समाधि प्रकरण - अध्याय सहावा

निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


आज्ञापिती विठ्ठल रुक्मिणीसी । हे भक्त माझे असती उपासी ।
याकारणें भोजन आजि द्यावें । मिष्टान्न यां योग्य जवें करावें ॥१॥
अवश्य आज्ञा म्हणवोनि माथां । वंदोनियां पाय म्हणे समर्था ।
तूं इच्छितां सर्वहि याचकाळीं । होईल त्रैलोक्यजना दिवाळी ॥२॥
पाचारिले तैं विधि-विश्वकर्मे । सांगीतली त्यांप्रति हेचि कर्मे ।
शाला रचाव्या अनुपम्यवाणी । कीं इच्छिती भोजन चक्रपाणी ॥३॥
त्या कामधेनूसि जवें बलावा । सर्जावया सर्व पदार्थ लावा ।
गंगादि आणा सरिता उदंडा । वाहोत नाना रसपूर्ण गोडा ॥४॥

भुजंगप्रयात.
दहीं दूध लोणी घृतासाखरेच्या । मधूपेयसंयुक्त सर्वांरसाच्या ।
फलें शाक सर्जावया कल्पवृक्षा । त्वरें बाहिजे गा विधी सर्वदक्षा ॥५॥
सुवर्णादि पात्रार्थ चिंतामणीतें । त्वरे आणिजे स्वर्गिचा आजि येथें ।
रचा सर्व रांगोळिया रत्नदीपा । करा कुंकुमें चंदनें सेक लेपा ॥६॥
करा आयितिं सर्व तात्काळ येथें । भुकेले पहा पंढरीनायकातें ।
पहा भक्त सर्वस्व माझे भुकेले । ययां पाहिजे पूर्ण संतृप्त केलें ॥७॥
बरे मेळवा शीघ्र दिक्पाळ तेही । यथायोग्य कामास योजा तयांही ।
त्वरें आळवा त्या शचीनायकातें । ययां वाढण्या अप्सरां बायकांतें ॥८॥
तयांनी तदां तोचि आदेश माथां । त्वरें वंदिला तैं स्त्रजी विश्वकर्ता ।
विचित्रा विशाला महारम्य शाला । मणिस्तंभयुक्ता जशा त्या तशाला ॥९॥
महादीप पीठावळी रत्नताटें । तशा आडण्या तोयपात्रासि नेटें ।
बहु वाटिया पान पत्रें उदंडें । तदां सर्जिली विश्वकर्मे प्रचंडे ॥१०॥
तदां पातल्या अप्सरा दिव्यनारी । धुरा देवपत्नी शची मुख्य सारी ।
ऋषींच्या तशा सुंदरी देवमाता । पुढोरोनियां मीनल्या त्या समर्था ॥११॥
तदां देखिलें सर्वही सिद्ध आहे । नये भीमकी पांडुरंगासि बाहे ।
तुम्ही ऊठिजे भक्तिवृंदासमेतें । करावी त्वरा स्नानसंध्या समस्तें ॥१२॥
महातीर्थ इंद्रायणी पुण्यदात्री । समस्तीं तदां स्नान केलें पवित्रीं ।
दिठि देखिलें दिव्य वैकुंठ तेंही । नसे यापरीं मुख्य वैकुंठ तेंही ॥१३॥
तदां पाहिल्या लोचनी दिव्यशाला । महाश्रेष्ठ चिंतामणीच्या विशाला ।
बर्‍या निर्मिल्या दिव्यपंक्ती अपूर्वा । दिशा साधिल्या उत्तरा आणि पॄर्वा ॥१४॥
जशा ज्यांसि त्या योग्य पंक्ती धराव्या । अहो ऊर्ध्व संन्यासियांते कराव्या ।
अहों अग्निहोत्र्यांसि हे पंक्ति द्यावी । महायागदीक्षावतां हे असावी ॥१५॥
महां सोमपी याच पंक्ती बसावे । बरे श्रोत्रिये या स्थळी बैसवावे ।
महोदार जे तापसी वानप्रस्थ । तयां योग्य हे पंक्ति आहे प्रशस्त ॥१६॥
अहो ब्रम्हचारीजनी या वळीतें । सुखें बैसिजे ठाव हा योग्य यातें ।
अहो भक्तसाधू-समाधानवंता । यथें बैसवा साधुबुद्धी समस्तां ॥१७॥
दयाळू सदां पोषिते जे परांचे । पहा साधु हे कोवळे या मनाचे ।
सदां सिद्ध जे दीनसंरक्षणातें । तया आणिजे श्रेष्ठ पंक्तीस येथें ॥१८॥
महीदानद्ते महोदार लोकीं । महाकर्मकर्ते मठाराम जे कीं ।
करावें हरी तोषणाच्याच व्याजें । तयां सज्जना पंक्ति मोठी विराजे ॥१९॥
महाधीर वैराग्यसंपन्न आले । उदासीन सर्वांस्थळीं साच झाले ।
विरिंच्यादि लोकांत नाहीं सुखाशा । तयां बैसवा श्रेष्ठपंक्ती नरेशां ॥२०॥
नवाही प्रकारांतरें भक्तियोगें । मला वश्य केलें जयांनी निजांगें ।
जयांला नसे या जगीं अन्य जोडा । तयां भक्तवर्गासि हे पंक्ति मांडा ॥२१॥
महाभक्त मौनी महायोग्य सिद्ध । हरी लक्षिती सर्वभूतीं प्रसिद्ध ।
अशा सज्जना थोरली पंक्ति योजा । म्हणे रुक्मिणीनाथ देवाधिराजा ॥२२॥
दिसे सन्मुखी मी समस्तांसी तोंडा । अशा मध्यदेशीं अम्हां पात्र मांडा ।
अम्हां सन्निधीं ज्ञानिया पुंडलिका । कर ठाव ते दूर मातें न लेखा ॥२३॥
तदां उद्धवाक्रूरपार्थादिकांहीं । हरीच्या मतें दिव्यपंक्ती तयांही ।
बर्‍या निर्मिल्या योग्य त्यांते बसाया । नसे ठाव कोणासि कांही रुसाया ॥२४॥
बलावा त्वें भोजना भक्त माझे । हरीची ऊसी श्रेष्ठ आज्ञा विराजे ।
तदां सर्व पाचारिला भक्तमेळा । त्वरें चालतील क्षिती रम्यशाला ॥२५॥
यती बोलती तैं उगरोनि दंडा । तयां अप्सरातें तुम्ही मार्ग सोडा ।
अम्ही सोवळे जातसों भोजनातें । तुम्ही दूर व्हा पुंश्चली अन्यपंथे ॥२६॥
तदां बोलती अप्सरा यांसि रागें । कसे सोंवळे अंतरी भेद जागे ।
यती ही असा ते क्षमा मुख्य नाहीं । कशाला शिखा टाकिल्या क्रोधियांही ।
तदां ते यती बोलती त्यांसि तोषें । नसे भेद भूतीं अम्हाम ब्रह्म भासे ।
तथापी जनाचार रक्षावयातें । अम्ही तजितों या जगा निस्पृहत्वें ॥२८॥
असें ऐकतां वंदिती पादपद्मा । त्वरें जायिजे भोजना देवसद्मा ।
असा सोहळा मांडला थोर जेथें । हरी वर्ततां न्य़ूनता काय तेथें ॥२९॥
तदां बैसलें सर्वही एकमोरे । हरी लक्षिती सर्व नेत्रासमोरे ।
तदां वाढण्या घेतलें देवतांही । शची मेनका ऊर्वशी मुख्य त्यांही ॥३०॥
त्वरेनें अरंभा म्हणे दिव्य रंभा । घृताची घृताच्या धरी रत्नकुंभा ।
जना वाढिते दाविते कौशलातें । अशा सिद्ध देवांगना सर्व तेथें ॥३१॥
वाढण्या पातल्या सर्व पात्रीं । तदां पात्र गुंडाळीती अग्निहोत्री ।
अम्ही काय या गोंधळी आजि आलों । कसें जेविजे या स्थळी भ्रष्ट झालों ॥३२॥
महा पूंश्चली अप्सरा कामचारी । अह्मां वाढिती हे नव्हे गोष्टि भारी ।
तदां हांसती पूसती त्या तयांतें । तुह्मी मानितां काय मोठ्या भयातें ॥३३॥
तुह्मी याज्ञिकीं यज्ञ काशासि केले । अह्मां कारणें वेद ते वेंच केले ।
अह्मांलागि कंटाळतां आजि येथें । उद्यां पादसेवार्थ पावाल तेथें ॥३४॥
अह्मी सर्व देवेश्वरां मान्य कां विटाळा । मनीं स्वर्गिची वासना मुख्य टाळा ॥३५॥
ऋषीराय आम्हांचि पासोनि झाले । अह्मी हे ऋशी सर्वही शुद्ध केले ।
अह्मांपासुनी वंश क्षत्रियांचे । प्रसिद्धीस आले शशीभास्कराचे ॥३६॥
अम्ही नाहलों या जळीं सुद्ध झालों । हरीतीर्थ इंद्रायणी तोय प्यालों ।
अम्हा काय धिक्कारितां व्यर्थवाणी । त्यजा भेदबुद्धी भजा चक्रपाणी ॥३७॥
तदां हांसती अन्य देखोनि त्यांतें । हरीपंक्तिचे भेद बुद्धिस्थितांतें ॥३८॥
असा गलबला ऐकतां चक्रपाणी । वदे धातया ऐक तूं रम्यवाणी ।
स्वपंक्तीस पाहोनियां देवताहीं । बरें वाढितां घोळ होणार नाहीं ॥३९॥
धरी मस्तकीं श्रीशाआदेश धाता । करी योगिनीलागिं आज्ञा समस्ता ।
स्वपंक्ती तुह्मी वाढिजे तोषमानें । तदा श्रीपतिलागि हें कृत्य माने ॥४०॥
तया मुख्य स्वाहा स्वधा याज्ञिकांतें । बर्‍या वाढिती तोष चित्तें स्वहस्तें ।
महायोगसिद्धी तयां योगियांसी । तपोसिद्धि त्या वाढिती तापसांसी ॥४१॥
समर्था महामोक्षसिद्धी यतीतें । तदां नीघती उत्सवें वाढण्यातें ।
वनस्थांसि त्या ब्रह्मलोकांत-सिद्धि । महासाक्षपें वाढिती श्रेष्ठबुद्धी ॥४२॥
व्रतस्थांसि त्या पुण्य-सिद्धि समस्तां । तयाम तीर्थिकां तीर्थसिद्धी प्रशस्ता ।
तयां स्वर्गकामी जना अप्सरांहीं । बरें वाढिलें प्रीति पावोनि तेही ॥४३॥
यया वारिती भीमकी सत्यभामा । अह्मी वाढितों भक्तवृंदा महात्मा ।
अशा पट्टराणी हरीच्या समस्ता । निघाल्या तदां वाढण्यातें प्रशस्ता ॥४४॥
बरीं लोणचीं रायतीं दिव्यशाखा । महारम्य कोशिंबिरी त्या अनेका ।
वरान्नें बरीं सोलिवां मुद्गदाळी । सुगंधे सुवर्णाकृती पीत झालीं ॥४५॥
मुदा ओदनाच्या महाउष्ण वाफा । सुगंधासि घेवोन येती अपापा ।
जशा कुंदजातीकळ्या त्याप्रमाणें । शितें शोभतीं ते शरच्चंद्रवर्णे ॥४६॥
पहा भक्ष्य लाडू किती साखरीचे । भले लोटले पूर नानापरीचे ।
वडे सांडगे पापडांच्या सुरासी । महापात्र तें वाढती सावकाशीं ॥४७॥
खिरी कामधेनूदुधें आळवील्या । बर्‍या रायपूरीं सिता मेळविल्या ।
बहू वाढिल्या रत्नपात्रीं अनेकीं । सुधा स्वर्गिची जिंतिति याच लोकीं ॥४८॥
तयां पात्रपात्रांसि चौसष्टि वाट्या । समस्तां रसीं दाटल्या फार मोठ्या ।
कढी तूप दूधा दह्यांच्या निराळ्या । बर्‍या क्षीर-सायीभरें पूर्ण केल्या ॥४९॥
अनेकांपरीं तक्रनिंबूरसांनीं । कितीं दाट संमिश्र ते शर्करेनी ।
बहू जातिच्या भिन्न पक्वान्नजाती । तयांचे पहा ये स्थळीं पूर जाती ॥५०॥
तदां पाहती लोचनीं स्वर्गवासी । अह्मी एक सेवोनि जाणों सुधेसी ।
तिया एक गोडीत दूजें कळेना । अम्हां मानवी-सौख्य देवां मिळेना ॥५१॥
पहा षड्रसें भक्षिती भिन्नभिन्न । रुची चाखती तोषती नित्यपूर्ण ।
असे अन्न यांते अनंता प्रकारीं । हरी निर्मितो धन्य हे भूमिचारी ॥५२॥
सुगंधोदकें स्वच्छ इंद्रायणीचीं । बरी भाविलीं केतकीपाटलींचीं ।
उशीरादि कस्तूरिका चंपकाहीं । बहू शीत संस्कारिली चातुरांहीं ॥५३॥
अह्मी वंचलो जन्मलों स्वर्गलोकीं । कशाकारणें राहतो व्यर्थ नाकीं ।
कधीं हें सरे पुण्य़ जाऊं धरेसी । भजूं पांडुरंगासि या भावनेशीं ॥५४॥
महाभक्त साधूंचिया दिव्यपंक्तीं । अम्ही मान्य होऊं कधीं कोण युक्ती ।
करावी, असा निर्जरां काम वाढे । असे मृत्यूलोकीं जना सौख्य गाढें ॥५५॥
अम्ही मानवी जन्म घेवोनि यावें । सुखें या अशा भोजनातें करावें ।
असे इच्छिती स्वर्गिचे देव सारे । मनी थोर आशा तयां या प्रकारें ॥५६॥
असा सोहळा सर्व लोकांसि झाला । समस्तांसि देवें परामर्ष केला ।
तदां ज्ञानदेवा निवृत्तीस पाहे । पुढें मुक्ति सोपान चौघांसि बाहे ॥५७॥
तयां बैसवी सन्मुखी स्वर्णताटीं । हरीला जयां देखतां प्रीति मोठी
चतुर्भूज मूर्ति द्विजां दोंभुजांच्या । स्वरुपा पुजी प्रेम ठायीं जयांच्या ॥५८॥
तयाचें पद क्षाळिलें तीर्थ माथां । धरी प्रेमभावें त्रिलोकासि धर्ता ।
महामंदिरी सिचिलें सर्वठायीं । ह्मणे मूळ संपत्तीचे हेचि पाही ॥५९॥
मुखीं प्राशिलें तैं म्हणे धन्य झालों । सुधा अक्षयी आजि मी साच प्यालों ।
अहो ब्रह्मपादांबु हें सोमपाना  । असे तुल्य मी हें म्हणे सत्य जाणा ॥६०॥
फुलें तूळसीचीं दळें विप्रमाथां । गळां हार नाना फुलीं लोकभर्ता ।
उटी चंदनाच्या सुगंधा बुक्यांनी । पुजी देव हा ब्राह्मणा चक्रपाणी ॥६१॥
म्हणे इंदिरा-मेदिनीचा पती मी । जयांच्या प्रसादें असे पूर्ण कामी ।
सुरां रक्षितों शिक्षितों दैत्यनाथां । असे सर्व सामर्थ्य हे विप्रसत्ता ॥६२॥
असें देव सर्वासि बोलोनि राहे । करें सर्व संकल्प तैं सोडिताहे ।
असे एक विष्णु जगद्रूप सारा । महद्भूत त्या सर्व पावो उदारा ॥६३॥
असा दिव्य संकल्प सोडी हरी तो । समस्ता किर्या पूर्ण जो कां करितो ।
असी दावितो या जना रीति सारी । स्वयें आचरे लोककर्ता मुरारी ॥६४॥
तदां जेविती भक्त संतुष्ट सारे । हरी आमुचा अन्नदाता कसारे ।
अम्हां दीधलें आजि हें पोट सानें । कसीं साठऊं यांत हे उत्तमान्नें ॥६५॥
अम्हां तोंड मध्यें कशालागि झालें । अहा मस्तकीं धातयानें न केले !! ।
उगें टाकितों ऊर्ध्वपंथेचि गोळे । कितीं जन्मिचें पुण्य होते उदेलें ॥६६॥
हरि पंक्तिचा लाभ आम्हांसि झाला। कितीं जन्मिंचा भाग्य - भानू उदेला ।
पुन्हा मृत्यु संसार कांही अम्हांतें । नसे निश्चयें मानलें या मनातें ॥६७॥
असें चिंतिति जेविते लोक सारे । बहू जेविले तोष पोटीं न थारे ।
सुखी सर्वदां श्रीनिवासासि गाती । मुखीं श्लोक उच्चारिती रुप ध्याती ॥६८॥
जया जें रुचे तेंचि मागोनि घेती । सदां सर्वदां त्या रसीं तृप्त होती ।
असे जेविले षड्रसें कृष्ण पांती । सुतोषें आनंत कल्पांत ठाती ॥६९॥
असे जेविले भक्त ते कौतुकानें । तयां तृप्ति आनंत कल्पांत माने ।
अशा जेवणीं भूक राहील कोठें । जरी वाढवीलें तरी पोट मोठें ॥७०॥
विडे पुष्पमाळादिकें अष्टगंधे । बहू धूपधूमें विचित्रें सुगंधें ।
तदा ते सभा बैसली वैष्णवांची । ध्वनी दिव्य गांधर्व सद्गायनाची ॥७१॥
तदां अप्सरा नाचती ताळघोळें । विणे सालरी सन्मृदंगे विशाळें ।
फुलें वर्षती पाहती दिव्य व्योमीं । कसा तिष्टतो भक्तवृंदांत स्वामी ॥७२॥
अळंकापुरीं हा महोत्साह झाला । असा तुष्टला सर्वही भक्तमेळा ।
हरी राहिले जोंवरी क्षेत्रदेशीं । असा नित्य सन्मान भक्तोत्तमांसी ॥७३॥
तदां फुंदतां पाहिला एक नामा । रडे अश्रुनेत्रीं करी खेद तो मा ।
तदां रुक्मिणी बोलिली श्रीधरातें । अम्ही मांडिलें ताट या नामयातें ॥७४॥
न जेवीच नामा तुझी वाट पाहें । तयां जेववी तो जसा पूर्ण धाये ।
तदां विठ्ठलें बाहिलें नामयातें । पुढें आणिलें चांगले ताट त्यातें ॥७५॥
महादिव्य मिष्टान्न  वाढोनि आणी । सती रुक्मिणी भक्तिप्रेमखाणी ।
करें घास घालीं मुखी नामयातें । बहू सांतवी थापटी पाठि हातें ॥७६॥
हरी़च्या करें शेष हें वैष्णवांचें । किती वानिजे भाग्य या नामयाचें ।
निजांकी तया बैसवी नामयासी । मुखीं कूरवाळी बुझवी तयासी ॥७७॥
असा जो लळा पाळितो सज्जनाचा । असे माय हा बाप सर्वांजनाचा ।
अळंदीस उत्साह नारायणानें । असा दाविला भक्तवृंदासि तेणें ॥७८॥
महा तोष पोटीं तयांते न माय । अम्हां जोडले धन्य देवेशपाय ।
असा सोहळा जन्म कोट्यानकोटी । तपा अर्जितां तैं मिळे देवभेटी ॥७९॥
॥ इति श्रीज्ञानेश्वरविजयमहाकाव्ये समाधिवर्णने
भोजनविलासकथनं नाम षष्ठोध्याय:

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP