श्रीनाथलीलामृत - अध्याय १६ वा

नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.


श्रीगणेशाय नमः ॥
नमो पूर्णब्रह्म आदिनाथ । सत्य शाश्वत उमाकांत । जो परात्पर हेरंबतात । त्रिगुणरहित अढळ जो ॥१॥
तूं सत्य शाश्वत अनामिया । तूं अज अजित अव्यया । तूं परंज्योति प्रकाशवर्या । सद्गुरुरुपें विचरसी ॥२॥
गताध्यायींचा इतिहास । वैराग्य झालें भर्तृहरीस । करिता झाला अरण्यवास । कथारहस्य सुरस पैं ॥३॥
अंगिकारुन वल्कलवसन । नैराश्ये करी भ्रमण । इकडे वर्तलें काय कठिण । तेंचि सज्जनी परिसावें ॥४॥
लोकलज्जेचें लांछन । काळिमेनें माखलें वदन । सकळीक सलज्ज होऊन । राजकांता सदुःख ॥५॥
भवितव्य ऋणानुबंध । याचा न कळे सर्व शोध । पूर्वप्राक्तन अगाध । भोगल्यावीण सुटेना ॥६॥
एकटी एकांत अरण्यांत । जाती झाली अति त्वरित । पश्चात्तापें अति दुःखित । वनीं निकट जातसे ॥७॥
गोरक्षकातें पाचारुन । देती झाली करभूषण । हे रत्नकंकण करुनि ग्रहण । ममाज्ञेनें वर्तावें ॥८॥
कुंडगर्ता करावी खनन । माजी करुनि शुष्कइंधन । ऐसें आज्ञापिता वचन । सिध्द केली तयानें ॥९॥
म्हणे करा रे स्थळां तर । कोणा न वदा रे हा विचार । दुजे वनी ते समग्र । जाते झाले सर्वही ॥१०॥
सुस्त्रात होऊन तये वेळीं । चेतविला ज्वाळामाळी । जय जय शिव चंद्रमौळी । म्हणूनि उडी टाकिली ॥११॥
सुभटवीर्याचे होते हेर । तिहीं जाणविला समाचार । रायें उत्तरकार्य समग्र । संपादिलें तियेचें ॥१२॥
अस्थि रक्षा सर्वही । विहाळिली क्षिप्राप्रवाही । यावरी वर्ततां दिवस कांही । अपूर्व चरित्र वर्तलें ॥१३॥
भर्तृहरिरायाचें वृत्त । देवेंद्रासी झालें श्रुत । नृपें पीयूषफळ भक्षूनि त्वरित । अनुष्ठान करीतसे ॥१४॥
हें परमभय पाकशासनी । पाहोनि खिन्न होतसे मनीं । आरुढेल माझे सिंहासनीं । तपेंकरोनि वाटतें ॥१५॥
आधींच पुण्यशीळ तो नृपाळ । तशांत भक्षिलें अमरफळ । तपें होईल परम सबळ । पद घेईल पैं माझें ॥१६॥
असो राव हिंडतां वनांत । तों चर्पटी भेटले अकस्मात । नाथास करोनि प्रणिपात । हर्षयुक्त अंतरीं ॥१७॥
चर्पटीनाथें धरोनि हस्त । एकांती नेत अरण्यांत्त । रायासी बोधिता झाला हित । परम सकृत होऊनी ॥१८॥
भविष्य जाणूनि पुढारी । म्हणे राया वचन अवधारी । ईश्वरी सत्ता चराचरीं । ऐसीच आहे नृपनाथा ॥१९॥
ऐसीच प्रतिमा नाचवीत । परि सूत्रधारी राहे गुप्त । हारी जयकरी एकांत । परि उभयपक्षीं आपण ॥२०॥
महावस्तूचे लोभेंकरुन । तेंचि अनर्थासी कारण । स्यमंतक मण्याचें विहरण । आलें जाण कृष्णावरी ॥२१॥
कीं राहू प्राशितां अमृत । तत्काळ झाला मस्तकहत । दिव्य वस्तूसी घात । महाअनर्थ वोढवे ॥२२॥
पराचा वायस करणें । हें संभावितासी लाजिरवाणें । आपुली जानु उघडी करणें । उचिताउचित विचारी ॥२३॥
पाहतां हाचि सृष्टिक्रम आहे । गंधर्वाग्नी सोम पाहे । नृपा न धरी हा संशये । विचार करीं मनासीं ॥२४॥
ऐक राजा चातुर्यसिंधु । मनाचें दैवत तरी कुटिलेंदु । शिवमुकुटीं तरी केवी निंदु । परि दुरोनि वंदूं तयातें ॥२५॥
गुरुभार्या तारासती । ती वश्य झाली रोहिनी पती । ती प्रसवली बुधाप्रति । हें तूं जाणसी नरेंद्रा ॥२६॥
पाहें इंदिरा अति चंचल । देवां असुरांत न राहे निश्वळ । शंकरमुकुटीं गंगा निर्मळ । परि शंतनु भूपाळ वरियेला ॥२७॥
शिव इच्छितां मुखचुंबन । तया न देच प्रीतीकरुन । परि सहस्त्रमुखेंकरुन । सागरातें चुंबिलें ॥२८॥
परम कापटय स्त्रियांची जाति । मनीं अभिलाषी द्रौपदी सती । कर्णही जरी असता पति । तरी भोग भोगितें अक्षयीं ॥२९॥
ऐक राया साराम्श । कोणतें कुळ सांग निर्दोष । व्याधीरहित कोण पुरुष । सांग मज नरेंद्रा ॥३०॥
वस्त्राआड नग्न जग । पाहूं जातां सर्व विलग । सृष्टिराहाटीचा हाचि मार्ग । जाणसी की सर्वज्ञा ॥३१॥
शोधून शर्करेचा ठाय । तेथें पिपीलिका अवश्य जाय । विश्वासस्थळी ठेविता भार्ये । अपाय होत जाण पां ॥३२॥
पाहे राया निश्चयेंसी । काय करावें वस्तूच तैसी । विचार करी दृढ मानसीं । उपाय यासी असेना ॥३३॥
आतां आग्रह न धरीं चित्ती । उर्वरित विषयाची करीं तृप्ति । ऐसें वदोनि कृपामूर्ति । काय करिता जाहला ॥३४॥
राजपत्नीची रक्षा जीवनी । त्यागिली होती जिये स्थानीं । भस्म फुंकिलें तये क्षणीं । तों दिव्य कामिनी निघाली ॥३५॥
सालंकारी कमळनयनी । शुभांगी शुक्लांबरधारिणी । जेवीं क्षीरसमुद्रांतूनी । दिव्य इंदिरा प्रगटली ॥३६॥
की जान्हवीमाजी देवतटिनी । सगुणरुप देहधारिणी । वरिला शंतनुराव गुणा । परमप्रीती भूप तो ॥३७॥
तेवी क्षिप्रेंतूनि ते अवसरीं । निघती झाली लावण्यनारी । रंभा तिलोत्तमा जिची सरी । पादांगुष्ठी न पवती ॥३८॥
तप्तसुवर्ण वर्णकांति । विद्युत्सम जियेची दीप्ति । विशाळ नेत्र विराजती । सरळ नासिक साजिरें ॥३९॥
हिरियांसम दंतश्रेणी । अधरपुटें अरुणवर्णी । पन्नगसम सलंबवेणी । सरळजानु हरिमध्या ॥४०॥
श्रवणी मुक्ताघोष तळपती । कृत्तिकापुंजसम भासती । मुक्तामाळा गळां डोलती । पदभूषणें सुशब्दू ॥४१॥
तनूचा सुवास अहळबहळ । तेथें वसंत होऊनि अळिकुळ । रुंजी घालोनि सदा रुळे । परमानंदेंकरोनी ॥४२॥
ऐसी निघाली लावण्यनारी । अनर्ध्य रत्नांची माळा करीं । नमस्कारोनि बध्दकरीं । उभी ठेलीई जवळिक ॥४३॥
नाथ आज्ञापिती तीतें । शीघ्र वरी या भूपातें । चर्पटी दाविती करसंकेतें । रायाकडे ते वेळीं ॥४४॥
राया उजू चाले चमकत । तत्काळ माळा गळां घालीत । पदीं मस्तक निवांत । ठेविती झाली शुभांगी ॥४५॥
पुन्हा उठोन ते तन्वंगी । उभी ठाकली वामभागीं । योगींद्र म्हणे नृपालागीं । एकाग्र तें परिसिजे ॥४६॥
ऐक राया सावधान । इचें जन्मांतरपूर्वकथन । पूर्वी हे वारांगना रुपसंपन्न । गुणसौंदर्या आगळी ॥४७॥
तिचें ऐकोनि सुस्वर गायन । रंभा तिलोत्तमादि तल्लीन । सौंदर्या देखोनि मीनकेतन । तन्मय होऊन नृत्य करी ॥४८॥
जिचा निरखून वदनशशी । भुलोनि जाती तपी तापसी । वेध लागोनि नृपासी । रतिसुखातें इच्छित ॥४९॥
पिंगला तिचें नामाभिधान । चतुर्दशविद्यानिपुण । चौसष्टी कळा विसावोन । तिचे देही राहती ॥५०॥
जिचे लावण्याचा दीप । झेंपावती पतंग दीप । कुसुमाकरें वोढोनि चाप । पंचबाणें बिंधिलें ॥५१॥
घायाळ होवोनि भूपाळ । अरंबळत परमविकळ । नेत्रकटाक्ष अतिव्याकुळ । अळिकुळ कमळीं ज्यापरी ॥५२॥
वेश्या असोनि धार्मिक । शिवभजनीं अतिनिःशंक । अतिथी पूजुन आवश्यक । दानधर्मी नेटकी ॥५३॥
एके दिवसीं कमळनयनी । सज्ज होऊनि आपुले सदनीं । मार्ग लक्षितां अस्तमानीं । द्वारप्रदेशीं आवडीं ॥५४॥
कमनीय कामिनी अवलोकन । कामिक येती कामना धरुन । पुरुष लावण्यधनसंपन्न । पाचारिती तियेतें ॥५५॥
तीतें वेधून राजकुमर । द्रव्य देती अति अपार । धनवसनें अलंकार । अनर्ध्य रत्नें अर्पिती ॥५६॥
द्रव्य देती तीतें बहुत । परि असंतुष्ट जिचें चित्त । हातें भरोनियां सक्त । अति लोभ लाभाचा ॥५७॥
एक शतक शतत्रय । सहस्त्रावधि वरी द्वय । परि मन संतुष्ट कदा नोहे । लोभवृत्ति झाली पैं ॥५८॥
परि तो प्रधानपुत्र दीन । प्रेषिता झाला पाचारण । परि ते द्रव्यलोभेंकरुन । गुंतोनियां राहिली ॥५९॥
विरहविव्हळ प्रधानपुत्र । मार्ग लक्षितां शिणले नेत्र । ईश्वरी सत्तेचें विचित्र सूत्र । काय चरित्र वर्तलें ॥६०॥
घडी पळ लव निमिष । वियोगभावें भावी वर्ष । प्राण होती कासावीस । उठे बैसे मंचकीं ॥६१॥
कामातुर कामव्यसन । कामज्वरें व्यापिलें पूर्ण । अकस्मात गेला प्राण । न लगतां क्षण जाण पां ॥६२॥
एकचि झाला हाहाःकार । रुदन करिती नारीनर । तों उदयाचळीं भास्कर । होता झाला ते काळीं ॥६३॥
पुढें लोटले कांही दिन । हेही पावती झाली निधन । तेचि हे राणी होऊन । तूंतें वरिलें नरेंद्रा ॥६४॥
पूर्वसंस्कार स्वभाव । नृपवर्या कदा न जाय । तो प्रधानपुत्र निश्चय । दास झाला तव गृहीं ॥६५॥
इनें घेऊन देहांत । हेंचि घेतलें प्रायश्चित्त । ही तों जाहली पापहत । धौतकर्मे शुध्द ही ॥६६॥
ही परम पवित्र पतिव्रता । राया झाली तुझी कांता । आग्रह सोडोनि नृपनाथा । ईतें तत्त्वतां वरावें ॥६७॥
माझिये आज्ञेची अवज्ञा । कदा न करीं तूं सर्वज्ञा । निश्चयात्मक असो प्रज्ञा । सूचक सर्वज्ञा असे ही ॥६८॥
ही सौंदर्यचातुर्यखाणी । म्हणूनि नेई आपुले सदनीं । द्वादश वर्षे हे मेदिनी । राज्य करीं प्रतापें ॥६९॥
अवश्य आज्ञा प्रमाण । राजा वदे पुनर्वचन । मग वंदितां चरण । मस्तकी हस्त ठेविला ॥७०॥
सुभटवीर्यासी वर्तमान । कळतां ये त्वरेंकरुन । दळ्भारेंसी सिध्द होऊन । परमहर्षे पातला ॥७१॥
उपवनीं मंडप शिबिरें । उभविलीं एकसरें । विवाह झाला अति गजरें । ,मंगळतुरें वाजतीं ॥७२॥
यापरी झालें पाणिग्रहण । नगरीं प्रवेशला नरभूषण । पाहूं पातले पौरजजन । मंडपघसणी होतसे ॥७३॥
बोलती नरनारी सकळ । पुण्यश्लोक हा नृपाळ । पिंगळा सुशीळ वेल्हाळा । जोडा योजिला विधीनें ॥७४॥
ही शुध्दसत्त्व परम सती । उपमेस सावित्री कीं दमयंती । विश्ववदना सरस्वती । स्तुति करिती जियेची ॥७५॥
धन्य धन्य ते सुशीळ । पतिस्मरणीं ह्रदयीं माळ । चित्तीं चिंतन सर्वकाळ । निजध्यास पतीचा ॥७६॥
आसन शयन उदकपान । पतिवीण मानी विषासमान । प्रियपदार्थ पतिवीण । नसे आन जियेतें ॥७७॥
ऐसा जोडा जन्मांतरीं । पूजिली असेल मंगळागौरी । तरीच प्राप्त निर्धारीं । सर्व पुण्यें लाहिजे ॥७८॥
गृहीं लक्ष्मी राहे निश्वळ । आरोग्यतनु क्षेमकुशळ । भार्या पतिव्रता सुशीळ । पूर्वसुकृतें फळ लाभे ॥७९॥
पूर्वदत्तें विद्यानिपुण । पूर्वदत्तें पुत्र सधन । पूर्वदत्तें सद्गुरु सर्वज्ञ । सुमित्र पूर्वदत्तें पैं ॥८०॥
एवं सर्वलक्षणीं सुलक्षण । वीर्यशौर्यपरमनिपुण । जो प्रतापाचा चंडकिरण । रुपें मदन पैं दुजा ॥८१॥
पश्चात्तापें मधुवनीं । ध्रुव गेला निग्रहेंकरुनी । तेथें भेटला नारदमुनि । उपदेश करोनि पैं गेले ॥८२॥
तेणे केलें भगवदाराधन । प्रत्यक्ष झालें भगवंतदर्शन । माथां जलज स्पर्शोन । निजात्मज्ञान जाहलें ॥८३॥
वासुदेव मंत्र वासुदेव । प्रत्यक्ष भेटले इंदिराधव । पुन्हा भोगून राज्यावैभव । ध्रुवपदीं ध्रुव स्थापिला ॥८४॥
तेवीं भर्तृहरिरायासी झालें । चर्पटीनाथें आज्ञापिलें । पुन्हा राज्यासनी स्थापिलें । पुढें वर्तलें परियेसा ॥८५॥
पुढें कथा सुरसगहन । परम पवित्र अनुसंधान । श्रोती देऊन अवधान । श्रवण करावें आदरें ॥८६॥
आदिनाथलीला श्रीशंकर । पद्यरचना पूजासंभार । भावें अर्चिला षोडशोपचार । षोडशोऽध्यायीं आवडीं ॥८७॥
कीं हा षोडशकळीं पूर्णचंद्र । चकोरश्रोतयां सुधाकर । त्रितापतापातें शीतकर । रोहिणीवर प्रत्यक्ष हा ॥८८॥
श्रीमदादिनाथलीलाग्रंथ । ग्रंथकर्ता भैरवसमर्थ । तत्प्रसादें आदिनाथ । षोडशोऽध्यायीं वंदिला ॥८९॥

N/A

References : N/A
Last Updated : February 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP