समाधि प्रकरण - अध्याय तिसरा

निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


पुसे रुक्मिणी देवदेवासि भावें । म्हणे ’गूढहे तत्व मातें वदावें ।
कलीमाजि या प्रकृतालागि सोपी । करा कां सुगीता परब्रम्हरुपी’॥१॥
हरी बोलले ऐक वो सुंदरांगी । तुला सांगतों गुह्य मी या प्रसंगी ।
पुरा व्यासरुपेंचि सारीं पुराणें । महाभारता म्यांच केलें सुजाणे ॥२॥
चहूं वेदिंच्या म्यां विभागासि केलें । मुनी शिष्य दिल्हें तया साच बोले ।
महावेद शाखोपशाखा उदंडा । रचोनी करी एक तो खंड खंडा ॥३॥
नसे बुद्धि येकासि सारा धराया । मला हेंचे की कार्य शाखा कराया ।
ऋषी शिष्य पैलादि ते जाण माझे । तया वाटितां वेद लोंकी विराजे ॥४॥
वैशंपायनही तयांत बरवा तो शिष्य माझा सती
म्यां हें भारत त्यास कीं पढविलें देखोनियां सन्मती ।
तेणें तेचि पुढें परीक्षितिसुता जन्मेजयाकारणें
केले कीं कथनासि त्यासि घडल्या त्या विप्रहत्या म्हणे ॥५॥
होता पांडववंश तोंवरि असे चौथ्या कलीच्या युगी
कांते जाण युधिष्ठिराख्य शक तो तों वेदशास्त्रा सुगी ।
झाला त्यावरि विक्रमाख्य बरवा तोही भला जाहला ॥६॥
होते तोंवरि विप्रवृंद बरवे आचारयज्ञादिकें
शाखा - अध्ययनें करोनि असती गीर्वाण - विद्याधिकें ।
झाला तो मग शालिवाहन महा कर्ता शकाचा तदां
झाले भूपति म्लेंच्छ दुष्ट करिते गोब्राह्मणांच्या वधा ॥७॥
तैं ब्राह्मण्य समस्त हीन घडलें वृत्तीवना कष्टलें
वेदाभ्यास नसे न यज्ञविधि तो गीर्वाणहे भ्रष्टलें ।
झाले सेवक हे अविध-कुळीचे आभासमात्रें द्विजा
जाणावे उरलें नसेचि दुसरें संध्या नसे श्रीपुजा ॥८॥
कोणी वैदिकही तयांत वसती दंभेंचि ते नष्टले
नाही शास्त्रविचार वित्तविषयी हिंडोने ते भ्रष्टले ।
तेव्हां तत्वविचार कोण कथिता लोकांत दुर्ब्राम्हणा
यासाठीं करुणा करोनि रचिली गीता जगत्तारणा ॥९॥
याअर्थी अवतार म्यांचि धरिला या ज्ञानदेवाभिघें
केले प्राकृत भाष्य मान्य सकळां लौकांसि वैशारदें ।
आतां प्राकृत ग्रंथ हेच पढतां जातील मुक्तीप्रती
कैचे वेद पुराण यज्ञरचना कैं धर्म आतां सती ॥१०॥
आतां ऐक रहस्य भक्ति धरिजे मन्नाम उच्चारिजे
मन्नामेंचि कलींत आप तरिजे लोकांसही तारिजे ।
माझी कीर्तिसुधा सुखें निजमुखें ते सज्जनी प्राशिजे
हो कां संस्कृत प्राकृतेंचि अथवा येणें कली नाशिजे ॥११॥
असें ऐकतां तोषली देवराणी । जिची पूर्ण केली हरीनें शिराणी ।
तदां ज्ञानदेवांस दिल्ही समाधी । महावैभवें विठ्ठले घोषवेदी ॥१२॥
विमानी महापुष्पकीं रात्रि नेली । महानंदयोगेंचि सद्भक्तमेळी ।
सदांही कथा हेचि ज्ञानेश्वराची । हरीच्या मुखीं श्लाघना सद्‍गुणाची ॥१३॥
रविउदय तदां तो जाहला दिव्य जेव्हां
नरहरि करि आज्ञा त्या विमानसि तेव्हा ।
धरणितळिं समस्तीं ऊतरोनी द्विजांनी
करिति सकळ संध्यास्नानदानें विधानीं ॥१४॥
न देखोनि ज्ञानेश्वरा संतलोकी । तदां मांडिलासे महाशोक तो कीं ।
न देखेंचि ते मूर्ति ज्ञानेश्वराची । यया लोचनीं दूसरी श्रीधराची ॥१५॥
तदां देव संबोखिती तूं निवृत्ती  । महादेव तूं काय हे तूज खंती ।
जगा तारिता तूंचि कीं आदि होसी । नव्हे युक्त हे क्लेश तूझ्या मनासी ॥१६॥
तदा दीर्घ सोपान पायांसि लोटे । तदां मुक्तिबायीस या देव भेटे ।
न देखोनियां लोचनी ज्ञानदेवा । न कंठे आम्हां साच बा वासुदेवा ॥१७॥
धरी देव सोपान तो एक हातें । दुजी मुक्ति बाळा धरी अन्यहस्तें ।
तदां नामदेवादि भक्तांसमेंतें । शमी खालुते बैसले देव तेथें ॥१८॥
हळहळ करिती ते संत सद्भक्त सारे । स्तवित अमळ चित्तें कृष्ण विष्णु मुरारे ।
विकळ सकळ आम्हीं जाहलों आजि देवा । त्वरित सदय आम्हां भेटवी ज्ञानदेवा
हरि म्हणति पहा रे सर्वभूतांत त्यातें
सकळहि घडला हे ज्ञानदेवा विभूतें ।
परम अणुभरीही ठाव न हीं निराळा
अचळचळसमस्तीं एकरुपें मिळाला ॥२०॥
अवचित नभगर्भी वर्तली व्योमवाणी
म्हणत श्रवण कीजे गोष्टि हे सज्जनांनी ।
अढळ सकळ काळीं हेचि जाली अळंदी
त्रिभुवन - जन तारी मुक्तिही यीस वंदी ॥२१॥
सिद्धेश ज्ञानेश्वर हे अळंदी । सदां असे ज्ञानविधी समाधी ।
अनादि यीतें म्हणवोनि जाणा । नव्हे कदा शोक बरा सुजाणा ॥२२॥
तेथें मिळाले सनकादि संत । हे ऐकतां केवळ हर्षभूत ।
पितोनि टाळ्या जयकार केला । तो नांद ब्रह्मांड भरोनि गेला ॥२३॥
प्रस्थान कीजे मग देवदेवें । हें योजिलें देखुनि नामदेवें ।
तैं घातली लोळण भूमिदेशीं । पिटी तदां भाळ करं विशेषीं ॥२४॥
रडे वोरडे नामया दीर्घ-कंठें । तया ज्ञानरत्नाविना तों न कंठे ।
म्हणे प्राण टाकीन वांचोनि कांही । मला या जगीं साधणें अन्य नाही ॥२५॥
तदा पाहिलें विठ्ठलें नामयातें । म्हणे लागलें कोण वेडें ययातें ।
उगा कां रडे वोरडे व्यर्थ नामा । यया जाणत्या सांतवी कोण तो मा ॥२६॥
पुसे पंढरीनाथ या नामदेवा । वृथा खेद काशसि देतोसि जीवा ।
नसे ठाव दु:खासि कोठेंचि कांही । तुला सांगिजे काय तें आणिकांही ॥२७॥
म्हणे सांग तूझ्या मनीं काय आहे । वृथा फुंदसी गोष्टि हे युक्त नोहे ।
वदे काय तुझ्या मनीं साच वाणी । तुझी ऊरली कोणती ते शिराणी ॥२८॥
असें ऐकतां त्यासि संतोष वाटे । पुढें बोलतां बोलतां कंठ दाटे ।
म्हणे ज्ञानदेवास दावीं दयाळा । तयावेगळा अर्थ नेदी निराळा ॥२९॥
मला ज्ञानदेवाविना तों न कंठे । पुन्हा देखिजे एकदां हेचि वाटे ।
तया भेटिजे आटिजे शोकसिंधू । मना आवडे पूरवी दीनबंधू ॥३०॥
असी ऐकतां नामयाची सुवाणी । तदां हासिले बोलिले चक्रपाणी ।
अम्ही दीधली ज्ञानदेवा समाधि । पुन्हा तो कसा ऊठवावा सुबूद्धि ॥३१॥
नये आहुती होमिली जेंवि हातीं । तसी गोष्टि हे तूं न वाहेचि खंती ।
समुद्रीं जसी मीनली मेघधारा । नभीं लीन झाला जसा थोर वारा ॥३२॥
पुन्हा ऊठणें तेंवि ज्ञानेश्वराचें । नव्हे शोक टाकी नसे काम याचें ।
नको आळ घेऊं वृथा नामदेवा । स्मरें अंतरी यापरी ज्ञानदेवा ॥३३॥
असे सर्व भूतांवरे ज्ञान कांही । तयावेगळें दुसरें साच नाहीं ।
अरे देखिला जो परिछिन्न होता । समस्ता जगीं व्यापला तोचि आतां ॥३४॥
मिळाली स्वयें सागरीं जाण गंगा । पुन्हा ते कसी सांग येईल मागां ।
तसा मीनला व्यापकीं साच ज्ञानी । तया दाविजे केंवि तूं गोष्टि मानीं ॥३५॥
हा ज्ञानागर ज्ञानसागर असे हा ज्ञानतारुं जना
हा ज्ञानांजन हाचि दान विलसे ज्ञानें दिसे सज्जनां ।
ध्यानें गम्य घडे यथार्थ वदतों ध्यानेंचि हा सांपडे
यासाठी मम गोष्टि ऐक बरवी ध्यानी स्मरे रोकडें ॥३६॥
मातें पाहुनि मीच तो म्हणुनियां भावीं सुखें नामया
माझें रुपचि तें दुजेपण कधीं नाहीं अह्मांतें तया ।
माझा नाम - सुघोष नित्य करिं तूं मातेंचि तूं आळवीं
मी ज्ञानेश्वर जाण दृश्य तुजला मातेंचि तूं पालवीं ॥३७॥
म्हणे नामा देवा ! तळमळ मला फार सुटली
न राहे माझ्या या मनिं डहुळली दु:खपटली ।
मला आतां जेव्हां दरुषण नव्हे ज्ञाननिलया
न राहे या लोकीं मम तनु असें जाण सदया ॥३८॥
समर्थाच्या बाळा न पुरति लळे केंवि कथिजे
तुझ्या दासें इच्छा करुनि फळ कैसें न पविजे ? ।
नसे मातें वाटे हरिजन तयां दुर्लभ जनीं
हरी तूं विश्वात्मा अससि अमुतें तातजननी ॥३९॥
स्वभक्तासाठीं त्वां अघट घडवावें तरि हरी
तयाचें पाळावें वचन सहसा त्वां नरहरी ।
कसा पार्थासाठीं कळवळुनि तात्काळ अपुलें
स्वरुपा दावावें हरि-विधि-सुरीं ना निरखिलें ॥४०॥
घडावीं तात्काळीं अमित लुगडीं एक निमिषीं
तया पांचाळीची कळवळ तुला कां हरि असी ।
निशीं शाखापत्राप्रति करुनि आरांगण हरी
महान्नें दुर्वासा रचुनि भयपीडा परिहरी ॥४१॥
दहा सोंगें एका धरिसे तरि भक्तार्थ सखया !
अम्हांसाठीं कैशी असट करिसी ते तव दया !
घडावेंना तेंही घडविसि मनीं साच धरितां
कसा होसी देवा कृपणपण आतांचि करितां ॥४२॥
गजेंद्रें बाहावें तुज तंव हरी धांवसि कसा
खगेंद्रा टाकोनी अमित पडला तूज वळसा ।
स्वभक्तांचे ऐसे मनिं धरुनि तूं पाळिसे लळे
अम्हांसाठीं कैसा घडसि अति निष्ठूर न कळे ॥४३॥
करीं दीनानाथा विरुद अपुलें साच बरवें
न होतां या नावा त्यजुनि मग लोकांत मिरवें ।
न जावें दैन्यानें तरि मिळुनि हातीं सुरतरु
तया कोणी लोकीं भजल मग सांगें सुरगुरु ॥४४॥
स्वभक्तांच्या छंदा पुरविसि हरि तूं प्रतियुगीं
अम्हांसाठीं मुद्रा अपण धरिली मौनचि उगीं ।
मला दावीं ज्ञानेश्वर दवडिजे शोक परता
असा माझा स्वामी अससि विभु तूं श्रेष्ठ पुरता ॥४५॥
असी हे नाम्याची परिसुनि सुवाणी करुण हे
तदां वीठोबाच्या मुखिं किमपिही शब्दचि न ये ।
तटस्थाकारें तो त्रिभुवनपती स्तब्ध बसला
कसें कीजे नामा धरुनि नसता आळ रुसला ॥४६॥
न कीजे म्यां याचें तरि पळभरी जीव न धरी
तदां माझें गेलें यश सकळ कांहीच न उरी ।
अम्हीं कैसें वांचूं जगतिं मग नाम्याविण घडी
असे माझ्या प्राणाहुनि अधिक हा गोष्टी उघडी ॥४७॥
करावें कीं याच्या असल मनिचें हेंचि बरवें
तदां माझें सारें यश भुवनकोशांत मिरवे ।
न होतां हें गेलें सकळ मिळवीलें बहु-युगें
स्वभक्ता कैवारी म्हणुनि वदिजे कां मग जगें ॥४८॥
अलिंगी नाम्यातें पसरुनि भुजा च्यारि हरि तो
स्वभक्तांच्या तापा क्षण न लगतां नित्य हरितो ।
कसा तो खेदाचा परिहर करीना निजगडी
रडे नाम्या ऐसा अठौनि स्वमित्रा घडघडी ॥४९॥
कर स्पर्शी माथां सकळ करिता शोक परता
स्वदासांच्या चित्ता उचित फळ देणार पुरता
तदां बोले नाम्याप्र्ति हरि मुखें धन्य अससी
त्रिलोकांच्या भाग्या उघड करिता तूंचि दिससी ॥५०॥
अरे ! मद्भक्तांची सरि कवण लोकीं करिल या
जयाच्या माथां ते मम विलसते फारचि दया ।
न होणेंही व्हावें धरिति मनिं तैं भक्त सहसा
असे मी कामारी कथित करितों हा भरवसा ॥५१॥
असोनी ऐसेंही तुज कथितसें जाण बरवें
नसे येथें ज्ञानी अमळ निजलोकांत मिरवे ।
असे जेथें गेला नियत मम तो पुंडलिक रे
नये तो माघारा म्हणुनि न करीं शोक न झुरें ॥५२॥
चला जाऊं आतां सकळ सखया पंढरपुरा
करीं तेथें माझें भजन करिसी ज्यापरि पुरा ।
तदां नामा बोले मज निरखवी ज्ञानविधि तो
न होतां चित्ताचें न करि मग मी पूर्वविधि तो ॥५३॥
न नाचे भीमेच्या अति वितत त्या रम्य पुलिनीं ।
कथा वार्ता वीणा सकळ तव पादार्पण करी
न राहे मी आतां नियत तुझिया पंढरपुरीं ॥५४॥
वनीं एकांती वसुनि भलत्याही गिरिदरीं
करीं आयुष्याचें क्षपण परिसे तूं नरहरी ।
फळें कंदे मूळें गळित तरुपानें तृण जळें
करुं वृत्ती आतां जंववरि असे जीवित बळें ॥५५॥
असें नामा बोले नयनि जळधारा गळतसे
ययातें देखोनी नरहरि मनीं विव्हळ दिसे ।
कसें कीजे आतां कवण रचिजे यत्न बरवा
कसा ज्ञानी येतो दहनिं मिळला कापुररवा ॥५६॥
तदां बोले आयी हळुच रखुमाई सुविनयें ।
अजी जावे तेथें त्वरित विनतेच्याचि तनयें ।
वदावी ते आज्ञा सरस अपुली पुंडलिक त्या
तुम्ही ज्ञानोबांसी धरणिवरि यावें जनहिता ॥५७॥
न ऐके हा नामा कवण मग तो यत्न करिजे
यया बाळाचेंहि हित अपुण चित्तांत धरिजे ।
असे बोले देवा त्रिजगजननी भीमकसुता
तदां बाहे वेगीं हरि गरूड तो भक्त पुरता ॥५८॥
म्हणे जावें वेगीं मम पदिं वसे पुंडलिक तो
असे ज्ञानी तेथें म्हणुनि तुज मी गूज कथितों ।
तयां दोघां आणीं कथन करि वृत्तांत समुदा
तुम्ही भेटा मातें पुनरपि वसा जाउनि पदा ॥५९॥
पहा नामा छंदे बहुत परि हा दीर्घ रडतो
ययाच्या हृत्पद्मीं अति विरह संताप कढतो ।
यया भेटायातें सहज उभयीं येउनि घडी
पुन्हा जावें आह्मां निरखुनि कधीं गोष्टि उघडी ॥६०॥
असी आज्ञा होतां गरुड अतितोषें उडतसे
पहा माझ्या वेगा पवन मग वेगें क्रमितसे ।
स्वपक्षाक्षेपें जो सकळ करि आंदोलन जगा
लयांतीच्या वातासम उडवितो भूधरनगा ॥६१॥
त्वरेनें वैकुंठा घडि पळ न लागे तंव सरे
महावेगें जातां गरुड तनुचें भान विसरे ।
त्रिलोकेशा वाहे त्वरित खग जाये निजपदा
सडा जातां त्यातें किति उसिर तो लागल वदा ॥६२॥
तदां संतोषें तो जय-रव उठे वैष्णवगणीं
आह्मां सोपा आहे त्रिभुवनमणी विठ्ठल धणी ।
पहा ! आम्ही जें जें मनिं धरितसों तेंचि पुरवी
तमाची ते बाधा परिहर कसा तो करि रवी ॥६३॥
निरोपातें सांगे गरुड निनयें ’पुंडलिकजी !
तुम्हांते पाचारी नरहरि चलावें त्वरित जी ।
त्रिलोकीचे आले हरिजन धरे मोक्षपदिंचे
तुम्ही नाहीं आलां म्हणुनि विभुला तोष न वचे ॥६४॥
सवें घ्या ज्ञानेशा हरि बहुतसी वाट निरखी
त्वरें भूलोकांतें सरुनि करिजे विठ्ठल सुखी !
तुम्हांसाठी नामा बहुत झुरतो खंति करितो
पुन्हा देवाचें तें स्मरस्मरुनियां पाय धरितो ॥६५॥
ययासाठी दोघीं त्वरित निघणें युक्त दिसतें
तुम्हां नेतों खांदी बसउनि पळामाजि निरुतें ।’
असी ऐके तेव्हां गरूड मुखिंची गोष्टि बरवी
तदां पुंडोबाच्या सुख अमुप वाढे निजविवीं ॥६६॥
पुजी प्रेमें भावें हरिसम सखा अंडजपती
धरी ब्रह्मांडेशा सबळ निजखांदी द्रुतगती ।
हरीचा हा घोडा त्रिभुवनिं न जोडा जन यया
अशा स्तोत्रे तोषा बहुतचि करी पुंडलिक या ॥६७॥
’ बरा झालों मीही बहुत दिवसां धन्य सखया
हरीनें केली कीं सय मज मनीं आणुनि दया ।
त्यजोनी तैं गेला प्रभुवर पहा पंढरपुरा
असा भक्तांचे हा यश मिरविता सत्प्रिय खरा ॥६८॥
यया ज्ञानेशार्थी परम विरहें तापित दिसे
मलाही हा लाहो परम घडला यातरि मिसें ।
चलावें ज्ञानोबा अज निरखितो वाट तुमची
तुम्हांसाठी झाली सय बहु दिसां आठवुनियां
मनी त्या मोहाच्या निधिस अपुल्या सांठउनियां ।
पुन्हां आम्हीं तुम्हीं नयनिं निरखूं तो सुरपति
पतीतांचा त्राता म्हनौनि नयमें भक्त जपती ॥७०॥
पती तो लक्ष्मीचा त्रिभुवनपती तो व्रजपती
पती हा विश्वाचा म्हणुनि भजताहे पशुपती ।
पती पृथ्वीचाही घडुनि वधिला राक्षसपती
पतीतोद्धाराचा नियत्म ह्मणवी शेष सुपती ॥७१॥ ’
असें पुंडलीकामुखें ज्ञानदेवें । बरे ऐकतां वाक्य बोले चलावें ।
अम्हां हेंच सेवा करुं तोष देवा । सदां सर्वसौख्यामृता तोचि ठेवा ॥७२॥
विमानासि पाचारिलें पुंडलिकें । तदां पातले कोटिसूर्येंदु - लेखें ।
तयामाजिं आरुढले भक्त दोघे । महा प्रेम ज्यांच्या मनी नित्य जागे ॥७३॥
अगा वैनतेया पुढें जा हरीला । अम्ही पातलों सांग लक्ष्मीपतीला ।
सुखाचा अम्हां सोहळा प्राप्त झाला । समाजांत लक्षूं तया विठ्ठलाला ॥७४॥
इति श्रीज्ञानेश्वरविजये समाधिवर्णन पुंडलीकागमनकथनं नाम
तृतीयोध्याय: ॥ श्रीगुरुनाथ ॥ श्लोक १९३ ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP