । धूम्र कोंदला एकसरें । भ्रांतिनिशा भासली ॥९९॥
शर्करा भरोनि द्विरदावरी । हर्षे वाटिते झाले नगरीं । अक्षयवाणें सौभाग्यनारी । करित्या झाल्या आवडीं ॥१००॥
हरिद्राकुंकुम अंतःपुरी ॥ राजभार्या ते अवसरीं । वाणें वसनें अलंकारी । द्विजांगनांते पैं देती ॥१॥
भांडारें फोडोनि समग्र । तोषविले धरामर । देवघोषें गाजे अंबर । आशीर्वाद द्विज देती ॥२॥
असो आनंद वर्तला अपार । चंद्रचूड जोडूनि कर । स्तवन करी वारंवार । सद्गुरुचें ते वेळां ॥३॥
जयजय सद्गुरु निर्विकारा । मायाविपिनवैश्वानरा । उन्मनकारका जगदोध्दारा । परात्परा श्रीगुरु ॥४॥
जयजय द्वंद्वद्विरदविदारणा । क्रोधअहिनिक्रंदसुवर्णा । मदमदनांतका भाळलोचना । त्रिदोषशमना गुरुवर्या ॥५॥
जेवीं लोहाचें शुध्दकांचन । तेवी केलें मन उन्मन । या कृतोपकारा उत्तीर्ण । प्राण सांडणें पैं माझे ॥६॥
मी मजमाजीं हरपलों । माझा मजमाजीं सांपडलों । सद्गुरुमाहात्म्य काय बोलों । सुख पावलों स्वस्वरुपीं ॥७॥
मृगजलवत्‍ हा भवसमुद्र । त्यांत तनुनौका नवछिद्र । इचा विश्वास क्षणमात्र । मज नसे गा सर्वथा ॥८॥
आत्मसाधनावीण शरीर । प्रेता जेवीं अलंकार । स्मशानीचें भग्नपात्र । काय उपयोग तयाचा ॥९॥
निरर्थकाचें सार्थक । कर्ता एक गुरुनाथ । भिक्षा मागूं पातलों रंक । आवश्यक मज दीजे ॥११०॥
आतां पुरे हा भव दुस्तर । अधोगतीची वेरझार । ऊर्ध्वगतीं राहे स्थिर । ऐसें करीं गा दयाळा ॥११॥
तूं गोइंद्रियांचा नियंता । इंद्रिय्यें माझीं रक्षी आतां । गुरु गोरक्षनाम धर्ता । ब्रीदाभिमान तुजलागीं ॥१२॥
गोरक्ष गोरक्ष करितां स्मरण । स्मरणें तुटे जन्ममरण । तयासी होय कैवल्यपण । माळ घाली मोक्षश्री ॥१३॥
मंदस्थिम बोलती वचन । बापा योग हा परम कठिण । आमंत्रण असोनि भिक्षाटण । कां इच्छिसी सुजाणा ॥१४॥
ऐश्वर्यसंपन्न संपत्ती । त्यागूनि भोगावी वैराग्यविपत्ति । हें अयोग्य तुजप्रति । सांगूं किती तुजलागीं ॥१५॥
राज्यभोग ऐश्वर्यविषय । त्यागून इच्छिसी वैराग्यविषय । त्यांत कैसा पावसी संतोष । दुःखप्रद योग हा ॥१६॥
अनेक तपाचरण करुन । राज्यभोग सुखसंपन्न पावून त्यांच त्याग करणें । हें अयोग्य लौकिकीं ॥१७॥
तरी सांगतों ऐक विचार । प्रपंची परमार्थ घडे सुंदर । अतिथि अभ्यागत साचार । गृहस्थधर्मी घडे कीं ॥१८॥
येरू वदे निश्चयवाणी । देह अर्पिला सद्गुरुचरणीं । आतां प्रपंचाची कहाणी । नाईके श्रवणीं सर्वथा ॥१९॥
जरी गुरुपदीं असेल निर्धार । तरीच करिती स्वामी उध्दार । ऐसें वदोनि नमस्कार । दंडप्राय घालीत ॥१२०॥
निश्चय पाहोनियां थोर । वदते झाले वरदोत्तर । चिरंजीव चंद्रार्कवर । योगसुखातें भोगिसी ॥२१॥
न कारीं साधनाचे सायास । जपतपनेमाचा हव्यास । स्वसुख भोगी असमास । निमग्न राहीं स्वानंदी ॥२२॥
न लगे कर्मठपणाचा खटाटोप । न लगे जपतपाचा साक्षेप । मुख्य पाहिजे पश्चात्ताप । जेणें त्रिपात नासती ॥२३॥

मुंडणं चोपवासं च तीर्थयात्रां तथैव च । अग्निहोत्रं च संन्यासं नाथपंथे विवर्जयेत् ॥४॥

मुंडण आणि उपोषण । न लगे करावें तीर्थाटण । अग्निहोत्र संन्यास जाण । नाथपंथी वर्ज हें ॥२४॥
नाथसांप्रदायमहिमा परम । स्वयेंचि होय परब्रह्म । न कळे निगमा हें वर्म । नाथधर्म अगाध ॥२५॥

स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ॥५॥

षष्ठमोऽध्यायी गीताकार । अर्जुना वदे शार्ड.धर । संन्यासी आणिय योगीश्वर । निरग्निक्रिया उभयांची ॥२६॥
अर्जुना भिन्न मार्ग हे दिसती । निदानीं तरी एकवटती । जेवी गंगाप्रवाह भिन्न असती । ऐक्य होती एकचि ॥२७॥
एका वृक्षा दोन लता । उभय दिसती पाहूं जातां । तैसा संन्यास आणि नाथपंथा । भेद सर्वथा असेना ॥२८॥

आदौ जटिलसंन्यासी दत्तो नारायणः शिवः । दुर्वासो वामदेवश्व भरतः कपिलस्तथा ॥६॥
श्वेतकेतुर्द्रुहिणजः सनत्कुमार एव च । इत्यादयस्ते जटिला संन्यासे क्षौरवर्जिताः ॥७॥

 
जटिलसंन्यासी ते कवण । ऐक अनुक्रमें अभिधान । आदिनाथ आदिनारायण । दत्तात्रेय वामदेव जो ॥२९॥
शिवदूर्वासा सिध्दव्रत । ऋषभपुत्र नामें भरत । कपिल आणि श्वेतकेत । ब्रह्मपुत्र सनत्कुमार पैं ॥१३०॥
दंडी मुंडी शुचिष्मंत । शौचज्ञानी सदा निरत । अग्निहोत्री भिक्षा नाथपंथ । भेद सर्वथा असेना ॥३१॥
संन्यास जटिली मुंडित । आणि योगधर्म नाथपंथ । तुज सांगिरला यथार्थ । तदनुसार आचरे तूं ॥३२॥
पाहतां हा भ्रममूळ भेदभास । बागुलभावना अज्ञानास । कीं मृषा मृगजळ मृगास । असत्य सत्य भाविती ॥३३॥

भ्रमेणाहं भ्रमेण त्वं भ्रमेणोपासका जनाः । भ्रमेण देवताः सर्वा भ्रममूलमिंद जगत् ॥८॥

भ्रममूळ हें मीतूंपण । भ्रमें अनेक उपासनाकरुन । भ्रममूल देवतार्चन । संपूर्ण जग भ्रममूल ॥३४॥
ब्रह्मास्मिअहंस्फुरण । तेंचि जान अपरोक्षज्ञान । भरोन उरला आपआपण । भेदभान नसेचि ॥३५॥
पूज्यपूजक न द्वैत । ध्ये ध्याता कैचें दैवत । अखंड सबाह्य ओतप्रोत । त्रिपुटी समूळ विराली ॥३६॥
ध्येय ध्याता आणि ध्यान । ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान । कार्य कर्तृत्व कारण । निरसून जाती आपैसीं ॥३७॥

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी । यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥९॥

जेथें जगत सर्व जागृत । तेथें योगी समाधिस्थ । जेव्हां जग होय निद्रिस्त । योगी जागती निश्चयें ॥३८॥
निद्रा जिंकी गुडाकेश । दुजा जो गोरक्षयोगीश । सदा जागृत अविनाश । सत्य शाश्वत वर्तत ॥३९॥
अधःपृथ्वी ऊर्ध्व आकाश । उभयसंधी गोरक्षवास । त्रैलोक्यगमन निरवकाश । आशापाशरहित जो ॥१४०॥
तो महाराज दीनदयाळ । स्वयें कथिलें ज्ञान प्रांजळ । तत्काळ सद्गद नृपाळ । वैराग्ययुक्त जाहला ॥४१॥
सकृप होऊन ते क्षणीं । कृपाकटाक्ष मोक्षदानी । दीक्षा अर्पिली नाथभूषणीं । अलक्षोच्चार गाजला ॥४२॥
मुकुटकुंडलें सर्व त्यागी । भस्म लेपित सर्वागीं । कर्णी मुद्रा शैली शृंगी । भव्य योगी प्रगटला ॥४३॥
मस्तक ठेवून सद्गुरुपदीं । निवास करी अक्षयपदीं । जेथें नसे आधिव्याधि । स्वानंदउदधिसंगमीं ॥४४॥
 नाम ठेविलें चर्पटनाथ । पुन्हा तयातें आज्ञापित । जडमूढ उध्दरी शरणागत । गमन तुझें त्रिलोकी ॥४५॥
यापरी अर्पून प्रसादवचन । पावते झाले अंतर्धान । पुढिले कथेचें निरुपण । परमरहस्य परियेसा ॥४६॥
हा अध्याय एकादश । कीं हे प्रत्यक्ष रुद्र एकादश । कीं दश इंद्रियांत एकादश । मन उन्मन होय पैं ॥४७॥
कीं ये ग्रंथीं एकादशी । जेवी व्रतांत श्रेष्ठ एकादशी । जे पावती कैवल्यपदासी । तेवी एकादश अध्याय ॥४८॥
आदिनाथलीलाग्रंथचंरे । श्रवणार्थ श्रोते श्रवणचकोर । विकसित श्रवण मुखें अहोरात्र । कथाबिंदू इच्छिती ॥४९॥
हा ग्रंथ मानससरोवर । वेष्टित श्रोते मराळ चतुर । मुक्ताफळांचा सेविती आहार । उत्तरोत्तर स्वानंदें ॥१५०॥
केवळ ग्रंथ हा कल्पवृक्ष । जे आर्त धरोनि येती मुमुक्ष । तयां साफल्य श्रीगोरक्ष । जो सर्वसाक्षी सद्गुरु ॥५१॥
श्रीमत् आदिनाथलीला सुरस । भैरव सद्गुरुचा चिद्विलास । तत्सत्ते आदिनाथइतिहास । एकादशांत वर्णिला ॥१५२॥
॥ संमतिश्लोक ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : February 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP