समाधि प्रकरण - अध्याय दुसरा

निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


रत्नकळा सवायी.

सनकादि महामुनि तैं मिनले करिती निगमागम घोष बरे
शुभगायन सामऋषी करिती अतिनाद विरंचिकटाह भरे ।
भगवज्जन गर्जनही नृहरी हरि विठ्ठल राम अशा गजरें
घनटाळमृदंग विणे करताळ महारव ऐकुनि दोषु झुरे ॥१॥
दिनपंचक याचपरी अति उत्सव देव अळंदिस राहियले
अतिधन्य सुमान्य अळंदिपुरी जिस एकहि मोक्षपुरी न तुळे ।
हरि जेथ उभे विभु रुक्मिणिसीं परितिष्ठति भक्त उभे सगळे
क्षण एक जरी नर येथ थिरे तरि पातकपर्वत तैंचि गळे ॥२॥
मग पाहुनि ज्ञाननिधिप्रति बोलति विठ्ठल " तूं परिसे सखया
तव दिव्य कवित्व जनीं नर वाचिल त्यावरि मी करिं पूर्ण दया ।
मज तो जन भेटल तो मज पावल तो मज चिंतिल तो मज या
निजभक्तजनीं अतिवल्लभ होईल देयिन मी पद पूर्ण तया" ॥३॥
परिसोनि असें परमामृतभाषण ज्ञानविधी नमिती चरणीं
करकंज शिरीं हरि ठेउनियां उठवी अपुला निजभक्तमणी ।
समुदाय समेत निघे मग विठ्ठल येत नदीतटिं तेचक्षणीं
हरिदास समस्त तदां करिती शुभ मज्जन पाउनि हर्ष मनीं ॥४॥
==
स्त्रग्धरा.
नाम्याचा पुत्र नारा सुचवित अपुल्या नामदेवास कानीं
देवाला पूस बापा सकळहि महिमा क्षेत्रिची या पुराणीं ।
व्हावी लोकांत सारी प्रकट हरिमुखें सांगतां भक्तवृंदी
पावावी मूढलोकी परि हरि पदवी सेवितां हे अळंदी ॥५॥
संतोषे नामदेवें मग हरिस मुखें पूसिलें नम्रवाणी
सांगावी क्षेत्रिची या अतितर महिमा काय ते चक्रपाणी ! ।
होती कोणायुगी हे कवण तरि असे सांग क्षेत्रज्ञ येथें
या लोकीं हे अळंदी म्हणुनि मिरवली नाम कां सांग यीतें ॥६॥
येथें तो धर्म लोकीं कवण विचरिजे काय तें दान द्यावें
जी येथें पुण्य केलें तरि घडत किती साच देयें वदावें ।
ऐसें या नामयाचे गदित परिसतां तोषला केशिराजा
सारे जे संत तेही प्रमुदित घडले साश्रुनेत्रेंचि वोजा ॥७॥
ह्मणत धन्य हरी मग नामया । पुससि पुण्यकथेसि अनामया ।
प्रतियुगीं मजला असणें असे । असिच ज्ञान - समाधि सदां असे ॥८॥
वैकुंठ भूतळवटीं तुज सांगतो मी । अष्टदशाहुनि वरिष्ठचि पीठनेमी
काशीहुनी वडिल सया अळंदी ! येथें तपें करुनि पावति मोक्ष सिद्धि
शैवागमीं शिव विरंचिस बोधिताहे । संवाद अतिशये तुज सांगताहें
दक्षासि द्रोह घडला अति शंकराचा । तो मुक्त येथ घडला तपतांचि साचा
वैवस्वतादिक मनू पदवी वराया । आले पुरा बहुतवार तपें कराया ।
हे नारदादि बहु भक्त तपोनि येथें । ते पावले परम सज्जन मत्पदातें ॥११॥
हें तो असे अति पुरातन तीर्थ नामा । येथेंचि मुक्त घडला गुरुशाप सोमा !
मोक्षासि दे ह्मणौनि नाम इचें अळंदी । हे या कळींत अति दुर्लभ जाण आधीं
येथें दिल्हें परम अल्पचि दान तेंही । मेरुसमान घडतें अनुमान नाहीं ।
यज्ञादि धर्म करितांचि अनंत होतें । झालों तरीं सुरगुरु वदवे न मातें ॥१३॥
देतील अन्न नर एकचि घांस येथें । पृथ्वीस सागर किल्ह्यासम पुण्य होतें ।
जो एकदांचि मम नाम वदेल वाणी । तो सांगवेद-फल पावल सत्य मानी ॥१४॥
येथें निवास करितां घडली तपस्या । लाभे सुरेंद्र पदवी सहजीं मनुष्या ।
विश्वास मात्र धरिजे तरि सर्व कांही । होयील सिद्धि मग त्यासि विलंब नाहीं
ऐसें असे परम गुह्य म्हणोनि तोषें । म्यां स्थापिलें सतत ज्ञान धना विशेषें ।
मी राहिलों निकट येउनि याजपाशीं । येथेचि मी करिन सर्व जनांसि काशी ॥१६॥
आनंदकानन यथार्थ असे अलंदी । हे मोक्षदायक म्हणोन अखंड वंदी ।
विश्वेश हा ह्मणुनि भाविसि सिद्धलिंगा । इंद्रायणी परमपावन देवगंगा ॥१७॥
हे ऐकतांचि भगवन्मुखिची सुवाणी । ते पावले परम वैष्णव तोष - खाणी ।
ते नाचती उडति ते जयशब्द तोंडें । उच्चारितां रव विरंचिकरंड कोंडे ॥१८॥
ज्ञानेश्वरार्थ मग दिव्यसमाधि-शय्या । कीजे ह्नणोनि वदले हरिदास वर्या ।
आले विठोसहित भक्त समाधिठाया । सिद्धेश्वरानिकट पूर्व दिसे कराया ॥१९॥
ध्यानीं सदा निरत नित्य निवृत्तिनाथ । तोही त्यजोनि मग सत्वर येथ येत ।
सोपान मुक्ति अति सत्वर सिद्ध होती । ज्ञानेश्वरा निकट वर्तति नित्यभक्ति ॥२०॥
ज्ञानेश्वरें नमुनि सादर विठ्ठलातें । आज्ञा समाधिस सुखें पुसतां विभूतें ।
ठेवी महंत अभयंकर हस्त माथां । जो उद्धरी सकळ दीनजनां अनाथा ॥२१॥
आज्ञा करी बैस सुखें समाधी । सर्वात्मरुपीं मिळसी सुबुद्धी ।
हा मोक्ष प्रत्यक्ष तुलाचि जोडे । तूंसारिखे या त्रिजगांत थोडे ॥२२॥
तैं इंद्रचंद्रादि सुरेंद्र आले । विरंचि दक्षादि प्रजेश आले ।
गंधर्व विद्याधर सिद्ध आले । वसू मनू मारुत तैं मिळाले ॥२३॥
तेत्तीसकोटी अमरेंद्र-मेळा । पहावया कौतुक तैं मिळाला ।
त्रैलोक्यवासी ऋषि मुख्य आले । पाताळिंचे पन्नगही निघाले ॥२४॥
सद्भक्त जे मानव तैं मिळाले । राजर्षि मोठे जनकादि आले ।
ब्रह्मर्षि आले शुक वामदेव । जे श्रेष्ठ व्यासादि महत्प्रभाव ॥२५॥
त्या सत्यभामादिक देवनारी । सोळासहस्त्राधिक गोपनारी ।
चंद्रावळी त्यांतहि मुख्य राधा । संतोषल्या देखुनियां मुकुंदा ॥२६॥
प्रल्हद आला सहदैत्य पासीं । लंकापती राक्षस - यूथपासीं ।
आला तदां नारद भक्तराजा । गातो मुखें विठ्ठलनाम वोजा ॥२७॥
वशिष्ठ तो श्रेष्ठ ऋषीसमेतें । आला समाधीस विलोकनाथें ।
जे अंबरीषादिक भक्तराजे । आले असे श्रेष्ठ समाधि गाजे ॥२८॥
कैलासवासी हरपार्वतीसी । समाधि - संतोष विलोकनासी ।
दावावया कौतुक शैलजेला । नंदीश्वरारुढ जवेंचि आला ॥२९॥
साक्षात्‍त्रिलोकेश्वर पांडुरंग । जेथें उभा तेथिल काय रंग ।
वर्णावया ये कवि-मंद - वाचे । उदार ऐसे गुण केशवाचे ॥३०॥
केली समस्तीं जयघोषवाणी । प्रसून - वृष्टी रचिल्या सुरांनी ।
सुरांगना आरतिया सुदाटीं । वोवाळीती विठ्ठल रत्नताटीं ॥३१॥
ऐसा महोत्साह विराजलाहे । समाधि ज्ञानेश्व सेविताहे ।
नाचे तदां तो परसा सुभक्त । नामा तसा नाचत प्रेमयुक्त ॥३२॥
तैं नामदेववामनिं खंति दाटे । नेत्रोत्थ बाष्पांबु विशेष लोटे ।
बोले तदा श्रीधर रुक्मिणीसी । समाधि हा सेवित ज्ञानरासी ॥३३॥
ऐसा न देखे ममभक्त दूजा । कलींत हा दुर्लभ ज्ञानराजा ।
हा जाणसी कीं सति प्राण माझा । यासारिखा हाचि यथार्थ वोजा ॥३४॥
सर्वा जगाचा अपमृत्युहर्ता । संजीवनी जाणसि ज्ञाननाथा ।
अळंदिका-वासचि योग्य यातें । आह्मी वसूं यासह तोष-चित्तें ॥३५॥
जो भक्त मातें निरखील डोळां । ज्ञानेश्वरा सन्निध येक वेळां ।
तारील गोत्रासह सत्कुळासी । होयील वैकुंठपदी विलासी ॥३६॥
हें धन्य आहे शिवपीठ नारी । श्रीनीळकंठाख्य वसे पुरारी ।
येथे करी श्रेष्ठ तपा विरंची । तो पावला ब्रह्मपदा त्रिवाचीं ॥३७॥
इंद्रा घडे गौतम-शाप भारी । भोगी अहल्या कपटें सुनारी ।
निंद्यत्व येतां सुरलोकनाथा । येथें करी तो तप वृत्रहंता ॥३८॥
झाला तदां पातकमुक्त देहीं । तो पावला देव-पदासी पाहीं ।
इद्रायणी नाम नदीस तेणें । या ठेविलें तोषुनि वासवानें ॥३९॥
यीच्या तिरीं इंदुपुरी विराजे । या पंचकोशांतरि फार साजे ।
भोगी गुरुची शशि दिव्य तारा । ते मागतां नेदिच त्या भ्रतारा ॥४०॥
शापी तदां तो गुरु त्या शशीतें । प्रतारिसी फारचि काय मातें ।
क्षयी कलंकी घडसील चंद्रा । तेणें घडे रोग तया द्विजेंद्रा ॥४१॥
टाकोनि तारा क्षयरोग होतां । मनांतिलीही सरली अहंता ।
बृहस्पतीच्या वचनेंचि येथें । केली तपस्या उडुलोकनाथें ॥४२॥
येथें त्रिवेणी अतिगुप्त वाहे । भागीरथी भैरवसंन्निधी हे ।
पूर्वेवरी पर्वतराजकन्या । माया वसे शंभुस ती सुधन्या ॥४३॥
सभोंवते हे वनवृक्ष पाही । हे देव सारे अनुमान नाहीं ।
तात्काळ अस्थी घडतात पाणी । हे तीर्थकर्ता विभु चक्रपाणी ॥४४॥
हे पंढरीहोनि विशेष आहे । कळींत सोपी सकळां जना हे ।
नसे कळीचें भय या अळंदी । येवोनि जंतू जरि तीर्थ वंदी ॥४५॥
प्रेमें वदे विठ्ठल रुक्मिणीतें । उचंबळे अद्‍भुत प्रेम त्यातें ।
सबाष्पकंठे हरि हेंचि बोले । ते धन्य जीच्या उदरासि आले ॥४६॥
ऐकोनि ऐशी हरिवक्त्रवाणी । संतोषली पंढरिनाथराणी ।
ते रुक्मिणी पूसतसे हरीला । विचित्र ज्याची अनुपम्य लीला ॥४७॥
"चौघे महाभक्त उदार साचे । हे पूतळे केवळ चिद्रसाचे ।
हे अंश कोणा सुरसत्तमाचे । स्नेहाळ तूझे पुरुषोत्तमाचे ॥४८॥
कलींत येहीं अवतार केला । किमर्थ हाही विधी सांग बोला ।
सांगा सविस्तार कथा दयाळा । तारी जनातें अतिचित्रलीला ॥" ४९॥
’प्रिये’ म्हणे विठ्ठल ऐक आतां । शंभूचि तूं जाण निवृत्तिनाथा ।
मंदश हा ज्ञानमणी विराजे । सोपान वेदास्य यथार्थ साजे ॥५०॥
जे मुक्ति मी कीं सुजनासि देतो । ते हेचि मुक्ता तुजला कथीतों ।
प्रत्यक्ष झाले कलिमाजि लोकां । उद्धारकर्ते मम भक्त जे कां ॥५१॥
वाहोनि मी मौनचि पंढरितें । आहें नसें भाषण तैंचि मातें ।
सांगावया तत्व यया जनांला । म्यां ज्ञानरुपें अवतार केला ॥५२॥
संवादसौख्यामृतसेवनार्था । कर्मावया शंकर आदिनाथा ।
म्यां आणिलें त्यासि निवृत्तिरुपें । जनांत केलें परतत्व सोपें ॥५३॥
संवादसौख्यामृत हे दिवाळी । देखोनि पाठी विधि धांव घाली ।
सोपानरुपे मम सन्निवानी । हा राहिला यास्तव सत्य मानी ॥५४॥
हे योगमाया मम खेळ सारा । आधीन यीच्या रचिला पसारा ।
विद्या अविद्या म्हणवोनि यीतें । म्यां ठेविलें नांव महासतीतें ॥५५॥
हे बंधरुपा जगिं मुक्तिरुपा । हे शक्ति माझी अमल स्वरुपा ।
तयांत हे केवळ मुक्तिदात्री । मुक्तात्मिका साच घडे धरित्रीं ॥५६॥
जे वर्तली ज्ञानमुखें सुवाणी । जे ऐकती भाविक भक्त कोणी ।
तयांसि तात्काळचि मुक्ति द्यावी । म्यां आणिली यास्तव आदिदेवी ॥५७॥
व्यासें महाभारत रम्य केलें । तें पांचवा वेद म्हणोनि बोलें ।
जो भारतीं वर्णित अर्थ नाहीं । तो साच झाला जगतींत नाही ॥५८॥
तत्रापि त्यामाजि मदीय गीता । म्यां बोधिली पांडवमध्यभक्ता ।
ते मुक्तिदात्री अतिगूढ आहे । भावार्थ तीचा तरि व्यक्त नोहे ॥५९॥
निवृत्ति हा शंकररुपधारी । यती घडे हाच पुरा शरीरी ।
येणें महाभाष्य करोनि गीता । हे ठेविली पंडितपावनार्था ॥६०॥
आपामरांलागि कळावयातें । ते कींव आली अतिथोर मातें
टीका मर्‍हाटी विवरोनि सोपी । करीन मी प्राकृत ज्ञानवापी ॥६१॥
ह्नणोनि केला अवतार आही । त्रिवर्गदेवीं सति जाण भूमीं ।
विकल्प येथें न धरींच कांही । आह्मांविना बोधक अन्य नाहीं ॥६२॥
॥ इति श्रीज्ञानेश्वरविजये समाधिवर्णने द्वितीयोध्याय:
श्रीविठ्ठलप्रीतयेऽस्तु॥

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP