श्रीनाथलीलामृत - अध्याय ४ था

नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.


श्रीगणेशाय नमः ।
आदि अनादि आदिनाथ । जो अज अजित अव्यक्त । सच्चिदानंद मायातीत । ओतप्रोत परिपूर्ण ॥१॥
जें आदिबीज विस्तारलें । जें आदिमध्यअवसानीं संचलें । जें अव्यक्त व्यक्तीसे आले । अवतारलें हे भूमंडळी ॥२॥
गतकथारहस्यसार । गोरक्षोत्पत्ति सविस्तर । आतां परिसावी एकाग्र । कथा सुंदर अवधारा ॥३॥
सिंहावलोकनेंकरुन । चतुर श्रोती करावें श्रवण । मत्स्येंद्र गोरक्ष आपण करिती गमन तेथुनी ॥४॥
येऊनि कनकाद्रिशिखरीं । गोरक्षातें उपदेश करी । पीठत्रय स्थापित निर्धारी । पूजन करी मत्स्येंद्र ॥५॥
आवाहनितां आदिनाथ । प्रत्यक्ष तेथें प्रगट होत । षोडशोपचारें पूजा करीत । गोरक्ष स्वयें निजांगे ॥६॥
शक्तीचें करितां आवाहन । चिच्छक्ति देत क्षीरपान । मंदस्मित सुहास्यवदन । प्रसन्न भाषण वदे ॥७॥
पय परामामृत पात्र पूर्ण । गोरक्षाननीं लावी आपण । कृपादृष्टीं अवलोकन । करिती झाली जगदंबा ॥८॥
पूर्णिमेचा पूर्ण इंदु । हर्ष पावे पाहोन सिंधु । कीं चकोरातें चंद्र सुधाबिंदू । अर्पीतसे प्रीतीनें ॥९॥
तेवीं आदिनाथ अवलोकन । कृतार्थता पावून धन्य । शरण येऊन अनन्य । स्तवन करी प्रार्थूनि ॥१०॥
जय जय मंगलकारक । जगन्नाथा जगदोध्दारका । भवईभकुंभस्थळविदारका । भवानीवरा तूं ॥११॥
आद्य आराध्य मत्स्येंद्रा । वेदवंद्या चित्समुद्रा । वेदप्रतिपाद्या निर्द्वद्वा । साध्य सिध्दा होसी तूं ॥१२॥
मग वदे कैलासनाथ । द्वीपांतरी असती नृपनाथ । त्यांतें करुनि सनाथ । नाथपंथ चालवी ॥१३॥
गोरक्षें आज्ञा वंदोनी । शिवचरणीं ठेवीं मूर्न्धी । निघते झाले तेथूनि । भूमंडळीं प्रगटले ॥१४॥
योगियांचे दर्शन न मेदिनीं । म्हणूनि गेले पाताळभुवनीं । तेथें बैसले अनुष्ठानीं ॥ भोगावतीतीरीं पैं ॥१५॥
सहस्त्र वर्षे अनुष्ठान । गोरक्ष करिती रात्रंदिन । तंव मत्स्येंद्र येऊन । मस्तकी हस्त ठेविती ॥१६॥
अरे पुत्र होई सावध । कासया करिसी दिनावध । जड जीवांत्तें शोधूनि बोध । तयां सिध्द करावें ॥१७॥
गोरक्षें गुरु निरखोनी । स्तविते झाले विनयवचनीं । तें वर्णितां वाग्वाणी । विस्तार होईल ग्रंथातें ॥१८॥
श्रीगोरक्षशतक ग्रंथ । श्रवणें पुरती मनोरथ । तें स्तवी गोरक्षनाथ । परमरहस्य योगियां ॥१९॥
विवेक मार्तंड विवेकतरणी । स्वयें गोरक्ष वदोनी । तीन सहस्त्र ग्रंथवाणी । त्यांतील श्लोक पैं ॥२०॥

दीनोऽहं बुध्दिहीनो जनिनिधनजराकालपापौघनाशम् । वंदे मत्स्येंद्रनाथं मृदुपदकमलं योगमार्गागमेच्छुः ॥
यो माध्व्या साद्गिरा स्वान्‍ कथयति नितरां ज्ञानमज्ञानचर्याम् । ध्वांतार्क विश्वभेदव्यपनयनपटुं चित्तजाडयासहिष्णुम् ॥१॥


गोरक्ष उवाच । मग वंदन करुनि मत्स्येंद्रनाथा । मज योगमार्गाची आहे आस्था । चरणीं ठेऊनियां माथा । मनी बहु आवडी ॥२१॥
मज दाखवा हा योगमार्ग । मज अति अनुराग । कृपा करोनि सांग । सांगावा जी समर्था ॥२२॥
तव ब्रह्मगिरि शिवस्थान । बुध्दिपंगूसी केवी गमन । यास्तव आशंकित मन । महद्भाव कठिण हा ॥२३॥
नुलंघवे ब्रह्मगिरीचा घाट । महागूढार्थ दरे दरकूट । ऐसे जाणोनि संकट । केवीं पुढें मजमार्ग ॥२४॥
करी मार्ग मृदु मवाळ । जन्ममृत्यु जराकाळ । तरी द्यावें ज्ञान अढळ । चंद्र सोज्वळ ज्यापरी ॥२५॥
तरी तो मोक्षयोग मजलागीं । मागतसें लडिवाळ सलगी । सद्गद होऊनि अंगप्रत्यंगी । मत्स्येंद्रा नमी पैं ॥२६॥
सद्गुरु भवाब्धिनौका जाण । सद्गुरु देई कैवल्यपण । स्वर्गस्थित्यंतकारण । सद्गुरु पूर्णब्रह्म पै ॥२७॥
पिंडब्रह्मांडाची स्थिति । गोरक्ष पुसे मत्स्येंद्राप्रति । तो श्लोक गोरक्षोक्ति । एकाग्र श्रोती परिसिजे ॥२८॥

कियदंगुलमाकाशं कियद्गगनतारका । कातिधारा वर्षते मेघो कियध्दस्ता वसुंधरा ॥२॥

किती अंगुलें गगन प्रमाण । किती नक्षत्र धारा धन । किती हस्त मेदिनीमान । कृपा करोनि मज सांगा ॥२९॥

चतुरंगुलमाकाशं द्वे वै गगनतारका । दशधारा वर्षते मेघो औटहस्ता वसुंधरा ॥३॥

 परिसें रे माझ्या वत्सा । त्वां केली युक्त पृच्छा । पिंडब्रह्मांडचिकित्सा । तुज इच्छा असे कीं ।\३०॥
तरी गोरक्षा अवधारी । व्योम चार अंगुल वदे निर्धारी । दोन नक्षत्र दशधारी । मेघ वृष्टि करीतसे ॥३१॥
त्रयपरार्ध हस्त मही । अनुभव पाही या देही । पिंडब्रह्मांड देह विदेही । याहूनि नाही दुजे पैं ॥३२॥
पिंडीं प्रचित शब्दी विश्वास । ध्रुवनिश्चय हे मानस । निमग्न होऊनि समरस । निर्दोष यश विचरें कां ॥३३॥
मग विनवी कर जोडून । शिवशक्तीचें स्थान कोण । चंद्रचकोरन्यायेंकरुन । आर्त माझें पुरवावें ॥३४॥

॥ गोरक्ष उवाचः कस्मिन् स्थाने वसेत्‍ शक्तिः कस्मिन्‍ स्थाने वसेत्‍ शिवः । कस्मिन्‍ स्थाने वसेत् कालो जरा केन प्रजायते ॥४॥

कोणे स्थानी शक्तिवैभव । वसे कोठें परात्पर शिव । कोठें काळ जरा संभव । स्थान कोण सांगावें ॥३५॥

पाताले वसते शक्तिर्ब्रह्मांडे वसते शिवः । अंतरिक्षे वसेत्कालो जरा तेन प्रजायते ॥५॥

पाताळीं वसे ती शक्ति । ब्रह्मांडीं शिवाची वस्ती । अंतरिक्ष कालस्थिति । जरा प्राप्त त्यायोगें ॥३६॥
तरी स्नानसंध्या करुन । करी योगवळें आराधन । सत्वर करी मानसिक स्नान । ते निरुपण अवधारी ॥३७॥
मत्स्येंरसंहिता मत्स्येंद्रनाथ । सांगती मानसिक तीर्थ । ते स्नानें होवोनि सुस्त्रात । मानस कृतार्थ होतसे ॥३८॥
जळस्नानें बाह्यमळ जाती । परि मनोमळ शुध्द न होती । यालागीं त्रिवेणीतीर्थी । स्नानें सुस्त्रात होई कां ॥३९॥
शतविध स्नानें असतीं । मानसिक स्नान सरी न पवती । तेंही सांगतों तुजप्रति । यथानिगुती अवधारीं ॥४०॥
जागृति स्वप्न सुषुप्ति तुर्या । तेणीं सर्व दोष जाती विलया । सांगतो तुज गोरक्षराया । कासया वाया खटपट ॥४१॥

इडायां संस्थिता गंगा पिंगला यमुना नदी । नमस्त्रैपथगामिन्यै सुषुम्नाख्या सरस्वती ॥६॥

इशा नाडी भागिरथी । पिंगला ते रविजा निश्चिती । सुषुम्ना सूक्ष्म सरस्वती । तीर्थनृपति हा होय ॥४२॥
तीर्थराज प्रयाग प्रसिध्द । प्राप्त झाल्या पुण्य अगाध । जीवदशा जाऊनि शुध्द । कैवल्य साध्य गुरुकृपें ॥४३॥
त्रिवेणी हे प्रयागतीर्थी । कमळासन कमळापति । तेथें अक्षयीं राहे पशुपति । सिध्दयोगियां लाभ तो ॥४४॥

स्वस्थितः सद्गुरुरुपेण ज्ञानगंगा त्रिवेणि वै । सार्धत्रिकूटतीर्थेषु स्नानं कोटिगुणं भवेत् ॥७॥

चिद्‍व्योमीं स्वप्रकाश गुरुनाथ । गंगा त्रिवेणी प्रयागतीर्थ । साध्य सार्धत्रिकूटतीर्थ । कोटितीर्थी फळ लाभे ॥४५॥
या स्नानाचा अगाध महिमा । स्वयें जाणे शंकर उमा । काय वदूं त्या माहात्म्या । योगप्रेमा अतर्क्य ॥४६॥

उन्मनीजलमध्ये च रागद्वेषमलापहम् । यः स्नाति मानसे तीर्थे जायते स्फटिकोपमः ॥८॥

उन्मनीजळाभीतरी । द्वैतदोष पळती दुरी । मानसस्नानें थोरी । स्फटिकस्वच्छता ज्यापरी ॥४७॥

अच्युतोऽहं हरिरहं सच्चिदानंदविग्रहम् । अहं ब्रह्मैवाहमभेदेन मुक्तोऽहमिति भावयेत् ॥९॥

अहंकार जेथें आभास । जीवदशेचा होई नाश । द्वैताचा करोनि ग्रास । अद्वैत तें दिसे सर्वही ॥४८॥
धन्य धन्य त्रिवेणीस्नान । जेथें अहंब्रह्म होय आपण । तेथें सर्वतीर्थे एकवटून । फळ देताती आपुलें ॥४९॥
गंगा गोदा फल्गु गोमती । यमुना सरस्वती वेत्रवती । कृष्णा पयोष्णी भीमरथी । अगाध कीर्ति जयांची ॥५०॥
कावेरी तुंगभद्रा मही । तापी ताम्रपर्णी पाही । अलका अटका भोगावती ही । असंख्य तीर्थे ते स्थळीं ॥५१॥
आतां ऐक संध्या सोज्वळ । नलगे दर्भ आसन जळ । परत्वसंधी स्थित निश्चळ । संध्याकाळ साधीं हा ॥५२॥

ह्रदयाकाशं चिदादित्यं प्रतिभाति निरंतरम्‍ । उदयास्ते द्वयं नास्ति कथं संध्यामुपास्महे ॥१०॥

ह्रदयाकाशीं स्वप्रकाश । सूर्यप्रभांकित अविनाश । उदय अस्त जेथें नसे । अर्ध्य कसें मग द्यावें ॥५३॥
सत्रावीचे जळ । सर्वदा प्रवाह प्रांजळ । अनर्ध्य अर्ध्य वाहे सजळ । अढळ दिवानिशीं पैं ॥५४॥
आतां ऐक आजपागायत्री । सोऽहं सोऽहं महामंत्रीं । एकवीस सहस्त्र साहाशें अहोरात्रीं । जप होतसे अनायासें ॥५५॥
अजपा अनाहत अलक्षा । नाथपंथाची मुख्य दीक्षा । तुज निवेदितों गोरक्षा । अनुभवी परीक्षा करी तूं ॥५६॥
मूळाधारी वज्रासन । मूळबंध म्हणती त्याकारण । तेथें कुंडलिनीउत्थापन । ऊर्ध्वपवनें करावें ॥५७॥
चतुर्दळीं गणपतिस्थान । अजपा जप साहा शत प्रमाण । स्वाधिष्ठानीं साहा सहस्त्र जाण । चतुरानन षड्‍दळीं ॥५८॥
मणिपूर ते दशदलेंसीं । विष्णुदेवते स्थळासीं । अजपाजप साहा सहस्त्रेसी । अहर्निशीं होतसे ॥५९॥
अष्टदळीं फिरे मन भ्रमर । दळपरत्वें होय विकार । स्फटिकस्वच्छ प्रकार । उपाधी रंगें तैसा तो ॥६०॥
अष्टदळीं अष्टधावृत्ति । मनपद्मजा तें बोलती ॥ पूर्वदळी होय पुण्यमति । निद्रालस्य अग्नि दिसे ॥६१॥
याम्य दिशा क्रूर म्हणती । नैरृत्य दिशें पापस्मृति । वरुणदिशा ते क्रीडास्फूर्ति । वायव्य गगन बुध्दि ते ॥६२॥
उत्तरे ते रतिकल्पना । ईशान्य धर्मवासना । मध्य वैराग्यभावना । मनेच्छास्थिति जाणिजे ॥६३॥
कमळकेसरी जागृत मन । कर्णिके अवस्थेंत स्वप्न । लिंगे सुषुप्ति प्रमाण । यावरी मनकमळ अष्टदळ ॥६४॥
ह्रदयस्थान चक्रें द्वादश । अजपाजप षट्‍सहस्त्र । द्वादश जळ स्वयंप्रकाश । अनाहतचक्र बोलती ॥६५॥
विशुध्दचक्र कंठस्थान । जीवात्मा देवता ज्योतिर्वर्ण । तेथें षोडशदळप्रमाण । अजपाजप सहस्त्र ॥६६॥
ललाट ते परमात्मस्थळ । कोटिचंद्रसूर्यबंबाळ । भ्रूसंधी अग्निचक्र द्विदळ । सहस्त्र जपसंख्या ॥६७॥
सहस्त्रदळीं सद्गुरुदेवता । प्रकाश कोटिशशिसविता । अखंडध्वनि नादात्मता । जप सहस्त्र ते स्थळीं ॥६८॥
हे अजपामाळ षट्‍चक्रमणि । सुषुम्नेचे वोवोनि गुणीं । अजपा फेरे फिरे स्मरणी । सहस्त्रदळमेरूपर्यंत ॥६९॥
मग वदती गोरक्षनाथ । दश नाद जो कां अनाहत । तो स्वामी करवा श्रुत । आर्त माझा बहुत असे ॥७०॥
परिस पुत्रा नाद अनाहत । आतां परिसें तूं निवांत । एकाग्र करोनि चित्त । श्रवण करी तूं पाडसा ॥७१॥
प्रथम रव चिकार खरा । चिंचिनी शब्द तो दुसरा । घन घंटानाद तिसरा । शंखस्फुरण हा चतुर्थ ॥७२॥
पंचम तो तंत्रीनाद । षष्ठम तो तालशब्द । सप्त वेणु प्रसिध्द । अष्टमृदंगसुशब्दीं ॥७३॥
नवम वाद्य दुंदभी । मेघनाद दशम नभीं । बृहद्गिरा गगनगर्भी । दुमदुमीत भरलेसे ॥७४॥
तंत वितंत घन सुस्वर । चतुर्विध वाद्यांचा प्रकार । जेथें असे निरंतर । नादानुसंधान योगियां ॥७५॥
मुख्य आसनीं आसनजय । तेणे योगाभ्यास होय विजय । ये विषयीं अभिप्राय । आसनविधी सांगतों ॥७६॥
नवग्रहांत दिनकर । विवुधांत सहस्त्रनेत्र । आयुधांमाजि वज्र । तेंवि वज्रासन श्रेष्ठ हें ॥७७॥

नासनं वज्रसदृशं न कुंभः पवनोपमः न खेचरीसमा मुद्रा न नादसदृशो लयः ॥११॥

वज्रासनाहूनि आसन पर । कुंभकाहुन वायू थोर । खेचरी ते मुद्राशिखर । वायूंमध्यें कुंभक ॥७८॥
याहून नसे दुसरी सरी । मत्स्येंद्र वदती निश्चयोत्तरी । गोरक्षा हें सत्य अवधारि । सिध्दा साध्य आसन हे ॥७९॥
त्वपद आणि असि । तें कैवल्य स्वानंदाराशी । तेथें होऊन तापसी । निजांगें मी फिरतसें ॥८०॥
हा योगमार्ग पुरातन । ह्र्दयमांदुसीं करी जतन । हेंचि माझे अचळ धन । पुत्र म्हणोनि अर्पितों ॥८१॥
गुह्याद्गुह्य परम गुज । प्रतारणा केवीं राखूं तुज । तूं पात्र जाणोनि सहज । वोगरितों संतोषें ॥८२॥
मत्स्येंद्र म्हणे वज्रासन । ऐक हठयोग लक्षण । अंध्रिमूळ वामचरण । मूळाधारी रोधावा ॥८३॥
आधारीं चारी मातृका असती । कुंडलिनी सर्पिणी ऊर्ध्वगति । जागृत करोनि ते शक्ति । स्वाधिष्ठानीं पदरोधी ॥८४॥
षड्‍दळीं षड्‍मातृका । उड्डियानीं कंद म्हणती देखा । त्राहाटक रोधोनि कुंभका । ऊर्ध्वपंथें लावावा ॥८५॥
अनाहा ते द्वादशदळ । द्वादशामाजी जाश्वनीळ । अनाहती दळचक्र तें केवळ । नादानुसंधान तेथूनि ॥८६॥
षोडशदळीं षोडशमात्रा पाही । जीवात्मा राहे ते ठाई । जालंधरबंध स्नान तेंही । गुरुपुत्र ते जाणती ॥८७॥
ललाटसंधी द्विदळ । दोन मातृकेचें ते स्थळ । त्रिकूट श्रीहठादि केवळ । उल्हाट औटपीठ तें ॥८८॥
अग्निचक्र वैन्यचक्र । कोटिरवि आज्ञाचक्र । काकीमुख स्वतंत्र । चंद्रसूर्य दों भागीं ॥८९॥
सव्यभागी भास्कर । वामभागीं वसे चंद्र । सुषुम्ना मध्यभागी सुंदर । दाहकळा दाहकत्व ॥९०॥
बारा सोळा कळा असती । सत्रावी जीवनकळा म्हणती । तिची काय सांगूं ख्याती । योगियांची निजजननी ॥९१॥
सत्रावी लंबिकामार्गे । जो पान करीत निजांगें । तो चिरंजीव चिरकाळयोगें । भोगी भोग उन्मनीं वसे ॥९२॥
पंचमुद्रा खेचरी भूचरी । चांचरी अगोचरी । अलक्षा पांचवी खरी । मुद्रापंचक जाणावें ॥९३॥
पंचमार्ग तरी कोण । ऐसा करिसील प्रश्न । पिपीलिका विहंग मीन । कपिशेष जाणावा ॥९४॥

खेचरे खं तु मध्यस्थं उम्ननीगगनाकृतिः अंगुष्ठमात्रस्वस्थानें चक्षुश्चंद्रः प्रकाशते ॥१२॥

खेचरी ते गगनी लीन । उन्मनीचें लयस्थान । शाखाचंद्रन्यायेंकरुन । चंद्र पाहे तेथूनि ॥९५॥
काळदमन कल्पनाधन । योगमार्गे योगसाधन । त्रिकाळ ज्ञानैश्चर्यसंपन्न । मग गमन त्रिलोकीं ॥९६॥
भूत भविष्य वर्तमान । शीतोष्णादि अदृश्यसाधन । अंतरसाक्ष अंतरिक्षगमन । योगी फळ लाभे पै ॥९७॥
आतां ऐक काळज्ञान । मृत्युपरीक्षाचिन्ह । तें अवलोकी लक्षण । खूण पाहाणें ते स्थळीं ॥९८॥

अरुंधतीं ध्रुवं चैव विष्णोस्त्रीणि पदानि च । आयुर्हीना न पश्यंति चतुर्थं मातृमंडलम् ॥१३॥

अरुंधती धृति ध्रुवं । त्रिकुटी विष्णुपद निश्चय । मातृमंडल चतुर्थ होय । आयुर्हीन न पाहाती ॥९९॥

अरुंधती भवेत् जिव्हा ध्रुवो नासाग्रमेव च । भ्रुवोर्विष्णुपदं ज्ञेय तारकं मातृमंडलम् ॥१४॥

अरुंधती जिव्हास्थान । नासाग्र तें ध्रुव जाण । भ्रूमध्य विष्णुपद निर्वाण । मातृमंडल तारक तें ॥१००॥

सूर्येण बध्यतें सूर्यश्वंद्रश्वंद्रेण बध्यतें । यो जानाति क्रियामेतां त्रैलोक्यं वशयेत् क्षणात् ॥१५॥

सूर्ये सूर्य करावा बध्द । शशीनें शशिनिरोध । हे जाण क्रिया विशद । तरी त्रैलोक्य वश्य पैं ॥१॥

चंद्रं पिबति सूर्यश्व सूर्य पिबंति चंद्रमा । अन्योन्यकालभावेन जीवेच्चंद्रार्कतारकम् ॥१६॥

चंद्रामृत सूर्य ग्रासी । सूर्यसुधांशु शशी प्राशी । ही कळा अन्योन्यभावेंसीं । चिरंजीवकल्प तो साधी ॥२॥
हा योगमार्ग दुर्घट पाहातां । साध्य होतां साधितां भलता । मनवासना क्षय न होता । कैसी सिध्दि तयांसी ॥३॥
आतां असा इतिहास । कथिला काळगतिसारांश । जो आचरण करी तयास । स्वात्मसाम्राज्य ये हातीं ॥४॥
ऐक ब्रह्मरंध्र सहस्त्रदळ । श्रीगुरुआदिनाथाचें स्थळ । ज्योतिर्मय निरामय केवळ । अचळ अढळ पै ॥५॥
अखंडध्वनि सोज्वळा । कोटिशशिसूर्याची कळा । कीं स्थिर ती अनंत चपळा । शीतोष्णावीण प्रकाशे ॥६॥
चहूं वाचेसीं अगोचर । चपळ मन तेथें स्थिर । जें उन्मनीचें माहेर । सूर्या पक्वता होतसे ॥७॥
जेवी सापत्नांचीं मनें । तेवीं इंद्रियभिन्नपणें । एकाग्रतेचीं साधनें । एकवटती ऐक्य पैं ॥८॥
मीतूंपणासीं भेद । अखंड वस्तूचि अभेद । आनंदाचा ब्रह्मानंद । तेथें अनुवाद कायसा ॥९॥
स्फटिकमंदिर दैदिप्यदीप्ति । अनेक प्रज्वळित ज्योति । अंतर्बाह्य प्रकाशती । आत्मस्थिती भावातें ॥११०॥
यापरी गोरक्षयोगबोध । योगस्थितिसूचक शोध । उपदेशग्रंथसिंधुअगाध । त्रुटित श्रोतियां कथियेला ॥११॥
जेथें श्रुत्यादि मार्ग पुसती । तेथें स्मृतीची कायसी गति । मूर्खपणें मी मंदमति । काय स्थिति ते सांगूं ॥१२॥
हठयोग तो हाटकेश्वरी । गोरक्ष तेथें साध्य करी । जे दिवस न रात्रीं । पाताळस्थळीं जाण पां ॥१३॥
महाफणिमस्तकीं मणि । प्रकाशती जेवीं तरणी । तेथें भोगावती तटिनी । तटी हाटकेश्वर धुर्जटी ॥१४॥
प्रशस्त प्रकार सादर । पाठांगणीं रत्नें विविध । दिव्यमनी जोडिले अभेद । विद्युद्‍ध्वज तळपती ॥१५॥
मणिमय लिंग अभ्यंग । नित्यार्चिती शेषादि नाग । जयाचे दर्शनें हठयोग । वासुकी शेषा प्राप्त होय ॥१६॥
योग साध्य हाटकेश्वरीं । योग पातांजळ विवरीं । श्रीगोरक्षातें निर्धारी । मत्स्येंद्रकृपें साधिला ॥१७॥
मत्स्येंद्रवरद अनुभव सिध्दि । गोरक्षालागीं समाधि । पाहूनि सवड संधि । मत्स्येंद्र जाती सत्वर ॥१८॥
घेत हाटकेश्वराचें दर्शन । तेथें प्रगटले नाथ भगवान । श्रीआदिनाथ निरंजन । भेटते झाले मत्स्येंद्रा ॥१९॥
तेथें पातले शेष वासुकी । अनेक चक्षुश्रवे शृंगी । शिवदर्शना सवेगीं । भोगेंद्र येत आवडीं ॥१२०॥
तों देखिले मत्स्येंद्रनाथ । साष्टांग केला प्रणिपात । मनी म्हणी कृतार्थ । आज धन्य जाहलो ॥२१॥
शेष संतोषें अंतरीं । स्वागत पुसे अवसरीं । मत्स्येंद्र वदती उत्तरीं । योग मग सर्वदां ॥२२॥
मग योगयुक्ति सविस्तरें । वदते झाले परस्परें । तें सांगतां सविस्तरें ग्रंथसमुद्र पसरे ॥२३॥
शेष वदे मत्स्येंद्रमुनि । चलावें आपुले भुवनीं । येऊं अवश्य म्हणोनी । गमन करी शेषावलीं ॥२४॥
करोनि षोडशोपचार । पूजाद्रव्य अळंकार । अमौल्य रत्नें परिकर । पाताळमणि आर्पिले ॥२५॥
जिकडे तिकडे परिस । चिंतामणि चहूंकडेस । चिंतामणि परिस संघ तसे । मत्स्येंद्रनाथ पैं ॥२६॥
दुर्लभ वस्तु पृथ्वीवरी । म्हणोनि त्यांते अंगिकारी । गूढ रक्षी झोळी माझारी । संतोषे अंतरी होतसें ॥२७॥
आज्ञा मागोनि सत्वर । निघते जाहले मत्स्येंद्र । इच्छागमन स्वइच्छाचार । गुप्त झाले तेथूनि ॥२८॥
एक अयनपर्यंत । गोरक्ष होते समाधिस्थ । पुन्हा होऊनि जागृत । वृत्तांत श्रोतीं ऐकावा ॥२९॥
असो तये अवसरासी । तक्षक प्रगट्ला मनुष्यवेषी । स्नान संध्या योगाभ्यासी । करीत बैसे कुटिळ तो ॥१३०॥
दांभिकाचा आचार । मद्यपियाचा तत्त्वविचार । जराचा काय सदाचार । रायविनोद ज्यापरी ॥३१॥
सुस्नान वातांबुपर्णाशन । वर्तें नैराश्येंकरुन । विवरीं बैसे एकांत लक्षून । भस्मलेपनमुद्रादि ॥३२॥
पर्णाशन करी मेष । म्हणोनि काय वैराग्य त्यास । मीन सदां उदकीं असे । स्नानमहिमा नेणे तो ॥३३॥
नादानुसंधानतन्मय फनी । परि मनोलय नव्हे त्यालागोनी । वायु आहार म्हणोनी । वायुरोधनी नव्हे तो ॥३४॥
भूमिजळाची निराशा । तो चातक विलोकी आकाशा । त्यासी काय निःस्पृहदशा । अंगी येईल त्याचे ॥३५॥
भूषक करी बिळीं वास । घडे काय योगाभ्यास । खर भस्मीं लोळे त्यास । भस्ममहिमा नेणवें ॥३६॥
बकाचें एकाग्रध्यान । म्हणोनि काय ते ब्रह्मचिंतन । मैद माळामुद्रासन । परि मार्गघ्न होय तो ॥३७॥
ऐसा तो मंदबुध्दि । लावून बैसे समाधी । तो म्हणे कायसी उपाधि । तेथें आली नेणवे ॥३८॥
गोरक्षा म्हणे कां येथें । मानव पातला पाताळातें । ऐकोनि गोरक्ष वदे त्यातें । भय आम्हातें कोणाचें ॥३९॥
परि तो खवळला दुर्जन । भयानक रुप प्रगटोन । लंबायमान विस्तीर्ण । पतंग झेंपावे दीपातें ॥१४०॥
विगतदर्प बृहत्सर्प । विक्राळ व्याळ काळ्दरुप । सरळ सळकले अमूप । वळवळोनि आला ॥४१॥
गरळ वमीतसे मुल्जा । भडभडां निघती अग्निशिखा । धुधुःकारें धूम्र देखा । धुंदावल्या दिशा दाही ॥४२॥
द्वंद्व वरोनि दंदशूक । निर्द्वंद्वासि झेंपावती देख । तामस योनि अविवेक । क्रोधयुक्त अंतरी ॥४३॥
पिवळे काळे गव्हाळे । बिळें वारुळें त्यागून सकळ । उसळोनियां सोनसळे । पाताळीं कुळें व्याळांची ॥४४॥
वखाळोनि वोकिती ज्वाळा । काळकूटाच्या मुखीं गरळा । सरसावोनि सळसळा । सकळ गोळा जाहले ॥४५॥
पूर्वदिग्बंधन मर्यादा देखा । सागरा जेवीं मर्यादरेखा । स्पर्शावया अवांका । कोणा तवका नव्हे ॥४६॥
गगनमंडळ गोरक्ष वदती । तेथें नसे काळगति । शस्त्र अग्नि न पवती । जळवज्रघातीं न मरूं ॥४७॥
विषांचें विषपण जाय । अग्निही शांत होय । काळातें ग्रासिताहे । मृत्यु जाय मरोनी ॥४८॥
मग पुच्छावर्तकुंडलाकारी । कुंअलेतें दुर्गाशरीं । वेढा वेष्टोनि दुराचारी । धुसधुस फूत्कारी ॥४९॥
ऐसें पाहोनि नाथ । भस्म उधळिलें किंचित । बहु प्रगटले विनतासुत । पाहोनि पळत सर्प ॥१५०॥
अरुणानुज प्रळय कृतांत । भीमभयानक हाक देत । दचकले काद्रवेय तेथ । इतरां पाड कायसा ॥५१॥
ज्या भयें आम्ही येथें । वास करोनि पाताळातें । तेथें हो पातला जाण मृत्यु । होणार न चुके पै ॥५२॥
मुख्य कद्रुसूत । गुह्य बैसोनि विचार करीत । हा वोढवला प्रळयानर्थ । कारण काय कळेना ॥५३॥
एक वदती गोरक्षमुनि । हाटकेश्वरी अनुष्ठानीं । बैसले होते ते स्थानीं । न कळे कोणी छळिलें ॥५४॥
विचित्र योगमायेचें विंदान । गरुड गेले गुप्त होऊन । सर्व सर्प शरण येऊन । स्तुतिस्तवन करिताती ॥५५॥
त्यांत एक फणिवर । पाहून करी नमस्कार । विष्णु विरंची किंवा हर । अंशावतार मज गमे ॥५६॥
तो वदे स्वामीप्रति । नको मज या तामसांची संगति । न लगे सर्पदेहाची बुंथी । मजलागीं जाण पैं ॥५७॥
कांहीं न घडे आत्मसाधन । सक्रोध सदा अंतःकरण । मी अनन्य स्वांमीस शरण । अनुग्रह देई दयाळा ॥५८॥
त्याचें अंतर पाहून । सदयकृप दयाघन । मस्तकीं हस्त ठेऊन । उपदेश देत तयातें ॥५९॥
तों तत्क्षणी दिव्यदेही । होता झाला अही । मठ स्थापिला ते ठाई । मठाधिपति तो केला ॥१६०॥
ठेविते झाले नामाभिधान । नागनाथ नामेंकरुन । शेषादि तेथें येऊन । पूजा करिती सर्वही ॥६१॥
करी गिरिमस्तकीं उत्पन्न । अमौल्य अनर्ध्य अर्पिलें रत्न । जें असाध्य निर्जरप्रयत्न । तेंच प्रीतीनें आणिती ॥६२॥
सुगंधद्रव्य देत विलेपण । आम्ही स्वीकारुं भस्मलेपन । अळंकार कोठें करुं जतन । बरी शैलीशृंगी हे ॥६३॥
सकळ शरण येऊन पाही । म्हण्दती सेवा घडली नाहीं । पूजाही अंगिकार केला नाहीं । तरी आज्ञा कांही करावी ॥६४॥
गोरक्ष म्हणे भोगेंद्रनाथा । तुम्हीं यावें स्मरण करितां । कारण जाणून तत्त्वतां । स्मरतां यावें तुम्हीं तेथें ॥६५॥
ऐसें वदोनि त्यांतें । गुप्त झाले गोरक्षनाथ । धन्य महिमा कद्रूसुत । वर्णिती नाथातें ॥६६॥
हा ग्रंथ पूर्ण ब्रह्मगिरि । पारायणप्रदक्षिणा नर करी । तया योगगति निर्धारी । योगसिध्दि योग पैं ॥६७॥
श्रवण पठण या ग्रंथाचें । तयां भय नसे सर्पादिकांचें । पठण केलिया तयांचें । मोक्षालय जाणिजे ॥६८॥
हा अध्याय सर्वांत सार । जेवीं भारतीं गीता थोर । भावें वाचील जो नर । प्राप्त सिध्दि सर्वही ॥६९॥
जेथें श्रुत्यादि मार्ग पुसती । तेथें स्मृतीची नसे गति । मग मूर्खपणें मी मंदमति । काय स्थितीतें सांगूं ॥१७०॥
यापरी गोरक्षबोध । योगस्थिति दाविलो शोध । उपदेश ग्रंथसिंधु अगाध । त्रुटित श्रोतियां कथियेला ॥७१॥
जे सिध्द सिध्दांतसंगति । तोचि आश्रय ग्रंथाप्रति । डोळसाश्रय अंधगती । गमन करी तत्संगे ॥७२॥
हा ग्रंथ भावाब्धीचें अयोनिसंभव । योगदीक्षेचें पूर्णवैभव । जे स्वप्रकाश स्वयमेव । काव्यगौरव कायसें ॥७३॥
महाराज गोरक्ष समर्थ । त्याचे कृपें चाले ग्रंथ । लेखनपठणें मी कृतार्थ । मृगमदव्यवहार ज्यापरी ॥७४॥
चतुर्थ अध्याय चौथी मुक्ति । की वाणी ते चौथी । कीं अवस्थात्रयाहून जे परती । काय स्थिति वदूं हे ॥७५॥
अध्याय चौथा पुरुषार्थ । कीं चवथा परमार्थ । येथें चित्तचतुष्टय एक होत । वेदमथितार्थ हा अध्याय ॥७६॥
श्रीमत्‍ आदिनाथलीलामृत । ग्रंथकरविता भैरव समर्थ । त्याचे वरदें आदिनाथ । चतुर्थाध्यायीं वर्णिला ॥७७॥
पुंडलीकवरदस्मरण । म्हणा एकदा जानकीजीवन । हर हर पार्वती रमण ॥ गुरुर्जयति तें स्मरावें ॥७८॥
ज्या स्मरणमात्रेंकरुन । तुटतीं भवबंधनें । जन्मदुःख जरामरण । जन्मांत न बाधी ॥१७९॥
॥ श्लोक ॥१६॥ ओव्या ॥१७९॥

N/A

References : N/A
Last Updated : February 06, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP