समाधि प्रकरण - अध्याय आठवा

निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


दोधकवृत्त.
ज्ञानि समाधिस विठ्ठलराजें । बैसविला अति उत्सव गाजे ।
नाचति भक्त सुरासुर भोजें । दिव्य कथानक हें बहु साजे ॥१॥
कांचन-पिंपळ उत्तरभागीं । वृक्ष अजान पुढें उपयोगी ।
बैसत आसन घालुनि जेथें । सर्व सुखांबुद वर्षति तेथें ॥२॥
सिद्ध महेश्वर सिद्धगणाशीं । बुद्धिविधायक पश्चिमदेशीं ।
ज्ञानविधी निरखोनि हरी तो । बोलत फार सुतोषगिरा तो ॥३॥
चंद्र दिवाकर जोंवरि तारा । भूमि असे जव अंबुधि वारा ।
तोंवरि अक्षय येथ समाधी । राहिल निश्चय घे वर आधीं ॥४॥
कल्प सरे मग या जग आटी । ठेविन नेउनियां मम पोटीं ।
होयिन मी वटपत्रनिवासी । बालक निद्रित योगविलासी ॥५॥
मागुति सर्जिन लोक तदां ते । येथ यथास्थित हें मग वर्ते ।
याचपरीं बहुतें शतकल्पें । क्रीडतसे निजशक्ति अनल्पें ॥६॥
ज्ञानदेव चतुराक्षर नामें । जो जप नित्य कर नेमें ।
त्यासिच सुल्लभ चौविध मुक्ती । दायक मी नृहरी अतिभक्ती ॥७॥
देयिन भोग समस्तहि येथें । नेयिन सेवट मत्सदनातें ।
हा वर अद्भुत मीं तुज देतों । वास करीन तुझ्या निकटीं तो ॥८॥
बोलत देव समस्तजनांसी । भक्त असा मम ज्ञानविलासी ।
नाहिंच नाहिंच आणिक दूजा । ज्ञानविधी जगतारक वोजा ॥९॥
वंदुनि पादसरोज हरीचे । त्यावरि नाथ निवृत्तिगुरुचे ।
वंदुनियां सकळां सुरसिद्धां । व्यासमुखा मुनिवर्य सुबुद्धां ॥१०॥
बोलति विठ्ठल देखुनि डोळां । तूंविण कोण अह्मांसि निराळा ।
स्वामि असे भुवनत्रकोशीं । तूंचि अह्मां भवतारक होशी ॥११॥
उत्सव हा निजभक्ताचा । कोण करी तुजवांचुनि साचा ।
धन्य मला त्रिजगीं हरि केलें । भाग्य कसें मम आजि उदेलें ॥१२॥
येथ महासुर-सिद्ध मिळाले । ब्रह्म महेंद्र शिवादिक आले ।
धन्य मला सकळांतरि केलें । हें यश तूज तुझें हरि आलें ॥१३॥
भक्तलळा परिपाळिसि देवा । योग्य तुलाचि सुरांत सदेवा ।
उत्सव हा मम थोर समाधी । दाखविला स्वजनांप्रति आधीं ॥१४॥
रुढविलें भुवनत्रयिं मातें । रुढविलें अपणें अपणातें ।
दाखविली सकळांप्रति माया । दीनदयानिधि केशवराया ॥१५॥
भक्त तुझे अह्मिं पावन झालों । मान्य तुह्मी जगतीं बहु केलों ।
काय वदूं तुमचे गुण आतां । विश्वविधायक पंढरिनाथा ॥१६॥
विश्वरुपें समुदा नटलासी । विश्वपटांत गुणी भरलासी ।
चाळीसि विश्व समस्त पुरेशा । चाळक तूं भुवनत्रयवासा ॥१७॥
भू-जळ तेज समीर-नभातें । कोण धरी तुजवांचुनि हातें ।
बुद्धि अहंकृति मानस आठें । प्राकृत हें रचिलें जग मोठें ॥१८॥
सत्वरजात्मक हें तरि सारें । चाळविसी हरि सूत्र विचारें ।
निर्मुनि एक विराट तनूतें । तूंचि विराज विराजसि तेथें ॥१९॥
भक्तमहाभयसंकटकाळीं । दुष्टनिवारक तूं वनमाळी ।
घेसिल ते अवतार अनेक । त्यांत दहा करिती जन लेख ॥२०॥
दाविसि दिव्य चरित्र जनांला । लाविसि सात्विक ते भजनाला ।
गोविसि राजस तामस कामीं । खेळ करी तव शक्ति रिकामी ॥२१॥
गातिल जे तव पुण्यचरित्रा । त्यां प्रतिपाळिसि साच पवित्रा ।
ठेविसि नेउनियां निजधामीं । देउनि मुक्तिसुखाप्रति स्वामी ॥२२॥
हें महिमान अगाध परेशा । एक-मुखें तुज वर्णिन कैसा ।
वर्णुनि त्या ह्मणति श्रुति नेती । वैखरि काय पुरे तुज गाती ॥२३॥
ऐकुनि ज्ञानमुखें स्तुति-वाणी । तोषुनि विठ्ठल पंकजपाणी ।
ठेवितसे अतिशीतळ माथां । तारक जो भविं दीनअनाथां ॥२४॥
मागुति मागुति ज्ञानमणीची । बोलतसे स्तुति विठ्ठल वाचीं ।
सांगत देव दयानिधि माझें । स्तोत्र करीं भुवनाद्भुत गाजे ॥२५॥
ऐकुनि सेवटली तव वाणी । नाम सुधासम सद्‍गुणखाणी ।
तृप्ति घडेल जसी मम कर्णा । योजि तशा निगमार्थक वर्णा ॥२६॥
धन्य ह्नणोनि नमोनि पदातें । ज्ञाननिधान तदां निगमार्थे ।
स्तोत्र करी विभुविठ्ठलजीचें । सार्थक हेंच असे रसनेचें ॥२७॥
ज्ञान कळानिधि विठ्ठलदेवा । वर्णुनि ज्ञान सुधा निधि सेवा ।
तो करि ज्ञानसुधारसवाणी । वेंचुनि ज्ञान जनीं सुखखाणी ॥२८॥
ते अतिखोल यया लगुवाचे । वर्णिन केंवि महागुण त्याचे ।
मान्य किजे सकळां सुजनांनीं । मंदमती वदलों अभिमानी ॥२९॥
===============================
नमन ज्ञानदेवकृत.
--------------------
मात्रासमक वृत्त.
काळकुतूहळ देव नमो । चक्रचाळ गोपाळ नमो ।
शिव विश्वेश्वर आद्य नमो । श्रीविश्वप्रतिपाळ नमो ॥१॥
अरुप दिग्वासासि नमो । दशदिग्व्यापकदेह नमो ।
नारायण सुखसार नमो । कमलगर्भजनकासि नमो ॥२॥
चित्ताचाळक भाव नमो । विष्णो भव्य विभाव नमो ।
भजनशीळ हृदयस्थ नमो । आदिदेव तूं सत्य नमो ॥३॥
ज्योतिलिंग जगदीप नमो । भुवनांतर्गत एक नमो ।
जगद्‍गुरु श्रीकांत नमो । अगम्य पार परेश नमो ॥४॥
ज्ञानगम्य जयदेव नमो । लीलानाटक भाव नमो ।
वैकुंठाधिप कृष्ण नमो । वैकुंठस्थितरुप नमो ॥५॥
दर्श स्पर्शनगूढ नमो । उपरति विद्या रुढ नमो ।
देव तितिक्षारुप नमो । कमलालय कमलेश नमो ॥६॥
मूल त्रिगुणाधार नमो । त्रिगुणक्षोभक काळ नमो ।
सदाकृपावात्सल्य नमो ! ब्रह्मसनातननाम नमो ॥७॥
राजेश्वर जयराम नमो । जयजय विगळितकाम नमो ।
वाचातीत-विचार नमो । वाचाचालक - सूत्र नमो ॥८॥
जय हृत्तम-चंडार्क नमो । काल - कला -संदीप्त नमो ।
कर्त्या हर्त्या सर्व नमो । भक्त रक्षका हरी नमो ॥९॥
हरहरि ब्रह्मेशान नमो । वेदांतांबुधि - पार नमो ।
अद्वितीय सुखसार नमो । सर्वेश्वर भवहार नमो ॥१०॥
श्रुति- गम्यामयहीन नमो । ज्ञानकिरण-चिद्भानु नमो ।
द्वैतनिरासक साम्य नमो । समसुखकर्ता तूज नमो ॥११॥
व्यक्ताव्यक्तक रुप नमो । मायामदगजसिंह नमो ।
मायागृहकृतवास नमो । आत्माराम सुखाब्धि नमो ॥१२॥
शिवजीवात्मक देव नमो । ज्ञानाज्ञान - विलास नमो ।
सर्वजीव - निजबीज नमो । जय जय जगदाधीश नमो ।
पंढरपुरकृतवास नमो । पांडुरंग - धृतनाम नमो ॥१४॥
अद्भुतरुपोदार नमो । त्रैलोक्याकृतिधार नमो ।
भीमातीर -विहार नमो । भीमकाळ-परिहार नमो ॥१५॥
त्रैलोक्यांबुजकंद नमो । जगदीशा जगदादि नमो ।
क्षराक्षरोत्तम-पुरुष नमो । सर्वातीत उदार नमो ॥१६॥
मुद्रा जीवाकार नमो । चराचरा आधार नमो ।
मधुसूदनघृतनाम नमो । मधुमाधवविश्राम नमो ॥१७॥
मधुरगीतप्रिय बाळ नमो । मुरलीगायनलोल नमो ।
कालभुजंगमकाल नमो । भालविशालतमाल नमो ॥१८॥
त्रिविधतिमिरपरिहार नमो । परमानंदविहार नमो ।
पुरविसि आशापूर नमो । जय निजभक्ताधार नमो ॥१९॥
आशापाशहुताश नमो । क्लेशाक्लेशविनाश नमो ।
प्रापंचिकपरिहार नमो । श्रीधर श्रीकर देव नमो ॥२०॥
संगदोषहर सर्व नमो । नाशक विषयविकार नमो ।
अनंतनामाधार नमो । नामें कलिपरिहार नमो ॥२१॥
शांतितितिक्षाधार नमो । देव दयाघनसार नमो ।
दीनोद्धर सुखपार नमो । दीनदयाकर नित्य नमो ॥२२॥
कूर्मसमामृतदृष्टि नमो । रक्षिसि हे तव सृष्टि नमो ।
निष्कलंकजननाथ नमो । भेदमहाभय - घात नमो ॥२३॥
भवार्णववाडवन्हि नमो । द्वादशविसमतेज नमो ।
वेदवेद्य गुणपूर्ण नमो । वेदप्रकटशील नमो ॥२४॥
चित्तचकोरसुधांशु नमो । कारणकार्यसमर्थ नमो ।
सत्य नमो अतिनित्य नमो । सत्यज्ञानानंद नमो ॥२५॥
अद्वैतांबुधिसार नमो । निर्द्वंद्वा निष्पार नमो ।
नित्यानित्यप्रासि नमो । नित्यानित्यकरासि नमो ॥२६॥
अतिदुर्गार्तिहरासि नमो । हरणभरणकरनासि नमो ।
भेददृष्टिहरणासि नमो । भवभयपरिहरणासि नमो ॥२७॥
अद्वैतानंदासि नमो । निर्द्वंद्वामृतशिल्क नमो ।
आलिंगितपरशक्ति नमो । दर्शितश्रीशिवभक्ति नमो ॥२८॥
काळकूविषभक्ष नमो । कालांतक अतिदक्ष नमो ।
आदिचराचरसाक्ष नमो । आदिचराचर-रक्ष नमो ॥२९॥
वसु-रुद्रादित्यात्म नमो । पशुपाशोद्धरपक्ष नमो ।
सर्वत्रीं समभाव नमो । प्रियाप्रियादि अभाव नमो ॥३०॥
कृत्रिमकपटविदाह नमो । अकपटजनसुखदोह नमो ।
परिहरि संकटघोर नमो । प्रतिपालक संहरक नमो ॥३१॥
नारायण गुणपूर्ण नमो । पारायण सुखपूर्ण नमो ।
इंद्रियचाळवक्र नमो । त्रैलोक्याधिपशक्र नमो ॥३२॥
दत्तात्रय अवधूत नमो । नित्यानंदविलास नमो ।
अपरमितैश्वर्यासि नमो । उत्कटसत्ताधार नमो ॥३३॥
दुष्टदर्पपरिहार नमो । शिष्टपुरुषपरिपाल नमो ।
कष्टविनाशक सुष्ट नमो । अमित कीर्ति उत्कृष्ट नमो ॥३४॥
चतुर्वेदरविगगन नमो । योगगुप्त सर्वाक्षि नमो ॥३५॥
सत्यसनातन विष्णु नमो । दैत्यमहामयजिष्णु नमो ।
सर्वहि भार-सहिष्णु नमो । गोकुलपालक कृष्ण नमो ॥३६॥
क्षीरनीरनिर्वाह नमो । विदग्धजनसुखदोह नमो ।
विवेकसागरपार नमो । महानादझंकार नमो ॥३७॥
अद्वयपरसुखसदन नमो । जगभक्षक अतिवदन नमो ।
शुक्लांबर शुभवर्ण नमो । दयावंत अतिजीर्ण नमो ॥३८॥
श्रुतिशास्त्रप्रतिपाद्य नमो । पद्मगर्भभवतात नमो ।
चिदाकाश अतिव्याप्त नमो । चित्सत्ता घनरुप नमो ॥३९॥
त्रिभुवनतामसदीप नमो । एकार्णव-समरुप नमो ।
कल्पांतक गुणविभव नमो । सकळदेवदेवेंद्र नमो ॥४०॥
गोगोपाल कृपाल नमो । गोविंदा गुणशील नमो ।
चित्तचमत्कृतिरुप नमो । चित्तरंजनाधार नमो ॥४१॥
ध्वजवज्रांकुश-अंक नमो । पदापंकज अकलंक नमो ।
दूरीकृतभवपंक नमो । कृत्याकृत्य-विशंक नमो ॥४२॥
निराधारकाधार नमो । क्षमाक्षमासंधार नमो ।
अलेप अगुणाकार नमो । अखिलांडेश्वर देव नमो ॥४३॥
चित्तभ्रमकविचित्र नमो । परमोदार परेश नमो ॥४४॥
ध्यानांतर्गतदीप नमो । दर्शितदिव्यप्रताप नमो ।
आग्रहनिग्रहहीन नमो । वैकुंठाद्यभिदान नमो ॥४५॥
अनादृष्टपरिमाण नमो । दृश्यादृश्यनिदान नमो ।
सुखमय सुखकररुप नमो । नित्योदितपदकमळ नमो ॥४६॥
दृश्यादृश्यादृश्य नमो । दीप्तचराचरदृश्य नमो ।
सर्वहि तूं शिवभाष्य नमो । सर्वहि तूं सर्वेश नमो ॥४७॥
परमपदादिब्रम्ह नमो । आत्माराम सुशर्म नमो ।
सन्मुख भक्तजनांसि नमो । तारक दीनजनांसि नमो ॥४८॥
एकतत्व एकांत नमो । एकचि मायाकांत नमो ।
पूर्णचिदांबुधि नित्य नमो । योगरुढ परतत्व नमो ॥४९॥
सबाह्य वससी तूज नमो । सबाह्य दिससी तूज नमो ।
वेदादिकवक्त्यासि नमो । वेदादिककर्त्यासि नमो ॥५०॥
सत्ता सर्व तुझीच नमो । भक्त जाणती तूज नमो ।
ज्योतिर्यमयरुपासि नमो । तत्वबीज ते तूंचि नमो ॥५१॥
परब्रह्म परतत्व नमो । परमगुह्य परसत्व नमो ।
अपरंपार परांत नमो । स्वयंवेद्य संचित्य नमो ॥५२॥
अघटितघटका तूज नमो । सुघटितविघटण - दक्ष नमो ।
द्वैताद्वैता तूज नमो । कर्ता भर्ता सर्व नमो ॥५३॥
संख्यारहिता तूज नमो । असंख्यपालक तूज नमो ।
जनसंजीवन तूज नमो । पुंडलीकधन तूज नमो ॥५४॥
निर्गुणगुणस्वरुप नमो । देवदेव अतिसुलभ नमो ।
कृपे सर्व तुझियाच नमो । चरणनलिनयुगळासि नमो ॥५५॥
भक्तापकजीमूत नमो । ब्रह्मनाम निर्धूत नमो ।
योगीजननिजमित्र नमो । योगिवृंदसुखपात्र नमो ॥५६॥
भूस्वर्गत्रय तूंचि नमो । युगयोगात्मक तूंचि नमो ॥
सर्वजनक तूंचि नमो । विश्वजनक तें तूंचि नमो ॥५७॥
नाहीं तुजसम अन्य नमो । तुजविण अधिक नसेचि नमो ।
चार्‍ही वाचा तूज नमो । न पवति साच्यां तूज नमो ॥५८॥
मुक्तिविधायकतत्व नमो । मुक्त्यतीतपरतत्व नमो ।
पंचम उरसी तेंचि नमो । षड‍दर्शनपथसूर्य नमो ॥५९॥
चिद्विलास सकळांग नमो । भानुबिंबगततेज नमो ।
तेजोवंतसुतेज नमो । आदितेजरविबिंब नमो ॥६०॥
अनेकदर्शनभेद नमो । क्लेशसर्वविच्छेद नमो ।
त्रिगुणप्रपंचनिरास नमो । सर्वासत्वविनाश नमो ॥६१॥
नाडीचक्रातीत नमो । इंद्रियदशकातीत नमो ।
यांत गुंतले भक्त तयां । काढिसी तूं कनवाळ नमो ॥६२॥
बाध्यबाधककर्म नमो । भ्रमसत्ता हे सव नमो ।
तद्भमवारक तूंचि नमो । ह्मणुनि पदांबुज नित्य नमो ॥६३॥
यमधर्माची दृढसत्ता । कर्मधर्म-चाळकपंथा ।
कर्मधर्म सर्वहि धात्या - । पायीं अर्पुनि तूज नमो ॥६४॥
यमदमउपशम जे कांही । भेददर्शनें जे साही ।
नाडीत्रयपथ या देहीं । अर्पुनि तुजला तूज नमो ॥६५॥
प्रान - पवन मनधारण जें । तुर्यपदाचें कारण जें ।
समतुक अवघे गुण सहजें । अर्पुनि तुजला तूज नमो ॥६६॥
भौतिक दिसतें जग सारें । जन्ममरनभय अनिवारें ।
ब्रह्मांडाधिप तुज सारें । पद युगिं अर्पुनि तूज नमो ॥६७॥
युक्त वासना मन झालें । विषयधनीं गुंतुनि ठेलें ।
धाउनि वेगीं तूं सगळें । वोढुनि काढीं तूज नमो ॥६८॥
चंचळचित्तचमत्कृति तें । नकळे तद्धावनगतितें ।
तुझिया परसत्ते होतें । पदयुगिं अर्पुनि तूज नमो ॥६९॥
मनवारु चंचळ झाला । बांधुनि ठायीं दृढ केला ।
बुझाविला तव चरणाला । अर्पुनि विमला तूज नमो ॥७०॥
नित्य धर्म होते चुकले । वेदविरुद्धें ते झकले ।
तेचि तुला श्रीहरि सगळे । अर्पण केले तूज नमो ॥७१॥
श्रुति-स्मृतीचीं बहु वचनें । सभाचतुरता अति गहनें ।
अन्य कळा सर्वहि सगुणें । अर्पुनि चरणा तूज नमो ॥७२॥
नानातंडवितंडा क्रिया । देह चाळका असति जिया ।
भ्रंश मनातें अतिशय ज्या । सांभाळी तूं तूज नमो ॥७३॥
देहभरण ममता सारी । देह पोषिती निशिवारीं ।
अनंत वृत्तीच्या हारी । सांभाळी तूं तूज नमो ॥७४॥
त्रिगुण-तिमिर जें जें अवघें । रुपा आले मन वोघें ।
तें तें देवा मी नेघें । सांभाळी तूं तूज नमो ॥७५॥
योनिजनित निजकष्ट सदां । वृद्ध वासना पुष्ट सदां ।
अर्पुनि तुजला सर्व मदा । शुद्ध जाहलों सांभाळी ॥७६॥
विद्यावयकुलधर्म बरा । ब्रह्मचर्य आचार खरा ।
हरी सर्वही उणा पुरा । अर्पियला तुज सांभाळी ॥७७॥
बहुत जन्म अवतार-कळा । नाना शाखा अति - विमळा ।
गोत्रोच्चार - विधी सकळा । विभू अर्पिल्या सांभाळी ॥७८॥
वेदपाठ जें स्मृतिवचनें । शास्त्रभाषणें अति गहनें ।
कीर्तन गुण वर्णन गाणें । तुला अर्पिले सांभाळी ॥७९॥
चंद्रसूर्यपदसोपानें । करुनि जया लोका जाणें ।
तेंही तवपद तुज जाणें । केलें अर्पण सांभाळी ॥८०॥
रोमरोम शत ब्रह्मांडें । विराट रुप असे वाडें ।
तेंही तवरुपीं थोडें । महद्रूप तूं तुज नमो ॥८१॥
विश्वपटाची सूक्ष्म घडी । तारक ब्रह्मगुणेंचि घडी ।
ते म्यां उकलुनियां उघडी । देखिजली तवमूर्ति नमो ॥८२॥
तुझ्य़ा भक्तिनें सर्व कळे । तीविण कांहींही न कळे ।
तुझ्या कृपेनें दास भले । सखा पावले तूज नमो ॥८३॥
अनंत नामाचा पुतळा । तूझ्या आंगी सर्व कळा ।
असा तुझा तूं अति विमळा । परमानंदा तूज नमो ॥८४॥
गुणाग्रगण्या श्रीरामा । गुणसागर तूं नि:सीमा ।
सकळ-चराचर-विश्रामा । पूर्णब्रम्हा तूज नमो ॥८५॥
विभूतिरुपा तुज नमितां । अहंकार-मळ कैं आतां ।
चित्त रमे पायीं दृढता । अति निश्रांता तूज नमो ॥८६॥
नमने हेंचि अतिथोर दिसे । नमनें तवपद - सुख गिंवसे ।
याविण सर्वहि नेति असें । श्रुतिशत वर्णिति तूज नमो ॥८७॥
नमन हेंचि अतिवर्म असे । नमनीं परसुख पूर्ण वसे ।
नमन हेंच परतत्व दिसे । आत्मारामा तूज नमो ॥८८॥
नमनाविण सर्वहि वाटा । देव देव त्या अव्हाटा ।
नमन पाववी तुज श्रेष्ठा । परमवरिष्ठा तूज नमो ॥८९॥
नमन हेंचि तारक जाण । नमन हेंचि परविज्ञान ।
नमन-विना सुरपद हीन । नको विठ्ठला तूज नमो ॥९०॥
नमन कोण म्हणतो लटकें । तोचि प्रपंची जीव ठके ।
सर्व जगाच्या भव-सुटके । नमन सर्वथा श्रेष्ठ नमो ॥९१॥
नमना यवढा मंत्र हरी । धुंडुनि शास्त्रें कोटिवरी ।
काढिन ह्मणतां यासि सरी । नये दूसरी तूज नमो ॥९२॥
इंद्रचंद्र सनकादी मुनी । परम पावती तुज नमुनी ।
शिव मुख्य सनातन तो नमनीं । तिष्ठत भजनीं तूज नमो ॥९३॥
नमन हेचि अनुभूति खरी । नमन हेचि भवभाव हरी ।
नमन हेंचि परदेव करी । नमन थोर गुज तूज नमो ॥९४॥
नमन करुनि ब्रह्मा श्रेष्ठ । नाभिकमळ अतिसुखपीठ ।
पावत निजपद वैकुंठ । नमन इष्ट अति तूज नमो ॥९५॥
श्रीगुरुकरुणा ज्यासि घडे । नमन -भक्तिसुख त्या जोडे ।
मुक्ति तया पायांचि पडे । मुख्य मुक्ति तूं तूज नमो ॥९६॥
नमो नमस्ते नमो नमो । पुढतोपुढती नित्य नमो ।
समाधिसुख -दात्यासि नमो । चिद्वनसुखपूर्णासि नमो ॥९७॥
महाविष्णु तूं योगनिधी । योगरुप योगेंद्र विधी ।
अपरामितानंदांबुनिधी । भानुकोटि-तेजासि नमो ॥९८॥
अनंत करकमळें धरिता । तोचि चतुर्भुज तूं ताता ।
मुकुटरत्नमणिढाळ शिरीं । वनमाळा आपाद वरी ॥९९॥
अरिशंखांबुजयुक्तकरा । पीतांबर रमणीय धरा ।
कौस्तुभकंधर देववरा । श्रीवत्सांकित तूज नमो ॥१००॥
नूपुरतोडर पदयुगुळीं । बांधुनि ठेविसि काळकळी ।
सर्वपाळ गोपाळ बळी । मन्मथ - शत - सुंदर - वदना ॥१०१॥
नाना पदक मणी कंठी । हार मुद्रिका लघुबोटीं ।
आंगी मलयागर ऊटी । मृगमद भाळीं बहु शोभे ॥१०२॥
जडित-मेखळा-गुण कासे । क्षुद्रघंटिकारव विलसे ।
तेणें मुनिमानस विकसे । मुरलीवादनलोल नमो ॥१०३॥
रुणुझुणु रुणुझुणु रुणुझुणुन्‍ । वाजविसी मंजुळ वेणू ।
सुंदर शामल जलदतनू । देखुनि लाजे मदन नमो ॥१०४॥
सभोंवते गोपाळ तुझे । अंतरंग जिवलग माझे ।
पुंडलीक मम प्राण असे । तव पद निकटी नित्य वसे ॥१०५॥
माझ्यावृत्ती गोपमुली । रमती निशिदिन पदकमळीं ।
माझा भाव सुकल्पतरु । तळीं तिष्ठसी आदिगुरु ॥१०६॥
भक्ति पूर्ण माझी यमुना । वाहत पदनिकटीं सुमना ।
ज्ञान बोधसह दृश्य हरी । सर्व अर्पिले तुझे करीं ॥१०७॥
रखुमादेवीवर वरदा । बाप विठ्ठला दिव्य-पदा ।
वंदन करितों मी भाळीं । करीं धरुनि तूं सांभाळी ॥१०८॥
अष्टोत्तरशत पद्ममणी । माला विरचुनि ज्ञानमणी ।
पूजी विठ्ठल-पदकमळा । मुक्तिदायका अति विमळा ॥१०९॥
भावें धरिती जे कंठी । शोभति ते जन वैकुंठीं ।
ज्ञानदेवसह जगजेठी । देयिल अंती सुखभेटी ॥११०॥
इह सर्वार्थ तया फळती । चार्‍ही मुक्ती त्या वरिती ।
ऐशी महिमा नमनाची । ज्ञानदेवगी सुमनाची ॥१११॥
ज्ञानदेवभावार्थ असा । घेउनि वदलों मी परिसा ।
उणें पूर्ण तें सर्व करा । दीन बनाजी करीं धरा ॥११२॥
॥ इतिश्रीज्ञानेश्वरविजयमहाकाव्ये समाधिवर्णने स्तुतिकथनं
नामअष्टमोध्याय: ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP